(ही कथा काल्पनिक आहे साम्य आढळल्यास योगायोग समजावा)

ती गढी फार पुरातन होती.  पेशवाईच्या अखेरच्या काळात मर्दुमकी गाजविल्याबद्दल मुकुंदाच्या एका पूर्वजाला  सरदारी व पंचवीस गावांची जहागिरी मिळाली होती .आता जरी जहागिरी नष्ट झाली असली तरीसुद्धा चार पांचशे एकर जमीन मुकुंदाच्या मालकीची होती .व्यवस्थापक नेमून मजूर लावून ती तो कसत असे. गढी इतकी मजबूत बांधली होती की त्याची बाहेरून तरी दुरुस्ती करण्याची वेळ अजून आली नव्हती .काळानुरूप आतील रचना बदलत गेली.आधुनिक काळानुसार मुकुंदाने सर्व रचना  आपल्याला हवी तशी करून घेतली होती .सैपाकघर दिवाणखाना शयनगृहे इत्यादी सर्व आधुनिक पद्धतीचे होते.बाहेरून गढी जरी जुनाट व पुरातन वाटत असली तरी आत शिरल्यावर एकदम अत्याधुनिक  घरात आल्यासारखे वाटे.  

गढी सभोवताली सुंदर बाग केलेली होती.बागेत शोभेच्या झाडांबरोबर फुलांचीही झाडे लावली होती . गढीच्या तीन बाजूंना अरण्य होते तर एका बाजूला नदी वाहत होती .मुकुंद हाडाचा शेतकरी होता .तो मजूर लावून स्वत: शेती करीत असे.शेतीवर त्याचे निरनिराळे प्रयोग चालत . कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी  कॅनिंगसाठी, बॉटलिंगसाठी,लोणची मुरांबे इत्यादी तयार करण्यासाठी त्याने लहान लहान कारखाने सुरू केले होते .त्याची शेती व प्रक्रिया करणारे कारखाने यामुळे त्या गावात बऱ्याच जणांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या होत्या . एवढ्या मोठ्या इस्टेटीला नेहमीच्या देखरेखीसाठी  एक व्यवस्थापक  नेमलेला होता .विविध प्रकारची फुले, फळे, धान्य,व छोट्या छोट्या कारखान्यातून तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी शहरांमध्ये एक स्वत:चे दुकान मुकुंदाने सुरू केले होते .तिथे नंबर एकचा शेतमाल व शेती उत्पादनावर प्रक्रिया केलेल्या वस्तू योग्य भावात मिळत असत.

मुकुंदाचे सर्वत्र बारीक लक्ष असे.त्यामुळे शेतीमधून, फळबागांतून, फुलांच्या ताटव्यातून, उत्कृष्ट उत्पादन होई.आणि ते चांगल्या किमतीत विकले जात असे .प्रक्रिया केलेला मालही एक नंबरचा असे. शहरातही त्याचा एक बंगला होता .तिथे पत्नी व मुले रहात .सुटीमध्ये सर्व गढीवर येत असत .एरवी शिक्षणाच्या निमित्ताने सर्वजण शहरात रहात असत. मुकुंदा कधी शहरांमध्ये तर बऱ्याच वेळा आपल्या गावात गढीमध्ये राहात असे .शहर काही फार लांब नव्हते. चार तासात मोटारीने शहरात पोचता येई. सर्वत्र देखरेख करण्यासाठी त्याची उपस्थिती आवश्यक असे.

असे सर्व काही छान चाललेले असताना एकाएकी तो प्रकार सुरू झाला .मुकुंदाची पत्नी व मुले शहरातील बंगल्यात होती .गढीवर मुकुंदा एकटाच होता .अर्थात नोकर चाकर होतेच .मुकुंदाची एक सवय होती. झोपण्यापूर्वी पाण्याची बाटली भरून तो कॉटशेजारील टीपॉयवर ठेवीत असे .मध्येच केव्हा जाग आली तर त्याच्या घशाला शोष पडत असे .त्यावेळी दोन चार घोट पाणी पिऊन तो पुन्हा झोपी जात असे .त्या दिवशी रात्री त्याला गाढ झोप लागली होती .सकाळी उठून पाहतो तो पाण्याची बाटली अर्धी झालेली होती .त्याला पक्के आठवत होते की रात्री तो मुळीच जागा झाला  नव्हता .तरीही बाटलीतील पाणी कुणीतरी प्याले होते .दरवाजाला कुलूप लावलेले होते .मुकुंदाची ती नेहमीची सवय होती.कडाक्याच्या थंडीचे दिवस असल्यामुळे खिडक्याही बंद होत्या . तर मग पाणी कोण प्याले असा सवाल त्याच्या पुढे उभा होता.तेव्हापासून रात्री तो खिडक्या नीट बंद आहेत ना? त्याना कड्या  लावलेल्या आहेत ना?दरवाजा आतून लॉक केलेला आहे ना ?हे सर्व पाहू लागला.चार पाच दिवस तसेच गेले.रात्री काहीही घडले नाही . बहुधा त्या रात्री आपण पाणी प्यालो आणि झोपलो.गाढ झोपेत असल्यामुळे आपल्या लक्षात आले नाही. असे तो समजून चालला.

पुन्हा एका रात्री संपूर्ण बाटली रिकामी केलेली होती .आपण रात्री पाणी प्यालो नाही याची त्याला खात्री होती .तो रात्री झोपेतून  जागा झाल्यावर फार तर दोन चार घोट पाणी पीत असे.संपूर्ण बाटली रिकामी करणे शक्यच नव्हते . नेहमीप्रमाणे रात्री आपण पाण्याची बाटली भरून ठेवली होती हे त्याला पक्के आठवत होते.दरवाजे खिडक्या आतून बंद असताना रात्री कोण बरे पाणी पिते?तो गोंधळात पडला.भुताटकीवर त्याचा विश्वास नव्हता. परंतु आता विश्वास ठेवणे भाग होते 

दुसऱ्या दिवसापासून त्याने एक नवीन काळजी घेणे सुरू केले .पाण्याने भरलेल्या बाटलीला घट्ट बूच लावून  त्यावर तो चिकटपट्ट्या मारू लागला.हेतू एवढाच की चिकटपट्ट्या काढून पाणी घेईपर्यंत झोप नक्की उडालेली असेल.झोपेत पाणी प्यालो अशी सबब राहणार नाही .आणि काय आश्चर्य चिकटपट्ट्या तशाच होत्या. आतील पाणी मात्र गायब झाले होते.रात्री झोपेत आपण उठलो चिकटपट्ट्या काढल्या पाणी प्यालो आणि पुन्हा रिकाम्या बाटलीवर चिकटपट्ट्या मारल्या आणि हे आपल्याला झोपेमुळे कळले नाही, असे झाले असेल यावर त्याचा अज्जिबात विश्वास नव्हता . 

पुन्हा पूर्वीचाच पश्न कायम होता. पाणी कोण पिते?

मुकुंदला आणखी एक सवय होती .त्याच्या खोलीत एक छोटा फ्रीज होता.त्यात मसाला दुधाची बाटली ठेवलेली असे .  दिवसांत केव्हा तरी बहुधा संध्याकाळी  पाच वाजता ते तो पीत असे .त्याचा नोकर रोज सकाळी बाटली फ्रिजमध्ये ठेवीत असे . एक दिवस दूध पिण्यासाठी बाटली काढली परंतु ती रिकामी होती .त्याने नोकराला बोलवून चौकशी केली.नोकराने नेहमीप्रमाणे एक दुधाने भरलेली  बाटली आणून ठेविली व रिकामी बाटली तो घेवून गेला.हे सर्व तो शपथपूर्वक सांगत होता .नोकर जुना होता. विश्वासू होता . तो खोटे बोलण्याचा संभव नव्हता.

पुन्हा तोच प्रश्न बाटलीतील दूध कोण प्याले?

तेव्हापासून रोज सकाळी मुकुंद दुधाची भरलेली बाटली ठेवलेली आहे ना?याची खात्री करून घेऊ लागला .तरीही एक दिवशी संध्याकाळी मुकुंद दूध पिण्यासाठी गेला तेव्हा बाटली रिकामी होती.सर्व नोकर जुने होते प्रामाणिक होते त्यातीलच कुणीतरी दूध प्यायला असेल याची शक्यता नव्हती. नोकरांना दूध प्यायचेच असते तर ते किचनमध्ये पिऊ शकले असते .त्यांना अडवणारे कुणीही नव्हते. तरीही मुकुंदा बाहेर जाताना बाटलीत दूध आहे ना याची खात्री करून दरवाजाला कुलूप लावून किल्ली स्वतःकडे ठेवून बाहेर जाऊ लागला .

तरीही एक दिवस बाटलीतील दूध कुणीतरी प्याले होते .

आता मात्र मुकुंदाला वेड लागण्याची पाळी आली.आपल्याच नोकर मंडळीपैकी कुणीतरी आपल्याला गंडवीत आहे फसवीत आहे असे त्याला वाटू लागले.तरीही पाणी कोण पिते याचा उलगडा होत नव्हता.

एके रात्री मुकुंदा झोपलेला असताना त्याला जाग आली.कुणाचातरी पायरव एेकू आला .दरवाज्यापासून हळूहळू चालत दबकत दबकत कुणीतरी आपल्या कॉटजवळ आले व ते कुणीतरी वाकून आपल्याकडे निरखून बघत आहे असा त्याला भास झाला .त्याने कोण आहे ते पाहण्यासाठी घाबरून डोळे उघडले.कुणीही कुठेही नव्हते. खोलीत शांतता होती. बाहेरून रातकिडय़ांचा आवाज येत होता .त्याने दिवा लावून सर्वत्र पाहिले .दरवाजा, खिडक्या, बंद आहेत ना याची खात्री करून घेतली .सर्व काही जिथल्या तिथे व्यवस्थित होते .आपल्याला स्वप्न पडले की जागा झालेला असताना प्रत्यक्ष कुणी आले असे वाटले ते त्याच्या लक्षात येईना.

दुसऱ्याच दिवशी त्याने शहरात जाण्याचे ठरविले. मुलांना सुटी लागल्यावर पत्नी व मुले यांच्यासह  परत येण्याचे त्याने ठरविले .असे भास होत असताना तो आता एकटा गढीवर राहणार नव्हता. दुपारी जेवून तो निघणार होता .सकाळी बागेत  खुर्ची टाकून कोवळ्या उन्हात माळ्याने केलेल्या कामाचा तो आढावा घेत होता.थोडय़ा लांब असलेल्या एका गुलाबाच्या ताटव्याजवळ कुणीतरी उभे आहे असे त्याला वाटले .त्या इसमाने वाकून एक गुलाबाचे फूल तोडले .तो मनुष्य चालत चालत फाटकाकडे गेला.आपल्या बागेत येऊन आपल्या परवानगीशिवाय एखादा फूल तोडतोच कसे म्हणून त्याला राग आला .पकडा पकडा असे ओरडत तो उठला.दोन तीन नोकर धावत आले.मुकुंदाशी बोलणारा माळीही एकदम मालक पकडा पकडा असे कुणाला म्हणतात म्हणून मालक बघत असलेल्या दिशेला फाटकाकडे पाहू लागला .धावत आलेल्या नोकरांना  मुकुंदाने  फाटकातून बाहेर जाणाऱ्या  इसमाला पकडण्यास सांगितले. त्यावर त्या नोकरांना कुणाला पकडावे तेच कळेना कारण फाटकात कुणीही नव्हते .मुकुंदालाही कुणीही फाटकात दिसेना.एकाएकी तो चोरटा कुठे अदृश्य झाला ते कळेना .

आपल्यालाच हे भास का होतात ?सील केलेल्या बाटल्यातील पाणी कोण पितो ?दुधाची बाटली कोण रिकामी करतो ?खोलीच्या दरवाज्याला कुलूप लावलेले असताना खिडक्या बंद असतानाही खोलीत कोण फिरतो ?दबक्या पावलांनी आपल्या कॉटजवळ येऊन आपल्याला कोण निरखून बघतो?हे काय चालले आहे ?बघता बघता फूल चोरणारा अदृश्य कसा होतो ?

आपल्याला वेड तर लागलेले नाहीना?मुकुंदने मानसरोगतज्ञाची भेट घेण्याचे  ठरविले .दुपारऐवजी लगेच तो शहराकडे जाण्यासाठी निघाला .तिथे गेल्यावर आपल्याला आलेले सर्व अनुभव किंवा झालेले भास त्याने सरिताला त्याच्या पत्नीला सांगितले.

त्यांनी एका नामांकित मानसरोगतज्ञाची अपॉइंटमेंट घेतली. त्याला भेटल्यावर शांतपणे त्याने मुकुंदाचे सर्व अनुभव भास ऐकून घेतले.त्याला त्यांनी काही प्रश्न विचारले .शेवटी त्यांनी त्याला काही वेळा माणसाला असे भास होतात. त्यात काळजी करण्यासारखे काही नाही.तुम्ही दोघेही कुठे तरी आठ पंधरा दिवस फिरून या .नवीन प्रदेश नवीन निसर्गसौंदर्य नवीन माणसे यामध्ये तुम्ही सर्व काही  विसरून जाल .ताजेतवाने व्हाल.नंतर परत आल्यावर तुम्हाला काहीही भास होणार नाहीत .सर्व काही ठीक होईल असे म्हणून त्याला आश्वस्त केले.त्या उप्पर तुम्हाला काही त्रास अनुभव भास झाल्यास मला अवश्य भेटा नंतर आपण काय करायचे ते ठरवू असे त्यांनी सांगितले .

दोनच दिवसांनी दोघेही पंधरा दिवसांच्या सुट्टीवर दार्जिलिंगला रवाना झाली .

(क्रमशः)

१/११/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to रहस्यकथा भाग २


गूढकथा भाग ४
कौटुंबिक प्रेमकथा भाग २
वस्ती
रहस्यकथा (युवराज कथा) भाग ३
रहस्यकथा (युवराज कथा) भाग २
भूतकथा भाग ३
भूतकथा भाग ४
प्रेमकथा भाग ४
रहस्यकथा भाग ३
प्रेमकथा भाग ३
गूढकथा भाग ३