सुलभा

बारावी झाल्यानंतर मी इंजिनीअरिंग कॉलेजला अॅडमिशन घेतली होती .आधीच मी बुजरी त्यात नवीन कॉलेज त्यामुळे बिचकत बिचकत मी कॉलेजच्या एका इमारतीत प्रवेश केला .कॉलेज मोठे असल्यामुळे एकूण चार पाच इमारती प्रयोगशाळा हॉस्टेल्स कॅन्टीन्स जिम वगैरे  मोठा पसारा होता.मला एफवायच्या वर्गात जायचे होते .माझे स्पेशलायझेशन जरी कॉम्प्युटर असले तरी पहिल्या वर्षी सर्वांनाच सर्व विषय असतात.प्रवेशद्वारासमोर एक मुलांचे टोळके गप्पा मारीत उभे होते . माझी बुजरी नजर पाट्या पाहणे यावरून मी नवीन आहे  हे सहज त्या टोळक्याच्या लक्षात आले .मला अजून कुठे आवारात त्यांनी पाहिलेले नव्हते हे मी नवीन आहे हे ओळखण्याचे एक कारण तर होतेच .

त्यातील एक मुलगा पुढे आला आणि त्याने निरागसपणे कुठे जायचे आहे असे विचारले .मी अर्थातच माझा क्लास तुकडी वगेरे सांगितले .त्याने ही बिल्डिंग नाही तर समोरच्या बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरला जा व डाव्या बाजूचा पहिला वर्ग असे साळसूदपणे सांगितले .माझा त्याच्यावर अर्थातच चटकन विश्वास बसला .मी वळून त्या बिल्डिंगच्या दिशेने निघाले.मी पायऱ्या उतरणार एवढ्यात त्या टोळक्यामधील एक मुलगा चटकन पुढे आला आणि म्हणाला मिस मी पटकन म्हणाले सुलभा .त्यावर त्याने मिस सुलभा या बिल्डिंगमध्येच पहिल्या मजल्यावर तुमचा क्लास आहे चला मी दाखवतो असे म्हणाला आणि जिन्याच्या दिशेने चालू लागला .एक मुलगा समोरची बिल्डिंग  दाखवतो तर दुसरा याच बिल्डिंगमध्ये आहे म्हणून सांगतो कोण खरा कोण खोटा याची शहानिशा न करता मी मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या मागे चालू लागले.माझा त्याच्या बोलण्यावर चटकन विश्वास बसला होता .का कुणास ठाऊक पण मला तो आश्वासक वाटला .चालता चालता तो म्हणाला की तुम्ही चटकन जो कुणी बोलतो त्यावर विश्वास ठेवू नका .नवीन मुलगा किंवा मुलगी पाहून त्यांना गंडविण्यासाठी हे टोळके येथे उभे आहे .रॅगिंग चाच एक प्रकार म्हणाना. पाट्या नीट पाहा. कुणीही काही म्हणाले तरी तिकडे लक्ष देऊ नका. नाही तर  तुम्ही केडगावला जाण्याऐवजी पेडगावला जाल.तुम्ही म्हणाल मीही त्या टोळक्यात होतो .बरोबर आहे आमचा सिनिअरचा ग्रुप पहिले काही दिवस नव्यांची अशी मौज करीत असतो .तुमचा निरागस सोज्वळ चेहरा पाहून तुमची गंमत व्हावी असे मला वाटेना म्हणून मी मुद्दाम पुढे येऊन तुम्हाला तुमचा वर्ग दाखवित आहे .मी काहीच बोलत नव्हते. त्याच्याबरोबर मुकाट्याने जिना चढत होते.हाही कदाचित मला फसवत असेल असे कुठे तरी मनात चमकून गेले.त्याचा आश्वासक चेहरा पाहून ,स्वर ऐकून हा प्रामाणिक पणे बोलत आहे असे मला आत कुठेतरी जाणवले .त्याने मला आमच्या क्लासपर्यंत आणून सोडले व तो बाय म्हणून निघाला .मीहि त्याचे आभार मानले .

पहिल्या भेटीतच त्याची छाप पडली होती .तो कुठेतरी मला आत आवडून गेला होता .तो कॉम्प्युटर्सला दुसर्‍या  वर्षाला होता .जेव्हा कुठे तो मला भेटे त्यावेळी आम्ही एकमेकांकडे बघून स्मित करीत असू 

आमोद

आमचे टोळके त्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची पाहणी करीत होते .विशेषतः नवीन मुलींकडे आमचे लक्ष होते .तेवढ्यांत समोरून एक मुलगी पोर्चच्या पायऱ्या चढून वर येत होती.तिला पाहिल्यावर मला आतून कुठेतरी तिच्याबद्दल अापुलकी वाटली .हिला फसवू नये .हिची गंमत करू नये.हिची फिरकी आपण घेता कामा नये.असे प्रामाणिकपणे गंभीरपणे अांत कुठेतरी जाणवले . जेव्हां आमच्यातील एका मित्राने तिला चुकीचा रस्ता दाखविला तेव्हा मी चटकन पुढे होऊन तिला तिच्या क्लासपर्यंत नेऊन सोडले .तिचा साधेपणा शालीनता मला कुठेतरी स्पर्श करून गेला.ती मला आवडली हे मी कशाला नाकारू.प्रथमदर्शनी प्रेम असे म्हणतात ते हे तर नसेल ? आम्ही जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येत असू त्यावेळी स्मित करीत असू .मला तिच्याशी ओळख वाढवायची होती परंतु ते कसे करावे ते मला कळेना .ती वाङ्मय मंडळात आहे असे मला समजले .मीही त्या मंडळाचा सभासद झालो .स्वाभाविक आमच्या भेटीगाठी त्यानिमित्याने होऊ लागल्या.मुली चतुर असतात .मी तिच्यासाठी वाङमय मंडळाचा सभासद झालो हे तिने मुलींच्या स्वाभाविक चातुर्याने व अंतःप्रेरणेने ओळखले होते.आमच्या कामानिमित्त किंवा कामाशिवाय भेटीगाठी वाढत होत्या .कॅन्टीनमध्ये गप्पा मारीत बसणे.कॉरिडॉरमध्ये गप्पा मारीत उभे राहणे .यावरून अाम्हा दोघांबद्दल कॉलेजमध्ये मित्रमंडळीत गॉसिपही सुरू झाली होती .

सुलभा

आमोद मला पहिल्या भेटीतच आवडला .मी पहिल्या दिवशी त्या मुलाने सांगितल्याप्रमाणे कुठेतरी जात असताना त्याने मला थांबवून व्यवस्थित वर्गापर्यंत सोडले व काही सल्लाही दिला .केवळ माझ्यासाठी तो वाङमय मंडळाचा सभासद झाला हेही माझ्या लक्षात आले .आम्हा मुलींना मुलांच्या डोळ्यातील भाव बरोबर लक्षात येतात .त्याच्या डोळ्यात इतर मुलांप्रमाणे भाव नसून एक वेगळाच भाव होता तो माझ्या बरोबर लक्षात आला .

तो जरी माझ्या प्रेमात पडला असला आणि मलाही जरी तो आवडत असला तरी आमचा विवाह होणे कठीण आहे हे मी जाणून होते .मी मध्यमवर्गीय मुलगी .तीन खोल्यांच्या ब्लॉकमध्ये राहणारी .तर तो श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा .तो रोज मोटार घेऊन कॉलेजमध्ये येत असे.गाड्यांची त्यांच्याकडे निरनिराळी तीन चार मॉडेल्स होती .त्यातील कुठली तरी एक गाडी घेऊन तो येत असे.त्याच्या श्रीमंतीमुळे त्याच्या घरून आमच्या लग्नाला विरोध होईल असे मला कुठे तरी जाणवत होते.माझ्या आई वडिलांनी मला विरोध केला नसता तरी सावध मात्र निश्चित केले असते .या सर्वांची जाण असल्यामुळे मी त्यांच्यापासून निश्चयाने माझ्या मनाविरुद्ध थोडे अंतर राखूनच राहात असे .एके दिवशी कॉलेजला जाण्यासाठी मी बस स्टॅण्डवर उभी असताना तो त्याची अलिशान गाडी घेऊन बसस्टँड जवळ आला.त्याने मला त्याच्या गाडीतून येण्याची विनंती केली .मी निग्रहाने नको असे म्हटले त्यावेळी त्याने वाटल्यास बसचे पैसे मला द्या म्हणून हसत हसत सुचविले .मीही त्याला नाही म्हणू शकले नाही . त्याच्या मोटारीतून कॉलेजला जाणे हे मग रोजचेच झाले.

एके दिवशी आमच्या कोणीतरी नातेवाईकाने आम्हाला एकत्र मोटारीतून जाताना पाहिले .घरी कागाळी केली .त्या दिवशी माझी घरी हजेरी झाली.मीही मोकळेपणाने सर्व हकीगत आई वडिलांना सांगितली .जरा जपून या श्रीमंत मुलांचे काही सांगता येत नाही असा सल्ला दिला .

आमोद

एके दिवशी तिने अकस्मात माझा मोटारीतून न येण्याचा निर्णय घेतला .तिला कारण विचारता तिने जे रिलेशन आपल्याला शेवटपर्यंत नेता येत नाही त्याची  सुरुवातच न केलेली चांगली म्हणून सांगितले .त्यावर मी सुरुवात तर झाली आहे असे हसून बोललो .त्यावर तिने हसून ते तर खरे परंतु आता आणखी पुढे जाणे नको असे सांगितले.त्यावर मी तिला आता मी तुला प्रपोज करतो म्हणून वुईल  यू मॅरी मी  म्हणून विचारले .त्यावर तिने हो परंतू एक अट आहे असे सांगितले .दोन्ही घरातून जर आपल्या लग्नाला मनापासून पूर्ण संमती असेल त्यांच्या मनाविरुद्ध काहीही होत नसेल तरच माझी संमती आहे असे तिने सांगितले .कुणालाही दुखवून आपल्याला लग्न करायचे नाही आपल्याला दोन्हीकडून मनापासून आशीर्वाद मिळाले पाहिजेत.

ही काही मोठी अशक्य अशी अट नव्हती .आम्ही जरी श्रीमंत असलो तरी श्रीमंतीचा गर्व आमच्या कुटुंबात कुठेही नाही .माझे वआई वडिलांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत .जर मी निवडलेली मुलगी चांगली असेल आणि सुलभा चांगली निश्चितच आहे तर माझ्या घरून कुणीही विरोध करणार नाही याची मला खात्री होती.दुसऱ्या दिवशी मी घरी विषय काढला .सुलभाची तुलनात्मक गरिबी ही काही समस्या नव्हती.मी सुलभाजवळ सर्व काही सविस्तर बोललो. दुसऱ्या दिवशी तिला आमच्या घरी घेऊन गेलो .त्याच प्रमाणे तीही मला त्यांच्या घरी घेऊन गेली .नंतर पुढचे चार सहा महिने आम्ही एकमेकांच्या घरी येत जात होतो .हा हा म्हणता एक दोन वर्षे निघून गेली .दोन्हीकडूनही अशी संमती मिळाल्यावर साखरपुडा करूनच मी अमेरिकेला जावे असे ठरले .येथून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्टग्रॅज्युएट व डॉक्टरेटसाठी मी यूएसला जाणार होतो.तेव्हा साखरपुडा करूनच यूएसला जावे असे ठरले .

सुलभा

.                   प्रेम विवाह म्हटला की त्यामध्ये अनेक अडचणी असतात अनेक वळणे असतात असे सिनेमा नाटक पाहून कादंबऱ्या लघुकथा वाचून व इतरांचे अनुभव पाहून वाटत होते.परंतु तसे काहीच न होता दोन्ही बाजूंनी संमती मिळाली  आणि आमचा साखरपुडा सुद्धा थाटात झाला .एकदा लग्न करूनच अमेरिकेला जावे असे ठरत होते .परंतु शेवटी दोन वर्षे त्यांने अमेरिकेत राहून परत आल्यावर विवाह करावा असे निश्चित झाले.त्याप्रमाणे साखरपुडा होऊन तो अमेरिकेत गेला सुद्धा .सर्व काही स्वप्नात असल्यासारखे चालले होते .

मलाही ग्रॅज्युएट होऊन एका कंपनीत नोकरी लागली .रोज आमचे मोबाइलवरून बोलणे होत असे.एक दिवसही बोलणे झाल्याशिवाय आम्हाला राहवत नसे.काही कारणाने एखाद्या दिवशी जर बोलता आले नाही तर ती रात्र नीट झोप लागत नसे. दोन वर्षे केव्हा संपतात व तो अमेरिकेतून इकडे परत केव्हा येतो असे आम्हाला झाले होते . प्रेमाच्या काळात सगळ्यांना वाटते त्याप्रमाणे मलाही आमची जोडी "मेड फॉर इच अदर" अशी वाटत होती.सर्व काही परिकथेतील असल्यासारखे वाटत होते .फुलांच्या पायघड्या घातलेल्या आहेत आणि त्यावरून मी चालत आहे असे मला वाटत होते .

कुणाची आमच्या संबंधाला दृष्ट लागली कळत नाही .आणि त्या दिवशी अकस्मात आभाळ कोसळले .मी घरी जात असताना  एका मोटरसायकलने मला उडविले .माझ्या डोळ्यांसमोर काळोख पसरला .मी जागी झाले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते.मी शुद्धीवर येण्याची सर्व वाट पाहत होते.एक दोन ऑपरेशन्स व जवळजवळ चार पाच दिवसांनी मी शुद्धीवर आले होते.मी बेशुद्ध झाल्यावर त्या मोटरसायकलवाल्यानेच मला हॉस्पिटलमध्ये आणून दाखल केले होते.चूक माझी होती .रस्ता क्रॉस करत असताना मी कोणत्या तंद्रीत होते कुणाला ठाऊक .त्या मोटरसायकलीने मला ठोस दिली.आणि माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला .माझ्या डोक्याला मार लागला. अर्थातच ही सर्व हकिगत मला मागाहून कळली.मी जेव्हा शुद्धीवर आले त्यावेळी हॉस्पिटलमध्ये  होते. माझ्या आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू चालले होते .मी त्यांना रडू नका म्हणून सांगण्यासाठी बोलू लागले तो मला बोलता येईना.डोक्यावर मार लागल्यामुळे बोलण्याच्या केंद्राला धक्का बसला होता. मला यापुढे आयुष्यात कधीही ऐकू येणार नव्हते की  बोलता येणार नव्हते .

(क्रमशः )

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel