सुधाकर समुद्र किनाऱ्यावर एकटाच बसला होता .आकाशात ढगांनी गर्दी केली होती .कदाचित केव्हाही पाऊस सुरू झाला असता.हवा कुंद झाली  होती .लाटा किनाऱ्यावर येऊन सतत आपटत होत्या .या सगळ्याकडे सुधाकरचे लक्ष नव्हते .बाहेरील परिस्थितीचे प्रतिबिंब त्यांच्या मनात उठले होते किंवा याच्याविरुद्ध झाले होते असेही म्हणता येईल .त्याचे मन थाऱ्यावर नव्हते .मनात मळभ दाटले होते .त्याच्या संगीत दिग्दर्शनाखाली ती कदाचित कधीही काम करणार नव्हती.कदाचित ती त्याला कधीही भेटणार नव्हती .त्यांच्यामधील संबंधांचा आज अचानक शेवट झाला होता .कालपर्यंत ती दोघांचे लग्न होईल असे समजून चालत होती .तिला सुधाकर अविवाहित आहे असेच वाटत होते. सुधाकरने कधीही तो विवाहित आहे हे सांगितले नव्हते.त्याचप्रमाणे तो अविवाहित  आहे असाही संदर्भ कधी आला नव्हता .तिच्या बरोबरचे संबंध तुटल्यामुळे त्याला खिन्नता आली होती .त्याला तिच्याशी लग्न करणे अशक्य होते .कोणत्याही परिस्थितीत तो आपल्या पहिल्या पत्नीला दगा देऊ शकत नव्हता .त्याचबरोबर त्याचा जीव मधुरामध्येही गुंतलेला होता .काल मधुराने निर्वाणीचे विचारले होते .आणि त्यानेही मी तुझ्यावर कितीही प्रेम करीत असलो तरी पहिल्या बायकोला सोडणार नाही असे स्पष्टपणे सांगितले.तेव्हाच तो विवाहित आहे हे तिला पहिल्यांदा कळले. खरे म्हणजे  त्याच्यात गुंतवण्यापूर्वी तिने तो विवाहित आहे की नाही हे जाणून घ्यायला पाहिजे होते.परंतु प्रेम हे असे तोलून मापून मोजून करता येत नाही .प्रेम करतो म्हणण्यापेक्षा प्रेम होते,कसे माहिती नाही,असेच म्हणावे लागेल.त्याला दोघांचाही नाईलाज असतो .तिला तो विवाहित असल्याची सत्य परिस्थिती कळली आणि तिथेच त्यांच्या संबंधांना पूर्णविराम मिळाला होता .

आता ती त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली कदाचित कधीही गाणार नव्हती . अत्यंत विमनस्क स्थितीमध्ये तो त्या सागर किनाऱ्यावर बसला होता .

त्याला तिची पहिली भेट आठवली .तो प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक होता .त्याच्या केवळ  संगीतासाठी लोक सिनेमा पाहण्यासाठी येत असत.त्याकाळी संगीत ऐकण्यासाठी रेडिओ, रेकॉर्ड प्लेअर किंवा थिएटर एवढेच साधन उपलब्ध होते.रेकॉर्ड्स विकत घेणे, ग्रामोफोन, रेकॉर्ड प्लेअर, विकत घेणे हे खर्चिक काम असे.रेडिओवरही मर्यादित काळासाठी मर्यादित सिनेसंगीत लागत असे.रेडिओ सिलोन हेच त्याकाळी सिनेसंगीत ऐकण्याचे साधन होते .एकोणीसशे सत्तावन नंतर विविध भारतीचा जन्म झाला.  चार आणे देऊन सिनेमा पाहणे सोपे स्वस्त पडत असे.केवळ संगीतासाठी वीस वीस पंचवीस पंचवीस वेळा सिनेमा पाहणारे (वेडे)लोक त्या काळात होते .साठ वेळा पाहणारा एखादा रेकॉर्डब्रेकरही त्यावेळी होता .त्यावेळी चार आणे सर्वात कमी दर होता.रुपया दोन रुपये हा सगळ्यात जास्त दर होता.अर्थात त्यावेळच्या चार आण्यालाही आजच्या शंभर रुपये एवढी किंमत होती .हे विसरून चालणार नाही .

संगीत दिग्दर्शक सुधाकर असे शब्द आले की टाळ्यांचा पाऊस पडत असे.पोस्टरवर ठळक अक्षरांमध्ये संगीत: सुधाकर असे लिहिलेले असे.ज्याच्या त्याच्या तोंडी सुधाकरने संगीत दिलेली गाणी असत .रेडिओवर त्याची गाणी वाजत असत .रेडिओ सिलोनवर पहिल्या चार पाच पायदानामध्ये त्याचेच गाणे नेहमीच असे.त्यावेळी मधुरा ही एस्टॅब्लिश होण्यासाठी धडपडणारी एक गायिका होती.अनेक स्टुडिओमध्ये ती मुलाखतीसाठी जात असे .तिचा आवाज अत्यंत सुरेल मधुर होता.कष्ट करण्याची तिची तयारी होती .कितीही वेळा टेक आणि रिटेक झाले तरी ती कंटाळत नसे. त्या काळात एकेका गाण्याची तालीम एक एक महिना सुध्धा  चालत असे .

स्टुडिओत जाण्यासाठी मधुरा एक दिवस बसस्टॉपवर उभी होती .त्याचवेळी पाऊसही जोरात आला .सुधाकर ही स्टुडिओमध्ये जात होता .मधुरा धडपडणारी गायिका आहे हे त्याला माहीत होते.अजून मधुरा त्याच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेली नव्हती.त्याने गाडी थांबवून चला मी तुम्हाला स्टुडियोमध्ये सोडतो मलाही तिकडेच जायचे आहे म्हणून बसल्या बसल्या गाडीचा दरवाजा उघडला.मधुरा त्याला प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखत होती .ती आनंदाने त्याच्या गाडीत बसली .या ओळखीमुळे आपल्याला त्याच्याकडे गायला मिळेल असे तिला वाटले . 

तिच्या मनातील कल्पनेप्रमाणेच प्रत्यक्षात घडले .पुढच्या सिनेमाच्या गाण्याच्या वेळी त्याने मुद्दाम मधुराला बोलवून घेतले .तिचा आवाज तर उत्कृष्ट होताच .त्याचे संगीतही अफलातून होते .दोघांची जोडी हळहळू हिट होऊ लागली .सुधाकर संगीत दिग्दर्शक आणि मधुरा गायिका हे शब्द पडद्यावर पाहिल्यावर लोक टाळ्यांचा वर्षाव करू लागले .एका मागून एक सिनेमा पडद्यावर येत होते आणि मधुरा सुधाकरकडे गात होती . अर्थात ती इतर गायकांकडेही गात होतीच .तीहि गाणी हिट सुपरहिट होत होती .हळूहळू मधुरा इतर गायिकांना एका मागून एक मागे टाकीत जास्त प्रसिद्ध होत होती .या प्रसिद्धीमागे मधुराचा मधुर आवाज तर होताच परंतु त्याचबरोबर सुधाकरच्या कर्णमधुर अफलातून संगीताचाही मोठा वाटा होता.सुधाकर गातही असे .त्याचा आवाज फार अप्रतिम होता असे नाही .तो अनेक गाणी मधुरा बरोबर गात असे .त्याचे संगीत कौशल्य मधुराचा आवाज यामुळे अशी गाणीही हिट सुपरहिट होत असत .मधुरा हे संगीतसृष्टीला पडलेले एक मंजुळ गोड स्वप्न होते. दोघेही प्रसिद्धीच्या शिखरावर होती .

हळूहळू दोघे एकमेकांमध्ये गुंतत चालली होती .त्याला प्रेम म्हणता येईल की नाही ते नक्की सांगता येत नव्हते .दोघांच्या वयामध्ये बरेच अंतर होते .सुधाकरचे लग्न अगोदरच झालेले होते .त्याला दोन मुलेही होती .आपल्या संसारात तो सुखी होता .त्याला आपल्यावरील जबाबदारीची पूर्ण जाणीव होती .त्याचबरोबर तो मधुरामध्ये  हळूहळू  गुंतत जात होता .एकमेकांजवळ बऱ्याच काळ संगीताच्या निमित्याने,रेकॉर्डिंगच्या  निमित्याने, राहात असूनही त्यांनी आपली लक्ष्मणरेषा कधीही ओलांडली नव्हती. परंतु असा संयम आपण किती काळ पाळू शकू अशा दोघांनाही संभ्रम होता .मनोमन दोघेही एक झाले  होते. नीती नियमांच्या मानसिक बंधनामुळे शारीरिक दुरी होती.ही शारीरिक दुरी फार काळ टिकवता येईल असे दोघांनाही वाटत नव्हते.कुणी कुणाला प्रपोज करावे या विचारात दोघेही होते .शेवटी ही कोंडी मधुराने फोडली .तिने सरळ सरळ सुधाकरला तुमचा काय विचार आहे असे विचारले .त्याने मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या बायकोला सोडणार नाही असे सांगितले.सुधाकरला आपल्यावरील जबाबदारीची पूर्ण जाणीव होती .लग्नात दिलेले वचन त्याला प्रामाणिकपणे पाळायचे होते .मधुराचा आग्रह त्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट द्यावा व नंतर मधुराशी लग्न करावे असा होता .त्या गोष्टीला सुधाकर अर्थातच तयार नव्हता .

जर आपण एकत्र येऊ शकत नाही तर अापण एकमेकांबरोबर सहवासात न राहिलेलेच चांगले असे मधुराला वाटत होते . त्याप्रमाणे तिने ते स्पष्टपणे बोलून दाखवले .हे बोलताना तिचे डोळे पाण्याने डबडबले होते .ती आता रडेल की नंतर रडेल अशी परिस्थिती होती .ती चिडली नाही. ती रागावली नाही.एका दृष्टीने सुधाकरचे म्हणणे योग्य आहे असेही तिला प्रामाणिकपणे वाटत होते .दुसरी बायको म्हणून सुधाकर बरोबर राहणे तिला पसंत नव्हते.द्विभार्या  प्रतिबंधक कायद्यामुळे तसे लग्नही बेकायदेशीर होते.तसेच राहण्याचा ती चुकूनही विचार करू शकत नाही .शेवटी तुझे माझे मार्ग आता वेगळे झाले असे म्हणून ती स्टुडिओमधून निघून गेली .

सुधाकरचे मनापासून तिच्यावर प्रेम होते .मधुराचे ही सुधाकरवर नितांत प्रेम होते.दोघांनीही आकांडतांडव न करता एकमेकांपासून दूर होण्याचे ठरविले .या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी आपले प्रेम सफल होईल असा दोघांनाही विश्वास होता .

यानंतर सुधाकर एकटाच मोटार घेऊन या समुद्र किनाऱ्यावर आला होता .किनाऱ्यावर विमनस्कपणे अज्ञातात पाहात बसला होता .त्याची दृष्टी शुन्यात होती .आजूबाजूच्या जगाचे त्याला भान नव्हते.कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल कदाचित तुफान येईल याकडे त्याचे अजिबात लक्ष नव्हते .मनातील तुफानापुढे त्याला बाहेरील वादळाचे काहीही देणे घेणे नव्हते.

जरी भावनिक संबंध संपले असले तरी यापुढे व्यावसायिक संबंध राहतील की नाही टिकतील कि नाही सर्वच अधांतरी होते .

३/२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel