हिरी म्हणाली, 'आज दिवाळी, परंतु एकही दिवली बाहेर लावता येत नाही.'

माणकी म्हणाली, 'वास्तविक दिवाळीच्या दिवशी हजारो पणत्या लागायच्या; परंतु आज आपला काळोख.'

रुपी म्हणाली, 'सखू, तू तरी एखादी युक्ती सांग बाहेर दिवे लावायची.'

सखू म्हणाली, 'आपल्या घरातील सारे कंदील आपण बाहेर टांगू या. ते वार्‍यात थोडे तरी टिकतील आणि घरात पणत्या लावू. दारे घेऊ लावून. म्हणजे त्या घरात टिकतील. बाहेर प्रकाश व आतही प्रकाश. नाही का?'

माणकी म्हणाली, 'सखू, तुला कसं सुचतं? आम्ही शाळेत जातो, परंतु आम्हाला सुचत नाही. आमच्या डोक्यात उजेड नाही, तर बाहेर काय पडणार?'

सखूने सांगितले त्याप्रमाणे करण्यात आले. घरातील सारे कंदील बाहेर लावण्यात आले. बाहेर थोडा उजेड झाला. आकाशात लख्खकन् वीज चमकली. त्या मिणमिण कंदिलांना ती वीज का हसली? आकाशातील विजे! हस, खुशाल हस. तुझा प्रकाश झगमगीत असला तरी त्याचा काय उपयोग? त्याने डोळे मात्र दिपून जातात. या कंदिलांचा प्रकाश सौम्य असला तरी त्याने रस्ता दिसतो, पाऊल कोठे टाकावे ते कळते.

पाऊस अद्याप थांबला नव्हता, पडतच होता. त्या तिन्ही मुलींचे आईबाप अद्याप परतले नव्हते. त्या मुलींना भुका लागल्या.

रुपी म्हणाली, 'सखू, आईबाबा केव्हा येणार? मला तर लागली आहे भूक. वाढतेस आम्हाला तू? वाढ फराळाचं.'

हिरी म्हणाली, 'खाऊ या काही तरी.'

माणकी म्हणाली, 'चला आपण बसू. सखू, वाढ तू आम्हाला.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel