‘दिलावर!’

‘काय फातमा?’

‘सोड हो तुझे फंद. तू मला रडवतोस. तुझ्यासाठी मी प्रार्थना करीत असते.’

‘परंतु मी काय केले वाईट?’

‘ही चैन सोड. चैनीसाठी तुला पैसा पुरा पडत नाही. तू पैशासाठी खोटेनाटे करू लागशील. इज्जत घालवून बसशील. माझे ऐक. माझे स्त्रीधनही तुला दिले. तुझ्यासाठी मी भिकारी झाल्ये.’

‘तुला आता मी श्रीमंत करीन. पाच हजार रूपये तुला मी आणून देईन.’ तुझे पाच हजार मी खर्च केले, होय ना?’

‘दिलावर, माझे म्हणजे तुझेच हो. माझे द्यायला नकोत परंतु; परंतु चैन कमी कर. आपण गरिबीने राहू, परंतु अब्रूने राहू. कोठून रे आणणार आहेस पाच हजार? जुगार खेळून? दरोडा घालून?’

‘मिळणार आहेत! बघ एक दिवस. तुझ्यासमोर आणून रास ओतीन. हे काय करते आहेस?’

‘माझ्यावर प्रेम करणा-याला स्वेटर.’

‘कोण करते तुझ्यावर प्रेम?’

‘तूच सांग.’

‘मी. होय ना? तुला हे कोणी शिकवले करायला?’

‘माझ्या एका मैत्रिणीने.’

‘काय तिचे नाव?’

‘तिचे नाव चित्रा. तिनेच ते रामायण मला दिले. प्रेमाची भेट. मला रामायण आवडते. एकपत्नी, एकवचनी राम आणि सीतादेवी तर केवळ सत्वमूर्ती!’

‘कोठे आहे तुझी चित्रा?’

‘माझ्या हृदयात आहे.’’

‘तू पत्र नाही पाठवीत तिला?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel