प्रत्येक मूर्ती वा प्रतीक ही त्या त्या देवतेचे सगुण व दृश्य रुप होय. मूर्ती हा केवळ कल्पनाविलासाचा खेळ होऊ शकत नाही. हे रूप कसे असावे हे सांगण्याचा अधिकार ज्यांना देवदेवतांची रूपे साक्षात्काराने प्रतीत झाली आहेत, वा ज्यांना त्याविषयी ज्ञानप्राप्ती झाली आहे, अशा साधकांना, उपासकांना वा भक्तांनाच असतो. त्यासंबंधी विचार धर्मशास्त्रात सांगितलेला असतो, वा साक्षात्कारी पुरुषाने सांगितलेला असतो; किंवा परंपरेने प्राप्त झालेला असतो.
आपल्याला झालेले यासंबंधीचे ज्ञान किंवा दिसलेल्या देवतेच्या स्वरूपाचे संपूर्ण वर्णन तज्ञ व्यक्तीने मूर्तीकाराला सांगावयाचे व त्या वर्णनानुसार त्याने मूर्तीतयार करावयाची, हे प्रतिमाविद्येत अभिप्रेत आहे. मूर्तीच्या अशा वर्णनांचा संग्रहच प्रतिमाविद्येत असतो. प्रतिमाविषयक उपपत्तीची वा तत्त्वज्ञानाची थोडीबहुत चर्चा प्रतिमाविद्येत अभिप्रेत आहे. कलाकाराला वर्णनाप्रमाणे मूर्तीचे बाह्य स्वरूप बनविता आले, तरी तिचे अंतःस्वरूप किंवा भावस्वरूप दाखविण्याची गरज असतेच.
तथापि सर्व कलाकारांना त्या स्वरूपाची जाणीव झाली असेलच, असे नाही. असे होऊ नये म्हणून भारतीय कलाविचारात कलाकार व तज्ञ उपासक वा साधक यांचे अद्वैत आवश्यक मानले आहे. कलाकार स्वतः तज्ञ उपासक असला आणि त्याने प्रतिमाविद्येतील नियमांबरहुकूम मूर्ती तयार केली, तरच ती परिपूर्ण होईल, असा विचार त्यामागे आहे.