हेच सफरचंदाबाबतही! प्रचारामध्ये किवी आणि सफरचंदामधून मिळणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वाच्या अलौकिक गुणांचे वर्णन केले जाते; जे बऱ्याच अंशी खरे आहे. मात्र, प्रत्यक्षात या फळांमधून ‘क’ जीवनसत्त्व ((Vitamin C) किती मिळते? सफरचंदामधून मिळते केवळ एक मि. ग्रॅ.! परदेशी सफरचंदामधून जरा बरे म्हणजे दहा मि. ग्रॅ.! तर किवीमधून मिळते ६३.९६ मि. ग्रॅ. इतके. त्या तुलनेत आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या भारतीय फळांमधून कितीतरी अधिक ‘क’ जीवनसत्त्व मिळते. जसे- विलायती चिंच १०८ मि. ग्रॅ., काजू फळ १८० मि. ग्रॅ., पेरू २१२ मि. ग्रॅ. आणि आवळा तब्बल ६०० मि. ग्रॅ.! रक्तवर्धक लोह, रक्तवाहिन्या व चेतातंतूंना पोषक मॅग्नेशियम, स्नायूंना (पर्यायाने हृदयस्नायूंना) पोषक पोटॅशिअम, रोगप्रतिकारशक्तिवर्धक आणि प्रजननक्षमतासंवर्धक जस्त वगरे अनेक पोषक घटकांची एतद्देशीय फळांशी तुलना करता किवी व परदेशी सफरचंद भारतीय फळांसमोर उभेसुद्धा राहू शकत नाहीत.
भारतीयांच्या आरोग्यसमस्या म्हणजे रक्तक्षय, ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव, प्रथिन ऊर्जेचा अभाव, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती.. ज्यांचे निराकरण करण्यासाठी सफरचंद उपयोगी आहे का? सफरचंद खाऊन भारतीयांच्या आरोग्यसमस्या दूर होणार नसतील तर आपण का म्हणायचं- ‘अॅन अॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे?’ याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ५९ हून अधिक प्रकारची रुचकर व पोषक फळे जिथे उपलब्ध आहेत, त्या भारतीयांना फळांमधून मिळणाऱ्या पोषणाची कमी आहेच कुठे?