राजनचे कटकारस्थान  माझा अपघात असे दाखवत केलेला खून  ही सर्व हकिगत ऐकल्यानंतर मी रागारागाने राजनवर हल्ला चढविला .परंतु धुसर वायुस्वरूप असलेल्या मला राजनला काहीही इजा करता आली नाही .मला माझ्या मृत्यूचा सूड घ्यायचा होता .त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे  माझ्या परीला मला राजनपासून वाचवायचे होते .मी तर सर्व पाहू शकत होतो. कुठेही जाऊ शकत होतो. परंतु प्रत्यक्ष राजनला इजा पोचवू शकत नव्हतो .तूर्त मी सर्वांना राजन बद्दल सावधान करायचे ठरविले. तेही कसे करावे ते मला कळत नव्हते .काहीतरी उपाय नक्की सुचेल असे म्हणून मी राजनला सोडून दिले व प्रथम माझ्या घरी आलो .घरी मी आलो तेव्हा मी जाग्यावर नव्हतो .मला पुढील उत्तर क्रियांसाठी स्मशानात नेले असावे .जिथे मी झोपलो होतो व त्यात शिरायचा प्रयत्न करीत होतो तिथे आता मी नव्हतो  फक्त एक दिवा जळत होता.पुरुष मंडळी कुणीहि नव्हती बहुधा सर्व स्मशानात गेले असावेत.आई लहान भाऊ बहीण व शेजारील काही बायका मंडळी घरात होती.आई अजून रडतच होती . मी तिचे अश्रूही पुसू शकत नव्हतो.मी अजूनही घरात आहे हे सर्वांना कसे जाणवून द्यावे ते मला कळत नव्हते .मी दिव्यावरून उडत जात असताना दिव्याची ज्योत एकदम हलू लागली .कुणाचे तरी तिकडे लक्ष जावे म्हणून मी सारखा दिव्यावरून फिरू लागलो .दिव्याची ज्योत सारखी हलत होती .एवढ्यात कुणाचे तरी तिकडे लक्ष गेले.आलेल्या बायकांपैकी कुणीतरी म्हणाले अरे ती ज्योत विझू देऊ नका .खिडक्या दरवाजे लावून घ्या .जवळून जाताना जपून जा. तुमच्या कपड्यांचा  वारा लागून ज्योत विझता कामा नये. सर्व बंदोबस्त केला तरीही ज्योत हलण्याची थांबेना .कारण मी सारखा जोरजोरात ज्योती भोवती घिरटया घालीत होतो .

ज्योत हलताना पाहून कोणीतरी म्हणाले कि सुभाषचा आत्मा इथेच कुठेतरी घुटमळत आहे .त्यामुळे वारा नसूनही ज्योत हलत आहे .ते ऐकून मला बरे वाटले .माझ्या अस्तित्वाची जाणीव तेथील सर्वांना झाली होती .माझा खून राजनने केला हे त्यांना कसे सांगावे ते माझ्या लक्षात येत नव्हते.मी उडत उडत  शेजारी सहज म्हणून गेलो .तिथे काका कॉम्प्युटरवर गेम खेळत होते .आमच्या शेजारी रानडे राहातात.मी त्यांना काका म्हणून हाक मारीत होतो .मी सवयीप्रमाणे त्यांना काका म्हणून हाक मारली .त्याना ऐकू गेले नसेल म्हणून मी जोरात हाक मारली .तरीही ते खेळतच राहिले तेव्हा कुठे माझ्या लक्षात आले की मी मेलो आहे.माझे बोलणे त्यांना ऐकू जात नाही .मी त्यांच्या उजव्या कानात जाऊन बसलो .व त्याना जोरात हाक मारली. त्यांनी जरा जोरात डोके हलविले किंचित उजव्या बाजूला पाहिले व नंतर कानात बोट घालून खाजविल्या सारखे केले .त्यांच्या कानात बसून जोरात ओरडल्यावर त्यांना काहीतरी ऐकू गेले असावे असे मला वाटले .जर मी याची प्रॅक्टिस करत राहिलो तर आज ना उद्या माझे बोलणे कुणाला तरी ऐकू जाईल असे मला वाटू लागले.काका कॉम्प्युटरवर गेम खेळतच राहिले .मला आणखी एक भन्नाट कल्पना सुचली .जर मी जोरात उंचावरून की बोर्डवर उडी मारली तर कदाचित  स्क्रीनवर अक्षरे उमटू शकतील .मी लगेच स्क्रीन बोर्डवर नाचू लागलो .मी हा हा म्हणता  छतापर्यंत जाई व नंतर तिथून जोरात कीबोर्डवर आदळत असे.काकांचा गेम एकदम वेडावाकडा हलू लागला .आपण बोटे दाबतो कुठे आणि प्रत्यक्षात स्क्रिनवर उमटते काय यामुळे ते गोंधळून गेले.ही काय भुताटकी असे वैतागून म्हणत त्यांनी लॅपटॉप  बंद केला .ती खरीच भुताटकी आहे असे त्यांना माहित होते तर ते नक्कीच हादरले असते .

आता मला दोन गोष्टी करावयाच्या होत्या .कानात बसून जोरात ओरडून बोलणे ऐकायला जाईल असे पहाणे .आणि की बोर्डवर बरोबर उड्या मारून अक्षरे टाईप करता येतात का ते पाहणे .यातील कुठल्या ना कुठल्या मार्गाने किंवा दोनही मार्गानी मी माझे बोलणे जिवंत माणसांपर्यंत पोहोचवू शकणार  होतो.मी पुनः  माझ्या घरी परत आलो .आल्या आल्या बन्याच्या कानात जाऊन बसलो .जोरात बन्या म्हणून आरोळी ठोकली .बन्याला काहीतरी ऐकायला गेले असे वाटले. दचकून त्याने ओ म्हणून जबाब दिला.मोठ्या माणसांपेक्षा लहान मुले संवेदनशील असतात असे ऐकून होतो त्याचा प्रत्यय आला.कदाचित लहान भावाशी असलेल्या भावनात्मक बंधामुळेही माझे अस्तित्व त्याला जाणवले असावे .त्याला बहुधा त्याच्या दादांनेच हाक मारली असा संशय आला . आणि नंतर हे कसे शक्य आहे असे तो पुटपटला  पुटपटला .एवढ्यात बन्याला कुणाचातरी फोन आला .मला आणखी एक कल्पना सुचली. मोबाईलच्या कीबोर्डवर नाचून काही अक्षरे उमटू शकतील का ?मी बन्याच्या खांद्यावर वाट बघत बसून राहिलो .त्याने की बोर्डवर काही टाइप करायला सुरुवात करताच मी त्यावर नाचून काही जमते का ते पाहू लागलो .आणि मी तिथेही यशस्वी झालो .

तिथून मी निघालो तो सरळ परीकडे आलो .परी विमनस्क स्थितीत बसली होती .तिच्या कानात बसून मी जोरात ओरडले की मी आलो आहे .बन्या सारखीच तीही दचकली .मी तिला म्हटले की तू घाबरू नकोस .मला तुला एक रहस्य सांगायचे आहे .तिने मला काय म्हणून विचारले .माझे बोलणे तिला ऐकू जात होते .मी सूक्ष्म रूपाने तिथे आहे हे तिला जाणवले .माझ्या असे लक्षात आले की जिथे भावनात्मक बंध जुळलेले असतील तिथे माझे बोलणे सहज ऐकू जात होते.माझी बोलण्याची प्रॅक्टिस वाढत चालली होती .मी परीला सर्व हकीगत सांगितली .तिला सर्व ऐकून आणखीच रडे कोसळले.एकमेकांशी प्रत्यक्ष न बोलता दोघांनीही मनोमन काय इमले रचले होते . आता ते सर्वस्वी उद्ध्वस्त झाले होते .तिला राजनपासूनचा धोका आता खूपच वाढला होता.तिला आता  स्वतःच तिचे रक्षण करणे भाग होते.मी तिला कराटेचा क्लास सुरू करण्याला सांगितले .जरी प्रवीण होण्यास खूप कालावधी लागला असता तरी महिन्याभरात ती काही ना काही स्वसंरक्षण करण्यास समर्थ झाली असती .तिच्या संरक्षणाचा दुसरा कुठला मार्ग मला दिसत नव्हता .दुसऱ्या दिवसापासून तिने कराटेचा क्लास चालू केला . तिच्या वडिलांना काही सांगावे असे वाटले.परंतु त्यात काही अर्थ नाही हे लक्षात आले .

तिथून मी सरळ निघालो तो राजनकडे आलो .राजनला मला घाबरवून सोडायचे होते .मी जो अत्यंत पातळ धुसर द्रव्य स्वरूपात होतो तिथे मला आता काही प्रमाणात घन स्वरूपात प्रकट होणे शक्य होऊ लागले होते .तिथे आल्या आल्या मी माझे अस्तित्व त्याला जाणवण्यासाठी त्यांच्या कानात बसून एक आरोळी ठोकली .तो जागच्याजागी दचकला इतक्या जोरात त्याने मान हलविली कि ती लचकली.त्याला नीट बघता येत नाहीसे झाले .त्याची मान जोरदार जोरात तिरपावली होती.वाकडी मान करून त्याला प्रयासाने बघत बोलावे लागत होते .माझ्या असे लक्षात आले की जसे प्रेमाचे भावनात्मक बंध असतात त्याचप्रमाणे द्वेषाचेही भावनात्मक बंध असतात .परीला ज्याप्रमाणे माझे अस्तित्व जाणवले त्याचप्रमाणे राजनलाही माझे अस्तित्व जाणवले .परी मी सूक्ष्म  रूपाने का होईना आलेला पाहून आनंदित झाली होती .तर राजन थरथर कापू लागला होता .मी देहरूपाने होतो तेव्हा तो मला इजा पोचवू शकत होता. त्याने पद्धतशीरपणे  माझा काटा दूर केला .आता तो माझे काहीच वाकडे करू शकत नाही अशी माझी समजूत होती .मी त्याला सांगितले की जर तू परीच्या वाटेला गेलास तर तुझी खैर नाही.तू मला मारलेस खरे परंतु मी परत आलो आहे .पूर्वीपेक्षा माझी ताकद कितीतरी वाढलेली आहे .मी मुळातच सज्जन असल्यामुळे मला तुला हानी पोचवावी असे वाटत नाही .परंतु परीकडे तू वाकड्या नजरेने पाहिले तरी सुद्धा मी तुझे डोळे बाहेर काढीन.तो कावऱ्याबावऱ्या नजरेने चहूकडे पाहात होता .मी तिथेच आसपास कुठे तरी आहे हे त्याला जाणवले होते .

मी त्याला जरबेने त्याचा लॅपटॉप सुरू करायला सांगितला संमोहनात  असल्याप्रमाणे त्याने लॅपटॉप सुरू केला .मी कीबोर्डवर नाचून त्याला संदेश दिला.खबरदार मी सांगतो त्याप्रमाणे तुला वागलेच पाहिजे .जर वागला नाहीस तर मी तुझी मुंडी मुरगाळून टाकीन. मी परीला काहीही करणार नाही म्हणून त्याने सांगितले.तो चांगल्यापैकी घाबरून गेला होता .त्याच्या डोक्यात एखादा मांत्रिक आणून माझा बंदोबस्त करावा असे विचार चालले होते .ते मला लगेचच कळले.मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की काही लोकांच्या डोक्यात काय विचार चालले आहेत ते कसे माहित नाही परंतु मला कळत जाणवत होते. मी त्याला दम दिला की मांत्रिक वगैरे आणण्याच्या भानगडीत पडू नकोस मांत्रिक माझा बालही वाकडा करू शकणार नाही .मात्र मी तुझी वाट लावीन .त्याच्या मनातील विचार मला कळतात असे पाहून तो आणखीच हादरला . माझ्यामुळे आधी त्याची मान लचकली होती .मी तिथे आहे असे पाहून तो  हादरला होता .त्याचे विचार मला कळतात हे पाहून तो आणखीच घाबरला.परीला अजिबात त्रास देता कामा नये असा पुनः  एकदा मी त्याला दम दिला .तो इतका घाबरला की लॅपटॉप बंद करण्याचे विसरून तसाच आतल्या खोलीत निघून गेला .

मला ही आयतीच सुवर्णसंधी मिळाली होती .मी त्यावर सुभाषचा खून कसा झाला .त्याच्या गाडीला अॅक्सिडेंट झाला नव्हता .मागून लक्ष ठेवून येणाऱ्या ड्रायव्हरने त्याला मुद्दाम उडविला. गाडीच्या ड्रायव्हरला किती पैसे देण्यात आले .त्या गाडीचा नंबर कोणता.राजनने हे सर्व का केले.वगैरे सर्व गोष्टी टाइप करून तो मेल पोलिसांकडे पाठवून दिला . त्याची एक कॉपी मी  राजेशच्या वडिलांना  पाठवून दिली. आता पोलीस चौकशी करण्यासाठी निश्चित येणार होते .अर्थात राजनच्या वडिलांचा राजकीय दबदबा लक्षात घेता कदाचित त्यांनी या मेलकडे दुर्लक्ष ही केले असते.अजूनही मला नीट टाईप करता येत नव्हते .मला बोलताना प्रयास पडत होते.माझ्या द्रव्याचे दिसेल असे घनीकरण व दिसणार नाही असे सुक्ष्मीकरण मला सराइतपणे करता येत नव्हते.चालणे उडणे बोलणे टाइप करणे इत्यादी गोष्टी मला सहजपणे करता येत नव्हत्या .पण एकना एक दिवस या सर्व गोष्टी मला करता येतील याची मला खात्री होती .मला जास्त प्रॅक्टिस आवश्यक होती .

राजनच्या घरून निघालो तो सरळ त्याच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये गेलो .ते राजकीय पुढारी असल्यामुळे त्यांचे पार्टी ऑफिस होते.माझ्या मेलचा काय परिणाम झाला ते मला पाहायचे होते .बाहेर ऑफिसमध्ये काम चालले होते.केबिनचा दरवाजा बंद होता .अर्थात मला आता जण्यात अडचण नव्हती.बंद दरवाजातून मी सरळ आत गेलो.राजनचे वडील व आणखी दोन गुंडांसारखी दिसणारी माणसे यांचे काहीतरी आपसात

हळू आवाजात बोलणे चालले होते .माझी मेल त्यांना मिळाली होती .राजनला काही होणार नाही परंतु जर त्याच्यावर काही दोष आला तर त्याला कसे वाचवावे याची चर्चा चालली होती . राजनच्या लॅपटॉपवरून ही मेल कशी  आली हाच चर्चेचा मुख्य  मुद्दा होता .राजनने खून केला. अपघात असे दाखवण्यात आले. ही सर्व माहिती  जवळच्या कुणाला तरी माहीत आहे. म्हणून त्याने राजनच्या लॅपटॉपवरून ती माहिती आपल्याला दिली.हा घरभेदी कोण त्यावर चर्चा चालली होती.

त्याचा बंदोबस्त केला पाहिजे असेही बोलणे चालले होते. निवडणूक तोंडावर आली असताना राजनने केलेल्या उचापतीमुळे आपल्याला धोका पोचण्याचा संभव आहे.हा मेल पाठविणारा जो कुणी आहे त्याचा छडा लावला पाहिजे . तो आज ना उद्या आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा नक्की प्रयत्न करेल अशा स्वरूपाचे बोलणे चालले होते .मला हवा तो परिणाम झालेला होता .मी समाधानाने त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडलो .

तिथून निघालो तो मी सरळ आपल्या घरी आलो .पुरुष मंडळी स्मशानातून घरी आली होती. शेजाऱ्यांकडून आलेला पिठले भात नाईलाजाने मंडळी दोन घास खात होती .मला मुक्ती मिळेपर्यंत काही काम करीत नसलो तर माझ्या घरी येऊन मी पलंगावर आराम करीत असे .खिडक्या दरवाजे बंद असूनही दिव्याची ज्योत हलत कशी होती ते बायका मंडळी सांगत होत्या .सुभाष येथेच होता आहे असे त्या सांगत होत्या .मृत्यूनंतर दहा दिवस मेलेल्याचा आत्मा घुटमळत असतो अशी समजूत आहे.ते बरोबर की चूक ते मला माहीत नाही .परंतु मी मात्र येथे सूडाच्या भावनेने व परीला संरक्षण देण्याच्या इच्छेने घुटमळत होतो.

परीला वाचविणे  व राजनचा सूड घेणे हे झाल्याशिवाय मला मुक्ती नव्हती .                        

१/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel