(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

एक दिवस सर्व वर्तमानपत्रात एक जाहिरात आली .जाहिरात पुढीलप्रमाणे होती .आज मी चलनांमध्ये पांच रुपयांची  चार नाणी प्रसारीत(सर्क्युलेशन) केली आहेत .प्रत्येक नाण्याचे एक वैशिष्ट्य आहे.

एका नाण्यावर चौरस आहे.

एकावर चौकोन आहे.

एकावर काटकोन चौकोन आहे .

एकावर वर्तुळ आहे.

ही नाणी चलनांमध्ये दहा दिवस फिरत राहतील .अकराव्या दिवशी सकाळी सहा वाजता ज्याच्याकडे ही नाणी असतील त्याला पुढील प्रमाणे बक्षीस मिळणार आहे .

१)एक कोटी रुपयांचे बक्षीस.त्याच्या घरी एक कोटी रुपयांचे सुवर्ण कुरिअरमार्फत  पाठविण्यात येईल .त्याचा एक कोटी रुपयांचा विमा उतरलेला असेल.त्यामुळे ते सुवर्ण त्याला नक्की मिळेल.  

२)नामांकित पर्यटन कंपनीचे जगाच्या सफरीचे तिकीट.हे तिकीट त्याच्या नावाने पोस्टाने पाठविण्यात येईल. दुसरा कुणी ते तिकीट घेऊन सफर करू शकणार नाही. 

३)कोणत्या ना कोणत्या प्रकारे समृद्धी .समृद्धी कशी मिळेल ते माहीत नाही.  भरपूर पैसा मिळेल.किंवा जर एखादा कर्जबाजारी असेल तर त्याचे कर्ज फेडण्यात येईल.किंवा कोरड्या विहिरीला पाणी लागेल .किंवा शेतकऱ्यांची तंट्यामध्ये असलेली जमीन त्याच्या मालकीची होईल. किंवा व्यावसायिकांचा व्यवसाय भरभराटीला येईल .मालाला स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय मागणी वाढेल .

४)मृत्यू .कोणत्याही मार्गाने येऊ शकतो.अपघात, विषप्रयोग,कोणत्याही प्रकारे  खून,फाशीची शिक्षा, हृदयक्रिया बंद पडणे,मेंदूत रक्तस्राव ,किंवा इतर अनेक मार्गांपैकी कोणत्याही मार्गाने मृत्यू होईल हे नक्की .

मृत्यू मी देणार नाही .ज्याच्या त्याच्या दैवाने तो मिळणार आहे.मृत्यू टाळायचा असेल तर  मृत्यू दर्शवणारे नाणे पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पायथ्याशी ठेवावे . फेकून देऊ नये . 

हा एक प्रकारचा खेळ आहे असे समजले तरी चालेल .पहिल्या तीन गोष्टी मी देणार आहे . चौथी म्हणजे  मृत्यू ज्याच्या जवळ नाणे असेल त्याला दैवगतीने प्राप्त होणार आहे.एका नाण्यामध्ये असे काहीतरी आहे की त्यामुळे व्यक्तीला मृत्यू प्राप्त होणार आहे .

या आकृती साध्या डोळ्यांनी किंवा अन्य पाहण्याच्या मार्गांनी म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्र वगैरे  दिसणार नाहीत .मी एका विशिष्ट रासायनिक प्रक्रियेने या नाण्यांवर अदृश्य मुलामा चढविला आहे.जर नाणे पाण्यात बुडवून लाल  दिव्याखाली धरले तर या आकृती दिसतील.

या नाण्यांवर मी एक अदृश्य संदेश प्रक्षेपक (ट्रान्समीटर) बसविला आहे .त्यामुळे या नाण्याचा प्रवास मला क्षणोक्षणी कळणार आहे.वर सांगितलेल्या वेळी ज्याच्याकडे जे नाणे असेल त्याला त्याप्रमाणे त्याचे फळ मिळेल.

मृत्यूच्या भीतीने जर नाणे एखाद्याने फेकून दिले तरीही मला ते कळणार आहे.कुणीही नाणे न उचलल्यास ज्याने ते शेवटी फेकले त्याच्याकडे ते आहे असे समजण्यात येईल.नाण्यावरील आकृतीप्रमाणे त्याला फळ मिळेल.

आंबेडकर चौकात पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे.त्यांच्या पायाशी नाणे ठेवल्यास ते त्याना समर्पण करण्यात आले आहे असे समजले जाईल.आंबेडकर ट्रस्टला नाण्यावरील आकृतीप्रमाणे (फक्त मृत्यू सोडून) फळ मिळेल.एक कोटी रुपये जमा केले जातील .किंवा जगाच्या सफरीसाठी जो खर्च येईल तो ट्रस्टमध्ये जमा केला जाईल.किंवा समृद्धीचे मूल्य मी निश्चित करीन व ती रक्कम जमा केली जाईल.चारी नाणी पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाशी असली तर  समृद्धीचे मूल्य  मी निश्चित करीन आणि सर्व पैसा ट्रस्टला मिळेल

ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर तर्क वितर्काना ऊत आला.सोशल मीडियावर,वर्तमानपत्रात , घराघरात, चौका चौकात, चर्चा सुरू झाली .त्या चर्चेत पुढील मते मांडण्यात आली

.१)हा कुणातरी  वेड्याचा  उद्योग दिसतो.नाण्यांवर आकृती नाही. फळ नाही.कांही नाही. सर्व गप्पा आहेत.लोकांना उगीच कामाला लावले आहे.

२)हा कोणीतरी श्रीमंत वेडा आहे आणि तो खरेच त्या आकृतीप्रमाणे फळ देईल. 

३)एखाद्या हुषार माणसाने लोकांना कामाला लावण्यासाठी उगीचच जाहिरात दिली आहे.आणि तो लोकांची गंमत पाहत आहे .

४)एखाद्या समाज शास्त्रज्ञाने समाजमनाचा शोध घेण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे .

५) याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे हेच उत्तम .  

काही जणांनी ही जाहिरात कुणी दिली त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला .लेटर बॉक्समध्ये  जाहिरात छापण्यासाठीचे पत्र,जाहिरातीचा मजकूर,व सोबत  पुरेशी कॅश होती.  म्हणून जाहिरात छापली असे उत्तर वर्तमानपत्राच्या संपादकांनी दिले

जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या  आकृती असलेल्या नाण्यांचा परिणाम खरा असो. खोटा असो.त्याप्रमाणे फळ मिळो न मिळो. प्रत्येक जण दुकानदार, ग्राहक,मजूर ,सावकार ,बँकेतील कर्मचारी ,ऋणको,धनको, ज्याच्या ज्याच्याजवळ पैसा येत होता व जात होता तो , आपल्याला मिळालेल्या नाण्यातील पाच रुपयांचे नाणे बाजूला काढून ठेवू लागला.लाल दिव्याची विक्री तुफान होऊ लागली .कारण नाणे पाण्यात बुडवून लाल दिव्याखाली पहायचे होते.

लाल बल्ब खपत नाहीत म्हणून बल्ब उत्पादकांनीच ही युक्ती लढवली आहे.असे बरेच जण म्हणू लागले .तरीही  लाल बल्बची विक्री तुफान होत होती.

जाहिरातीत वर्णन केल्याप्रमाणे कुणाला ना कुणाला जाहिरातीत दिलेल्या आकृतीचे नाणे मिळत होते.पाण्यात बुडवून लाल दिव्याखाली पाहून आकृती आहे का ते लोक पाहत होते.उल्लेख केलेली आकृती असल्यास प्रत्येकजण  त्याचा वेगवेगळा अर्थ लावीत होता.त्याप्रमाणे नाणे जवळ बाळगीत होता किंवा त्याचा त्याग करीत होता. नाणे फेकून चालणार नव्हते .ते सर्क्युलेशनमध्ये पाठविणे आवश्यक होते. त्याचा उपयोग करणे आवश्यक होते .वेळप्रसंगी ते भिकार्‍याला दिले असते तरी चालले असते.  

काहीनी  या जाहिरातीकडे संपूर्ण दुर्लक्ष करू असे ठरविले.परंतु त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते .आपल्याकडे आकृती असलेले नाणे आले असले आणि त्यावरील आकृतीचा अर्थ मृत्यू असला तर?प्रत्येक जण आपल्या जवळ कोणत्याही मार्गाने पाच रुपयांचे नाणे आले का ?त्यावर काही आकृती आहे का ?त्याचा अर्थ काय आहे ?नाणे जवळ ठेवावे की प्रसारात पाठवावे हे ठरवीत होता.   

कोणत्या आकृतीचा कोणता अर्थ अशी दुसरी चर्चा सुरू झाली.

चौरस म्हणजे शेत, जलाशय.शेत म्हणजे धनधान्य  समृद्धी.पाणी म्हणजे  समृद्धी.

चौरस म्हणजे जगाचे चार कोपरे ,जगाच्या पर्यटनाचे नामांकित कंपनीकडून तिकीट 

चौरस म्हणजे कबर,समाधी, मृत्यू .

चौरस म्हणजे खजिन्याची पेटी .एक कोटी रुपये .

चौकोन, काटकोन चौकोन, यांचाही वरीलप्रमाणेच अर्थ लावण्यात आला .

वर्तुळ म्हणजे विहीर, लपवलेला खजिना . एक कोटी रुपये .

वर्तुळ म्हणजे विहीर म्हणजे जल म्हणजे समृद्धी .  

विहीर म्हणजे वर्तुळ.गोल. पृथ्वी गोल आहे. म्हणजे जगाची सफर.

वर्तुळ म्हणजे  विहीर म्हणजे  पाणी`.पाण्यात बुडून  मृत्यू होतो तेव्हां वर्तुळ म्हणजे मृत्यू 

अशा प्रकारे प्रत्येकाने आकृतींचा निरनिराळा अर्थ लावला.प्रत्येक आकृतीचा अर्थ काय असावा याचीही जोरदार चर्चा सुरू झाली होती .

एक कोटी रुपये, जगाची सफर ,समृद्धी, यातील कोणताही अर्थ असला तर म्हणून प्रत्येकजण कोणतीही आकृती असली तरी ते  नाणे आपल्याजवळ ठेवीत होता . परंतू पुनर्विचार करता त्याचा अर्थ मृत्यू असला तर  असे म्हणून लगेच ते नाणे कुणालातरी देऊन मोकळा होत होता. 

एकूण धमाल चालली होती.आणि या सगळ्याचा कर्ता कुठुनतरी सर्वांची गंमत पाहत होता .

एक एक दिवस उलटत होता .दहा दिवस पूर्ण होत होते .अकराव्या दिवशी सकाळी सहा वाजता कुणाजवळ नाणे असणार आणि त्याचे काय होणार अशी चर्चा सुरू झाली होती .

अकरावा दिवस उजाडला. सकाळचे सहा वाजले.डॉक्टर साहेबांच्या पुतळ्याच्या पायाजवळ चारही नाणी ठेवलेली होती .

पूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या ट्रस्टला एक कोटी रुपयांचे सोने,जगाच्या सफरीचे मूल्य पंचवीस लाख रुपये,समृद्धीचे मूल्य  म्हणून पन्नास लाख रुपये असे एकूण पावणे दोन कोटी रुपये अज्ञात इसमाकडून मिळाले.  

सोबत एक चिठी होती .लोक प्रत्येक गूढ गोष्टींचा वाटेल तो अर्थ कसा काढतात ते मला सिद्ध करायचे होते .त्याचप्रमाणे लोक मृत्यूला घाबरतात  आणि हे झंझट नको असे म्हणून चांगल्या गोष्टींपासूनसुद्धा परावर्तीत होतात हे सिद्ध करायचे होते.हा एक खेळ होता .

*काटकोन चौकोन कबर दर्शवीत होता.*

*उरलेल्या आकृती असलेली नाणी जर लोकांनी जवळ ठेवली असती तर ते मालामाल झाले असते .*

*काटकोन चौकोन असलेल्या नाण्यानेही मृत्यू आला असता असे नाही.ही एक केवळ प्रत्येकाला घातलेली भीती होती.*

*मी अज्ञात होतो आणि अज्ञात रहाणेच पसंत करतो.*  

६/६/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel