(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .जिवंत किंवा मृत व्यक्तीशी याचा संबंध नाही तसे आढळल्यास तो योगायोग समजावा )   

आपण हे साहस करायला नको होते असेही त्यांना वाटले .परंतु आता काही उपयोग नव्हता .काका परत गेले होते .त्यांना पुढे जाणे भाग होते . 

कोकणातील भुतांच्या वाचलेल्या कथा त्यांना आठवू लागल्या.    

एवढ्यात सुदाम्याच्या पायातील चप्पल तुटली.दगड, खडे, टोकदार गवत, कुसळे, यावरून अनवाणी चालण्याची दोघांनाही सवय नव्हती.सुदाम्याला भरभर चालता येईना .पायात काटे टोचू लागले. रक्त येऊ लागले.नीट चालता येईना .पायाला रुमाल बांधून बघितला .खड्यांची बोच थोडी कमी झाली. शेवटी सुदाम्याने अंगातील गंजीफ्रॉक काढला व तोही पायाला गुंडाळला .तो लंगडत चालू लागला. अशा चालीने पोचेपर्यंत रात्रीचा एक तरी वाजणार असे त्यांना वाटू लागले. कातळावर चालताना त्यांना अनेक पायवाटा दिसू लागल्या .यातील आपली पायवाट कुठली याबद्दल संभ्रम निर्माण झाला .

कोकणातील चकव्याबद्दलच्या,भुलीच्या झाडाबद्दलच्या वाचलेल्या कथा त्यांना आठवू लागल्या.

बिबट्या तरस कोकणात फिरत असतात हेही त्यांना आठवले.आपण काकांच्या घरीच राहिलो असतो तर बरे झाले असते,रात्री  चालत येण्याचा फंदात आपण उगीच पडलो, असे त्यांना वाटू लागले.काका चांगले आपल्याबरोबर येत होते. त्यांना आग्रह करून करून आपण परत जा असे उगीचच सांगितले. ही आपली आणखी एक चूक असेही त्यांना वाटत होते .आता या वाटण्याचा काहीही उपयोग नव्हता .

चालून चालून दमल्यामुळे ते शेवटी एका पारावर बसले.तो पार पिंपळाचा होता.वाऱ्यावर पिंपळाच्या पानांची सळसळ एैकू येत होती .त्यामुळे अंगावर आणखी शहारे उठत होते.तेवढ्यात त्यांना पिंपळाच्या झाडावर भूत असते असे वाचलेले आठवले .त्याला बहुधा समंध म्हणत असावेत.माणसाला नको तेव्हा नको त्या गोष्टी आठवतात .मन चिंती ते वैरी न चिंती अशी एक म्हण आहे.भित्यापाठी ब्रह्मराक्षस अशी आणखी एक म्हण आहे . दोघांच्याही मनात भलतेसलते विचार एकाचवेळी येऊ लागले .पिंपळाच्या झाडावरून खदाखदा  असा हसण्याचा आवाज आला.जणू काही तो समंध त्यांना बरे माझ्या तावडीत सापडला असे म्हणत होता.पिंपळाच्या झाडावरून त्यांना मी आता तुम्हाला खाल्ल्याशिवाय सोडत नाही. मी कुणाची तरी वाटच पाहात होतो.असा आवाज ऐकू आला .

त्यांना तेथून धूम ठोकावी  असे वाटत होते.परंतू पाय हलण्याला तयार नव्हते.पायात जणू काही मणामणाच्या बेड्या घातल्या सारखे वाटत होते. दोघांनाही आता आपला शेवट येथेच होणार असे वाटू लागले.खिळे मारल्यासारखे ते जाग्यावरच उभे होते.पिंपळाच्या झाडावर चित्र विचित्र राक्षसी आकृत्या दिसत होत्या. कोकणात भुते असतात असे ते दोघे ऐकून होते .आता त्यांना प्रत्यक्ष अनुभव येत होता .ती राक्षसी आकृती पिंपळाच्या झाडावरून खाली उतरली .व दमदार पावले टाकीत त्यांच्या दिशेने येऊ लागली .

एवढ्यात त्यांना जवळच डाव्या बाजूला एक झोपडी दिसली .झोपडीतून दिव्यांचा मंद प्रकाश येत होता .कशी कोण जाणे त्यांच्या पायात एकदम वीज संचारली.त्यांनी त्या झोपडीच्या दिशेने धूम ठोकली .त्यांना आपल्या मागून तो समंध येणार व आपल्याला पकडणार  अशी भीती वाटत होती .प्रत्यक्षात तसे काही झाले नाही .समंध अंतर्धान पावला होता.झोपडीच्या दारात एक म्हातारी उभी होती .कसे कोण जाणे त्यांना त्या म्हातारीच्या चेहऱ्यावरील भाव दिसले . आश्वासक प्रेमळ नजरेने ती त्या दोघांकडे पाहत होती .बाळानो कुठे चाललात म्हणून तिने त्यांची विचारपूस केली.आत या म्हणून सांगितले .ते दोघे आत गेल्यावर  घोंगडी  पसरून त्यावर बसण्यास सांगितले.आपला घसा प्रचंड  सुकला आहे याची त्यांना आता जाणीव झाली.अंगाला दरदरून घाम सुटून कपडे ओले चिंब झाले आहेत हेही त्यांना जाणवले.म्हातारीने त्यांना प्यायला पाणी दिले .दोघेही एकेक लोटी पाणी घटाघटा प्याले.एव्हाना त्यांचा घाम सुकला होता.

दोघांच्याही आता जिवात जीव आला होता.त्यांनी आपण कुठून आलो, कुठे निघालो,रात्री का निघालो, या वाटेने का यावे लागले, वगैरे सर्व हकीगत आजींना सांगितली .आजीने त्यांना तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सुखरूप आहात.मी तुम्हाला रिसॉर्टवर नीट पोचवीन असे सांगितले .दोघेही भुकावलेले होते.आजींनी पिठले भाकरी करून त्यांना वाढली .दोघांनाही ती अमृतासारखी वाटली .एवढ्या मोकळ्या माळरानावर आजी झोपडीत एकटीच कशी राहते असे त्यांना वाटले .त्यांच्या मनातील विचार जसे काही आजींना कळतच होते .आजी म्हणाल्या आजोबा शेजारच्या गावात काही कामासाठी गेले आहेत ते एवढ्यात येतीलच .

जरा थांबा ते आले की मी तुम्हाला त्यांना तुमच्या गावी सोडून येण्यास सांगेन.एवढ्यात आजोबा आलेच.आजोबा त्यांना त्यांच्या रिसॉर्टपर्यंत सोडण्यास आले. सुदाम्याच्या तुटलेल्या चपलाही त्यांनी खिळे मारून तात्पुरत्या दुरुस्त करून दिल्या .ते रिसॉर्टवर पोहोचले तोपर्यंत कॅम्पफायरचा अर्धा कार्यक्रम होऊन गेला होता.दोघेही सुखरूप आलेले पाहून सरांच्या जिवात जीव आला.त्यांची जबाबदारी सरांवरच होती.

दुसऱ्या दिवशी त्यानी काकांना फोन करून आम्ही सुखरूप पोहोचलो असे सांगितले.बोलता बोलता त्यांनी वाटेतील पिंपळ, त्यांना वाटलेली भीती, झालेले भास, नंतर दिसलेली झोपडी, म्हातारा म्हातारी, व शेवटी आजोबानी त्यांना सुखरूप मुक्कामावर कसे पोचविले, तेही सांगितले.

सर्व हकीगत ऐकून घेतल्यावर काका म्हणाले तुम्ही सुदैवाने वाचलात.आम्ही दिवसासुद्धा त्या रस्त्याने जाताना पिंपळाखालून जाण्याचे टाळतो.त्या पिंपळावर ब्रह्मराक्षस राहतो.येणाऱ्या जाणाऱ्याला तो घाबरवतो.बहुधा त्रास देत नाही.तुम्ही ज्या रस्त्याने गेलात त्या रस्त्यावर कोणतीही झोपडी नाही .जाखाई  नावाची एक देवी कोकणात सर्वांचे रक्षण करत फिरत असते.तिला एखाद्याची कणव(करुणा)आल्यास ती त्याला संकटातून मुक्त करते.ब्रह्मराक्षसाने तुम्हाला घाबरवले त्यावेळी ती तेथून जात असावी.तिला तुमची कणव आली. दया आली.तिने आपल्या सामर्थ्याने झोपडी व सर्व काही उभे केले.मायेने एखाद्या आईसारखे तुम्हाला खाऊ पिऊ घातले.व साक्षात म्हसोबाकडून हा एक देव आहे तुम्हाला रिसॉर्टवर सुखरूप पोहोचविले .

पिंपळाखालून जाऊ नका म्हणून मी तुम्हाला सांगणार होतो .परंतु तुम्ही उगीचच घाबरला असता म्हणून सांगितले नाही .ब्रह्मराक्षस सहसा कुणालाही काहीही करत नाही.फक्त घाबरवतो म्हणून मी तुम्हाला काहीही  सांगितले नाही.

~तुम्हाला पाहून जाखाईने सर्व माया उभी केली.व तुम्हाला सुखरूप रिसॉर्टवर पोचविले.काही काळजी करू नका .तुमच्यावर त्याचा वरदहस्त आहे .~असे म्हणून काकांनी फोन ठेवला .

*दोघांनीही तेव्हापासून एक नियम केला आहे .*

*कोकणात कधीही रात्रीचा सड्यावरून प्रवास करायचा नाही.*

*दिवसा किंवा रात्री केव्हाही पिंपळ वड अश्या झाडाखाली आसरा घ्यायचा नाही.*

*त्या दिवशी जाखाईला त्यांची करुणा आली आणि सर्व काही निभावले.*

*जर जाखाई  भेटली नसती  तर!!*            

*परत आल्यावर सर्वांना सांगण्यासाठी दोघांनाही  एक अस्सल कहाणी मिळाली.*

* समुद्र किनाऱ्याला रिसॉर्टवर गेल्याचे, कोकणातील एखाद्या टुरिस्ट स्पॉटचे, नाव काढा की लगेच तुम्हाला ते ही सर्व कथा ऐकवतील.*

(समाप्त)

२५/६/२०१९ ©प्रभाकर पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel