(ही कथा काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

समाजाला लागलेल्या अश्या किडी कायदेशीर किंवा बेकायदेशीर कोणत्याही मार्गाने नष्ट केल्या पाहिजेत असे हेरंबरावांचे स्पष्ट मत होते .

शेवटी दीपक सिंग तुरुंगात दहा वर्षांसाठी दाखल झाला .त्याने कमी शिक्षा व्हावी म्हणून किंवा सुटका व्हावी म्हणून केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले होते .त्याचे सुदैव एवढेच की त्याला फाशी किंवा आजन्म कारावास झाला नाही .त्याचप्रमाणे त्याला फाशी व्हावी किंवा निदान जन्मठेप मिळावी यासाठी हेरंबरावांनी  केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले होते .

तुरुंगात आल्यावर त्याने वॉर्डन किंवा इतर अधिकारी यांच्या मार्फत बाह्य जगाशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला .मोबाइल मिळवण्याचाही प्रयत्न केला .पैसे चारून दारू मिळविण्याचा प्रयत्न केला .त्याच्या दुर्दैवाने त्याचे कोणतेच प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत याचे कारण म्हणजे तुरुंगाधिकारी जाधवराव .

जाधवराव हा एक हेरंबरावांसारखाच कडक शिस्तीचा माणूस होता .तुरुंगाच्या नियमावलीवर काटेकोरपणे बोट ठेवून त्यांचा कारभार चालत असे .तुरुंग हे त्यांचे राज्य होते. आणि त्यामध्ये कोणताही बेशिस्तपणा चालत नसे.त्यांच्या हाताखालचे सर्व अधिकारी व इतर कर्मचारी त्यांना घाबरून असत .

या तुरुंगात आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपले काहीही कारनामे चालणार नाहीत याची दीपकसिंगला थोड्याच दिवसांत  खात्री पटली. 

काही कामानिमित्त हेरंबराव जाधवरावांना भेटायला आले होते.बोलण्यांमध्ये सहजच दीपकसिंगचा विषय निघाला .दीपकसिंगच्या कारनाम्यांबद्दल जाधवराव जाणून होतेच .वर्तमानपत्रातही केस चालू असताना त्यांनी बरेच काही वाचले होते .तो तुरुंगात आला त्यावेळी त्याचा इतिहास जाणून घेतला होता . प्रत्येक कैद्याचा इतिहास जाणून घेणे ही जाधवरावांची खास लकब होती.प्रत्येक कैद्याशी संबंध कसे ठेवावेत ते त्यावरून जाधवराव ठरवीत असत.जाधवरावांच्या दीपक सिंग बद्दलच्या ज्ञानामध्ये  हेरंबरावांनी आणखी बरीच भर घातली.असे गुन्हेगार ही समाजाला लागलेली कीड आहे आणि ती कोणत्याही उपायाने नष्ट केली पाहिजे याबद्दल दोघांचेही मत होते .ते या चर्चेमधून आणखी दृढ झाले.त्यानंतर आणखी काही गप्पा होऊन हेरंबरावांनी जाधवरावांचा निरोप घेतला .

दीपक सिंगला तुरुंगाच्या एका बाजूला शेवटच्या खोलीमध्ये ठेवले होते.  इमारतीत शिरल्याबरोबर पॅसेज सरळ लांबपर्यंत जात होता.त्या पॅसेजच्या डाव्या उजव्या बाजूला छोटे पॅसेज गेलेले होते .त्या प्रत्येक छोट्या पॅसेजच्या दोन्ही बाजूंना  कैद्यांच्या खोल्या होत्या .इमारतीला एकूण चार मजले होते .प्रत्येक मजल्यावर शंभर कैद्यांची सोय होती .एकूण चारशे कैदी दीपक सिंग ठेवलेल्या इमारतीत होते. अश्या  एकूण पांच इमारती होत्या.एकूण दोन हजार कैद्यांची या तुरुंगात व्यवस्था होती. अर्थात परिस्थितीनुसार एकेका खोलीत दोन दोन कैदी ठेवून तुरुंगाची क्षमता वाढविण्यात येत असे.एकेका खोलीत दोन दोन कैदी ठेवण्याच्या विरुद्ध जाधवराव होते .   

भटारखाना कार्यशाळा तुरुंगाधिकाऱ्यांचा बंगला तुरुंगातील कर्मचाऱ्यांच्या वसाहती असा एकूण सर्व कारभार होता .तुरुंगाला दहाफूट  मजबूत भिंत बांधलेली होती. त्यावर काचा व काटेरी तारा बसविलेल्या होत्या.तुरुंगातून पळून

जाणे जवळजवळ अशक्य होते.तुरुंगाच्या आवारात ट्रक येऊ शकतील एवढा मोठा दरवाजा व  त्याला छोटीशी दिंडी होती.दीपकसिंगने जेवण बरोबर नाही, मला व्यायामाला मोकळे सोडले जात नाही,खोलीत अमुक नाही तमुक नाही,मला माझ्या नातेवाईकांना नियमाप्रमाणे भेटू दिले जात नाही, म्हणून वेळोवेळी प्रशासनाला सताविण्याचे धोरण अवलंबिले होते.जेव्हा तुरुंगाच्या आवारात मोकळा सोडलेला असेल त्या वेळी लहान मोठ्या मारामाऱ्या करणे ,इतर कैद्यांवर हुकुमत गाजविण्याचा प्रयत्न करणे ,आपण इतरांहून वेगळे आहोत,आपण फार मोठे भाई आहोत हे इतरांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न करणे इत्यादी त्याचे  उद्योग वेळोवेळी चालूच होते .

ज्या ज्या मार्गानी उपायांनी प्रशासनाला सळो की पळो करता येईल असे त्यांचे एकूण वर्तन होते .आजारी पडून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करणे ,कुणीतरी जवळचा नातेवाईक आजारी आहे म्हणून पॅरोलवर सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणे ,चिरीमिरी देऊन तुरुंग कर्मचाऱ्यांना वश करून घेण्याचा प्रयत्न करणे,इत्यादी त्गोष्टी चालूच होत्या . तो तुरुंगात असला तरी त्याने पोसलेले वकील मोकळे होते .ते त्याला बाहेरून मदत करण्यासाठी प्रयत्नशील होते .  या तुरुंगातील कडक शिस्तीला कंटाळून दुसऱ्या एखाद्या तुरुंगात आपली बदली व्हावी यासाठीही तो प्रयत्न करीत असल्याचे जाधवरावांना समजले होते.

हेरंबरावांकडून जाधवरावाना दीपक सिंगचा सर्व काळाकुट्ट इतिहास कळला होता .या दीपक सिंगपासून आपलीच काय सर्वांचीच सुटका झाली पाहिजे अशा निर्णयावर जाधवराव आले होते .

रात्री नऊ वाजता तुरुंगातील दिवे बंद केले जात असत .पॅसेजमध्ये अंधुक प्रकाश देणारे दिवे प्रकाश टाकीत असत .त्या दिवशी काहीतरी बहाण्याने एक तुरुंग कर्मचारी दीपक सिंगच्या खोलीत आला .त्याच्याबरोबर आणखी दोन पोलिस होते .दीपक सिंग कदाचित हल्ला करील म्हणून नेहमीच काळजी घेतली जात असे .

दरवाजा ओढून घेण्यात आला . दांडा सरकवल्याचा व कुलुपामध्ये किल्ली फिरविल्याचा आवाज आला .तिघेही पॅसेजमधून चालत गेल्याचा, त्यांच्या बुटांचा आवाज आला.हळूहळू बुटांचा आवाज ऐकू येत नाहीसा झाला. दीपक सिंगचे कान तीक्ष्ण होते. आज कडीचा आवाज नेहमीप्रमाणे आला नाही हे त्याच्या ध्यानात आले.बहुधा कडीचा दांडा त्यासाठी केलेल्या भोकामध्ये गेला नसावा असा त्याला संशय आला.

तो हळूच चालत दरवाज्यापर्यंत आला.दरवाजा त्याने ओढून पाहिला .त्याचा अंदाज बरोबर होता .दरवाजा उघडा होता . दरवाजा उघडून त्याने हळूच पॅसेजमध्ये डोकावून पाहिले. लांबलचक दूरवर गेलेल्या पॅसेजमध्ये कुणीही नव्हते.दबकत दबकत तुरुंगाच्या इमारतीमधून बाहेर पडावे नंतर जे सुचेल ते करावे असे त्याने ठरविले.तो हळूच पॅसेजमध्ये आला .मुख्य पॅसेजच्या दोन्ही बाजूला गेलेल्या पॅसेजमधून कुणीतरी एकदम आल्यास आपण त्याला दिसू नये म्हणून तो जमिनीबरोबर भिंतीला चिकटून सरपटत सरपटत निघाला .सर्वत्र शांतता होती . छतावरील दिवे अंधुक प्रकाश टाकीत होते.त्या प्रकाशामुळे दिसायला मदत होत आहे की काळोख आणखी जास्त गडद होत आहे ते कळत नव्हते .एकूण वातावरण भेसूर होते.

भिंतीला चिकटून  दीपक सिंग पुढे सरकत असताना एकदम बुटांचे आवाज आले .पॅसेजमध्ये नेहमीप्रमाणे गस्त घालणारे येत होते .भिंतीला घोरपडीसारखा चिकटून श्वास रोखून दीपक सिंग आडवा पडला होता.त्या गस्त घालणार्‍यांचे त्याच्याकडे लक्ष जाते तर त्याची काही खैर नव्हती.सुदैवाने दीपक सिंगकडे त्यांचे लक्ष गेले नाही.त्याने सुटकेचा निश्वास सोडला .आपली छाती धाडधाड उडत आहे असे त्यांच्या लक्षात आले.एका मागून एक पॅसेज ओलांडत सरपटत तो पुढे सरकत होता.एवढ्यात कुणीतरी दोघे जण बाहेरून बिल्डिंगचा दरवाजा उघडून आत शिरले.एकमेकांशी कुठल्यातरी गहन विषयावर बोलण्यात ते दंग होते.दीपक सिंग पुन्हा भिंतींबरोबर चिकटून आडवा राहिला .त्याच्यापासून दहा फुटावर येऊन ते उभे राहिले . बोलता बोलता त्यातील एकाने दीपक सिंगकडे पाहिले .पाहूनही त्याची नजर शून्यात होती .त्याला बहुधा दीपक सिंग दिसला नव्हता .दिसला असता तर त्याने  दीपक सिंगला पकडण्यासाठी नक्कीच काहीतरी हालचाल केली असती. बोलता बोलता त्यातील एक जण बुटावर आपली छडी मारीत होता .जर आपण त्यांना दिसलो तर ती छडी आपल्या अंगावर किती वेळा उठेल असा  एक भीतीदायक विचार त्यांच्या मनात आला .ते दोघे जण तसेच चालत पुढे निघून गेले .

आता दरवाजा वीस फुटावर आला होता .त्यातून तो बाहेर पडला म्हणजे मोकळ्या आवारात येणार होता .एकदा भिंतीवरून चढून बाहेर उडी मारण्यात तो यशस्वी झाला म्हणजे   तो तुरुंगातून सुटला होता .समजा ते शक्य झाले नाही तर येणार्‍या  जाणार्‍या  मालाच्या ट्रकमधून तो बाहेर जाणार होता.

एकदा तुरुंगाबाहेर पडल्यावर  भूमिगत होऊन राहणे हा त्याच्या हातचा मळ होता .त्याने परदेशात निरनिराळ्या देशांत निरनिराळया बँकांत भरपूर पैसा जमविला होता . कुठल्याना कुठल्या मार्गाने देश सोडून जाता म्हणजे तो पूर्णपणे सुटला होता . वेषांतर करून खोटा पासपोर्ट तयार करून ते तो करू शकला असता. 

तो इमारतीच्या उघड्या असलेल्या दरवाजातून बाहेर आला.बाहेर सर्वत्र सामसूम होती .कुणाचीही कुठेही चाहूल लागत नव्हती .आकाशात ढग होते. अष्टमीचे फिकट चांदणे पडले होते . 

त्या फिकट प्रकाशात लांबून एखादी वस्तू मनुष्य दिसणे कठीण होते.मनुष्य दिसल्यास सावलीचाच भास होणार होता .नेहमी बाहेर प्रकाश झोत सोडलेले असत .आज बाहेर प्रकाश झोत नव्हते. बहुधा  वीज कंपनीची  वीज गेलेली असावी किंवा फ्यूज उडालेला असावा .

फिकट चंद्रप्रकाशात त्याला इमारतीच्या भिंतीला लागून आडवी ठेवलेली  शिडी दिसली .बहुधा काही कामानिमित्त ती शिडी तिथे आणलेली असावी .काम झाल्यावर ती जाग्यावर ठेवण्याचे कामगार विसरला असावा .

शिडी  उचलून  दीपक सिंगने ती भिंतीला लावली.त्याने झपाटय़ाने वर चढण्यास सुरुवात केली .एकदा तो शिडीच्या वरच्या टोकाला गेला असता की उडी मारून भिंत ओलांडणे त्याला शक्य  झाले असते .जंगल जवळच होते.एकदा तो जंगलात पोचला की पुढे कसे सुटावे त्याचा त्याने प्लॅन आखला होता.

तो शिडीच्या वरच्या पायरीपर्यंत पोहोचला होता .

एवढ्यात कर्णकर्कश शिट्टी वाजली .

त्याच्या अंगावर प्रकाशाचे झोत पडले . 

तीव्र प्रकाश झोतामुळे त्याला काहीही दिसत नाहीसे झाले.

तो काही काळ आंधळा झाला .

तरीही जिवाच्या आकांताने त्याने भिंतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला .

*त्याच वेळी बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या .*

* शरीराची चाळण झालेल्या अवस्थेत दीपक सिंग जमिनीवर पडला .*

* त्याचा सर्व खेळ संपला होता .*

* जाधवराव व हेरंबरावानी अशी कीड नष्ट करण्यासाठी आखलेली योजना यशस्वी झाली होती* 

(समाप्त)

३/११/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel