(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .जिवंत किंवा मृत व्यक्तीशी याचा संबंध नाही तसे आढळल्यास तो योगायोग समजावा )

किसनसुदामा ही जोडी  कॉलेजमध्ये सर्वत्र प्रसिद्ध होती .दोघे एका सोसायटीमध्ये किंवा एका गल्लीत रहात नव्हते तरीही त्यांची जोडी अभेद्य होती . बालवाडीपासून ते दोघे एकाच शाळेत होते .बालवाडी, प्राथमिक स्कूल, हायस्कूल, आणि आता  कॉलेज असा त्यांचा एकत्र  प्रवास झाला होता .खेळाचे मैदान असो,  निषेध मोर्चा  असो,सिनेमा नाटक असो, किंवा मिरवणुका, व्याख्याने, कॉलेजातील नाट्य विभाग,स्नेहसंमेलन इत्यादी काहीही असो, दोघांचा एकत्र संचार असे .दोघे घरचे बऱ्यापैकी सधन होते . एकमेकांपासून दूर  राहात असूनसुद्धा दोघांचे एकमेकांकडे नेहमी जाणे असे.रामकृष्ण शंकरपार्वती, विठोबारखमाई, यांचा उच्चार जसा आपण एकमेकांबरोबरच करतो त्याचप्रमाणे किसनसुदामा हा उच्चार एकत्र होत असे .सांदीपनी आश्रमात जसे ते कृष्णसुदामा मित्र होते त्याचप्रमाणे इथेही कॉलेजात दोघेही जीवश्चकंठश्च मित्र होते .ते सर्वत्र किसनसुदामा म्हणून ओळखले जात.

दिवाळीच्या सुटीमध्ये कॉलेजची ट्रिप जाण्याचे ठरले .या दोघानीही त्यासाठी नावे अर्थातच दिली होती.ट्रिप सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात समुद्रकिनारी जाणार होती .तेथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आले होते .चार दिवस समुद्रकिनारी वास्तव्य व धमाल असल्यामुळे एक बस त्यांना तेथे सोडणार होती व दुसरी त्यांना घेण्यासाठी जाणार होती.

भेंड्या लावीत गाणी म्हणत  पत्ते खेळत गप्पा मारीत  आरडाओरडा करीत धमाल करीत सर्वजण समुद्र किनारी मुक्कामावर पोहोचले.मुलांसाठी स्वतंत्र  व  मुलींसाठी स्वतंत्र जनरल  रुम्स व प्राध्यापकांसाठी स्वतंत्र खोल्या रिसॉर्टमध्ये बुक केलेल्या होत्या.रुंद व लांबलचक किनारा या सौंदर्य स्थळाला पिकनिक स्पॉटला लाभला होता. वाळूवर क्रिकेट लगोऱ्या विटीदांडू हुतूतू धावा धावी इत्यादी खेळ चालले होते .समुद्रात स्नान ,सकाळ दुपार संध्याकाळ चालले होते. एकूण धमाल चालली होती.

किसनचा  वडिलोपार्जित गांव या सौंदर्य स्थळापासून जवळच दहा पंधरा किलोमीटरवर होता. किसनच्या वडिलांनी त्याला आवर्जून गांवाला जाण्याबद्दल बजावले होते .समुद्र किनाऱ्यापासून दूर अंतर्भागात त्याचा गांव होता.समुद्र किनाऱ्यावरील या रिसॉर्टपासून त्याच्या गांवापर्यंत बस जात असे .बसने अंतर पंधरा सोळा किलोमीटर होते.तेच अंतर चालत  गेल्यास सहा किलोमीटर होते .बस लांबून वळसा घालून निरनिराळ्या गांवावरून जात असे .थोडा समुद्र किनाऱ्याने प्रवास नंतर एक छोटीशी घाटी नंतर कातळावरून व नंतर बस खोऱ्यांमध्ये उतरून गावदरीने  प्रवास करीत करीत किसनच्या गावाला जात असे .

किसन जाणार म्हटल्याबरोबर त्याच्याबरोबर सुदामा जाणार हे ओघानेच आले .दोघांनीही एक दिवसाची सरांकडे परवानगी मागितली .सकाळच्या बसने ते जाणार होते .दिवसभर तिथे राहून संध्याकाळच्या मुक्कामाच्या बसने पुन्हा परत येणार होते .किसन वडिलांबरोबर एकदोनदा गावाला जाऊन आला होता .शेजारी त्यांच्या घराची चावी दिलेली होती .घराची देखभाल त्यांच्याकडे सोपविलेली होती . सकाळच्या बसने किसनसुदामा त्याच्या गावी पोचले.गावी पोचेपर्यंत दहा वाजले .किसनने सुदाम्याला त्याचे घर गाव देऊळ वगैरे दाखविले.ज्यांच्याकडे चावी होती त्या काकांकडे दुपारी जेवण झाले.संध्याकाळी बस येणार होती . फक्त सकाळी एक बस व संध्याकाळी एक बस ये जा करीत असे .

त्या दिवशी काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा .नियमितपणे संध्याकाळी पाच वाजता येणारी बस आलीच नाही.सहा वाजेपर्यंत वाट पाहिली नंतर फोन केला .आज बस येणार नाही हे निश्चित झाले .शेजारच्या  काकांनी इथेच आता थांबा व सकाळी चहा नाष्टा करून सकाळच्या बसने जा  असे सांगितले.

किसन सुदाम्याची जाण्यासाठी चुळबुळ चालली होती.जेवणानंतर रात्री कॅम्प फायर होता.निरनिराळे खेळ व धमाल होती.या कॅम्पफायर मध्ये तर सर्वात जास्त मजा येणार होती .ती चुकवावी असे दोघांनाही वाटत नव्हते.त्यानी काकांना आज आम्हाला गेलेच पाहिजे नाही गेलो तर सर रागावतील.काही तरी आम्हाला दुसरा मार्ग सुचवा म्हणून सांगितले. गांवात एकुलती एक रिक्षा होती परंतु  आज तो रिक्षावालाही रिक्षा घेऊन  शहरात गेला होता .स्वतंत्र रिक्षा करून जाण्याचा मार्गही खुंटला .किसनच्या गावापासून रिसॉर्ट चालत दोन तासाच्या अंतरावर होता.काकानी त्यांना वाट दाखवण्यासाठी सोबत म्हणून एखादा गडी मिळतो का ते पाहिले. तोही मिळाला नाही .

काकानी तुम्ही अाज गेले नाहीत तर चालेल का असे पुन्हा एकदा विचारले .मुलांनी नाही म्हणून सांगितल्यावर शेवटी काकानी त्यांच्याबरोबर आपण स्वतःच जायचे ठरविले .घाटी चढून डोंगरांवर सपाटीवर येतात तो रात्रीचे आठ वाढले होते .कोकणात डोंगरावरील सपाट माळरानाला जिथे केवळ दगड असतात त्याला कातळ,सडा, असे म्हणतात . चंद्राच्या दिशेने चालत हा कातळ सुमारे चार किलोमीटर चालल्यावर पुन्हा एक घाटी येईल ती उतरली की तुमचे रिसॉर्ट आलेच .बोलता बोलता काका म्हणाले .  काकांना केवळ रस्ता दाखवण्यासाठी एवढे लांब चालत रात्रीचे न्यायचे हे किसनसुदाम्याला योग्य वाटेना.पुन्हा काका यांना रिसॉर्टवर पोचवल्यावर तिथे राहायला तयार नव्हते .ते तसेच आपल्या गावी परत येणार होते .काळोख्या रात्री काकांच्या वयाकडे पाहता एवढा त्रास त्यांना देणे दोघांनाही योग्य वाटत नव्हते .

लोकांनी ये जा करून पायाखालची वाट मळलेली होती .फिकट चांदणे पडले होते . दोघांनीही पुन्हा पुन्हा आग्रह करून काकांना  तुम्ही आता परत जा  आम्ही व्यवस्थित जाऊ. आम्ही सुखरूप पोचू.तुम्ही काळजी करू नका.पोहचल्यावर तुम्हाला फोन लगेच करू असे पुन्हा पुन्हा सांगितले .शेवटी काका परत फिरले.दोघे जण काकांनी दाखविलेल्या दिशेने फिकट चांदण्यातून मळलेल्या पायवाटेने अनोळखी जागेवरून झपाट्याने चालू लागले.

तासाभरात आपण पोचू.जेवण करून नंतर कॅम्प फायर मध्ये सामील होऊ असा दोघांचाही विचार होता . त्यांच्या डोक्यावरून एक टिटवी टिट् टिट् असा आवाज करीत उडत गेली . अकस्मात आलेल्या त्या आवाजाने त्यांच्या अंगावर शहारे आले .दूरवर त्यांना झाडे प्रकाश टाकीत आहेत लुकलुकत आहेत असे दिसू लागले.रात्री शांत वातावरणामध्ये काही वनस्पती स्वयंप्रकाशीत होतात .त्यात भीती वाटण्यासारखे काहीही नसते .ही गोष्ट दोघांनाही माहीत नव्हती .काकांना आपण उगीच जाऊ दिले असे त्यांना वाटू लागले .आपण हे साहस करायला नको होते असेही त्यांना वाटले .परंतु आता काही उपयोग नव्हता .काका परत गेले होते .त्यांना पुढे जाणे भाग होते . 

कोकणातील भुतांच्या वाचलेल्या कथा त्यांना आठवू लागल्या.

(क्रमशः)

२५/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel