प्रकरण सोळा

“ तुझ्या मामासाठी मला जरा मदत करशील? ”  पाणिनी ने आर्या ला विचारलं
“ दुनियेतली काहीही ! ” क्षणार्धात तिने उत्तर दिलं
“ पण मला जी मदत अपेक्षित आहे ती जरा नाजुक किंवा अवघड आहे.”  पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे कशी? ”
“ म्हणजे तू पकडली गेलीस तर अडचणीत येऊ शकतेस.”
“ तुमचं काय? मी पकडली गेले तर तुम्ही पण अडचणीत याल? ”
“ खूपच ”  पाणिनी म्हणाला.
“ मग पकडलं जायचंच नाही.” आर्या म्हणाली
“ हा विचार एकदम पटला मला ! ”
“ बोला तर मग काय करुया? ” आर्या म्हणाली
“ आर्या, तुझ्याशी कायद्याबद्दल बोलायचय आणि आणि मी यात नेमका कुठे बसतो हे सांगायचंय ”  पाणिनी म्हणाला.
तिने गोंधळून  पाणिनी  कडे पाहिलं
 “  आर्या, इतर लोक खुनाच्या प्रकरणा कडे पाहतात त्यापेक्षा वकील वेगळ्या नजरेने बघतात. त्यांच्या दृष्टीने खुनाचे प्रकरण म्हणजे त्यांच्या अनेक खटल्यांपैकी एक असते.ज्यांचा खून झालेला असतो तो वकीलांच्या ओळखीचा नसतो ,ज्याचावर आरोप असतो तो ही ओळखीचा नसतो.पण त्यामुळेच तो वकील भावनेच्या आहारी न जाता चांगली सेवा देऊ शकतो आपल्या अशिलाला. ”
तिने त्याचे विचार पटल्यासारखी आपली मान हलवली.
“ सरकारी वकील जे प्रश्न तुला विचारतील ते में तुला आधीच विचारतो.”  पाणिनी म्हणाला.
“ कोणते ? ” आर्या म्हणाली
“ तो चाकू किंवा सुरा, ज्या जोडीतला होता, आणि जो टेबलाच्या ड्रॉवर मधे असायचा तो तुझ्या नेहमीच्या ओळखीचा होता ? ”
“ अर्थातच.” आर्या म्हणाली
“ तू स्वतः तो चाकू टेबलाच्या ड्रॉवर मधे शेवटचा कधी बघितला होतास? ”
“ मला... नाही..मला वाटत की मामाच्या उशी खालून मी तो काढून घेतला तेव्हा तिथे ठेवला. या बद्दल मी दिलेली जबानी बदलायला पाहिजे का मी? असेल तर सांगा.”
“ तुला हाच प्रश्न सरकारी वकील विचारातील तेव्हा हेच उत्तर दे , जे खरे उत्तर आहे, म्हणजे खून झाला त्या सकाळी तू त्या ड्रॉवर मधे चाकू ठेवलास तो तू शेवटचा पाहिलास, म्हणजे काल घडलं हे, जेव्हा तू माझा सल्ला घेतलास आणि विहंग ला पटवलंस की त्याने मला वकील म्हणून नेमावे.”  पाणिनी म्हणाला.
तिने मान डोलावली. 


“ त्या नंतर कधी पाहिलास तो चाकू? ”
“ तुम्ही माझ्या बरोबर असतानाच.मामाच्या उशी खाली.” आर्या म्हणाली.
“ तो, तोच चाकू होता याची खात्री आहे ? ”  पाणिनी म्हणाला..
तिने मान डोलावली.
“ तसं असेल तर मला विचारायचं होतं ते झालं विचारून.”  पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे काय? ” तिने न समजून शंका व्यक्त केली.
“ सरकारी वकील याच पद्धतीने साक्षीदाराची तपासणी घेतात आणि त्यांच्या मनात असलेली उत्तरं काढून घेतात.” पाणिनी म्हणाला.
“ मला नाही समजलं ”
“ मामाच्या उशीखाली जो चाकू तुला सापडला तो म्हणजे ड्रॉवर मधलाच चाकू होता हे तुला माहीत नव्हतं, तुला वाटत होतं की दोन्ही चाकू म्हणजे एकच आहेत. सगळे चाकू सारखेच दिसतात. तू ड्रॉवर मधे शोधलंस, तिथे तुला चाकू दिसला नाही, म्हणून तू मामाच्या उशीखाली बघितलंस आणि तुला चाकू दिसला.तो हुबेहूब ड्रॉवर मधल्या चाकू सारखा होता,तू अशी समजूत करून घेतलीस की ड्रॉवर मधला चाकूच उशीखाली होता. ” 
“ म्हणजे  ? दोन्ही चाकू वेगळे होते? ” तिने विचारलं
“ मला माहीत नाही.”  पाणिनी म्हणाला.   “ पण दोन्ही ठिकाणचा चाकू एकच होता आणि त्याच चाकूने खून झालाय  हे सिध्द करायची जबाबदारी सरकारी वकिलांची येते.”  पाणिनी म्हणाला.
“ मग अशा परिस्थितीत मी म्हणेन की , दोन्ही ठिकाणचा चाकू एकच होता याची मला खात्री नव्हती.” आर्या म्हणाली.
“ तू भले तसे सांगशील, पण तुला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावाण्यापूर्वी सरकारी वकील पाच –सहा जणांची आधीच साक्ष काढतील , त्यांना विचारतील, तुम्ही शेवटचा कधी पहिलात चाकू त्या ड्रॉवर मधे? नंतर तो कधी दिसला वगैरे.त्यातून  अप्रत्यक्ष  पणे ते दाखवतील की दोन्ही एकच आहेत, आणि मग सहज विचारल्या सारखे विचारतील,  ‘तुमची खात्री आहे ना तो एकच चाकू होता?’  ”  पाणिनी म्हणाला.
तिने समजल्या सारखी मान डोलावली पण डोळ्यातील शंकेचे भाव तसेच होते.पाणिनी ने ते ओळखून म्हंटले, “ आर्या, मी तुझ्याशी मोकळे पणाने बोलू शकतो पण बल्लव आणि इतर साक्षीदारांशी बोललो तर त्याचा अर्थ असा निघेल की मी सरकार पक्षा च्या  साक्षीदारांना फितवतो आहे किंवा गोंधळात टाकतोय. त्यांच्यावर आधीच समन्स बजावलं गेलयं.”
“ पटवर्धन, मी जसजसा विचार करत्ये, तेव्हा लक्षात येतंय की अगदी अशाच प्रकारचे प्रश्न मला जबानी घेताना विचारले गेले होते.” ती म्हणाली
“ तेच मला म्हणायचं होत.”  पाणिनी म्हणाला.   “ या सर्वातला कच्चा दुवा तुला सांगायचा होता मला.कोणालाच माहीत नाहीये की दोन्ही ठिकाणचे चाकू म्हणजे एकच चाकू होता.सगळ्यांना फक्त वाटतंय की एकच चाकू होता.आपल्या म्हणजे बचाव पक्षाच्या दृष्टीने  ही गोष्ट महत्वाची ठरणार आहे. सरकारी वकील हेच गृहित धरून चाललेत आणि त्यांच्या साक्षीदारांना पण ते त्याच दृष्टीने प्रश्न विचारणार.मग मी जेव्हा उलट तपासणी घ्यायला उभा राहीन तेव्हा मी हे सिध्द करायचा प्रयत्न करीन की ते दोन चाकू वेगवेगळे होते.पण ते सिध्द करण्यासाठी मला सरकारी वकिलांनी हे सिध्द करायला हवंय की दोन्ही ठिकाणी सापडलेला चाकू एकच होता म्हणून.”
“ पण हे कसे करणार तुम्ही? ”
“  टेबलाच्या कप्प्यात तसाच दुसरा चाकू ठेऊन.”  पाणिनी म्हणाला. आणि याने तिच्या डोळ्यात निरखून पाहिलं.
“ तर मग आर्या, तुला उद्या तुझ्या टेबलाच्या कप्प्यात हुबेहूब तसाच दुसरा चाकू ठेवलेला दिसेल.तुझ्या पुरता विषय ठेव, आम्हीच व्यवस्था करणार आहो की वृत्तपत्रा पर्यंत ही बातमी जाईल.सरकारी वकील,पोलीस यांना संशय येईल की मीच तो चाकू तिथे ठेवला.मग ते सिध्द करण्यासाठी सरकारी वकील आकाश पाताळ एक करतील.माझ्यावर खोटा पुरावा पेरल्याचे आरोप करतील, माझ्या विरुध्द बार असोसिएशन कडे तक्रार करतील.मला तेच हवंय , की चाकू ओळखताना साक्षीदाराने तो सहजगत्या आणि फारसा विचार न् करता ओळखला असे व्हायला नकोय.तुझ्या लक्षात येतंय ना मला काय म्हणायचं आहे ते? ”  पाणिनी म्हणाला..
आर्या ने मान डोलावली. सौम्या ने पाणिनी चे लक्ष वेधून त्याला सावध करायचा प्रयत्न केला. पाणिनी ने आर्या च्या नकळत सौम्या ला खूण करून सांगितलं की मी सावध आहे काळजी करू नको.
“ तिथे चाकू कोण ठेवणार आहे उद्या ? ” आर्या ने विचारलं.
“ तू.”  पाणिनी म्हणाला.
“ मी ? ...” तिने किंचाळून विचारलं
पाणिनी ने मानेनेच हो म्हंटलं
“ आणि कोणाला सापडणार तो ? ”
“ इन्स्पे.होळकर ला.”  पाणिनी म्हणाला.
“ पण समजा त्याच्या आधी दुसऱ्या कोणाला तो दिसला तर? ” आर्या ने काळजीने शंका घेत विचारलं.
“ त्याची दक्षता घेऊ आपण.मी सांगतो काय कर ते.तुझ्या कडे त्या ड्रॉवर ची एकमेव किल्ली आहे ना? ”
“ हो ”
“ फक्त तुझ्याच कडे आहे.बरोबर? ”  पाणिनी म्हणाला..
“ हो.”
“ आणि अजूनही आहे तुझ्याकडे? ”
“ हो ”
“ तू इन्स्पे.होळकर ला फोन करून सांगायचं की पाणिनी पटवर्धन उद्या तुला म्हणजे आर्या ला भेटायला येणार आहे सकाळी आठ वाजता. तर त्याला आत घेऊ ना? ” पाणिनी म्हणाला.
“ आणि मी असं विचारलं की तो स्वतः सकाळी येईल? ” तिने विचारलं.
“ अगदी बरोबर आहे. तो १००% येईल.”
“ मला या सर्वात काही त्रास होईल का? ” तेणे शंका घेत विचारलं.
“ जर तू चाकू ठेवताना पकडली गेलीस तर अडचणीत येऊ शकतेस.”  पाणिनी म्हणाला.
“ हे सर्व केल्याचा फायदा विहंग खोपकर ला, म्हणजे मामाला होणारे? ”
“ मला खात्री आहे.”  पाणिनी म्हणाला.
ती हे ऐकून आत्म विश्वासाने उठली.पाणिनी पटवर्धन शी जोरदार हस्तांदोलन केलं तिने.
“ सौम्या, हिला आपल्या लायब्ररी च्या खोलीत बसव जरा.”  पाणिनी म्हणाला.
आर्याच्या चेहेऱ्यावरील प्रश्नचिन्हं पाहून तो म्हणाला, “ हा चाकू मिळवण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत.तुला ते कळाव असं मला वाटत नाही.कारण जेवढं तुला कमी माहिती होईल तेवढंच तुला कमी खोटं बोलावं लागेल. तू बस लायब्ररीत आमच्या.सौम्या तुला वाचायला पुस्तकं देईल.आमचं झालं की तुला कळवू.” पाणिनी म्हणाला.
“इन्स्पे.होळकर ला फोन करून नक्की कधी  सांगायचं ”
“ तू ड्रॉवर मधे चाकू ठेवलास आणि कुलूप लावलास की लगेच.”
“ पण या सर्वाला उशीर होईल.” ती म्हणाली.
“ ठीक आहे, पण तू सांगू शकतेस की पटवर्धन चा मला फोन आला होता  उद्या कधी येऊ विचारण्यासाठी आणि  थोडया वेळाने त्याला कळवायचे आहे . इन्स्पे.होळकर ला त्रास होईल का उझ्या फोन चा हा विचारच मनात नको आणू.त्याला मनातून गुदगुल्याच होतील , मला अडकवायची संधी मिळत्ये म्हणून. ”
“ मी जमविण हे सर्व.” ती निश्चयाने म्हणाली. सौम्या तिला घेऊन लायब्ररीत गेली. पाणिनी ने आपले दोन्ही हात पॅण्ट च्या खिशात घालून फेऱ्या मारायला सुरुवात केली. सौम्या तिला सोडून पुन्हा पाणिनी च्या केबिन मधे आली आणि दारावर टकटक झाली.प्रांजल आणि उदित ला सौम्या ने आत घेतलं.
पाणिनी ने दोघांना बसायला सांगितलं.  “ आणलाय ना चाकू? ”  पाणिनी म्हणाला..
“ उदित ला काही शंका विचारायच्या आहेत. नेमकं तुमच्या मनात काय आहे? ” प्रांजल म्हणाली.
“ फक्त एक प्रयोग करायचाय.”  पाणिनी म्हणाला.  “ सरकारी वकीलांच्या म्हणण्या नुसार टेबलाच्या ड्रॉवर मधून जो चाकू घेतला गेला होता,त्या चाकू सारखाच दुसरा चाकू मला हवाय ”
“ काय करायचं आहे तो घेऊन? ” उदित पेंढारकर  ने विचारलं
“ प्रयोग.” पाणिनी म्हणाला.
“या पेक्षा जास्त काही सांगता येणार नाही ? ”  --पेंढारकर  ने विचारले.
“ नाही.”
तो थोडा घुटमळला, नंतर खिशातून रुमाल काढून हातावर गुंडाळला,पण  जरा मना विरुध्द त्याने आपल्या जवळच्या कागदात गुंडाळलेला चाकू बाहेर काढून पटवर्धन कडे दिला.
“ हा तर अगदी हूबहू  आहे ! ” पटवर्धन चाकू हातात घेत आनंदाने उद्गारला आणि आपल्या टेबल वर ठेवला.
“ मला जेव्हा कळलं की या प्रकरणात चाकू ला फार महत्व राहणार आहे आणि प्रांजल ला समन्स निघू शकेल, तेव्हाच मी  चाकूच्या सेट मधल्या काट्या वरून उत्पादन करणाऱ्या कंपनीचा प्रोडक्ट कोड किती आहे तो पाहून ठेवला होता.” पेंढारकर  म्हणाला.
“ आणि त्या सेट ची ऑर्डर दिलीस ? ”  पाणिनी म्हणाला..
“ नाही, ऑर्डर नाही द्यावी लागली.माझ्या हार्डवेअर च्या दुकानात असे  सेट आहेतच. मी त्यातलाच पूर्वी विहंग खोपकर ला विकला होता.”
“ किती दिवसांपूर्वी विकला होतास? ”  पाणिनी म्हणाला..
“ साधारण दोन-तीन महिन्यापूर्वी.” तो म्हणाला.
“ खूप खूप आभार तुमचे दोघांचे.” पाणिनी म्हणाला.  “ विहंग खोपकर पर्यंत मी नक्की पोचवीन तुम्ही त्याच्या साठी एवढे सहकार्य केलेत ते.” पाणिनी ने उठून  दोघांशी हस्तांदोलन केले आणि आणखी काही काम नाही असे सूचित केले.
“ तुम्हाला खत्री आहे ना उदित ला यात त्रास होणार नाही? ” प्रांजल ने विचारलं.
पाणिनी हसला. “  त्रास होणे ही तुलनात्मक  संज्ञा आहे. त्याला फारसे महत्व नाही.” 
पाणिनी ने उदित च्या खांद्यावर थोपटले.आणि त्याला टेबला पासून लांब  दारा पाशी घेऊन गेला.  “ काळजी करू नको. शेवटी ग्राहक म्हणून मी तुझ्या दुकानात येऊन हा सेट विकत घेतला असता तर ? ”
“ त्यात फरक आहे , पटवर्धन. तुम्ही अत्ता माझ्या दुकानात नाही आलेले.” उदित पटवर्धन च्या म्हणण्याशी असहमती दर्शवत म्हणाला.
“  तुला मी तसं करायला हवं असेल तर जा आणि उघड तुझं दुकान. मी येतो आणि हाच सेट खरेदी करतो.” हसून पाणिनी म्हणाला आणि त्यांनी लौकर बाहेर  जावं म्हणून दार उघडलं.
मनाविरुद्ध च उदित  प्रांजल ला घेऊन बाहेर पडला.
“ पुढे काय आता? ” ते दोघे गेल्याची खात्री करत सौम्या ने विचारलं.
“ लिंबू आण.”  पाणिनी म्हणाला.
“ काय? ” सौम्या ने आठ्या पाडून विचारलं.
“ हो. आपल्या पेंट्री मधे लिंबू असेल ते आण.आणि या चाकूने ते आपण कापू.थोडा रस त्या पात्यावर काही काळ राहून देऊ.म्हणजे चाकूचा नावे पणा दिसणार नाही.मग आपण चाकूवरचे  आपल्या सर्वांचे ठसे पुसून टाकू.आणि तो चाकू आर्या कडे देऊ.ती पण काळजी घेईल की चे ठसे  ती कुठेच उमटू देणार नाही. ” पाणिनी म्हणाला.
“ मग इन्स्पे.होळकर ला जेव्हा तो चाकू ड्रॉवर मधे दिसेल तेव्हा लगेचच तो त्याच्यावर ठसे मिळतात का ते बघायला लागेल.” सौम्या ने पुस्ती जोडली.
“ अर्थात ! ” पाणिनी हसून म्हणाला.
“ त्याला तर कोणाचेच ठसे मिळणार नाहीत.” सौम्या म्हणाली.
“ बरोबर.”  पाणिनी म्हणाला.
“  मग या गोष्टीचा  त्याला संशय नाही येणार? ”
“ का? ”  पाणिनी म्हणाला..
“ चाकू वापरातला असल्याने त्यावर कोणाचे तरी ठसे हवेत ना? ” सौम्या म्हणाली.
 कोर्टात न्यायाधीशांसमोर अभिवादन करताना वकील जसे वाकतात तसे पाणिनी नाटकी पणाने वाकून  सौम्या ला म्हणाला, “ माय डार्लिंग,सरकारी वकिलांची स्थिती कशी होईल याचा आता  तुला बरोबर अंदाज यायला लागलाय.”
“ मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाही.”
“”लक्षात घे सौम्या, विहंग च्या उशीखाली सापडलेल्या चाकूच्या मुठीवर दृष्य स्वरूपातील कोणतेच ठसे नव्हते.” पाणिनी म्हणाला.
तेवढ्यात फोन ची रिंग जोरात वाजली.सौम्या बोलू लागली. थोडावेळ ऐकून घेतल्यावर पाणिनी ला उद्देशून म्हणाली, “ तुरुंगातल्या माणसाचा फोन आहे. तो म्हणतोय विहंग खोपकर ला काही कागदपत्र पाठवली गेल्येत आणि त्याला तुम्हाला ताबडतोब भेटायचं आहे.”
“ ओह ! त्याला म्हणावं मी लगेच येतोय.” टेबल वर उदित ने दिलेला चाकू पातं वर करून ठेवत पाणिनी म्हणाला.“  मी विहंग ला भेटायला जाई पर्यंत  लायब्ररीत बसलेल्या आर्या ला इकडे आण आणि सर्व समजावून सांग.”
सौम्या तिला घेऊन येई पर्यंत पाणिनी चाकू आपल्या रुमालाने पुसून स्वच्छ करायला लागला.आर्या आली आणि चाकू पाहिल्यावर एकदम म्हणाली, “ अरे हा तोच चाकू आहे.! ”
“ दोन पैकी कुठल्याच चाकूवर विशिष्ठ अशी  खूण नाही ”
“ बर, आता काय करावं मी या चाकूचं ? ” तिने विचारलं
उदित ने ज्या कागदात तो घालून आणला होता त्याच कागदात पाणिनीने तो  गुंडाळून ठेवला  आणि तिच्याकडे देऊन म्हणाला, “ यावरचे सगळे ठसे मी पुसलेत आता  तुझे किंवा इतर कोणाचे  ठसे पुन्हा उमटणार नाहीत याची दक्षता घे.त्याच ड्रॉवर मधे हा ठेव आणि इन्स्पे.होळकर ला फोन करून सांग की पटवर्धन सकाळी आठ वाजता येणार आहे.आणि खरोखरच मी बरोब्बर आठ वाजता येणारच आहे.”  पाणिनी म्हणाला.
“ आणि मी ड्रॉवर ला कुलूप लावायचं ना? ” तिने विचारले.
“ कुलूप लावायचं आणि कोणालाही कळू द्यायचं नाहीस की चाकू आत ठेवलाय म्हणून.”
तिने त्याच्या कडून  ते कागदाचे पार्सल घेतले.
“आर्या, तुला का वाटलं की मामा तुला ठार मारणार आहे? ” पाणिनी ने अचानक पण सहज बोलतोय असं भासवून विचारलं.तिला या प्रश्नाने अचानक पोटात ठोसा मारल्याची भावना झाली.
“ अहो काय बोलताय तुम्ही ! ” ती म्हणाली.
“ तुला नीट समजलंय मला काय म्हणायचंय ते.”  पाणिनी म्हणाला.  “ मामा झोपेत चालतोय ही गोष्ट तुला महिन्यापूर्वी पासून लक्षात आली होती.तुला वाटत होत की तो तुला मारणार आहे.
“ अजिबात नाही तसं. धाधांत खोटे आहे हे ” ती किंचाळून म्हणाली.
“ तर मग तु तुझ्या बेडरूम ला  आतून मोठ लॅच का बसवून घेतलंस ? ”  पाणिनी म्हणाला..
तिने एकदम आवंढा गिळला.
“ सांग, वेळ घालवू नको ” पाणिनी ने दम भरला.
“ मी...मी..” ती अडखळली.
“ तुझ्या खोलीला आधीच एक लॅच होत.त्याची किल्ली तुझ्या शिवाय विहंग कडे पण होती, म्हणून तुला असं लॅच बसवून घ्यायच होत की ज्याची किल्ली विहंग कडे नसेल.फक्त तुझ्याकडेच असेल.”  पाणिनी म्हणाला.
“ नाही...नाही...” ती उद्गारली आणि एकदम खुर्चीत कोसळली आणि रडू लागली.
“ रडून घे हवं तेवढं रडून झालं की माझ्या प्रश्नाचं उत्तर दे.मी वाट बघतो.”  पाणिनी म्हणाला.
“ तुम्हाला त्या लॅच बद्दल का माहिती हव्ये एवढी? ” तिने डोळे पुसत पुसत विचारलं
“ कारण सरकारी वकीलांना अगदी असंच तुला विचारून धक्का द्यायचाय. ते तुझ्याकडे बोट करून हेच विचारणार आहेत की तुला सुध्दा मामाची भीती वाटत होई म्हणून  तू लॅच बसवलस का दाराला ? मग तुला तिथे ही तसाच अभिनय करावा लागेल रडायचा, जसं तू अत्ता इथे करून दाखवलास मला. ”
“ मी...मी.. अभिनय नव्हते करत.” ती म्हणाली.
“ तू मामाला घाबरत होतीस असं त्या वकिलाने सिध्द केलं की याचा अर्थ असा घेतला जाईल की तुझा मामा  विहंग खोपकर हा जात्याचं खुनी वृत्तीचा होता. मग  या खटल्याचा निकाल काय लागेल ते वेगळं सांगायला नकोच.”  पाणिनी म्हणाला.
“ अहो पण हे कारण नाहीये मुळीच.”
“ मग काय आहे कारण? ” पाणिनी म्हणाला..
“ हर्षद  आणि मी महिन्यापूर्वी लग्न केलंय.अगदी गुप्त पणे.” ती लाजत खाली बघत म्हणाली.
“ ओह ! देवा, वाचलो ! ” पाणिनी उद्गारला.
“ म्हणजे? ” तिने विचारलं.
“ मामाच्या भीतीने लॅच लावून घेणे या गोष्टीचा  होऊ शकणारा वाईट परिणाम टळला ”  पाणिनी म्हणाला. “ पण तुम्ही जाहीर पणे का केलं नाहीत लग्न? ”  पाणिनी म्हणाला..
“ आम्हाला ते विहंग ला कळू द्यायच नव्हतं 
“ कारण काय पण? ”  पाणिनी म्हणाला..
“ तो एकदम टोकाला जातो. हट्टी आणि कोपिष्ट स्वभाव आहे त्याचा.”
“ अग,पण त्याला हर्षद पसंत आहे असं तू म्हणाली होतीस ना ? ”  पाणिनी म्हणाला..
“ मामाचं लग्न व्हायच्या आधी मी त्याला सोडून हर्षद च्या घरी जाणार हा विचार त्याच्या मनात येऊ नये असं माझं मत होतं. या शिवाय, मला हर्षद ला ताटकळत ठेवायचं नाहीये, तो चिकणा आहे आणि अनेक पोरी त्याच्यावर मरतात ! ” तिने प्रामाणिक पणे सांगितलं.
परी हसला. “ मी जेव्हा ते लॅच बघितलं तेव्हा त्यामागे असे रोमॅंटिक कारण असेल असं वाटलं नाही.काही भयानक असेल असं वाटलं आणि सरकारी वकील तुला फाडून खातील अशी भीती वाटली.मी आता असं समजो की त्या लॅच ची किल्ली तू आणि तुझा नवरा दोघांशिवाय कोणाकडेही नाही.”
“ मला एकच नवरा असल्याने तेवढी एकच किल्ली आहे.” ती मिस्कील पणे म्हणाली.
“ तुझ्या विश्वासातल्या कोणाला अजून लग्न बद्दल माहिती असायची शक्यता? ”  पाणिनी म्हणाला..
“ कोणालाही नाही.”
“ बरं आहे तर मग, घेऊन जा तो चाकू आणि ड्रॉवर मधे ठेव कुलुपात.सरकारी वकील जर उलट तपासणीत विचारायला लागले त्या लॅच बद्दल तर इथे माझ्या समोर जशी भावना प्रधान होऊन रडलीस तसंचं कोर्टात पण कर.आणि तुझ्या आणि हर्षद च्या लग्न बद्दल बोलताना हसायचे,रडायचे आणि रोमॅंटिक होऊन लाजायचे लक्षात ठेव.”
 पाणिनी म्हणाला. आणि सौम्या ला सांगून तुरुंगात जायला निघला.
(प्रकरण १६ समाप्त)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel