कोर्टरूम खचाखच भरली होती .ज्या वकिलांना कुठे काम नव्हते तेही सर्व इथे हजर होते .कोर्टरूमच्या बाहेरही तुफान गर्दी झाली होती .आज  लोकांच्या सोयीसाठी बाहेर लाऊडस्पीकर लावले होते.स्थानिक वर्तमानपत्रांचे सर्व वार्ताहर हजर होते.सायंकाळची वर्तमानपत्रे तर प्रथम  बातमी देण्यास विशेष उत्सुक होती.हिला आई कसे म्हणावे? ही तर राक्षसी आहे. हिला फाशी झाली पाहिजे.अशा चर्चा चालल्या होत्या .त्यावर एकाने आज तर खटला उभा राहत आहे .कित्येक महिन्यांनी वर्षांनी निकाल लागेल .त्यानंतर वरचे कोर्ट आहेच.असे म्हणून एकूण न्यायपद्धतीच्या दिरंगाईवर ताशेरे झोडले .

अजून कोर्ट यायचे होते.आरोपी सुभद्रेला घेऊन पोलिसांची गाडी बाहेर उभी होती .कोर्ट  स्थानापन्न झाल्यावर  नंतर तिला आत आणण्यात येणार होते.लोकांनी तिच्यावर दगडफेक करू नये म्हणून तिला विशेष संरक्षण देण्यात आले होते.

सुभद्रा एका अत्यंत गरीब घरातून आली होती .लोकांची धुणी भांडी करून ती आपला गुजारा करीत असे .वकील देण्यासाठी तिच्या जवळ पैसे नव्हते .अशा व्यक्तींना सरकारतर्फे वकील दिला जातो .तिच्या बाजूने कोण वकील तयार होईल,कोर्ट कोणत्या वकिलांकडे ही केस सोपवील अशीही चर्चा चालली होती.ती एका झोपडपट्टीमध्ये राहत होती .तिला दोन मुलगे होते. थोरला मुलगा बाबू आईजवळ राहात नसे .आईजवळ न राहण्याचे कारण केवळ त्याचा धाकटा भाऊ राघव हा होता.बाबू त्याच्या पत्नीसह दुसरीकडे राहात होता .सुभद्रेचा नवरा काही वर्षापूर्वी वारला होता .ती पंचेचाळीस वर्षांची होती .

तिच्यावर मुलाच्या खुनाचा आरोप होता .दारू प्यालेला मुलगा झोपलेला असताना तिने कुऱ्हाड त्याच्या डोक्यात घालून त्याचा खून केला असा आरोप होता .पोलिसांनी त्या कुऱ्हाडीसह तिला अटक केली होती .कुऱ्हाड तिच्या घरची होती .कुऱ्हाडीच्या दांड्यावर तिच्या हाताचे स्पष्ट ठसे मिळाले होते.तिनेही मी माझ्या मुलाचा डोक्यात कुर्‍हाड घालून खून केला अशी स्पष्ट कबुली दिली होती .त्यामुळे केस अगदी स्पष्ट होती .कोर्टाने साक्षी पुरावे पाहून निकाल द्यायचा होता .निकाल काय होणार ते स्पष्ट दिसत होते .फाशी किंवा जन्मठेप यातील एक शिक्षा तिला मिळणार याबद्दल सर्वांची खात्री होती .

कोर्ट येत असल्याबद्दलचा इशारा शिरस्तेदाराने दिला .सर्वजण कोर्टाला मान देण्यासाठी उठून उभे राहिले.कोर्ट बसल्यावर सर्व स्थानापन्न झाले .आत व बाहेर हळू आवाजात कुजबुज चालली होती . त्या कुजबुजीचा आवाज मोठा येत होता .कोर्टाने दोन तीनदा हातोडा टेबलावर आपटला व सर्वांना शांत  बसण्यास सांगितले.कोर्टाला आजच्या खटल्याबद्दल कल्पना होती . लोकांना या खटल्याबद्दल बरीच उत्सुकता आहे हे कोर्टाला माहित होते .जे आवाज करतील त्यांना बाहेर हाकलून लावले जाईल म्हणून कोर्टाने तंबी दिली .कोर्टरूमच्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांनीही जर शांतता पाळली नाही तर त्यांना हाकलून लावण्यात येईल अशीही तंबी कोर्टाने दिली .

सर्वत्र टाचणी पडली तरी आवाज ऐकू येईल इतकी शांतता पसरली .कोर्टाने सरकारी वकिलाला केस मांडण्यास सांगितले .त्याअगोदर सुभद्रेला तुला गुन्हा मान्य आहे का? म्हणून विचारले .तिने मला गुन्हा मान्य आहे. मी माझ्या मुलाचा डोक्यात कुर्‍हाड घालून खून केला.अशी स्पष्ट शब्दात कबुली दिली .अशा स्पष्ट कबुलीमुळे केसमधील गंमतच निघून गेली .सरकारी वकिलाने केस मांडणे आणि कोर्टाने शिक्षा ठोठावणे एवढीच औपचारिकता शिल्लक राहिली . गुन्हा मान्य केला तरी लगेच शिक्षा ठोठावता येत नाही .गुन्हा जरी मान्य केला तरी ती मान्यता  कदाचित आणखी कुणाला तरी वाचवण्यासाठी असू शकते. कायद्याप्रमाणे सर्व औपचारिकता पूर्ण व्हावी लागते .आणि नंतरच शिक्षा ठोठावता येते .

सुभद्रेच्या बाजूने कोण वकील आहे असे विचारता सुभद्रेने मी गरीब असल्यामुळे मला वकील देता येत येत नाही .आणि मला वकिलाची गरजही नाही .मला माझा गुन्हा मान्य आहे.म्हणून सांगितले .त्यावर असे चालणार नाही कुणीतरी वकील दिला पाहिजे असे कोर्टाने सुचविले .सुभद्रा काही बोलत नाही असे पाहून कोर्टाने एका वकिलाची सुभद्रेच्या बाजूने नेमणूक केली .

कायदेशीर गोष्टींची पूर्तता झाल्यावर कोर्टाने सरकारी वकिलाला केस मांडण्यास सांगितले .सरकारी वकिलाने आपल्या भाषणाला सुरुवात केली .

मी फार काही बोलणार नाही. मी अत्यंत थोड्या शब्दात ही केस मांडणार आहे .  एक संस्कृत वचन आहे .वाईट पिता बंधू पुत्र भगिनी असू शकते. परंतु वाईट माता कधीही असू शकत नाही .आई नेहमी मुलांच्या खोड्यांवर पांघरूण घालत असते.आई मुलावर नेहमी प्रेमच करीत असते .मुलगा कसाही असला तरी तो तिचा नेहमीच आवडता असतो .ती त्याला भले चार शब्द सुनावील परंतु समाजापासून मात्र त्याचे नेहमी  संरक्षण करीत असते .त्याला तिने आपल्या उदरात वाढवलेले असते.तो तिचाच एक भाग असतो .तो तिच्या काळजाचा तुकडा असतो . वेळप्रसंगी आपल्या जेवणातील चार घास बाजूला काढून ती त्याला भरवते.त्याचे पोषण संरक्षण संवर्धन ती नेहमी करीत असते.वेळप्रसंगी ती आपला जीव देईल परंतु मुलाला वाचवील.अर्थात इथे मुलगा आहे म्हणून मी तसा उल्लेख करीत आहे.जे मुलाच्या बाबतीत खरे आहे ते मुलीच्या बाबतीत खरे आहे .असे असूनही या आईने आरोपीने निर्घृणपणे रात्री मुलगा शांत झोपलेला असताना त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याचा निर्दयपणे खून केला .दुसऱ्याचा जीव घेणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे .त्यातही आईने मुलाचा जीव घेणे हा आणखी मोठा गुन्हा आहे.कुणीही शांतपणे निर्धास्त झोपलेले असताना त्याचा खून करणे म्हणजे फारच मोठा गुन्हा आहे . त्यातही स्वतःचा मुलगा शांत निर्धास्त आईच्या संरक्षणाखाली झोपलेला असताना त्याचा निर्दयपणे डोक्यात कुर्‍हाड घालून खून करणे म्हणजे क्रौर्याची परिसीमा आहे.ही आई जर सावत्र असती तर त्या खुनाचे कारण समजल्यावर आणि ते पूर्णपणे समर्थनीय आहे असे लक्षात आल्यावर, कदाचित आपण किंचित सौम्य शिक्षेचा विचार केला असता.परंतु इथे तर ही आई सख्खी  आहे .इथे तर कोणतेही समर्थनीय कारण संभवत नाही .अशा या न भूतो भविष्यती अशा क्रूर निर्दय खुन्याला कायद्यात सांगितलेली जास्तीत जास्त शिक्षा द्यावी असे सांगून मी माझे किंचित लांबलेले भाषण संपवतो .असे म्हणून सरकारी वकील स्थानापन्न झाले .बसताना त्यांनी कसे मोठे झकास भाषण दिले अशा अविर्भावाचा दृष्टिक्षेप सर्वत्र  फिरविला.

प्राथमिक भाषण देण्यासाठी सरकारने नेमलेला वकील उभा राहिला .हा वकील पोरसवदा होता .नुकतीच त्याने वकिलीची सनद घेतली होती .ओठ पिळले तर दूध निघेल असा हा पोरगा काय आरोपींची बाजू मांडणार असे कुणीतरी कुजबुजले.त्यावर कोर्टाने दोनदा हातोडा आपटून सायलेन्स सायलेन्स म्हणून दम दिला.हा पोरसवदा वकील काय बोलतो ते ऐकण्यासाठी सर्वांनी आपले कान टवकारले .या उमद्या  वकील पोराच्या डोळ्यात व चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची चमक ठळकपणे दिसत होती.त्याने बोलण्याला सुरुवात केली .मी माझ्या विद्वान वकिलांचे प्रदीर्घ भाषण लक्ष देवून ऐकले आहे .त्यांनी आपला बराचसा वेळ आईची महती गाण्यात घालविला .खून हा खून आहे .तो कुणी केला याला विशेष महत्त्व आहे असे मला वाटत नाही .तो कां केला याला मी जास्त महत्त्व देतो.अर्थात ज्याने किंवा जिने खून केला तो किंवा ती व ज्याचा किंवा जिचा खून झाला तो किंवा ती यांच्यामधील नाते संबंध महत्त्वाचा आहे हे मी नाकारत नाही .मित्रानेच मित्राचा केलेला खून किंवा आतांच्या केसमध्ये ज्याप्रमाणे खून झाला आहे तसा अत्यंत जवळच्या नातेसंबंध असलेल्या व्यक्तीने केलेला खून हा त्या व्यक्तीच्या खूनाबरोबरच विश्वासाचा केलेला खून आहे.माझ्या विद्वान वकिलांनी मांडलेला मुद्दा मी पुढे नेणार आहे .आई संबंधी अतिशय भावनात्मक भाषण करून त्यांनी माझे काम सोपे केले आहे .आईविषयी त्यांनी जे जे काही म्हटले आहे ते मला सर्व मान्य आहे .असे असूनही जेव्हा एखादी आई आपल्या प्राणप्रिय मुलाचा खून करण्याला उद्युक्त होते तेव्हा त्या पाठीमागे काहीतरी तसेच जबरदस्त कारण असले पाहिजे हे उघड आहे .माझी अशील खून केला हे मान्य करते .परंतु का कोण जाणे खुनाचे कारण सांगण्यास तयार नाही .मला रागाचा झटका आला.मला वेडाचा झटका आल। आणि म्हणून मी कुर्‍हाड  डोक्यात घातली एवढेच ती म्हणत आहे.परंतु राग का आला?वेडाचा झटका का आला?एवढे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण काय ते ती बोलण्याला तयार नाही.त्याच्या मागे तसेच जबरदस्त कारण असले पाहिजे असे मला वाटते .आरोपी जरी आता ते सांगत नसली तरी मी ते कारण शोधून काढीन.ते कारण कळल्यावर खुनाच्या घटनेमध्ये आपल्याला जास्त खोल समज येईल असे मला वाटते .अशी समज आल्यावर खुनाच्या गुन्ह्याची तीव्रता कमी होईल असे मला वाटते .सरकारी वकिलांनी त्यांची केस मांडावी त्यानंतर मी माझी बचावाची केस मांडीन असे म्हणून तो पोरसवदा वकील बसला . त्याचे भाषण ऐकून या वकिलांमध्ये दम आहे. हा कदाचित आरोपीला सोडवीलही.अशी कुजबूज सुरू झाली .  

सरकारी वकिलाने प्रथम या खुनाचा तपास करणाऱ्या इन्स्पेक्टरला बोलाविले .त्याने अमुक अमुक झोपडपट्टीमध्ये एक खून झाल्याचा फोन आला म्हणून मी  सर्व स्टाफसह लगेच तिथे गेलो.सुभद्रेच्या झोपडीसमोर बरीच गर्दी जमलेली होती . पुढ्यांत रक्ताने भरलेली कुऱ्हाड ठेवून सुभद्रा वेड्यासारखे मी त्याला मारला.मी सैतानाला मारला.असे बडबडत होती .

मध्येच आरोपीचा वकील उठून म्हणाला *सैतानाला मारले* असे सुभद्रा म्हणत होती याची विशेष नोंद कोर्टाने घ्यावी .*कोणतीही आई आपल्या मुलाला तसेच कारण असल्याशिवाय सैतान म्हणून संबोधणार नाही .*

पुढे इन्स्पेक्टरने तिथे सापडलेली कुर्‍हाड, त्यावरील रक्ताचे डाग,दांड्यावरील बोटाचे ठसे, झोपडीचे निरनिराळया  कोनातून काढलेले फोटो,कुऱ्हाडी वरील रक्ताचा गट आणि राघवच्या खून झालेल्या  व्यक्तीच्या रक्ताचा गट, हे जुळत आहेत असा रिपोर्ट,कुऱ्हाडीच्या दांडय़ावरील ठसे हे सुभद्रेच्या हाताच्या ठशांची जुळत आहेत असा रिपोर्ट सादर केला .

युवर विटनेस म्हणून सरकारी वकिलाने आरोपीच्या वकिलाकडे निर्देश केल्यावर त्याने  नो क्रॉस म्हणून सांगितले .

नंतर पंचनामा सादर करण्यात आला .पंचनाम्यावर सह्या केलेल्या व्यक्तींच्या साक्षी झाल्या .राघवचे प्रेत कसे पडले होते. त्यांची दिशा कोणती होती.प्रेत राघवचेच होते ना ?त्यानंतर राघवच्या प्रेताचा शवविच्छेदन रिपोर्ट सादर करण्यात आला .डोक्यावर उजव्या बाजूला कोणत्या तरी रुंद तीक्ष्ण अशा हत्याराचा(कुर्‍हाडीसारख्या) खोल घाव होता.मृत्यूचे कारण जखमेतून झालेला अति रक्तस्राव आणि मेंदूला पोचलेला धक्का असे रिपोर्टमध्ये लिहिण्यात आले होते .

यावरही आरोपीच्या वकिलाने नो क्रॉस म्हणून सांगितले.हा नक्की केस हरणार .आपला याच्याबद्दलचा अंदाज चुकला. हा आरोपीची शिक्षासुद्धा कमी करू शकत नाही .हा कुणाचीच क्रॉस एक्झामिनेशन घेत नाही .अशी कुजबूज प्रेक्षकात सुरू झाली .कोर्टाला हातोडा ठोकून पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करावी लागली .

एवढे सर्व होईपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले कोर्टाने खटला तात्पुरता तहकूब, उद्या पुढे सुरू होईल असे सांगितले . 

( क्रमशः )

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel