मदीनेच्या १० वर्षांच्या अमदानीत मुहंमद राजकीय सत्ताधीश झाले. शासक या नात्याने त्यांनी अनेक कायदे केले व त्यांची अंमलबजावणीही केली. धर्मसंस्थापकाने केलेल्या निवाड्यांमुळे प्रत्येक शासकीय निवाड्याला धार्मिक निवाड्याचे महत्व प्राप्त झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार किंवा खलीफा हेसुद्धा एकाच वेळी धर्मप्रमुख आणि शासनप्रमुख म्हणून काम पाहत. साहजिकच शासकीय कार्यप्रणाली आणि शासकीय निवाड्यांना धर्मशास्त्रात महत्वाचे स्थान मिळाले. इस्लामच्या तत्वज्ञानाप्रमाणे हे सर्व निर्णय परमेश्वरी आज्ञा आणि मार्गदर्शन यांनुसार होते. मदीनेचे राज्य शहरापुरते मर्यादित होते तोवर जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या प्रश्नावर मुहंमदांना आपला स्वत:चा निर्णय देता येत असे. परंतु राज्याचा विस्तार झाल्यानंतर काजींच्या नेमणुका होऊ लागल्या. शासनकर्त्यांप्रमाणे काजीही स्थानिक धर्मप्रमुख झाले व दैनंदिन कज्जांत न्यायनिवाडा करू लागले. परंतु हे काम कुराणाच्यामार्गदर्शनाबरहुकूम करणे जवळपास अशक्य होते. कारण कुराणात सर्वसाधारण मार्गदर्शन होते. प्रत्येक नव्या प्रश्नाचा निवाडा देण्यासाठी दुसऱ्या परंतु तितक्याच महत्वाच्या मार्गदर्शनाची जरूरी होती. यामुळेच मुहंमदांनी वेळोवेळी ज्या गोष्टी केल्या, जे निवाडे दिले, जी मते व्यक्त केली त्यांच्या आधारे निवाडे देण्याची पद्धती सुरू झाली.इस्लामी धर्मशास्त्राची सुरुवात कुराणाचे विश्लेषण तसेच मुहंमदांच्या आठवणी आणि आख्यायिका यांचा संग्रह करण्याच्या कार्यापासून होते. परंतु जसजसा काळ उलटत गेला, तसतसे आठवणी आणि आख्यायिकांचे पेवच फुटल्यासारखे झाले. त्यामुळे प्रत्येक आठवणीसाठी योग्य पुरावा आहे की नाही, याची छाननी सुरू झाली. शेवटी मुहंमदांच्या मृत्यूनंतर सु. २५० वर्षांनी त्यांच्या आठवणींचे संग्रह सहा वेगवेगळ्या सुन्नी पंडितांनी तयार केले. या प्रत्येक संग्रहाला अधिकृत संग्रह म्हणून मान्यताही मिळाली. हे संग्रह (हदीस) धर्मशास्त्र आणि कायदा या दोहोंसही फार मोलाचे ठरले. शिया व इतर पंथांच्या वेगवेगळ्या हदीस असतात.श्रेष्ठ कायदेपंडितांनी विशिष्ट प्रश्नांमध्ये निवाडा देण्याच्या बाबतीत स्थानिक काजींना मार्गदर्शन केले. त्यांच्यात कोणत्याही मुद्यावर एकमत झाले (इज्मा) तर त्या निवाड्याला आधारभूत मानण्यात येई. परंतु हे कायदेपंडित एकत्र बसून निर्णय घेत नसत. कोणतरी श्रेष्ठ व्यक्ती आपला निर्णय देत असे. त्यानंतर इतर कायदेपंडितांनीही तशाच प्रकारचा निवाडा देण्यास सुरुवात केली, की या निवाड्याला अधिकृत स्वरूप येऊ लागे.कुराण, हदीस आणि श्रेष्ठ कायदातज्ञ यांच्या एकवाक्यता, या तीन कसोट्यांवर बऱ्याच प्रश्नांबाबत निर्णय घेता येत असे. तरीसुद्धा काही प्रश्न गुंतागुंतीचे असल्यामुळे निर्णय देण्यास अडचण येऊ लागली. तेव्हा काही पंडितांनी सारासारविवेकाने स्वत:च योग्य तो निर्णय घेण्यास सुरुवात झाली. कारण या प्रश्नांबाबत कुराण, ]हदीस आणि इज्मा (पंडितांचे मतैक्य) यांपासून काही मार्गदर्शन मिळत नसे. परंतु या स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या प्रश्नावर (इज्तिहाद) खूप वादळ माजले. त्यातून शाफी या पंडिताने असा मार्ग काढला, की पूर्वीच्या सर्वमान्य निर्णय घेण्यात आलेल्या प्रश्नाशी गुंतागुंतीच्या किंवा नवीनच उद्भवलेल्या प्रश्नाचे काही बाबींतत जरी साम्य आढळले, तरी या समानतेच्या आधारावर (किया) साधकबाधकतेचा विचार करून निर्णय घ्यावेत. याशिवाय अरबस्तानच्या बाहेर ठिकठिकाणी पूर्वीपासून चालत आलेल्या चालीरीतींना धरून निर्णय घेण्याच्या बाबतीतही मुस्लिम पंडितांत बरीच एकवाक्यता झाली आणि इस्लामी कायदा किंवा ‘शरीयत’ उन्नत झाला.अशा रीतीने कुराण, हदीस, इज्मा, किया आणि स्थानिक रीतिरिवाज यांच्या आधाराने अगणित प्रश्नांवर अकमत झाल्यावर, ‘हिदायत’ नावाचे धर्मशास्त्राचे आणि कायद्यासंबंधीचे ग्रंथ निर्माण झाले. विलक्षण बुद्धिमान आणि मान्यवर पंडितांचे काहीजण अनुयायी झाले. हे पंडित म्हणजे अबू हनीफा, मलिक इब्न अनास, मुहंमद शाफी, इब्न हनबाल इत्यादी. त्यांच्या चार वेगळ्या शाखा सुरू झाल्या (हनफी, मालिकी, शाफी आणि हनबाली). हनफी शाखेचे अनुयायी तुर्कस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या देशांत आहेत. मालिकी शाखा अरबस्तानचा काही भाग आणि उत्तर आफ्रिकी देशांत आहे. दक्षिण अरबस्तान, पूर्व आफ्रिका, भारताचा पश्चिम किनारा, मलेशिया आणि इंडोनेशिया भागांतील मुसलमान शाफी शाखेचे आहेत. हनबाली शाखेचे अनुयायी फारच थोडे आहेत. ते प्रामुख्याने मध्य अरबस्तानात आढळतात.जवळजवळ ७५ टक्के मुसलमान सुन्नी पंथाचे आहेत. वर सांगितलेल्या चार शाखा या सुन्नी मुसलमानांच्या शाखा आहेत. यांशिवाय शिया आणि इतर उपपंथांच्या धर्मशास्त्राच्या आणि कायदेशास्त्राच्या स्वतंत्र शाखा आहेत.मध्ययुगीन मुस्लिम समाजाच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील जवळजवळ प्रत्येक प्रश्नावर हिदायत ग्रंथांमधून अधिकृत निर्णय दिलेले सापडतात. यावरून हे ग्रंथ किती मोठे आणि किती काळजीपूर्वक तयार केले आहेत याची कल्पना येईल. परंतु आधुनिक युगातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्रांतीमुळे या ग्रंथांतील ईश्वरी मार्गदर्शन मानवजीविताच्या अंतापर्यंत स्थलकालांमुळेही न बदलणारे आहे, असा आग्रह धरणाऱ्या सनातनी मुसलमानांना एक मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि आता बदललेल्या परिस्थितीशी कितपत मिळतेजुळते घ्यावे हा त्यांच्यापुढे मोठाच प्रश्न आहे.