रोमन प्रतिमाविद्येमध्ये पौराणिक दृश्यांच्या चित्रणात तसेच देवतांच्या मूर्तिशिल्पात ग्रीक आदर्श स्वीकारल्याचे दिसून येते. निसर्गदृश्ये ही मात्र खास रोमन निर्मिती म्हणावी लागले. ऐतिहासिक व्यक्ती व प्रसंगांचे रोमन शिल्पांकन ग्रीकांहून स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेषतः या शिल्पांतील तपशील दाखविण्यात रोमन शिल्पी ग्रीकांपेक्षा अग्रेसर होते. रोमन शिल्पज्ञांनी कित्येक प्रसंगांना मानवी रुप दिलेले आढळते. उदा., युद्धातील विजयाचा प्रसंग दाखवताना एका बाजूस आनंदित झालेले पुरुष, तर दुसऱ्या बाजूस रडणाऱ्या स्त्रिया दाखविल्या आहेत. डोंगर व नद्या यांनाही मानवी रूपे दिली आहेत. माता पृथ्वी दाखविताना तिच्या भोवती मुले, गुरेढोरे, पिके, हवा व पाणी असल्याचे सुचविण्यासाठी हंस व मगर यांवर बसलेल्या मुली दाखविल्या आहेत.
रोमन शिल्पकलेत सुरुवातीला ख्रिस्ती धर्मकल्पनांचा अंश कमी होता; पण पुढेतो वाढत गेला. रोमन शिल्पी हे ग्रीकांप्रमाणे अन्य माध्यमांबरोबरच संगमरवराचाही वापर करीत. ते पुढे पुढे चुनखडीचा दगड, भुरा वा पिवळा कुरुंद आणि काही वेळा काळा संगमरवरही वापरूलागले. ते मोठमोठ्या मूर्ती घडवताना ग्रीकांप्रमाणेच प्रथम माती वा चुना वा मेण यांच्या छोट्या प्रतिकृतीतयार करीत आणि मग त्यांचे मोठ्या पाषाणात वा धातूमध्ये रुपांतर करीत. रोमन शिल्पीही शिल्पांना रंग देत. कधीकधी दगडी भिंती रचून झाल्यावर त्यांवर प्रतिमा खोदीत. हे शिल्पी पटाशी, सड्या, कानस आणि भोके पाडण्यासाठी सामताअशी हत्यारे वापरीत. ग्रीकांनी मूर्ती खोदण्यात छिन्नी व हातोडा यांशिवाय अन्य कोणतीही हत्यारे वापरली नव्हती.
ग्रीकांमध्ये शिल्पव्यवसाय कमी प्रतीचा, तर रोमनांमध्ये प्रतिष्ठीत मानला जात असे. यावरून रोमन प्रतिमाविद्या ही त्या काळात भरभराटीस आली असावी, असे दिसते.