(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

*डॉ.राकेश* 

गेली दोन तीन वर्षे आई लग्न कर लग्न कर म्हणून मागे लागली आहे.परंतु माझ्या दृष्टीने  मॅरेज मटेरियल आहे अशी मुलगी मला मिळाली नाही.कॉलेजात असताना बऱ्याच मुली माझ्या मैत्रिणी होत्या .त्या माझ्या घरी येत जात सुद्धा असत .आमच्या घरचे वातावरण मोकळे आहे.त्यातील मालिनी नावाची मुलगी वारंवार आमच्याकडे येत असे .मी तिच्याशी लग्न करणार असे आई धरून चालली होती.माझी ती फक्त मैत्रीण होती .

डॉक्टर झालो. अनुभवही मिळविला.आता स्वतःचे हॉस्पिटलही काढले आहे .आईने तुझे नाव एखाद्या मॅरेज ब्युरोमध्ये नोंदवू का म्हणूनही विचारले.मी तिला निग्रहाने नको म्हणून सांगितले.बाबा आमच्या विशेष फंदात पडत नाहीत.तो आता मोठा झाला आहे.त्याचा निर्णय तो घेईल .आपण त्यामध्ये पडू नये असे त्यांचे सांगणे असते . मी लग्न करायचे नाकारतो तेव्हा बाबांनी एकदाच मला विचारले. तुझ्यात तसे काही कमी नाही ना?त्यावर हसून मी  उत्तर दिले. तसे काहीही नाही.

आमचे घराणे तसे सधन असल्यामुळे मी हॉस्पिटल काढायचे असे म्हटल्याबरोबर मला पुरेसे पैसे दिले.हे बीज भांडवल आहे इतर व्यवस्था तुझी तू करायची आहे .असेही निक्षून सांगितले. बँकेकडून कर्ज मिळाले .हॉस्पिटल उभे राहिले.आमच्या हॉस्पिटलमध्ये मी व निरनिराळ्या प्रकारचे चार स्पेशालिस्ट डॉक्टर असे काम करतो .

मी एखाद्या डॉक्टरबरोबर लग्न केले तर सर्वच दृष्टीने ते योग्य  होईल असे आई बाबांचे म्हणणे असते .आज मी बत्तीस वर्षांचा आहे .जेव्हां योग येईल तेव्हां येईल.आई नेहमी म्हणते "बाशिंग बळ पाहिजे हेच खरे".   

मी माझ्या केबिनमध्ये  बसलो होतो .हल्ली ही सोय चांगली झाली आहे .सर्वत्र सीसीटीव्ही लावल्यामुळे कुठे काय चालले आहे ते बसल्या जागी कळते. कर्मचाऱ्यांनाही सर पाहात असतील, सर पाहतील,सर रागावतील,  असा धाक असतो.मला स्क्रीनवर हॉस्पिटलच्या दारात एक अँब्युलन्स येऊन थांबलेली दिसली.चार मुली दोन स्ट्रेचरवरून व दोन कुणाच्यातरी आधाराने आत येताना दिसल्या .एवढय़ात माझ्या टेबलावरील फोनची रिंग वाजली.स्वागतिका फोनवर मला बोलवीत होती .अपघात झाला आहे.इमर्जन्सी आहे एवढे बोलून तिने फोन खाली ठेवला.

* नंदिनी* 

जागी झाले तेव्हा मी माझ्या खोलीत नव्हते .मी सर्वत्र नजर फिरवली .मी हॉस्पिटलमध्ये आहे हे माझ्या लक्षात आले.मी उठण्याचा प्रयत्न केला. माझ्या सर्वांगातून एक तीव्र कळ मेंदूपर्यंत गेली.माझ्या हातावर सुया टोचलेल्या होत्या .हात बेडला बांधून ठेवला होता .दोन स्टॅंडवर बाटल्या लावलेल्या होत्या .त्यातून औषध माझ्या शरीरात शिरत होते.शेजारीच सिस्टर बसलेली होती.तिने तोंडावर बोट ठेवून हलू नका अशी सूचना केली.मी आयसीयूमध्ये होते .

मी इथे कशी आले ते आठवू लागले.आम्ही मैत्रिणी माझ्या मोटारीतून पिकनिसाठी शहरापासून पंचवीस किलोमीटरवर असलेल्या तलावावर जात होतो.गप्पा विनोद हास्य अशी मजा चालली होती.एका वळणावर एक पिकअप व्हॅन वेडीवाकडी  येऊन आमच्या मोटारीवर आदळली.ती व्हॅन एखादा दारू प्यालेला चालवत असावा .कदाचित  टायर पंक्चर किंवा स्टेअरिंग जाम अशी एखादी घटना घडली असावी .पुढचे मला काहीच आठवत नव्हते.ज्याअर्थी मी हॉस्पिटलमध्ये होते त्याअर्थी अपघात गंभीर स्वरूपाचा असावा .

थोड्याच वेळात डॉक्टर येऊन मला तपासून गेले. मला जोडलेल्या निरनिराळ्या मॉनिटरकडे पाहत होते.काही काळजी करू नका. घाबरू नका.सर्व काही ठीक होईल असे म्हणून मला किंचित थोपटल्यासारखे करून नर्सला काही सूचना देऊन ते बाहेर गेले. ते सिस्टर जवळ काय बोलले ते कळले नाही .बहुतेक सर्व डॉक्टर अगदी हळू आवाजात पुटपुटल्यासारखे कां बोलतात कळत नाही .बहुधा ते त्यांची ऊर्जा राखून ठेवीत असावेत.बऱ्याच वेळा त्याचे बोलणे नर्सला कळते असिस्टंटला कळते परंतू पेशंटला कळत नाही .कदाचित डॉक्टर काय बोलत आहेत ते पेशंटला कळू नये असाही त्यांचा  हेतू असावा .

डॉक्टर तरुण दिसत होते .उंचनिंच व बऱ्यापैकी देखणे असावेत.एखाद्या सिनेमात नट म्हणून शोभून दिसले असते असा एक गमतीशीर विचार माझ्या मनात आला.त्या विचाराचेच मला हसू आले .एवढ्यात  माझे आईबाबा आत आले.त्यांचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता .आईच्या चेहऱ्यावरील तर रया पार निघून गेली  होती .कोणत्याही क्षणी आई रडू लागेल असे वाटत होते .एवढा अपघात होऊनही मी धडधाकट शीरसलामत होते.चार दिवसांनी मी घरी परत आले असते .एवढे चिंताक्रांत होण्याचे,अत्यंत घाबरण्याचे , हायपर होण्याचे कारण काय? ते मला मुळीच कळत नव्हते.आई नाहीतरी फारच करते असा विचार माझ्या मनात येऊन गेला .

*डॉ. राकेश*

मी इमर्जन्सी वॉर्डमध्ये बोलावल्याबरोबर लगेच गेलो.अपघात गंभीर स्वरूपाचा झाला असावा .दोन मुली बेशुद्ध होत्या .त्यामुळे वेदनेने त्या कळवळण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांना भरपूर मार लागला होता .तपासल्यावरच माराचे गंभीर स्वरूप कळणार होते.दोन मुलीना विशेष गंभीर जखमा झालेल्या दिसत नव्हत्या.अर्थात व्यवस्थित तपासल्यावरच सर्व काही लक्षात येणार होते.मी व उमेश लगेच कामाला लागलो. 

ज्या दोन मुलीना विशेष गंभीर लागले नव्हते त्यांना आम्ही  ड्रेसिंगसाठी व इतर उपचारांसाठी सिस्टरच्या ताब्यात दिले. 

ज्या दोन मुली बेशुद्ध होत्या त्यातील एकीच्या डोक्याला मार लागला होता.एमआरआय केल्याशिवाय ती किती गंभीर आहे ते कळणार नव्हते.तिला तपासून आणखी कुठे गंभीर मार नाहीना हे  पाहून तिला एमआरआय करण्यासाठी पाठविले .

दुसरी बेशुद्ध मुलगी मात्र खरेच गंभीर जखमी होती . तिच्या नातेवाईकांची चौकशी करता नातेवाईक आले आहेत असे कळले.अपघाताची बातमी कळताच तिचे आई बाबा आले होते.या मुलीचा रक्तस्राव खूप झाला होता.अगोदर रक्तस्राव थांबवणे आवश्यक होते .या मुलीचा डावा पाय अक्षरश: अपघातात चुरला होता.डाव्या पायाच्या नडगीचा,हाडाचा चक्काचूर झाला होता . आम्ही रक्तस्राव थांबवण्याचे इलाज करीत होतो .त्याचबरोबर तिला रक्त देणे आवश्यक असल्यामुळे त्याचीही व्यवस्था करीत होतो.हॉस्पिटलमधील अस्थितज्ज्ञाने आर्थोपेडिक सर्जनने तपासून तिचा पाय गुडघ्यातून काढून टाकावा लागेल. अँप्यूट करावा लागेल असे सांगितले.एवढी देखणी तरुण मुलगी आणि या वयात ती एका पायाला मुकणार हे ऐकून मला सुद्धा वाईट वाटले .कोणत्याही वयात अपंग होणे हे वाइटच.ऑपरेशन तातडीने करण्याची गरज होती .हा जीवनमरणाचा प्रश्न होता.तिच्या आई वडिलांना सांगून आम्ही तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले.तिचा डावा पाय गुडघ्यातून काढून टाकण्यात आला.शुद्धीवर आल्यावर  तिला वेदना जाणवू नयेत यासाठी गुंगीची औषधे दिली जात होती.

जवळजवळ चार दिवसांनी आम्ही ती पूर्णपणे शुद्धीवर येईल असे पाहिले.ती शुद्धीवर आल्याबरोबर मला सिस्टरचा फोन आला.मी जावून तिला तपासले.सर्व काही ठीक होते .ती आडवी होती तोपर्यंत  निदान काही दिवस तरी तिला तिचा पाय काढून टाकण्यात आल्याचे बहुधा कळणार नव्हते.

जेव्हा तिला पाय काढून टाकल्याचे कळेल तेव्हा आकांत होणार होता .तिला प्रचंड शॉक बसणार होता. ती या धक्क्याला कशी काय तोंड देते त्यावर सर्व काही अवलंबून होते.अशा प्रकारच्या गोष्टीला प्रत्येक जणाच्या व्यक्ती व्यक्ती अनुरुप ,प्रतिक्रिया भिन्न भिन्न असतात.धक्क्यामुळे बेशुद्धी,एखादवेळी कमी जास्त तीव्रतेचा वेडाचा झटका,मानसिक असंतुलन,हार्टअटॅक, इथपासून हा आघात सहजपणे सहन करण्यापर्यंत, सर्व प्रतिक्रिया शक्य असतात.ही वेळ नाजूक असते .ती पेशंटने, पेशंटच्या नातेवाईकानी, डॉक्टरने,आपापल्या परीने  योग्य प्रकारे सांभाळून न्यायची असते.काही वेळा पेशंट इतका टोकाला जातो की तो हॉस्पिटलमध्ये असताना किंवा घरी गेल्यावरही, आत्महत्येचा प्रयत्न करतो.एकदा तो त्या विशिष्ट मानसिक स्थितीमधून बाहेर आला की नंतर विशेष कांही भीती नसते .

ही मुलगी नंदिनी कसे काय तोंड देते त्यावर सर्व काही अवलंबून होते.   

*मालतीबाई नंदिनीची आई*  

मुलगी पिकनिकसाठी मैत्रिणींबरोबर जाते काय आणि जरा वेळाने पोलिसांचा तिला अपघात झाल्याचा फोन येतो काय,सर्वच अघटित आणि अविश्वसनीय.रविवार होता .सुदैवाने हे घरी होते.आम्ही दोघेही दुसरी गाडी काढून हॉस्पिटलमध्ये पोचलो .नंदिनी व तिच्या मैत्रिणींवर वैद्यकीय उपचार सुरू होते. बाहेर स्वागतिकेने आम्हाला अपघाताचे गंभीर स्वरूप सांगितले.डॉक्टर जवळजवळ अर्ध्या  तासाने बाहेर आले.डॉक्टर उमदे व तरुण होते.त्यांनी थोडक्यात आम्हाला अपघाताचे गंभीर स्वरूप  सांगितले .माझ्या लाडक्या नंदिनीचा डावा पाय गुडघ्यातून काढून टाकावा लागेल हे ऐकल्यावर मी मटकन बाकावर बसले. तिच्या जिवाला धोका आहे हे ऐकल्यावर आम्हाला पाय काढून टाकण्यासाठी नाईलाजाने परवानगी देणे आवश्यकच होते .

*नंदिनी बाकी सर्व ठीक होती.*

*एरवी तर ती चार आठ दिवसात घरी जाऊ शकली असती.*

* परंतु पाय काढून टाकल्यामुळे किती दिवस राहावे लागेल ते सांगता येत नाही असे डॉक्टरांचे सांगणे होते .*

* पाय काढून टाकल्यामुळे अनेक फिजिकल व सायकॉलॉजिकल समस्या उद्भवू शकणार होत्या .*

*तिचे शरीर व मन या सर्व आघाताला कसे तोंड देते त्यावर सर्व अवलंबून होते.*

(क्रमशः)

२७/७/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel