प्रकरण दहा

त्या प्रशस्त घराच्या फरसबंदी  केलेल्या अंगणात  पाणिनी  आर्या ला हलक्या आवाजात सूचना देत होता. “ काहीही झालं तरी खांडवा चा मुद्दा कोणालाही समजता कामा नये. तुझ्या विहंग मामा ला पुढचे दोन अडीच तास आपल्याला पूर्ण सुरक्षित ठेवायला लागणार आहे.”

“ ते त्याला इथे ओढत घेऊन येतील असं तुम्हाला वाटतंय?” तिने शंका विचारली

“ त्यांना प्रश्न विचारायचे असणार  विहंग ला.”  पाणिनी  म्हणाला

“ पोलिसांनी मला अत्ता त्याच्या बद्दल विचारलं तर काय सांगू मी? ” आर्या म्हणाली

“तो कुठे आहे ते मला माहीत नाही असे सांग.”

“ मी सांगते की मी खांडवा ला मुक्काम केलं आणि बस ने घरी आले.”

“ मी नाही तसा सल्ला देणार तुला ते तुझं म्हणण खर आहे का याची माहिती घेतील..”   पाणिनी  म्हणाला

“ तस करायचं काहीच कारण नाही त्यांना. पण तुम्ही काय सांगणार आहात विहंग बद्दल?”

“ मी काहीही सांगणार नाही.”   पाणिनी  म्हणाला

“ तुम्हाला त्रास नाही देणार ते ? ”

“ तसा प्रयत्न करतील ते ! ”

“ मला प्रश्न विचारायला कधी सुरुवात करतील? ” आर्या ने विचारल .

 पाणिनी  ने हातातल्या घड्याळाकडे पाहिले. “अत्ता ते प्रेताची तपासणी करताहेत. कोणत्याही क्षणाला ते बाहेर येतील. दुर्वास तर त्यांना माहिती द्यायला टपलेलाच आहे.ती नेमकी काय आहे ते मला माहीत नाही पण त्याला जेवढी वाटते आहे तेवढी महत्वाची नसणार.तो आणि  मरुद्गण दोघे ही विहंग वर आणि माझ्यावर ही खार खाऊन आहेत. ”

“ पण ते काय करतील आपल्याला ? ”आर्या म्हणाली

“ अत्ताच नाही सांगता येणार.मी आता जरा फोन करतो , तो पर्यंत पोलीस बाहेर आलेच तर मी येई पर्यंत किल्ला लढव.”   पाणिनी  म्हणाला

“ मी खांडवा ला रात्री राहून बस ने सकाळी घरी आल्ये हे लक्षात ठेवा. ”

“ ते सांगायची गरज नाही. मी येई पर्यंत काहीतरी शक्कल लढवून वेळ काढ. अर्थात तू खांडवा ला होतीस हे सांगितलस तरी त्याचा खुनाच्या प्रकरणात फरक पडणार नाही, पण मामाच्या व्यवसायावर परिणाम होईल.पुढे मागे ते तुला शपथेवर सांगायला लावतीलच.तेव्हा तुला खरं सांगावेच लागेल.   पाणिनी  म्हणाला

 “का बरं ? ”

“ नाहीतर तुझ्यावर ते खोटी साक्ष द्यायचा गुन्हा नोंदवतील”   पाणिनी  म्हणाला

“ तुम्ही मला साथ दयाल ना शेवट पर्यंत? ”- आर्या

“ नीट ऐक, ते माझ्या कडून जेवढी म्हणून माहिती काढतील तेवढी तू तुझ्याकडे साठवून ठेव. ”

एका खोलीत जावून  पाणिनी  ने सौम्या ला फोन केला. “ इथे बरंच काही घडलंय. कनक ला म्हणावं तुझे दोन तीन हेर घेऊन इकडे ये. पोलीस त्याला कदाचित आत येऊ देणार नाहीत तसं झालं तर तिथेच जवळपास घुटमळत रहा असं सांग त्याला. खांडवा मधली काय हालचाल? ”  पाणिनी  म्हणाला .

“ हो, सुकृत ने फोन केलं होता.तो म्हणाला की शेफाली च्या घरावर तो सतत लक्ष ठेऊन होता.ती कुठेच बाहेर नाही पडली.त्याला वैयक्तिक तुमच्याशी बोलायचं आहे , फोन वर बोलला तर गहजब होईल म्हणतो.” सौम्या म्हणाली.

“ घरावर कोण लक्ष ठेवून आहे अत्ता? ”  पाणिनी  म्हणाला .

“ हर्षद .आता त्यालाही सोडवायच आहे.” सौम्या म्हणाली.

“ मी सांगतो तुला , कनक ला सांग की त्याचा खांडवा मधला कोणीतरी संपर्कातला हेर गाठ आणि त्याला शेफाली च्या घरावर नजर ठेवायला सांग म्हणजे आपल्याला हर्षद आणि सुकृत दोघांनाही तिथून मुक्त करता येईल.तिचे फोटो आणि वर्णन त्या हेराला द्यायला सांग कनक ला. ती घरातून बाहेर कधी पडते नी कुठे जाते यवर लक्ष द्यायला सांग.”  पाणिनी  म्हणाला आणि पुन्हा आर्या ला भेटायला बाहेर आला.

“ विहंग मामाचे लग्न व्यवस्थित पार पडावे म्हणून तुम्ही फोन वर बरेच विषय मार्गी लावताय ना?” आर्या ने विचारले.  “ तुम्ही खरंच हुशार आहात.त्यांचे लग्न लागले तर ते दोघेही एकमेकांच्या विरोधात साक्ष देऊ शकत नाहीत ना कायद्याने? ”

 पाणिनी  काही उत्तर देणार तेवढ्यात त्याला इन्स्पे.होळकर येताना दिसला.

“ तुम्ही मामाची साथ दयाल ना शेवट पर्यंत? ”

“ त्याने झोपेत असताना खून केलं असेल तर मी त्याला वाचवण्याचा  टोकाचा प्रयत्न करेन पण त्याने सुजाणते पणे खून केलं असेल तर मी त्याला सांगेन की  दुसरा वकील बघ .”  पाणिनी  म्हणाला

“ कोण ठरवणार की त्याने केलेला खून सुजाणते पणे आहे की अजाणते पणे?” –आर्या

“ मीच ठरवणार.”   पाणिनी  म्हणाला

“ पण तुम्ही घाई घाईत ठरवणार नाही ना? मला तसे वचन द्या.”

“ काळजी नको करू.”   पाणिनी  म्हणाला   “ मी कधीच अविचार करत नाही. आता गप्प बस पोलीस आपल्याच कडे येत आहेत.”

“ अस दिसतंय पटवर्धन, की तू या मुलीला काय बोलायचं,कसं बोलायचं याच्या सूचना देतो आहेस.” त्यांच्या जवळ येत इन्स्पे.होळकर म्हणाला.

“ अनेकदा, दिसतं तसं नसतं इन्स्पे.होळकर ! ”  पाणिनी  म्हणाला

“ तर मग तू इथे काय करतो आहेस  पाणिनी ? ”- इन्स्पे.होळकर

“मरुद्गण आणि विहंग यांच्यातील एक करार होण्यासाठी मी तडजोड करायला आलोय. ”   पाणिनी  म्हणाला

“ आणि विहंग खोपकर कुठाय? ” – इन्स्पे.होळकर

“ ते मी नाही सांगू शकणार ”   पाणिनी  म्हणाला

“ शकणार नाहीस की सांगणार नाहीस? ”

“ दोन्ही ”   पाणिनी  म्हणाला

“ का? ”

“ माझ्या अशीलाचा विश्वास घात होऊ नये म्हणून.”   पाणिनी  म्हणाला

“ फालतू गिरी आहे ही.” – इन्स्पे.होळकर

“ तुला तसं वाटतंय.या बाबतीत आपलं कधीच एकमत होऊ शकणार नाही. आणि हे मी तुला वारंवार बोलून दाखवलं आहे.”  पाणिनी  म्हणाला

“ अजूनही मला विहंग खोपकर कुठे आहे याचं उत्तर मिळालच नाही.” – इन्स्पे.होळकर

“ तुला अजूनही दुसरे मार्ग आहेतच की.”

 इन्स्पे.होळकर आर्या कडे वळला. “ तू त्याची भाची आहेस ना?  ”

“ हो ”

“ कुठे आहे तुझा मामा? ” – इन्स्पे.होळकर

“ मी नाही सांगू शकणार.” ती म्हणाली.

इन्स्पे.होळकर चा चेहेरा रागाने लालबुंद झाला “ तुम्ही दोघेही घरात चला, हॉल मधे बसा , मी सरकरी वकीलांना निरोप पाठवलाय.”

“ तू त्याला वस्तुस्थिती सांगायला हवी होतीस.”

“ मी नाही सांगू शकत.” आर्या म्हणाली.

 पाणिनी  तिला घेऊन घरात गेला.

“ समीरण भोपटकर नावाचे सरकारी वकील कोणत्याही क्षणी येतील.मला काही प्रश्न विचारायचे आहेत. मयत व्यक्तीचे नाव काय आहे? ”

दुर्वास ने हात वर केला. “ मी वकील आहे.माझं नाव दुर्वास. मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत.”

“मयत व्यक्तीचे नाव काय आहे? ” इन्स्पे.होळकर ने पुन्हा विचारलं

 “मृत व्यक्तीचे नाव  राजे असं आहे. विहंग चा तो सावत्र भाऊ आहे.”मरुद्गण म्हणाला.

“ तुम्ही कोण? ” इन्स्पे.होळकर ने त्याला  विचारलं

“ मी मरुद्गण ,विहंग चा भागीदार आहे.सिहोर येथे माझी कंपनी आहे. ”

“ इथे काय करतो आहेस तू ? ” इन्स्पे.होळकर ने विचारले.

“ विहंग बरोबर  काही व्यावसायिक  तडजोडी करायच्या आहेत. ” मरुद्गण म्हणाला,  “ हे माझे वकील, दुर्वास ”

“  पाणिनी  पटवर्धन तुझ्याच बरोबर चर्चा करतोय ना? ” इन्स्पे.होळकर ने विचारले.

“ पटवर्धन हा विहंग खोपकर चा वकील आहे. काल रात्री पासून इथे ,या घरात राहिलाय तो.त्याने त्याच्या बरोबर डॉक्टर खेर नं पण रहायला आणलंय ”दुर्वास म्हणाला.

“ डॉक्टर कुठे आहेत? ” इन्स्पे.होळकर ने विचारले.

“ त्यांना महत्वाची केस होती , त्यांना थांबणे शक्य नव्हते. अर्थात त्यांना कधीही बोलावून घेता येईल.”  पाणिनी  म्हणाला

“ कोणाचा तरी खून झालाय हे पटवर्धन, डॉक्टर आणि आर्या ला माहीत होत.पण कोणाचा ते  नक्की नव्हतं.ते सारखे आसपास फिरत होते.त्यांना वाटलं की माझच खून झालाय.” मरुद्गण म्हणाला

“ तुला कसं कळलं  की खून झालाय कोणाचा तरी?” इन्स्पे.होळकर ने विचारले.

“ मला नव्हत कळलं ”   पाणिनी  म्हणाला    

तेवढ्यात बल्लव एका माणसाला घेऊन आत आला.

“ हे बघा  आलेच  समीरण  भोपटकर. आता तेच सर्व ताबा घेतील. ” इन्स्पे.होळकर म्हणाला.

“ मी काम सुरु करण्या पूर्वी जरा इन्स्पे.होळकर शी बोलून घेतो.” आपल्या ब्रीफ केस मधून वही बाहेर काढत समीरण  भोपटकर म्हणाला आणि इन्स्पे.होळकर ला कोपऱ्यात घेऊन गेला. दोघांची हळू आवाजात काहीतरी चर्चा झाली .

“ तुमच्या पैकी कोणाला काल रात्री काही संशयास्पद  आवाज किंवा हालचाल जाणवली?” समीरण  भोपटकर ने विचारले.

दुर्वास ने जरा खाकरल्या सारखे केले आणि  समीरण  भोपटकर चे लक्ष्य आपल्याकडे वेधून घेतले.

“ मी तुम्हाला महत्वाची माहिती  नेमके पणाने देऊ शकतो. ” तो म्हणाला.

“ तुम्ही कोण ? ”

“ दुर्वास, वकील आहे मी.”

“ सांगा.” भोपटकर म्हणाला.

“ मध्यरात्री नंतर थोड्या वेळाने मला जाग आली कारण कोणीतरी हलक्या पावलांनी , फ्रेंच विंडो  जवळून जात असल्याचा भास झाला, माझी झोप फार सावध आहे. माझा अंदाज आहे की चालणारी व्यक्ती अनवाणी असावी.”

“ तू काय केलंस मग? ” – भोपटकर

“ माझ्या खोली वरून पुढे जाणाऱ्या आकृतीची झलक मला दिसली.फ्रेंच विंडो च्या बाहेर सिमेंट चा कोबा आहे,त्यावरून ती व्यक्ती  झोपेत चालत जाताना दिसली.मी पटकन उडी मारून  खिडकी जवळ गेलो.” दुर्वास म्हणाला.

“ झोपेत चालत होती असं वाटायचं कारण काय? ” – भोपटकर

“अंगात नाईट गाऊन होता. ज्या पद्धतीने त्याची चालायची पद्धत होती, म्हणजे डोके मागे गेलेले, तंद्रीत चालणे. त्यावरून माझ्या लगेच लक्षात आले.”-दुर्वास

“ तो पुरुष होता की स्त्री ? ”-भोपटकर

“ आता असं बघा, ती पौर्णिमेची रात्र होती.....”दुर्वास म्हणाला.

“ माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायची घाई करू नका. त्या माणसाने काय केलं ते आधी सांगा.”

“ झोपेत चालत असतानाच एका टेबलाला अडखळला., पण नंतर उत्तरे कडच्या दाराने बाहेर पडून दिसेनासा झाला.” दुर्वास म्हणाला.

“ हे सगळ तू स्वतः पाहिलंस?” भोपटकर  ने विचारले

“ एकदम स्पष्ट पणे ”

“ वेळ कशी निश्चित केलीस?”-भोपटकर

“ माझ्या कॉट वर असलेले घड्याळ बघून ”

“ काय वेळ होती ती? ”

“ रात्री सव्वा बाराच्या सुमाराला.” दुर्वास म्हणाला. “ त्या नंतर मला झोप लागली नाही.”

“ तू आर्या आहेस? ” भोपटकर ने आर्या ला विचारले.

“ हो.”

“ तुला काय माहिती आहे यातील? ” –भोपटकर

“ काहीच नाही.” ती म्हणाली.

“ तुला तुझ्या खोलीत कोणी येताना दिसलं का? ”

“ नाही.”

“ तुझं दार आतून लॉक होत की नव्हतं? ” भोपटकर ने विचारले.

“लॉक होत ” –आर्या

“ कोणाचा तरी  खून झाल्या चे तुला सकाळी माहिती होते? ”

“ अजिबात नाही.”

“काल तू तुझ्या खोलीच्या  बाहेर पडली होतीस ? ”

“ त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये.” आर्या ने उत्तर दिले.

“ विहंग खोपकर कुठे आहे अत्ता ? ” –भोपटकर

“ पटवर्धन ना विचारा हे. त्याला माहिती आहे असे वाटतंय.” इन्स्पे.होळकर म्हणाला.

“ तो व्यावसायिक कामामुळे गैरहजर आहे. पण त्याचा इथे घडलेल्या घटनेशी काहीही संबंध नाही. ”   पाणिनी  म्हणाला

“ तो परत कधी येईल? ”-भोपटकर

“ आज रात्री उशिरा पर्यंत किंवा फारतर उद्या सकाळी.” – पाणिनी

“ अत्ता कुठे आहे तो ? ”

“व्यावसायिक कामामुळे गैरहजर आहे ”  पाणिनी  ने तेच उत्तर पुन्हा दिले.

“ पटवर्धन, मला इकडे तिकडे घुमवण्याचा नका प्रयत्न करू.हा खुनाचा मामला आहे आणि मला विहंग ला प्रश्न विचारायचे आहेत ”-भोपटकर

 पाणिनी  ने फक्त आपले खांदे उडवून ‘ माझा नाईलाज आहे ’ अशा आशयाचा संकेत भोपटकर ला दिला.

“ हे बघ पटवर्धन, तू सहकार्य केले नाहीसं तर आम्हाला त्याच्या मागावर माणसे पाठवायल लागतील आणि इथे आणावे लागेल.”-भोपटकर

“ ठीक आहे , तुम्हाला हवा तसं करा ”  पाणिनी  म्हणाला

“ कुणाला माहिती आहे विहंग कुठे असेल या बद्दल? ” –भोपटकर

थोडा वेळ तिथे शांतता पसरली.

“ मला समजलंय की काल रात्री हर्षद, आर्या आणि प्रांजल  अचानक कुठेतरी प्रवासाला गेले.माझा अंदाज आहे की ते खांडवा ला गेले असावेत.” मरुद्गण म्हणाला.

“ खांडवा ला ? ” भोपटकर ने विचारलं.  “ तिथे काय करताहेत हे सगळे? ”

“ ते नाही सांगता येणार मला.” – मरुद्गण

“ इन्स्पे.होळकर, मला वाटत नाही यातून काही निष्पन्न होईल.” भोपटकर अगदी हळू आवाजात त्याला म्हणाला.  “ या प्रत्येकाशी वेगवेगळं बोललं पाहिजे. अगदी नोकर वर्गाला सुद्धा विचारलं गेलं पाहिजे. तू सगळ्यांना बाहेर  घेऊन जा, एकेकाला आत सोड. ”

“ आपण  पाणिनी  पटवर्धन पासून सुरुवात करू.विहंग त्याचं अशील आहे.” इन्स्पे.होळकर ने सुचवले.

“ पटवर्धन, तुमच्या पासून सुरुवात करू. बोलायला लागा.” –भोपटकर

 इतर सगळे बाहेर गेल्याची खात्री करून घेऊन  पाणिनी  म्हणाला, “ विहंग आणि  मरुद्गण यांच्या मधे काही समझोता करण्याचा करार आम्ही बनावत होतो. आता त्याचा अधिक तपशील मी देऊ शकत नाही ,कारण त्यात  माझ्या अशिलाच्या खाजगी आणि गोपनीयतेचा  मुद्दा आहे. तडजोड पूर्ण पणे झाली नाही त्यामुळे कराराचे काम पूर्ण झालं नाही.आम्ही सगळ्यांनी इथेच मुक्काम केलं या घरातच. मी डॉक्टर खेर बरोबर एकाच खोलीत वरच्या मजल्यावर रहिलो.आज सकाळी विहंग  खोपकर व्यवसायाच्या कामासाठी बाहेर गावी गेलाय, आणि मीच त्याला तसा सल्ला दिलाय. तो कुठे गेलाय हे मी सांगू इच्छित नाही.आज सकाळी आर्या ने मला दाखवून दिले की टेबलाच्या कप्प्यातून एक चाकू, किंवा सुरी म्हणता येईल त्याला , गायब झाली आहे.मला माहिती होत की यापूर्वी विहंग खोपकर  हातात एक चाकू घेऊन रात्री झोपेत  चालला होता.आणि ही घटना अधिकृत रित्या नोंदवण्यात ही आली आहे. ”  पाणिनी  म्हणाला

“ काय ! ” भोपटकर ओरडला.  “” अशी झोपेत चालायची घटना नोंदवली कशी  जाईल? अनेक जण चालत असतील असे.आणि कोण नोंदवायला जाणार अशा घटना? ” -भोपटकर

“ शेफाली खोपकर , विहंग ची बायको.”   पाणिनी  म्हणाला

“ ती कशाला रेकोर्ड वर आणेल घरगुती घटना? ”-भोपटकर

“ विहंग विरुद्ध तिने लावलेल्या घटस्फोटाच्या दाव्यात .”   पाणिनी  म्हणाला

“ कुठे लावलाय दावा ?”

“ खांडवा ”   पाणिनी  म्हणाला

“ बर, तुम्ही काय केलंत ? ”-भोपटकर

“ आर्या ला घेऊन मी विहंग च्या खोलीत गेलो , त्याच्या उशीखाली मला चाकू दिसला.”

“ उशीखाली ! चाकू ! ” भोपटकर उद्गारला

“ हो ” पाणिनी  थंडपणे म्हणाला. “अजूनही तो तिथेच आहे.त्याला हात पण नाही लावला.पण काय झालं असावं याचा मला अंदाज आला म्हणून मी डॉक्टरांना आणि आर्या ला बरोबर घेऊन सर्व पाहुण्यांच्या खोलीला  भेट दिली , त्यात राजे आम्हाला अंथरुणात दिसला डोक्यापर्यंत पांघरून होते.वरकरणी पांघरुणा वरूनच त्याला भोसकला होता. जास्त तपासणी करता आली नाही मला, लगेच आम्ही पोलिसांना कळवलं”   पाणिनी  म्हणाला

“ अरे बाबा पण हे तुम्ही इन्स्पे.होळकर ला का नाही सांगितलं आधी?” –भोपटकर

“ मी सांगायला गेलो होतो त्या खोलीत, त्याने आम्हाला हाकलून दिलं ”

“ इन्स्पे.होळकर,” भोपटकर म्हणाला. “ एक-दोन जणांना त्या खोलीत पाठव आणि उशीखाली अजूनही चाकू आहे का बघायला सांग.कोणालाही हात लाऊन देऊ नकोस. तुला इथे येऊन किती वेळ झालाय? ”

“ तुम्हाला फोन करायच्या आधी  दहा मिनिटं मी आलो इथे.”

“ आणि मला येऊन वीस मिनिटं झाली , म्हणजे अर्धा तास झाला. त्या दुर्वास ला बरोबर घेऊन मी ते कॉफी टेबल, ज्याला झोपेत चालणारा माणूस धडपडला, ते बघून येतो.” –भोपटकर. इन्स्पे.होळकर ने दोन पोलिसांना त्या खोलीत पिटाळले. भोपटकर अंगणात जायला निघाला त्याच्या बरोबर  पाणिनी  निघाला.दुर्वास आणि भोपटकर एकमेकांशी बोलत होते.एका टेबलाजवळ दुर्वास थांबला आणि त्याने ते टेबल नीट न्याहाळले.

“ या टेबलाला धडकला तो ? ” भोपटकर ने विचारणा केली.

“ नाही; हे नाही वाटत ” दुर्वास म्हणाला.त्याने आजू बाजूला पाहिले.एका टेबलाकडे बोट केले , ते टेबल म्हणजे ज्यावर आर्या ने तिच्या कॉफीचा कप ठेवला होता ते टेबल होते.

“ तुझं म्हणणं आहे की या टेबलाचा टॉप तो धडकल्यावर त्याच्या हातात आला आणि त्याने तो पाडला? ”

“ या टॉप च्या खाली एक पोकळी दिसते आहे ”भोपटकर म्हणाला.”  “ पण हा टॉप बाहेर कसा येतो? अरे झडप आहे उघडायला. हा पहा बाहेर आला टॉप.पण अरेच्चा, आतील पोकळीत काहीच नाही  ”

“ ते काहीही असले तरी हेच टेबल आणि हीच जागा आहे ”-दुर्वास

“ मी या कप बश्या जरा आत ठेऊन येते.” आर्या म्हणाली. ती ते उचललायला गेली पण भोपटकर ने तिचे मनगट पकडले.  “ थांब जरा. त्यावर कदाचित ठसे मिळतील आपल्याला.

“ त्याने  काय फरक पडतो? ” ती उद्गारली.

तेवढयात बाहेरून खानसामा बल्लव चा आवाज आला, “ अरे ही कप बशी मला माहिती आहे, त्याचा एक टवका  उडालाय.माझ्या हातूनच आज सकाळी  पाच च्या सुमारास मी खोपकर, पटवर्धन आणि लीना माईणकर ला कॉफी दिली तेव्हा  त्याला धक्का लागला तेव्हा टवका उडाला होता. ” तो म्हणाला.

“ तू काय केलंस नंतर?” –भोपटकर

“ मी गाडी बाहेर काढून दिली,  पाणिनी  पटवर्धन  स्वतः खोपकर, लीना माईणकर ना घेऊन गेले. तासाभराने पटवर्धन पुन्हा गाडी घेऊन परत आले. ” –बल्लव

“ ते कुठे गेले काही कल्पना? ”- भोपटकर

“ माझा अंदाज आहे की ते लग्न करण्यासाठी गेले असावेत.”

“ त्या कप-बशी बद्दल काय सांगू शकशील आणखी?” –भोपटकर

“ पटवर्धन ने ज्या कपातून कॉफी प्याली, त्या बरोबर ही बशी होती.मला ती बदलायला वेळ नाही मिळाला ,गडबडीत.” –बल्लव

“ पटवर्धन,  म्हणजे तुम्ही त्या बशीने कॉफी प्यालात तर !  ” –भोपटकर

“ नाही, नक्कीच नाही.”   पाणिनी  म्हणाला.

“ नाही? ” भोपटकर ने आश्चर्याने विचारले.

“ मी जेव्हा बाहेर जात असतो तेव्हा कधीच बशीने कॉफी पीत नाही.”  पाणिनी  म्हणाला.

“ म्हणजे , बशिनेच प्यालात असे नाही, बशीत ठेवलेल्या त्या कपाने प्याला असाल, तुम्हाला अगदी क्लिष्ट आणि तांत्रिक भाषेतच विचारावं मी , असं वाटत असेल तर तसा अर्थ घ्या.” –भोपटकर

“ बल्लव तसं म्हणतोय.वैयक्तिक मला सगळेच कप सारखे वाटतात.पण मी कबूल करतो की मी कपानेच प्यालो कॉफी.”   पाणिनी  म्हणाला.

“ मग काय केलंत तुम्ही?” –भोपटकर

“ माफ करा मी मधे बोलतो जरा,” बल्लव म्हणाला.  “ पण पटवर्धन त्यांची कप-बशी घेऊन तिथून दुसरीकडे गेले असावेत, मला त्यांची कप-बशी सापडली नाही म्हणून त्यांना विचारलं पण ते म्हणाले की इकडे तिकडे ठेवली असेल कुठेतरी.”

“ हे कधी ? आज सकाळी घडलं साडेपाच च्या सुमाराला? ” –भोपटकर

“ हो.”

“ पटवर्धन तुम्ही सकाळी साडे पाच ला काय करत होतात तिथे ?” –भोपटकर

“ मी गेलो असेन तिथे अंगणात, पण मला एवढं लक्षात नाही.”   पाणिनी  म्हणाला.

“ तुम्ही ती कप बशी टेबलाच्या टॉप च्या खाली ठेवली का? ”

“ नाही ”   पाणिनी  म्हणाला.

“ कोणी तिथे ठेवली तुम्हाला माहिती आहे का? ”- भोपटकर

“ मला वाटतं तुम्ही राईचा पर्वत करताय. खुनाचा तपास करण्या ऐवजी तुम्ही कप आणि बशी चा केवढा बाऊ करताय.”   पाणिनी  म्हणाला.

“ तुमचा अशील विहंग इथून पहाटे बाहेर पडला, जाण्यापूर्वी त्याने  टेबल च्या टॉप  खालच्या जागेत काहीतरी लपवले. आता ती वस्तू तिथून गेली आहे आणि त्या जागी  कप बशी ठेवली गेली आहे.जी सकृत दर्शनी तुमच्या ताब्यात होती आणि तुम्हाला आठवत नाहीये कुठे ठेवली होती ते.”भोपटकर म्हणाला.

“ ते मी कबूलच केलंय की मी  कप बशी कुठेतरी ठेवली म्हणून पण टेबल टॉप खालच्या कप्प्यात नाही.दुसरं असं की दुर्वास ने झोपेत चालणारी व्यक्ती म्हणजे विहंग च होता असं म्हंटलेले नाहीये. ”   पाणिनी  म्हणाला.

“  तुमचा जबाब न्यायाधीशांसमोरच  घेणे योग्य ठरेल. तुम्ही आम्हाला गोलगोल फिरवत बसाल इथे.” –भोपटकर

“ म्हणजे माझ्या बरोबरचे तुमचे काम झालंय? ”   पाणिनी  ने विचारलं

“ खुना बद्दल तुम्हाला माहिती आहे काही? ”

“ काहीही नाही.”   पाणिनी  म्हणाला.

“ जा तुम्ही. काही लागलं पुन्हा तर कुठे शोधायचे तुम्हाला ते माहीत आहे आम्हाला.” –भोपटकर

 पाणिनी  नाटकी पणाने झुकून म्हणाला, “ अच्छा तुम्हाला सगळ्यांना.”

 पाणिनी  ने आर्या कडे पाहिलं तेव्हा त्याला कळल की तिला त्याच्याशी महत्वाचे बोलायचं आहे.म्हणून तो तिच्याकडे जायला लागला, ते लक्षात येताच भोपटकर ने त्याला हटकले, “ पटवर्धन, तुम्ही निघा, मला वाटतं तुम्ही इथे इतराना तुमची बहुमूल्य मतं आणि सूचना देण्यासाठी उपलब्ध नसाल तर आम्ही आमची चौकशी लौकर पूर्ण करू शकू.”

“ तुम्हाला सदिच्छा.”   पाणिनी  म्हणाला.

प्रकरण १० समाप्त.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel