(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

*मालतीबाई नंदिनीची आई*

नंदिनी बाकी सर्व ठीक होती.

एरवी तर ती चार आठ दिवसात घरी जाऊ शकली असती.

परंतु पाय काढून टाकल्यामुळे किती दिवस राहावे लागेल ते सांगता येत नाही असे डॉक्टरांचे मत होते.

पाय काढून टाकल्यामुळे अनेक फिजिकल व सायकॉलॉजिकल समस्या उद्भवू शकणार होत्या.असेही ते म्हणाले .

तिचे शरीर व मन या सर्व आघाताला कसे तोंड देते त्यावर सर्व अवलंबून होते.असे त्यांच्या बोलण्यात आले .

*नंदिनी*

मला अपघात झाला त्याला बहुधा चार दिवस झाले होते .अजूनही मी गुंगीत होते.उठून बसावे स्वतः स्वच्छतागृहात जावे असे मला वाटत होते. एक दिवस मी त्यासाठी आग्रह धरला.अजून सलाईन व इतर सुया काढण्यात आल्या नाहीत .तुम्हाला अशक्तपणा खूप आला आहे तेव्हा अजून काही दिवस पडून  राहावे लागेल असे मला सिस्टरने सांगितले. माझ्या दोन्ही  पायाना अपघातांमध्ये लागले असावे असे माझ्या लक्षात आले होते .पायाना ते ड्रेसिंग करीत असत .माझ्या पायाना किती लागले आहे असे विचारता विशेष नाही काळजी करू नका असे सिस्टर मला सांगे.परंतु मला मात्र माझ्या पायांना बरेच लागले असावे असा संशय येत होता.सिस्टर,डॉक्टर, माझी आई,माझ्यापासून काहीतरी लपवित आहे असे मला वाटे. एक दिवस मी बसण्याचा हट्ट धरला.माझ्या डाव्या पायाला कंड उठत होती.ती स्वत: खाजवावी असे मला वाटत होते. पडून पडून मला कंटाळा आला आहे असे मी सिस्टरला सांगितले.मला एक पंजा असलेली काठी द्या म्हणजे माझे मला खाजवता येईल असे मी म्हटले.मी सलाईन व औषधे चालू असलेला  हात अजिबात हलवणार  नाही असेही सांगितले .मी डॉक्टरांना विचारते त्यानी परवानगी दिल्यास तुम्हाला बसवू असे  सिस्टर म्हणाली.

*डॉक्टर राकेश*

दहा नंबरच्या खोलीतील पेशंट बसायचे म्हणतो काय करू असे सांगत सिस्टर आली.अपघाताला चार दिवस झाले होते .नंदिनीला बसवणेही  आवश्यक होते.तिला सत्य परिस्थिती सांगणे जरूर होतें .तिला माझ्या पद्धतीने सर्व सत्य सांगण्याचा मी निश्चय केला. तिच्यावर आघात होणार हे निश्चित होते.ती त्या आघाताला तोंड कसे देते त्यावर बरेच काही अवलंबून होते.मी दहा नंबरच्या खोलीत नंदिनीकडे गेलो .

*नंदिनी*

डॉक्टर स्वतः माझ्या शेजारी खुर्चीवर येऊन बसले.एरवी ते येत, तपाशीत, सिस्टरला काहीतरी विचारीत आणि निघून जात असत.त्याना कांहीतरी महत्त्वाचे बोलायचे असावे असे माझ्या लक्षात आले.डॉक्टर खोलीत आले की मला नेहमीच उत्साह वाटत असे.डॉक्टरला बघून पेशंटला नेहमीच हुषारी येते परंतु ही हुषारी, हा उत्साह, हा आनंद, त्यातील नव्हता  याची मला जाणीव झाली .या डॉक्टरचे चालणे बोलणे बघणे हसणे तपासणे सर्वच मला प्रिय वाटत होते .हा डॉक्टर मला आवडतो हे माझ्या लक्षात आले .या डॉक्टरच्या प्रेमात तर पडले नाहीना असा विचार माझ्या मनात आला.सिस्टरने व  डॉक्टरांनी मला धरून भिंतीला टेकून बसवले .डॉक्टर बोलू लागले .

" मी आता तुला जे सांगत आहे ते लक्ष देवून ऐक.तुला मोठा धक्का बसणार आहे .परंतु जे होते त्याला आपला बऱ्याच वेळा इलाज नसतो.घटना घडत असतात .आपण त्याला तोंड कसे देतो ते महत्त्वाचे .एखाद्या घटनेचा धैर्याने  स्वीकार केला तर मनाला व शरीराला उभारी येते.मनाचा शरिरावर नेहमी परिणाम होत असतो.याच्याविरुद्धही परिस्थिती असते. शरीर क्लांत असेल, थकलेले असेल,आजारी असेल, तर त्याचा परिणाम मनावर होतो.मनही उदास होते.तुम्ही धैर्यशील आहा असे तुमची आई म्हणत होती."

डॉक्टरांना काहीतरी अतिशय महत्त्वाचे सांगायचे असावे.त्याचा मला मोठा मानसिक धक्का बसेल असे त्यांना वाटत असावे .अशा मानसिक धक्क्याचा अनिष्ट परिणाम माझ्यावर होउ नये  म्हणून डॉक्टर प्रदीर्घ प्रस्तावना करीत होते .त्यांना अशा प्रस्तावनेतून पार्श्वभूमी तयार करायची असावी.कदाचित अपघातांमध्ये माझी एखादी मैत्रीण दगावली असावी आणि ते मला कसे सांगावे असा विचार डॉक्टर करीत असावेत.असा विचार माझ्या मनात आला.

डॉक्टर माझी आई म्हणाली ते खरे आहे .मी निर्विवाद, अपवादात्मक,धैर्यशील आहे.तुम्हाला जे काही सांगायचे असेल ते स्पष्टपणे सांगा .उगीचच गोल गोल सांगत बसू नका .असे मी त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी जे सांगितले ते ऐकून मी मुळापासून हादरून गेले.डॉक्टर एवढी प्रदीर्घ प्रस्तावना कां करीत होते ते मला त्यांनी जे सांगितले ते ऐकल्यावर लक्षात आले.मी त्यांना विचारले जर माझा डावा पाय गुडघ्यातून काढून टाकला आहे तर मग मला माझ्या पायाला कंड उठल्याची संवेदना सारखी कां होते?त्यावर ते म्हणाले असे काही काळ होईल .मेंदूला चेतातंतूंना पायाची सवय आहे .पाय नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही.त्यामुळे कांही पेशंटच्या बाबतीत कांही काळ असे होऊ शकते.  

*डॉक्टर राकेश* 

नंदिनीचा स्वभाव मला खरेच आवडला .आतापर्यंत शिकत असताना व हॉस्पिटल चालू केल्यावर मी असंख्य पेशंट बघितले आहेत .आपला पाय गुडघ्यापासून अपघातात गेला आहे .आपण पूर्वीसारखे कधीही चालू, धावू, जिना, डोंगर चढू शकणार नाही हे कळल्यावर, तिला जबरदस्त अपघात झाल्यामुळे तिचा डावा पाय गुडघ्यातून नाइलाजाने काढून टाकावा लागला हे सांगितल्यावर, तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले.भिंतीवर आपले डोके टेकले .ती तशीच जवळ जवळ पाच मिनिटे स्तब्ध होती. मी व सिस्टर तिची प्रतिक्रिया अजमावित होतो. कोणत्याही प्रतिक्रियेला तोंड देण्याची आमची तयारी होती.मी तिचा हात हातात घेतला .तिची नाडी पहात होतो.नाडी स्थिर व ठोके व्यवस्थित चालू होते . ही पोरगी विशेष आहे.तिच्या आईने सांगितल्याप्रमाणे खरेच ती धीट आहे  याची  मला खात्री पटली.

थोड्या वेळाने तिने डोळे उघडले .तिचे डोळे पाण्याने डबडबले होते.डॉक्टर ठीक आहे. आता यावर उपाय काय ते सांगा. असे तिने विचारले .

*नंदिनीची आई*  

त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी नंदिनीला भेटायला गेले.बाहेर उभ्या असलेल्या सिस्टरने डॉक्टर पेशंटला तपासत आहेत असे  सांगितले .मी हळूच खोलीत प्रवेश केला. डॉक्टर नंदिनीची नाडी पाहात होते.नंदिनी त्याच्याकडे टक लावून पाहात होती .एकाएकी माझ्या मनात यांचा जोडा किती छान दिसेल असा विचार आला. जावई म्हणून मला डॉक्टर खरेच आवडले असते.  ही गोष्ट आता शक्य नाही हेही माझ्या लक्षात आले .अशा लंगड्या मुलीला  डॉक्टर स्वीकारणे कधीच शक्य नव्हते.

माझ्याकडे डॉक्टरांचे लक्ष गेले.या आई या मी तुमच्या मुलीला सर्व काही सांगितले आहे.तुम्ही सांगितल्या प्रमाणे तुमची मुलगी खरेच धैर्यशाली आहे.तिने सर्व आघात व्यवस्थित पचवला आहे. एवढे बोलून डॉक्टर खोलीबाहेर निघून गेले .

मी नंदूजवळ जावून बसले.आई असे कसे झाले ग म्हणून ती माझ्या गळ्यात पडली.मी मायेने तिच्या मस्तकावर थोपटत होते.

*नंदिनी*

आता मला माझे सर्व आयुष्य कुबड्या घेऊन काढावे लागेल का असे स्पष्टपणे मी डॉक्टरांना विचारले .त्यावर डॉक्टरनी जे सांगितले ते ऐकून मला बराच धीर आला.जखम पूर्ण बरी झाल्यावर डॉक्टर माझ्या पायाचे माप जयपूरला पाठविणार होते.काही दिवसांनी जयपूर फूट आला असता. तो बसविल्यावर मला बरीच प्रॅक्टिस करावी लागली असती .बरीच सवय केल्यावर मी व्यवस्थित चालू शकले असते.

*डॉक्टर राकेश* 

नंदिनीची जखम बरी झाली .ती वेगाने सुधारत गेली.मला तिचा धीटपणा खरेच आवडला .ती जवळ जवळ एक महिना हॉस्पिटलमध्ये  होती.तिचे बोलणे, तिचा स्वभाव, तिचे दिसणे, खरेच आवडले होते. तिने हळूच केव्हातरी माझ्या हृदयाची तार मला नकळत  छेडली होती .याचा पत्ता मला तिला डिस्चार्ज दिल्यावर लागला. अर्थात तिची आणि माझी भेट वारंवार होणार होतीच .जयपूर फूट आल्यावर तो कसा बसवावा ,तो घालून कसे चालावे , त्याची काळजी कशी घ्यावी ,इत्यादी गोष्टींसाठी ती हॉस्पिटलमध्ये येणार होतीच .जरी या सर्व गोष्टी फिजिओथेरपिस्ट करणार होता तरीही माझी तिला गरज लागणार होतीच .

थोड्याच दिवसांत जयपूर फूट आला.नंदिनीपेक्षा मलाच जयपूर फूट कधी येतो असे झाले होते.कारण तो आल्यावर नंदिनी मला भेटणार होती .हॉस्पिटलमधून नंदिनीच्या घरी निरोप गेला . नंदिनी तिच्या आईबरोबर हॉस्पिटलमध्ये आली .व्हीलचेअरवर तिला बघवत नव्हते.जयपूर फू‍ट लावल्यावर त्याची सवय केल्यावर,ती अपंग आहे असे चटकन लक्षातही येणार नव्हते हाच एक दिलासा होता.मी फिजिओथेरपिस्टला बोलवून घेतले होते.नंदिनीला जयपूर फूट व्यवस्थित बसला .काही दिवसांच्या (प्रॅक्टिसने)सरावाने ती व्यवस्थित चालू लागली .तिला चढउतारही करता येऊ लागला.ती यायच्यावेळी मी मला शक्यतो मोकळा ठेवीत असे.प्रत्येक वेळी शक्यतो तिची आई बरोबर येत असे.थोड्याच दिवसात नंदिनी हॉस्पिटलमध्ये यायची थांबली असती . तिला बघता येणार नाही. तिला भेटता येणार नाही याचा मला विषाद वाटत होता.

नंदिनीला भेटून मला कुठे तरी मला माझी सहचरी भेटली असे वाटत होते.तिचा फोन नंबर माझ्याजवळ होता .ती जयपूर फूटने स्वावलंबी व स्वतंत्र झाल्यावर   तिला एकटीलाच कुठेतरी बोलवून घ्यावे आणि आपल्या मनातील भाव तिच्या जवळ व्यक्त करावेत असे मी ठरविले .

*नंदिनीची आई* 

मी बरेच पावसाळे पाहिले आहेत .हॉस्पिटलमध्ये जायचे जयपूर फूट आला आहे असे म्हटल्याबरोबर  नंदिनीच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद मी पाहिला .मी तिची आई आहे .तिची नस अन् नस मी ओळखते .हा आनंद केवळ जयपूर फूट आल्याचाच नव्हता तर राकेश भेटणार  याचाही होता किंबहुना राकेश भेटणार याचा जास्त होता हे मी ओळखले.

मी नंदिनी बरोबर हॉस्पिटलमध्ये गेले .डॉक्टर राकेश व नंदिनी यांची बॉडी लेंग्वेज मला दिसत होती.मांजर जरी डोळे मिटून दूध पित असले तरी इतर ते पाहात असतातच.

डॉक्टर बहुधा अापणहून काही बोलणार नाहीत.कदाचित डॉक्टरांच्या नीतिमत्तेविरुद्ध (एथिक्स ) ते असेल.डॉक्टरने पेशंटच्या प्रेमात पडू नये असा काही कायदा नाही.

नंदिनी डॉक्टरांनी नाकारले तर, अशा संभ्रमात राहील. डॉक्टरांचा नकार हा तिला तिचा अपमान वाटेल .ही कोंडी आपणच कुठेतरी फोडली पाहिजे .

मी हॉस्पिटलच्या काउंटरवर जावून डॉक्टरांचा घरचा पत्ता घेतला.एक दिवस त्यांच्या आईला जावून भेटले .अपघातापासूनची सर्व हकीगत त्यांना सांगितली. तुम्हाला लंगडी नंदिनी पसंत असेल, डॉक्टरना नंदिनी पसंत असेल,तर मी मुलगी सांगून आली आहे असे समजा असेही सांगितले .त्यांना नंदिनीचा फोटो दाखवला .एक दिवस त्या आमच्या घरी माझी मैत्रीण म्हणून आल्या .नंदिनीशी गप्पा त्यांनी मारल्या . ही राकेशची आई अशी ओळख मी करून दिली नाही .माझी नवीन मैत्रीण अशी ओळख दिली .

दुसऱ्या दिवशी राकेशच्या आईचा फोन आला .त्यांना मुलगी पसंत होती.एक दिवस राकेशचे आई वडील दोघेही  आमच्या घरी आले .गप्पाटप्पा झाल्या .

* राकेशची अाई* 

एक दिवस मी राकेशजवळ लग्नाचा विषय काढला. नेहमीप्रमाणे त्याने मला सतावीत जाऊ नकोस असे म्हटले. फोटो बघायला काय हरकत आहे असे म्हणत नंदिनीचा एनलार्जड् फोटो त्याच्या पुढ्यात टाकला . फोटो बघून तो जे समजायचे ते समजला.त्याने होकार दिला .

मी ज्याप्रकारे राकेशला विचारले त्याच प्रकारे नंदिनीच्या आईने तिला विचारले .तिचाही होकार आला .

-------------------------

*आता नंदिनी सौ.राकेश झाली आहे.*

*जयपूर फूट घालून ती सफाईने मोटारही चालविते .*

* तिला गुडघ्यापासून एक पाय नाही हे लक्षात येत नाही.*

* तिचे कुठेच काही अडत नाही. *

(समाप्त)

२८/७/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel