‘परंतु एकदा पाहू दे ती मुलगी.’

‘मुलगी म्हणजे रत्न आहे. मला तिची दया येते. खरोखरच गोड आहे ती मुलगी.’

‘तो गुंड व ते गि-हाईक चित्राच्या खोलीत आले. चित्रा घाबरली.

‘सोडा हो मला. तुम्ही का मला त्यांना विकणार?’

‘हो.’

‘अरेरे. मी का बाजारी माल?’

‘पोटासाठी. सारे पोटासाठी!’

‘हे तर श्रीमंत दिसतात. हेही का पोटासाठी मला विकत घेणार?’

‘माझ्या चैनासाठी तुला विकत घेणार आहे.’ ते गि-हाईक म्हणाले

‘तुम्ही मुसलमान दिसता, खरोखरच का मुसलमान वाईट असतात?’

‘आम्हाला बोलायला वेळ नाही.’

ते दोघे गेले. सौदा ठरला. रात्रीच्या वेळेस एक मोटार आली. चित्राच्या तोंडात बोळा कोंबण्यात आला. तिच्या तोंडावर बुरखा घालण्यात आला. तिला खाली नेण्यात आले. मोटारीत घालण्यात आले. गेली मोटार.

कोठे गेली चित्रा? पुढे काय झाले तिचे?

त्या मुसलमानाचे खरे नाव होते दिलावर; परंतु त्याने खोटे नाव घेतले होते. आपण त्याला दिलावर म्हणूनच ओळखू. कोण हा दिलावर?

हा दिलावर फातमाचा नवरा. दिलावर उधळ्या होता. त्याला नेहमी पैशांची टंचाई असे. फातमा त्याला बोले; परंतु त्याचा खर्च कमी होत नसे. त्याला डझनवारी कपडे लागत. आज ही टोपी घाली, उद्या दुसरी. आज गोंड्याची तर उद्या फेझ. आज हा सूट, उद्या तो. अत्तरांचा घमघमाट असायचा. मित्रांना हॉटेलांतून खाने द्यायचा. उदार मिरवायचा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel