ई.स. १९५२
महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमांत प्रदेश. काखोटीला कॅमेरा लटकवून आणि हातात सुटकेस घेऊन सेकंड क्लासच्या रेल्वेच्या डब्यातून जेव्हा रामचंद्र त्या छोट्याशा स्टेशन वर उतरला तेव्हा दुपारचे २ वाजले होते. श्रावण भाद्रपद महिन्याचे दिवस होते. एरवी निळ्याशार दिसणाऱ्या आकाशात काळे करडे ढग दाटून आले होते. रिप रिप पाउस पडत होता. पश्चिमेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे झाडं-वेली डोलत होत्या. स्टेशन मास्टरकडे चौकशी केली तेव्हा कळल कि तिथून उल्लाल गाव साधारण ३०- ३५ मैल दूर आहे आणि रस्ता खडकाळ आहे. तिकडे फक्त बैलगाडी जाऊ शकते आणि प्रवासाचे इतर कोणतेच साधन उपलब्ध नाहीये. ४० तासाच्या खूपच कंटाळवाण्या थकवून टाकणाऱ्या प्रवासामुळे रामचं शरीर पार आंबल्यासारखं वाटत होतं आणि मन थाऱ्यावर नव्हतं.
स्टेशन मास्तर एक कर्नाटकी गृहस्थ होते. त्यांचे होते नाव सिद्धरामय्या. वय ४५ ते ५० साधारण गोरा परंतु जागरण आणि वयोमानानुसार रापलेला लालसर चेहरा, सुटलेली ढेरी, कानावर वाढलेले वेडेवाकडे केस आणि चिवड्याच्या मधोमध लाडू ठेवल्यासारखे मधोमध टक्कल, गांजा प्यायल्याप्रमाणे रक्तासारखे लाल लाल डोळे, जेमतेम पाच सव्वापाच फुट उंची. थोडक्यात सिद्धरामय्या एक हास्यास्पद व्यक्तिमत्त्व होतं. थकव्यामुळे रामचंद्रचा झालेला अवतार पाहून कदाचित त्यांना त्याची दया आली असावी. त्यांनी त्याची रात्रीची वस्तीची व्यवस्था रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या त्यांच्या एका छोट्याशा क्वार्टरमध्ये केली.
मग रात्री गरमागरम सांबार आणि भात जेवून तो झोपला तो थेट सकाळी त्याचे डोळे उघडले. परंतु जेव्हा सकाळी निघायची तयारी केली तेव्हा आकाशात अचानक ढग दाटून आले आणि काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्या दिवशी दिवसभर पाऊस अविश्रांतपणे बरसत राहिला. थांबायचं नाव म्हणून घेत नव्हता.
सिद्धरामय्या म्हणाले,
“ इकडे असाच पाऊस असतो. एकदा का सुरु झाला कि थांबणं कठीण!”
नाईलाजास्तव रामला पुन्हा त्यांच्याचकडे थांबावे लागले.
क्रमश: