(ही कथा व पात्रे काल्पनिक आहेत साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)  

राजीव आपला मित्र संजीव याच्याकडे काही दिवस राहण्यासाठी म्हणून आला होता.राजीवच्या येण्याचे चार हेतू होते .

शहरातील वातावरणात सतत राहून राजीव कंटाळला होता. खेडेगावात जाऊन काही दिवस खेडेगावातील मोकळी हवा व निसर्गसौंदर्य यांचा आस्वाद घ्यावा असा त्याचा एक हेतू होता.

किती तरी दिवस संजीव राजीवला आपल्या घरी बोलावीत होता.दोघांचीही घनदाट मैत्री होती .तेव्हा संजीवच्या आग्रहाला मान द्यावा हाहि त्याचा हेतू होता .

संजीवची बहीण संजना हिची व राजीवची दाट मैत्री होती .काहीतरी करून घरच्यांची संमती सहज मिळवावी असा दोघांचाही प्रयत्न होता .संजनाच्या घरच्या मंडळींना इम्प्रेस करावे त्यांच्यावर प्रभाव पडावा असाही इथे येण्यामागे एक हेतू होता . इथे आल्यापासून घरच्या मंडळींना दोघांचाही जोडा चांगला दिासेल असे वाटू लागले होते. 

परंतु आणखी एक चौथा हेतू राजीव व संजीव या दोघांच्याही मनात होता .राजीव डायव्हिंग करण्यात कुशल होता .तो कुशल डायव्हर होता. पाठीवर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन मास्क लावून तो समुद्रात किंवा खोल पाण्यात कित्येक तास राहू शकत असे .टॉर्चच्या प्रकाशात खोल पाण्यात गॉगल लावून तो सर्व काही स्वच्छपणे पाहू शकत असे.आपली खोल पाण्यात जाण्याची सर्व सामुग्री बरोबर घेऊनच राजीव आला होता .

संजीवच्या खेडेगावात एक खजिना विहीर म्हणून मोठी प्रचंड विहीर होती.या गावात व  पंचक्रोशीतही पाण्याचा दुष्काळ पडू नये म्हणून कुणातरी राजामहाराजाने कोणे एके काळी ही विहीर बांधली होती.या विहिरीतील पाणी कधीही आटत नाही अशी अाख्यायिका व अनुभव होता.या विहिरीला तळ नाही अशी एक समजूत होती.पूर्वीच्या काळी चार चार मोटा सतत लावल्या तरीही ही विहीर अाटत नाही,असे गावातील वृद्ध  लोक सांगत असत.हल्ली चार मोठे इलेक्ट्रिक पंप लावूनही पाणी आटत नसे.जेव्हा पाण्याचा दुष्काळ पडे त्यावेळी पंचक्रोशीत येथून पाणी नेले जाई. 

येथे मोठ्या पाण्याच्या टाक्या बांधल्या होत्या.विजेच्या पंपाद्वारे त्या भरल्या जात .गावापुरता त्यातून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात असे .

पाण्याचा मोठा प्रचंड खजिना म्हणून खजिना विहीर असे नाव असावे असे काहींचे मत होते .

तर काही जणांची या विहिरीत ज्या राजाने विहीर बांधली त्या राजाने खजिना लपविलेला आहे.अशी समजूत होती .आणि म्हणून विहिरीचे नाव खजिना विहीर असे असावे .असे मत होते.

कोणे एके काळी या गावात राजाचा राजवाडा असावा.ही विहीर राजवाड्यात होती . राजवाड्यातील खजिना या विहिरीजवळ होता . त्यामुळे हिचे नाव खजिना विहीर पडले असे काहींचे मत होते .  

बर्‍याच उत्तम पोहणाऱ्या माणसानी या विहिरीत उडी घेऊन तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता .सफल कुणीही झाला नव्हता. पाण्यात खोलवर जाताना पाण्याचा दाब वाढत जातो.  श्वास काही काळच रोखता येतो .आपण घुसमटणार असे वाटल्यावर लगेच पाण्याच्या वर यावे लागते .

तात्पर्य अजूनपर्यंत कुणीही पाण्याच्या तळापर्यंत जाऊ शकले नव्हते.आणि म्हणूनच या विहिरीला तळ नसलेली विहीर असे म्हटले जात असे .राजीवच्या येण्याचा  या विहिरीत खोल जावे .तळापर्यंत गेल्यावर तेथे आपल्याला काय मिळते ते पहावे असाही हेतू होता .आख्यायिका आहे त्याप्रमाणे विहिरीत खजिना लपविलेला आहे का त्याचा शोध घ्यावा .असाही त्याच्या येण्याचा हेतू होता .म्हणूनच तो आपल्या बरोबर डायव्हिंगचे सर्व सामान घेऊन आला होता .

अशी ही नामांकित विहीर  संजीवच्या शेतात होती.संजना व संजीव दोघांनीही त्याच्याबरोबर हिंडून त्याला सर्व गाव दाखविला . गावापासून जवळची प्रेक्षणीय स्थळेही दाखवून झाली .संजना व राजीव यांची जवळीक संजीवच्या लक्षात केव्हाच आली होती.दोघेही एकमेकांना पसंत करतात हे त्याला आता जास्तच समजले.तिघेही  विहिरीवर जाऊन कित्येक वेळा गप्पा मारत बसले होते.संजीव म्हणतो त्याप्रमाणे ही विहीर खरेच इम्प्रेसिव्ह आहे हे त्याच्या लक्षात आले. काही दिवस गावात मनसोक्त हिंडल्यावर पाहुणचार उपभोगल्यावर राजीव आपली डायव्हिंगची सामुग्री घेवून विहिरीच्या काठावर आला . त्याच्याबरोबर संजीव व संजना दोघेही होती. पावसाळी दिवस होते विहिरीला आधीच पाणी भरपूर त्यात आणखी वाढ झालेली होती.उन्हाळ्यात निरनिराळया  गावात पाणी वाहून नेण्यासाठी टँकर्सची गर्दी असे.कितीही टँकर्स भरून नेले तरी विहिरीचे पाणी कधीही आटत किंवा कमी होत नसे .आता टँकर्स नव्हते .एकदा सकाळी पंप सुरू करून पाण्याच्या टाक्या भरल्या की नळयोजनेचे कामगारही विहिरीवर नसत.शेतातील माणसे दूरवर काम करीत होती .एकूण राजीव व संजीव यांचा काय उद्योग चालला आहे ते पाहण्यासाठी कुणीही नव्हते .

संजीवने राजीवला सर्व काळजी घेण्यास सांगितले.तुला आत काही धोका वाटला तर लगेच वर ये म्हणूनही बजावले. या सर्व गोष्टी संजनाने केवळ नजरेने सांगितल्या. पाण्यात आसरा असतात.त्या माणसाला भुलवतात .खोल पाण्यात नेऊन त्याला ठार मारतात अशी खेडेगावात समजूत आहे.राजीव व संजीव यांचा अर्थातच या समजावर विश्वास नव्हता.संजीवच्या घरच्या माणसांना मात्र त्या पाण्यात देवता राहतात तेव्हा खोलवर जावून त्यांना पाहण्याचा प्रयत्न करू नये असे वाटत होते .त्या देवतांना पाहण्याचा प्रयत्न केला तर विहिरीतील पाणी आटेल अशीही त्यांची समजूत होती.

तिघेही घरच्यांना काहीही न सांगता विहिरीवर आले होते . 

संजीवने राजीवचा व त्याचा हा हेतू कुणालाही सांगितला नव्हता .मिशन खजिना विहीर तिघांपुरतीच मर्यादीत होती . राजीवने डायव्हिंगचा सर्व जामानिमा चढविला .संजीवने काळजी घे म्हणून सांगितले. संजनाने तर नाही गेलास तर चालणार नाही का म्हणून काळजीने विचारले.

*मी अनेकदा डायव्हिंग केले आहे तू अजिबात काळजी करू नकोस म्हणून त्याने संजनाला आश्वस्त केले . *

*ऑक्सिजन सिलिंडर दोन तास पुरेल एवढाच आहे तू दीड तासातच वर ये म्हणून सांगितले .*

*तू काळजी करू नको मी वेळेवर परत येतो असे सांगून राजीवने पाण्यात बुडी मारली .*

(क्रमशः)

२६/७/२०१९@प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel