( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

रामण्णा खरेच अस्तित्वात होता की ती नुसती हूल होती तेही कुणाला खात्रीलायक  माहीत नव्हते.

कांही जणांकडे  जाळीचा दरवाजा ( संरक्षक दरवाजा) होता.आतील दरवाजा उघडल्यावर संरक्षण दरवाजातून बाहेर कोण आले आहे ते दिसत असे .बेल वाजत असे.दरवाजा कोणीतरी ठोठावेत असे.आतील दरवाजा उघडून पाहावे तो बाहेर कुणीही नसे .जाळीच्या दरवाज्यातून रामण्णा ता येऊ शकते नसे .

एक दिवस एका बंगल्यातील बेल वाजली.बेल वाजल्याबरोबर दरवाजा उघडण्यात आला.त्यावेळी रात्रीचे फक्त दहा वाजले होते .रामणा रात्री बारा वाजल्यानंतर येत असल्यामुळे तोपर्यंत सर्व निर्धास्त असत.तेव्हा कुणीतरी  विचार न करता लगेच दरवाजा उघडला.बाहेर रामण्णा उभा होता. आज तो दहा वाजताच आला होता .दरवाजा उघडताच तो चपळाईने आंत शिरला.अजूनपर्यंत त्याने अनेक बंगल्यांचे व ब्लॉकचे दरवाजे ठोठावले होते .परंतू अजून तो आत शिरला नव्हता.कुणी दरवाजा उघडलाच नव्हता.त्याला आत शिरताच आले नव्हते .  रामण्णा आंत आल्यावर काय करील ते अजून कुणालाच माहीत नव्हते.त्याला आत आलेला पाहून सगळे टरकले होते.त्याचा पोषाख नेहमीचाच होता.धोतर कुडता आणि मुंडासे(दक्षिणी फेटा). त्याने आल्या आल्या काहीतरी खायला मागितले.त्याला प्रचंड भूक लागलेली दिसत होती.तो तामसी बिलकुल दिसत नव्हता.  घरात जे काही उरले सुरले होते त्याने त्याची भूक भागली नाही.त्याला भात शिजवून पोळ्या करून खायला घालावे लागले.त्याच्या पोटात भुकेचा वणवा पेटलेला असावा . नंतर तो शांतपणे निघून गेला .तो गेल्यावर घरातल्या लोकानी सुटकेचा निश्वास सोडला.तोपर्यंत तो रात्री बारानंतर येत असे .आता तो रात्री केव्हांही  येऊ लागला होता.त्याला घरात येण्यासाठी अटकाव करणे अशक्य होते .तो कुणाचेही रूप घेऊन येऊ लागला .उदाहरणार्थ तुमचा भाऊ,मुलगा' पती ,बाहेर गेला आहे .रात्री नऊला जर तो परत आला  तर तुम्ही त्याला घरात घेणारच .तो रामण्णा असेल असा तुम्हाला संशयही येणार नाही.प्रत्यक्षात तो रामण्णा असू शकतो . त्याची भूक तुम्हाला भागवावी लागेल .दिवसेंदिवस त्याची भूक वाढतच होती.

कोणाच्याही रूपात रात्री  कितीही वाजता तो येऊ लागल्यामुळे त्याला घरात येऊ न देणे अशक्य झाले.त्याचप्रमाणे तो कुणाच्याही शरीरात शिरत असे व घरी येत असे.घरातील एखादा माणूस खा खा करू लागला, प्रचंड खाऊ लागला,की तुझ्यात रामण्णा शिरला आहे का अशी म्हण प्रचलित झाली होती .प्रत्यक्षात केव्हा केव्हा रामण्णा खरेच शरीरात शिरलेला असे . त्याची वाढणारी भूक मिटवता मिटवता लोक जेरीस आले.अजूनपर्यंत त्याने कुणालाही इजा केली नव्हती .तो स्वतःच्या आपल्या रूपात येई .तर केंव्हा दुसऱ्या एखाद्याच्या शरीरात शिरून आगमन करी.तो रामण्णा आहे याचा पत्ताच काही काळ लागत नसे.जेव्हा त्याची प्रचंड भूक लक्षात येई तेव्हा त्याच्या शरीरात रामण्णा शिरला आहे हे लक्षात येई.जर त्याला  खायला दिले नाही तर तो प्रचंड रागावत असे.रागाच्या भरात तो घरातील  सामानाची मोडतोड करीत असे .लोक गांजून गेले होते .त्याचा बंदोबस्त कसा करावा ते कुणाला कळत नव्हते .अर्थात शक्यतो त्याचे आगमन रात्री बारानंतर होत असे. परंतु त्याची काही खात्री देता येत नसे.

अशी पार्श्वभूमी असताना चारु व शीला दोघीच बंगल्यात होत्या.शीलाचे आई वडील तिच्या मामेबहिणीच्या लग्नासाठी गावाला गेलेले होते.चारू तिच्या सोबतीसाठी आलेली होती.त्या रात्री त्यांचा जेवणाचा डबा आलेला नव्हता. त्या दोघी काहीतरी करून खाण्यासाठी स्वयंपाकघरात आल्या होत्या .आणि कुणीतरी बेल वाजवीत होते. दरवाजा ठोठावत होते.प्रतिक्षिप्त क्रियेने चारू दरवाजा उघडण्यासाठी जात होती.शीलाने तिचा हात पकडून जाऊ नको म्हणून तिला रोखले. 

अजूनपर्यंत रामण्णाने कुणालाही इजा केली नव्हती.सामानाच्या मोडतोडी पलीकडे तो गेला नव्हता. बेल पुन्हा पुन्हा  वाजत होती .दरवाजा कुणीतरी अत्यंत घाईत असल्याप्रमाणे वारंवार ठोठावला  जात होता .दोघीही स्तब्ध उभ्या होत्या .दोघीही घाबरून गेल्या होत्या.त्या भीतीने थरथर कांपत होत्या .बाहेरून तिच्या वडिलांचा आवाज आला .शीला मी आलो आहे दरवाजा उघड .वडिलांचा आवाज एेकून शीला दरवाजा उघडण्यासाठी जात होती .आता तिचा हात चारूने गच्च पकडला होता.तो वाटेल त्याचे रूप घेतो.  कुणाचाही आवाज काढू शकतो .तुझे वडीलच आले असतील  कशावरून ?ते तर लग्नासाठी चार दिवस तुझ्या आईबरोबर गावाला गेले आहेत .चारू बोलत होती.शीलाला तिचे बोलणे पटत होते.बाहेरून पुन्हा अावाज आला शीला मला ऑफिसात महत्त्वाचे काम निघाले आहे.मला माझ्या साहेबाने मुद्दाम बोलवून घेतले आहे.तुझी आई तिकडेच आहे .मी उद्या काम संपवून रात्री लग्नासाठी परत जाणार आहे. यानंतर पुन्हा दोन तीनदा बेल वाजली.लगेच दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला .शीला दरवाजा उघड असा रागीट आवाजही आला.शीलाने चारुने धरलेल्या हाताला हिसडा मारून आपला हात सोडवून घेतला तिने घाईत जावून दरवाजा उघडला .

रामण्णा आंत आला.तिच्या वडिलांचा आवाज रामण्णाने काढला होता.त्याला जेवायला घालता घालता दोघीही रात्रभर मेटाकुटीस आल्या .तो आपल्याला काही करणार तर नाही ना या भीतीने दोघी घाबरल्या होत्या. जेवून समाधानाची ढेकर देऊन तो पहाटे निघून गेला .

रात्रभर झालेल्या जागरणांमुळे,श्रमामुळे ,मानसिक अणामुळे , त्या दोघी त्यांचा पेपर व्यवस्थित लिहू शकल्या नाहीत.

रामण्णाबद्दल पोलिसांत कम्प्लेंट करून झाली.भूतांचे आम्ही काहीही करू शकत नाही म्हणून सांगण्यात आले .कॉलनीतील लोक गांजून गेले होते.  रामण्णाचा बंदोबस्त कसा करावा ते कुणालाच कळत नव्हते .

शेजारच्या गावात एक मांत्रिक होता .त्याला रामण्णाचा बंदोबस्त करायला सांगावे असे ठरले.त्याला जाऊन सर्व हकीकत सांगण्यात आली .त्याने स्वतः येऊन तो प्रसिद्ध पिंपळाचा पार बघितला .रामण्णाला तिथेच बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न केला. तो विशेष कांही करू शकला नाही.रामण्णा घरोघर अकस्मात येतच राहिला.त्याला जेवू घालता घालता लोकांचे कंबरडे ढिले होतच राहिले.त्याला जेवायला घालण्यापेक्षाही लोक तो येईल म्हणून ताणाखाली रहात असत .

गावात फिरत फिरत एक साधू आले होते.त्यांना रामण्णाबद्दल विचारण्यात आले.त्यांनी थोडा वेळ विचार करून अंतर्ज्ञानाने पुढील माहिती सांगितली.गेल्या जन्मी रामण्णा भूकबळी होता .त्याचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता.तो तीस पस्तीस वर्षांचा असताना प्रचंड दुष्काळ पडला.भुकेने त्याचा मृत्यू झाला .त्यामुळे तो या भुताच्या जन्मात  सारखी खा खा करीत असतो.तो बाकी कांही त्रास देत नाही.त्याला जेवायला मिळाले नाही की तो भडकतो.रागाच्या सपाट्यात तो केव्हां काय करील सांगता येत नाही.त्याची क्षुधा पूर्ण शांत झाली की तो दुसऱ्या जन्मात ,पुढच्या योनीमध्ये निघून जाईल.         

शेवटी एकाला एक नामी कल्पना सुचली .मारुती जिथे असेल तिथे रामण्णा जात नाही .विजेचा शॉक बसल्याप्रमाणे रामण्णा फेकला जातो.बसमध्ये पहिलवानाने  त्यांचा हात धरल्याबरोबर त्याने तो जिवाच्या आकांताने सोडवून घेतला होता.ही गोष्ट त्याला आठवली .तो कुणाच्याही शरीरात शिरतो .तो कुणाचाही आवाज काढतो .तो कुणाचेही रूप घेतो.परंतु तो मारुतीची मूर्ती लॉकेट चित्र यापैकी कशालाही घाबरतो .

त्या पिंपळाखाली मारुतीच्या मूर्तीची स्थापना करण्याचे लोकांनी ठरविले .पिंपळ मध्यवर्ती ठेवून एक मंदिर बांधावे. त्याप्रमाणे मारुतीची स्थापना करण्यात आली .तिथे मारुतीचे मंदिर झाल्यामुळे रस्ता थोडा दुरून न्यावा लागला.म्युनिसिपालिटीकडे अर्ज करून, परवानगी घेवून रस्ता लांबून नेण्यात आला. तसेच सगळ्या बंगल्यातील व सोसायटीतील प्रत्येक ब्लॉकच्या दरवाज्यावर  मारुतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली .

*तेव्हांपासून पिंपळावरून रामण्णा नाहीसा झाला आहे.*

*कुणाच्याही घराचा दरवाजा त्याने ठोठावला नाही.*

*कोणाचीही बेल दाबली नाही .*

*कोणाचेही रूप घेतले नाही .*

*कोणाचाही आवाज काढला नाही .*

* तो कुठे गेला ते देव व रामण्णाच जाणे..

* आता रामण्णा ही एक आख्यायिका झाली आहे .*

*अलीकडील पिढी त्यावर विश्वासही ठेवत नाही .*

(समाप्त)

२६/९/२०२०©प्रभाकर पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel