भीष्म शरपंजरी पडल्यानंतर ११ व्या दिवशी कर्णाच्या सांगण्यावरून द्रोणाचार्य सेनापती झाले. दुर्योधन आणि शकुनी द्रोणांना सांगतात की जर त्यांनी युधिष्ठिराला बंदी बनवले तर युद्ध आपोआपच संपेल. तेव्हा जेव्हा दिवस अखेर द्रोणांनी युधिष्ठिराला युद्धात पराभूत केले आणि त्याला बंदी बनवण्यास म्हणून पुढे जाऊ लागले तेव्हा अर्जुनाने बाणांचा वर्षाव करून त्यांना रोखले. नकुल, युधिष्ठिराच्या बरोबर होता आणि अर्जुनही युधिष्ठिराच्या सोबत आला. त्यामुळे कौरव युधिष्ठिराला पकडू शकले नाहीत.
परंतु द्रोणांची वाढत चाललेली संहारक शक्ती बघून पांडवांच्या पक्षात दहशत पसरली होती. त्या पिता - पुत्राने मिळून महाभारतात पांडवांचा पराभव निश्चित केल्यात जमा होता. पांडवांची ही अवस्था बघून श्रीकृष्णाने युधिष्ठिराला कपटाचा आधार घेण्यास सांगितले. या योजनेच्या अंतर्गत युद्धात अशी बातमी पसरवण्यात येणार होती की "अश्वत्थामा मारला गेला." परंतु युधिष्ठीर खोटे बोलण्याला तयार नव्हता. तेव्हा मग अवंतिराज याच्या अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा भीमाच्या हातून वध करण्यात आला. त्यानंतर युद्धात अशी आवई उठवण्यात आली की अश्वत्थामा मारला गेला.
जेव्हा गुरु द्रोणाचार्यांनी धर्मराज युधिष्ठिराला अश्वत्थामाच्या बाबतीतले सत्य विचारले तेव्हा युधिष्ठिराने सांगितले कि, "अश्वत्थामा मारला गेला, परंतु हत्ती", त्याच वेळी बरोबर श्रीकृष्णाने शंख वाजवला, ज्याच्यामुळे द्रोणाचार्यांना शेवटचे शब्द 'परंतु हत्ती' ऐकूच गेले नाहीत. त्यांना वाटले की आपला पुत्र मारला गेला. त्यांनी त्याच वेळी शस्त्र खाली ठेवले आणि युद्धभूमीवरच डोळे मिटून घेतले आणि शोक करू लागले.
हीच संधी होती, आणि द्रोणाचार्य निःशस्त्र असलेली ती संधी साधून द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्नने तलवारीने त्यांचे मस्तक उडवले. ही बातमी अश्वत्थामासाठी भयंकर स्वरुपात दुःखदायक होती. आपल्या पित्याची कपटाने झालेली हत्या बघून अश्वत्थामाने युद्धभूमीचे सर्व नीतीनियम गुंडाळून बाजूला ठेवले.