आरोपीचा वकील आरोपीचा वकील असे म्हणण्याऐवजी आपण त्याचे नाव *युवराज*घेतलेले बरे .युवराज त्यावेळी तरुण होते.बॅरिस्टर झाल्यावर त्यांनी वकिलीची सनद नुकतीच घेतली होती .ही त्यांची पहिलीच केस होती .खरे म्हणजे ते नुसती केस ऐकण्यासाठी आले होते.परंतु अकस्मात कोर्टाने त्यांचे नाव पुकारून ही केस त्यांच्याकडे सोपविली होती .युवराजांनी आरोपीला भेटण्याचा प्रयत्न केला .त्यांनी सुभद्रेला तुम्ही खून का केला ते मला सांगा,त्याशिवाय मला तुम्हाला वाचवता येणार नाही.तुमची केस लढता येणार नाही,असे सांगितले.

परंतु सुभद्रेचा एकच धोशा होता.मला जगायचे नाही.मी माझ्या मुलाचा खून केला आता मी जगून काय करू ?याशिवाय ती काहीही बोलत नव्हती .

शेवटी युवराज नाईलाजाने बाहेर पडले .एखाद्या गुप्तहेरामार्फत आपल्याला झोपडीतील निरनिराळ्या लोकांशी बोलून सुभद्रा व तिचा मुलगा राघव यांची पार्श्वभूमी इतिहास जाणून घेतला  पाहिजे एरवी आपल्याला खुनाचे कारण कळणार नाही, असे युवराजांच्या लक्षात आले.त्यांच्या ओळखीचा कुणी गुप्तहेर नव्हता.विचार करीत जात असताना त्यांना अकस्मात खासगी गुप्तहेर अशी एक पाटी दिसली.त्यांच्या मनात यांचा जमला तर उपयोग करून घेऊ असे आले.आणि ते त्या ऑफिसमध्ये शिरले .संदेश नावाच्या एका गुप्तहेराचे ते ऑफिस होते .युवराजांना माणसाची पारख चांगली होती .हा संदेश हरहुन्नरी आहे तो आपल्याला हवी असलेली माहिती नक्की उपलब्ध करील याची त्यांना मनोमन खात्री पटली .

त्यांनी संदेशला सर्व केस सविस्तर समजून सांगितली.त्या झोपडपट्टीत जाऊन निरनिराळ्या लहान मोठ्या लोकांशी बोलून सुभद्रा व राघव यांच्याबद्दलची सर्व माहिती गोळा करण्यास सांगितले .संदेशने यासाठी त्यांच्याजवळ एक दिवस मागून घेतला .

दुसऱ्या दिवशी कोर्ट सुरू झाल्यावर युवराजांनी आरोपी सहकार्य करीत नाही.मला वकील म्हणून कालच नेमले .मला सर्व माहिती गोळा करून केस मांडण्यासाठी निदान दोन दिवस पाहिजेत असे सांगितले .कोर्टाने लगेच त्यांना दोन दिवस दिले .व त्यानंतर सुनावणी ठेवली .लगेच पुढची केस पुकारण्यास सांगितले .

दोन दिवसांत संदेशने सर्व माहिती गोळा करून ती युवराजांकडे सुपूर्त केली.सर्व माहिती वाचून युवराजांना विशेष धक्का बसला नाही .सुभद्रा सतत बोलण्याला नकार देते यावरून त्यांनी काही अंदाज बांधले होते.केस सुनावणीला आल्यानंतर ती कशाप्रकारे हाताळायची यांची त्यांनी रूपरेषा मनात तयार केली .

दोन दिवसांनी सुनावणी सुरू झाल्यावर युवराजांनी ठसेतज्ञाला विटनेस बॉक्समध्ये बोलाविले .

सुभद्रा व राघव यांच्याशिवाय आणखी कोणाचे ठसे कुऱ्हाडीच्या  दांड्यावर मिळाले का? अशी विचारणा केली .

त्यावर ठसे तज्ञाने होय आणखी एकाचे स्पष्ट ठसे मिळाले असे सांगितले .यावर युवराजांनी सुभद्रेचा थोरला मुलगा बाबू याच्या हाताचे ठसे कुऱ्हाडीच्या दांड्यावरील ठशाशी जुळतात का ते पाहायला सांगितले .

बाबू कोर्टामध्ये हजर होता. तो ती केस ऐकण्यासाठी रोज येत होता .त्याचे ठसे घेऊन अर्ध्या तासात रिपोर्ट देतो असे ठसेतज्ञाने सांगितले .

नंतर युवराजांनी त्या झोपडपट्टीमधील आणखी दोन तीन जणांना साक्षीसाठी बोलाविले .

त्यांच्या साक्षीमधून बाबू खुनाच्या अगोदर तिथे आलेला होता आणि  फोन केल्यावर नंतरही तो आला होता असे सिद्ध केले .त्याचप्रमाणे त्यांच्या साक्षी मधून राघव हा गुंड प्रवृत्तीचा मुलगा होता .दारू प्यायल्यावर तो सैतान बनत असे .त्याची स्त्रियांकडे पाहण्याची नजर चांगली नव्हती .दारू प्यायल्यावर स्त्रियांवर हात टाकण्यापर्यंत त्याची मजल जात असे.लहान मोठी स्त्री तो काहीही पाहात नसे हेही त्यांनी सिद्ध केले .

एका साक्षीदाराने तर जर सुभद्रेने त्याला मारले नसते तर त्याचा आणखी  कुणीतरी,  माय बहिणीवर हात टाकला म्हणून खून केला असता असे सांगितले .हा खून गुंडगिरीपेक्षा स्त्रियांवर हात टाकण्याच्या प्रवृत्तीतून झाला असता असेहि तो म्हणाला .

थोडक्यात राघवचे संपूर्ण चारित्र्य त्यांनी आपल्या साक्षीदारांना निरनिराळे प्रश्न विचारून उभे केले .

नंतर ठसेतज्ञाची साक्ष झाली त्याने  कुऱ्हाडीच्या दांडय़ावरील हाताचे ठसे बाबूच्या हातांच्या ठशांबरोबर  जुळतात असा रिपोर्ट दिला .

या सर्व साक्षी पुराव्यावरून युवराजांना काय सुचवावयाचे असावे ते बऱ्याच जणांच्या लक्षात आले .

नंतर त्यांनी बाबूला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलाविले.त्याला त्यांनी तू जबाबदारीने साक्ष दे.परमेश्वराला स्मरून खरे बोल .जर काही चूक झाली तर निष्कारण तुझ्या आईला शिक्षा होईल असे सुनावले .

खुनाच्या अगोदर तू तुझ्या आईकडे आला होता की नाही असे विचारले .त्यावर त्याने अगोदर आल्याचे कबूल केले.त्यावेळी तिथे काय घडले ते सांग असे युवराज म्हणाले .

त्यावर त्याने सांगण्यास सुरुवात केली .मी आलो तेव्हा राघव दारू पिऊन बेफाम झाला होता . तो आईजवळ आणखी दारू पिण्यासाठी पैसे मागत होता .आईने त्याला तू आता जेव आणि झोप असे सांगितले.त्यावर त्याने आईला अद्वातद्वा असभ्य शिव्या दिल्या .शेवटी तो आईच्या अंगावर धाउन गेला आणि त्याने तिच्या पदराला हात घातला .त्याचा इरादा काही योग्य दिसत नव्हता . यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही .

आत्ता पर्यंत सर्व पाहात असलेला मी आईला वाचविण्यासाठी धावून गेलो .मी आलेला आहे हे राघवला माहितच नव्हते.मला बघताच तो थांबण्याऐवजी जास्तच चवताळला.कोपऱ्यात उभी असलेली कुर्‍हाड घेऊन तो माझ्या अंगावर धावून आला.मी वरच्या वर त्याच्या कुऱ्हाडीचा दांडा पकडून वार थांबविला.मला वाचविण्यासाठी आई मध्ये पडली .या ओढाताणीमध्ये कुऱ्हाडीचे पाते राघवच्या डोक्याला लागले. तो तसाच जमिनीवर कोसळला .आईने मला शपथ घालून  ताबडतोब तिथून निघून जाण्यास सांगितले.मीही तिथून निघून गेलो.नंतर फोन आल्यावर मी पुन्हा तिथे आलो.राघव मृत्यू पावला होता .त्याच्या खुनाचा आरोप आईने मला वाचविण्यासाठी संपूर्णपणे स्वतःवर घेतला.आमचा कुणाचाही उद्देश राघवला मारण्याचा नव्हता .राघवचा मृत्यू हा खून नाही.  तो अपघात आहे.जर सरकारला कुणाला शिक्षा करायची असेल तर ती मला करावी .

बाबूची व इतरांची क्रॉस सरकारी वकिलांनी घेतली. त्यातून विशेष काही निष्पन्न झाले नाही . बाबू व झोपडपट्टीतील साक्षीदार आपल्या बोलण्यावर पक्के होते .

शेवटी युवराजानी पुढीलप्रमाणे समारोप केला .

सुभद्रा ही परिस्थितीची शिकार आहे .सुभद्रेला दोन मुलगे .पहिला मुलगा तिच्याजवळ रहात नाही. त्याचे कारण केवळ राघव आहे. दुसरा मुलगा अठ्ठावीस वर्षांचा अाहे .एवढ्या लहान वयात त्याला झोपडपट्टीतील इतर वाह्यात मुलांच्या नादाने अनेक वाईट सवयी जडल्या होत्या .दारू पिणे, जुगार खेळणे,मुलींची छेड काढणे,तलवार सुरा काठ्या  घेऊन दहशत निर्माण करणे,इत्यादी कामांमध्ये तो एवढ्यात तरबेज झाला होता . गुंडगिरीमुळे त्याचे लग्न होत नव्हते.तो कोणते ना कोणते गुन्हे करून दोन तीन वेळा तुरुंगात जाऊन आला होता .त्याने केलेले गुन्हे व त्याला झालेली शिक्षा यांचे  टाचण सोबत जोडले आहे.आसपास काही गुन्हे झाले कि ज्या गुंडांना पकडण्यात येत असे त्यातील हा एक होता. धंदा करणार्‍या  ज्या बायका होत्या त्यांच्याकडे तो जात असे.हल्ली तो रोज दारू पिऊन घरी येत असे.घरी आल्यानंतर शिवीगाळी आईला मारहाण ही रोजची बाब झाली होती .त्याला  दारूसाठी किंवा इतर व्यसनासाठी पैसे मिळाले नाहीत की तो आईजवळ पैसे मागत असे.आईला निदान स्वत:च्यातरी जेवणाचे पैसे देण्याऐवजी तो  तिच्याकडूनच पैसे मागत असे .जर आईने पैसे दिले नाहीत तर तो डबे कपाट वगैरे शोधून पैसे घेऊन जात असे .एकदा तर त्याने आईच्या कानातील कुडी सोन्याची समजून एवढ्या जोरात ओढली होती की त्यामुळे तिचा कान फाटला होता.हा फाटलेला कान कोर्टाने बघितलेला आहे. त्याची नजर वाईट होती.तो एकदा दारू प्याला की संपूर्णपणे वेगळा मनुष्य बनत असे.दारूच्या नशेमध्ये त्याला कोण आपली नातेवाईक कोण नातेवाईक नाही याचे भान राहात नसे .तरुण वृद्ध याचेही त्याला भान नसे.कुणाकडे अगदी आपल्या आईकडेही केवळ बाई म्हणून तो पाहात असे.दारूच्या नशेमध्ये त्याने झोपडपट्टीतील झोपड्यांमध्ये जाऊन अनेक बायकांचा विनयभंग केला .त्याच्या पुढची पायरीही कदाचित त्याने काही वेळा गाठली असेल. अशा गोष्टी उघडपणे कुणी बोलत नाही .एक दोनदा तर लोकांनी त्याला इतका मारला की तो मरता मरता वाचला .या सर्व गोष्टी मी घेतलेल्या साक्षीच्या मार्फत सिद्ध केल्या आहेत. या त्याच्या सवयीमुळे त्याने अनेकदा लोकांचा मारही खाल्ला आहे.

राघवला मारणारी आई नसून तो दुसराच कुणीतरी आहे  असे मला माझ्या चौकशीमध्ये आढळून आले आहे . सरकारी वकिलांनी फक्त सुभद्रेच्या ठशांशी कुऱ्हाडीवरील ठसे जुळतात एवढेच सांगितले  परंतु इतर कुणा कुणाचे ठसे जुळतात ते सांगितले नाही. बाबूच्या हाताचे ठसे कुऱ्हाडीच्या दांड्यावरील ठशांशी जुळतात हे मी सिद्ध केले आहे. 

हल्ली मोठा भाऊ इथे सुभद्रेजवळ रहात नाही .त्यामुळे त्याचे ताजे स्पष्ट ठसे कुर्‍हाडीवर कसे आले त्याचा उलगडा केला पाहिजे .

ज्या रात्री हा खून झाला त्या रात्री राघव दारू पिऊन टाइट होता .दारू प्यायल्यावर त्याला कोणतेही भान रहात नसे हे अनेक साक्षीदारांच्या साक्षीवरून सिद्ध केलेले आहे. त्या रात्री थोरला भाऊ आईला भेटण्यासाठी इथे आला होता हेहि मी सिद्ध केले आहे  .तो आला त्यावेळी राघव व त्याची आई यांच्यामध्ये काहीतरी  भांडण चालले असावे .कदाचित दारूच्या नशेमध्ये त्याने आईवर त्या विशिष्ट हेतूने हात टाकला असावा .एवढ्यात थोरला भाऊ आल्यामुळे त्याने त्याला अटकाव केला असावा.दारूच्या नशेमध्ये राघवने त्याच्या थोरल्या भावाला मारण्यासाठी कुर्‍हाड  घेतली असावी.त्याला आई व भावाने प्रतिबंध केला त्यामुळे त्यांचे ठसे  कुर्‍हाडीवर उमटले .या ओढाताणीमध्ये कुणालाही मारण्याचा हेतू नसूनहि कुऱ्हाड राघवला वर्मी लागली असावी. त्यात त्याचा मृत्यू झाला .थोरल्या मुलावर खुनाचा आळ येऊ नये म्हणून आईने तो आळ स्वतःवर घेतला.बाबूच्या साक्षीवरून वरील गोष्ट सिद्ध झालेली आहे .

हा खून हेतुपुरस्सर केलेला नाही.स्वसंरक्षणासाठी केलेला नाही . जरी स्वसंरक्षण करताना खून झाला असे गृहित धरले तरीही तो गुन्हा ठरू शकत नाही.स्वसंरक्षणाचा प्रत्येकाला अधिकार आहे .परंतु इथे तर केवळ अपघाताने हा खून झाला आहे .ही सर्व एखादी काल्पनिक थेअरी नसून मी हे सर्व पुराव्यानिशी शाबीत केले आहे .

न्यायाचे एक तत्त्व आहे हजार सुटले तरी चालतील परंतु एकाही निर्दोष  व्यक्तीला शिक्षा होता कामा नये .माझ्या आरोपीला संशयाचा फायदा मिळून तिला सोडण्यात यावे अशी मी कोर्टाला विनंती करतो .

असे म्हणून युवराज बसले .

नंतर सरकारी वकील म्हणाले.बाबू सांगतो ती सर्व बनवाबनवी आहे .ती त्याची केवळ आईला वाचवण्याची चाल आहे.  आईने तिचा गुन्हा कबूल केला आहे .शेजारच्या लोकांनी तिला हातात कुऱ्हाड घेऊन मुलाच्या प्रेताजवळ बसलेले पाहिले आहे. राघव त्रास देत होता तर तिने कायद्याची मदत घेणे आवश्यक होते .कोणत्याही परिस्थितींत ती कायदा आपल्या हातात घेऊ शकत नाही.बाबूचे कुऱ्हाडीच्या दांड्यावरील ठसे पूर्वी केव्हातरी पडले असतील.फार तर कोर्टाने बाबूलाही अटक करण्यास सांगून त्याच्यावरहि केस चालवण्यास सांगावे.

कोर्टाने दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे सोमवारी निकाल देण्यात येईल असे जाहीर केले .सोमवारी कोर्टाने दिलेले  निकालपत्र बरेच मोठे होते .त्यात दोन्ही बाजूंच्या साक्षी पुराव्यांची छाननी केलेली होती .कोर्टाचा मतितार्थ पुढीलप्रमाणे होता .

दोन्ही बाजूचे साक्षी पुरावे पाहता नि:संशयपणे आरोपीवर खुनाचा आरोप सिद्ध होत नाही. प्रत्यक्ष खून करताना कुणी पाहिलेले नाही. प्रत्यक्षदर्शी पुरावा अशा केसमध्ये महत्वाचा असतो .सभोवतील सर्व पुरावा पाहिला तरी आरोप नि:संशयपणे शाबीत होत नाही.

तरी आरोपीला संशयाचा फायदा देऊन मुक्त करण्यात येत आहे .बाबूवर केस चालविण्यात काही अर्थ आहे असे  कोर्टाला वाटत नाही .

*अशाप्रकारे अकस्मात  युवराजांकडे सुरुवातीला आलेली ही पहिली केस त्यानी यशस्वीपणे जिंकिली*

(सुभद्रा झोपडपट्टी कायमची सोडून आपल्या मुलाकडे बाबूकडे राहण्यास गेली )

( समाप्त) 

६/४/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel