तिसऱ्या दिवशी देखील पाऊस मुसळधार कोसळत होता त्यामुळे नाईलाजास्तव रामला त्यांच्याकडेच थांबावे लागले.

शची म्हणाली,” हे बरंच झालं कि पाऊस थांबला नाही. आणखी चांगला ४-५ दिवस पडू देत”

“का?” राम

“आपला विषय काल अर्धवट राहिला होता ना आणि तुम्ही इतके लगेच निघून गेलात तर तुमची आठवण येत राहिलं” शची मंद स्मित करत म्हणाली आणि खरंच पुढचे ४-५ दिवस पाऊस थांबलाच नाही.

आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशात पाणी साठले होते. रामही यामुळे सुखावला होता. त्या निमित्ताने का असेना रामला त्या बुद्धिमान, सौंदर्यवतीचा सहवास लाभला होता. अशी संधी पुन्हा मिळेल नाही मिळेल कोण जाणे असे त्याला वाटत होते. जितका वेळ तो तिकडे होता त्या दिवसांत शचीने रामला आग्रह करून करून निरनिराळी पक्वान्न खाऊ घातली. जेवण झाल्यावर पाणी पिण्याची रामला सवय नव्हती यावर शचीला हसू आले.

“तसं तर नेहमी मी जेवण झाल्यावर तीन चार तासांनी पाणी पितो. पण आज तेही शक्य नाही कारण इतकं जास्त खाणं झालं आहे कि घोटभर पाणी सुद्धा माझ्या पोटात मावेल असं मला वाटत नाही.”

यावर शची जोरजोरात हसू लागली. यावर राम देखील हसू लागला. शची चांगल्या मन:स्थितीत आहे हे लक्षात येताच संधीचा फायदा घेऊन रामने तिला विचारलेच,

“वाईट वाटून घेऊ नका पण तुमचे यजमान गांजा पितात का?”

शची हसतच होती “ नाही नाही.गांजा नाही. पण अफू खूप खातात. ती पण दिवसातून दोन तीन वेळा..”

“ अफू खाल्ल्यामुळे माणसाची ढेरी सुटते का?”

“ नाही हो. पण रोज अडीच शेर दुध पितात त्यामुळे पोट सुटलंय. नुसते स्टेशनच्या ऑफिसात बसून असतात. व्यायाम करत नाहीत. त्यामुळे जाडी वाढणं साहजिकच आहे ना?”

शचीच्या उत्तरात कोणताही विषाद जाणवत नव्हता. उलट ती एका समाधानी पतिव्रता स्त्रीचे एक मूर्तिमंत उदाहरण भासत होती.
 
या चार दिवसात राम आणि शची यांची चांगली मैत्री झाली होती त्यामुळे राम तिला शची देवी या नावानेच हाक मारू लागला होता. झालं असं कि त्यांच्या निरनिराळ्या विषयांवरील, साहित्यावरील गप्पा गोष्टी सुरु असताना रामने तिला विचारलं,

“ मी तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारू?”

“ तुम्हाला आवडेल त्या...” ती सहजपणे म्हणाली.

“ तुम्हाला राग तर येणार नाही न?”

“ नाही मला विश्वास आहे कि तुम्ही मला राग येईल असे आजीबात काही बोलणार नाही”

“ इतका विश्वास? असं मला तुम्ही किती ओळखता?”

“ आम्हा बायकांना चांगल्या वाईटाची पारख पुरुषांपेक्षा जास्त असते.”

“अच्छा मग अशा बुद्धिमान स्त्रीला मी ताई म्हणालो तर चालेल का?

लगेचच उत्तर मिळाले “ आजीबात नाही. मी तुमची बहिण होण्याच्या योग्यतेची नाही. आणि मी तुमच्यापेक्षा वयाने देखील मोठी नाही. त्यामुळे तुम्ही मला माझ्या नावाने हाक मारलीत तरी चालेल.”

रामला संकोच वाटला, “ नाही..नको थेट एकेरी नावाने हाक मारणे योग्य वाटत नाही. इकडे असं एकेरी नावाने तुम्हाला कोण हाक मारते?”

“ अशी एकच व्यक्ती आहे.”

“ कोण?”

“ माझे यजमान” हे उत्तर शचीने दिले आणि राम अत्यंत अस्वस्थ झाला. त्याच्या काळजाला क्षणभर चटका बसल्यागत झाले. तो शचीच्या संपर्कात वास्तविक तिच्या नवऱ्यामुळेच आला होता. पण का कोण जाणे त्याचे मन सिद्धरामय्या याचे अस्तित्त्व मान्य करायला तयारच नव्हते.

“एक पती आपल्या पत्नीला नावानेच हाक मारतो नाही का!”

“ हो पण इतरही नावाने हाक मारू शकतात की...”

हे ऐकताच राम पुन्हा थोडा गोंधळात पडला. त्याच्या डोळ्यासमोर सिद्धरामय्याची विचित्र मूर्ती आली.

“नको. थेट शची नको मी तुम्हाला शचीदेवी म्हणेन”

“देवी??” असे विचारून शची जोरजोरात हसू लागली. जवळपास मिनिटभर हसल्या नंतर शची म्हणाली

“ शची देवी? ठीके! शची देवी तर शची देवी. पण कृपया ताई वगैरे नको.”

आणि त्या दिवसापासून राम शचीला शची देवी म्हणू लागला. शची देवी रोज तिची घरातली कामे आटोपून रामशी गप्पा मारायला बसत असे. तिच्या अनेक कविता मासिके आणि नियतकालिके यात प्रकाशित झाल्या होत्या. राम शचीने एखादी कादंबरी लिहावी यासाठी थोडा आग्रही होता. ते चार पाच दिवस ते जितका वेळ एकत्र होते त्यांनी विविध विषयांवर चर्चा केल्या. चर्चेच्या विषयांमध्ये पुरुषाचे प्रेम, स्त्रीचे प्रेम, प्रेमातील त्याग आणि बलिदान अशा विषयांचा अंतर्भाव होता. अनेक वेळा स्वत:चा मुद्दा पटवून देण्यासाठी तिने त्याच्याशी हक्काने वादविवाद देखील केला. त्यावेळेस रामला शचीदेवी त्याची लहान बहिण किंवा वहिनी असल्यासारखे वाटले परंतु त्याने हे तिला चुकुनही बोलून दाखवले नाही.

क्रमश:

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel