'आई, हल्ली तार पोचायला उशीर लागतो.' तो म्हणाला.

'बरं, येऊ दे उत्तार.' ती म्हणाली.

वामन व हरी हयांच्याकडून पंधरा रूपये आले. मनीऑर्डरीच्या कुपनावर 'येता येणार नाही.' इतकेच शब्द होते. कशाला ते येतील? सुखाचा जीव दु:खात घालायला कोण येईल? आईजवळ येणे म्हणजे साथीत येणे, मरणाजवळ येणे. आई म्हातारीच होती. मेली तर सुटेल असे त्या भावांस वाटले असेल.

गोपाळची आई प्राण कंठी धरून होती. चार दिवस झाले.

'आलं का रे उत्तर तारेचं?' तिने विचारले.

'आई, ते काही येत नाहीत. पैसे पाठवले आहेत. त्यांनी.' तो म्हणाला.

'बरं हो. त्यांना इकडं बोलावणंच चूक होतं. खरं ना?' ती म्हणाली.

नंतर थोडया वेळाने ती म्हणाली, 'गोपाळ, बाळ इकडे ये.' गोपाळ आईच्या अगदी जवळ गेला ती म्हणाली, 'तुझं डोकं जरा खाली कर.' त्याने आपले डोके खाली वाकवले. त्याने आपले तोंड आईच्या तोंडाजवळ नेले. आईने प्रेम, वत्सलता, मंगलता हयांनी भरलेला हात  गोपाळच्या तोंडावरून व डोक्यावरून फिरवला. मग ती म्हणाली, 'देव माझ्या गोपाळला काही कमी पडू देणार नाही.' नंतर ती थांबली व पुन्हा म्हणाली, 'माझ्या तोंडात थोडी गंगा घाल. तोंडावर तुळशीचं पान ठेव.' गोपाळ गहिवरून उठला. त्याने देवातील गंगा आणून आईच्या तोंडात घातली. तिच्या ओठांवर तुळशीचे पान ठेवून तो गीता म्हणू लागला. गीता ऐकता ऐकता गोपाळची आई देवाकडे गेली. गोपाळला सारे जग शून्य झाले. ज्यासाठी तो जगत होता, जगला होता, ते त्याच्याजवळून कठोर काळाने हिरावून नेले.

नदीच्या तीरावर गोपाळच्या आईच्या देहाला अग्नी देण्यात आला. गोपाळ मात्र वेडा झाला. तो नदीच्या तीरावर बसे व येणाराजाणारास विचारी, 'कुठं आहे माझी आई? वामन व हरीकडे गेली? छे! ते नेणार नाहीत. मला कंटाळून का ती कुठं गेली? छे! ती मला कधीही कंटाळणार नाही. मग कुठं गेली आई? सांगा, लौकर सांगा.' तो पक्ष्यांना म्हणे, 'दाखवा रे माझी आई.' तो झाडांना म्हणे, 'द्या रे माझी आई. तुमच्यासारखीच ती छाया करणारी होती.'

परंतु एके दिवशी गोपाळही अदृश्य झाला. कोठे गेला तो? या जगात आईला शोधून ती सापडली नाही म्हणून दुसर्‍या जगात का तो शोधायला गेला? कोणास माहीत! वार्‍याला माहीत असेल; त्या नदीला माहीत असेल; पलीकडील दरीला माहीत असेल; परंतु गोपाळ पुन्हा कोणाच्या नजरेला पडला नाही एवढे मात्र खरे.

त्या गावचे लोक सांगतात की त्या नदीतीरावर अजूनही कधी कधी 'कुठं आहे माझी आई, कुठं गेली माझी आई?' असे शब्द कानांवर येतात!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel