वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय, हा प्रश्न आपल्याला पडणे अगदी सहज आहे. मानवी शरीर पंचमहाभूतांचे मिळून बनलेले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश म्हणजे पंचमहाभूते. मानवी शरीर या पाच तत्त्वांपासून तयार झाले आहे आणि मानवी शरीर जगविण्यासाठी ही पंचतत्त्व आवश्यक आहेत. तहान भागवण्यासाठी पाणी लागते,  श्वास घेण्यासाठी वायू लागतो, उर्जेसाठी अन्न लागते, स्थिर राहायला जमीन लागते. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजांपैकी निवारा गरजेशी आपले वास्तुशास्त्र संबंधित आहे. सहज सोप्या भाषेत म्हणायचं तर वास्तुशास्त्र म्हणजे पंचमहाभूते व दिशांचा योग्य प्रकारे साधलेला समन्वय होय.

मुख्यदिशा ४ आणि ४ उपदिशा या आठ दिशांचे वास्तूत योग्य संतुलन साधणे व नैसर्गिक तारतम्य साधून सकारात्मक स्पंदन लहरी प्राप्त करून घेणे हा वास्तुशास्त्राचा हेतू असतो. त्यानुसार वास्तूची रचना आणि  सुख, समृद्धी आणि आनंद उल्हास यांची आपल्या वास्तूत स्थापना करणे म्हणजे वास्तुशास्त्र होय. हि निसर्गाशी सांगड घालण्याची व समतोल साधण्याची एक शास्त्रशुद्ध प्राचीन पद्धती आहे, जी दिशा नियोजन व स्पंदन लहरींवर आधारित आहे.

वास्तू म्हणजे राहण्याचे ठिकाण आणि वस् म्हणजे वास करणे. प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्य हवं असतं आणि हे सुख प्रत्येकाच्या नशिबात असतच असं नाही. असं का बरे असू शकेल? याचं कारण एकच आपण वास करत असलेली वास्तू!

वास्तुशास्त्र दिशांच्या योग्य संतुलनामुळे उत्पन्न होणाऱ्या सकारात्मक उर्जेच्या  स्पंदनांवर आधारीत शास्त्र आहे. आपल्या वास्तूची रचना जर वास्तुशास्त्रीय नियमांवर आधारित असेल तर सर्व दिशांचे संतुलन योग्य प्रकारे केले जाते आणि वास्तुमधील सकारात्मक लहरी वाढतात. आणि  हे निर्माण होणारे  संतुलन व या सकारात्मक लहरी वास्तुमध्ये राहणाऱ्या माणसांशी जेव्हा जुळतात तेव्हा त्याचे  परिणाम अत्यंत लाभदायक असतात. म्हणून यालाच आपण वास्तू लाभली असे म्हणतो व त्याची उत्तम फळे मिळतात.

वास्तू म्हणजे  शांतता, प्रसन्नता, हक्काचा विसावा, सुख प्राप्त करण्याचे  मिळण्याचे ठिकाण, धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात मन:शांती मिळवण्याचे ठिकाण. नेमकं हेच ठिकाण जर सदोष असेल तर व्यक्तीला मन:शांती, सुख त्या वास्तूत प्राप्त होणार नाही. घरातले वातावरण जर व्यवस्थित नसेल तर मनुष्य प्रगती करू शकत नाही, कार्यक्षमता वाढवू शकत नाही, कर्तबगारी दाखवू शकत नाही. यासाठीच वास्तुशास्त्र अत्यंत महत्त्वाचे असते. वास्तू आपले जीवन शिस्तबद्ध, सुसूत्र बनवते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel