२.
पंचस्कंध, अर्हत्पद व निर्वाण

पंचस्कंध:-  रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान या पांच पदार्थांना पंचस्कंध असें म्हणतात.

पृथ्वी, आप, तेज आणि वायु या चार महाभूतांना आणि त्यांजपासून उत्पन्न झालेल्या पदार्थांनां रूपस्कंध असें म्हणतात.

सुखकारक वेदना, दु:खकारक वेदना, आणि उपेक्षा वेदना या तीन प्रकारच्या वेदनाला वेदनास्कंध म्हणतात.

घर, झाड, गावं, स्त्री, पुरुष इत्यादिविषयक कल्पनांना संज्ञास्कंध म्हणतात. घर, झाड इत्यादि पदार्थ परमार्थत: वर सांगितलेल्या चार महाभूतांचेच बनलेले आहेत;  म्हणून ते परस्परांपासून भिन्न नाहींत, असें असतां संज्ञास्कंधाच्या योगें त्यांचा निराळेपणा आमच्या लक्षात येतो. ही जी पदार्थांना निरनिराळीं नावें देण्याची मनाची शक्ति, तिलाच संज्ञास्कंध म्हणतात.

संस्कार म्हणजे मानसिक संस्कार. यांचे कुशल, अकुशल आणि अव्याकृत असे तीन प्रकार आहेत. दुसर्यास मदत करण्याची इच्छा, प्रेम, जागृति इत्यादि संस्कार कुशल जाणावे. लोभ, द्वेष, माया, मत्सर, आळस इत्यादि संस्कार अकुशल जाणावे. अकुशलहि नव्हेत आणि कुशलहि नव्हेत अशा संस्थांना अव्याकृत म्हणतात. उदाहरणार्थ, कांहीं पदार्थांची आवड असणें, कांहींची नावड असणें इत्यादि संस्कार पूर्वकर्मांचे फलभूत असल्यामुळें अकुशल किंवा कुशल यांत त्यांची गणना होत नाहीं. त्यांना अव्याकृत असेंच म्हटले पाहिजे.

विज्ञान म्हणजे जाणणें, संक्षेपानें सांगावयाचें म्हटलें म्हणजे विज्ञानें सहा आहेत. चक्षुविज्ञान, श्रोत्रविज्ञान, घ्राणविज्ञान, जिव्हाविज्ञान, कायविज्ञान व मनोविज्ञान. या सहा विज्ञानांच्या समुदायाला विज्ञानस्कंध असें म्हणतात. विज्ञानाला बौद्ध ग्रंथांत चित्त म्हणतात. चित्ताला कधीं कधीं मन हा शब्द लावितात. बौद्धाच्या मतें मन हे अमूर्त आहे. तें अणु प्रमाण नाहीं, म्हणून तर्कसंग्रहादि न्यायग्रंथांत सांगितलेंले मन व बौद्ध ग्रंथात सांगितलेलें मन हीं एक नव्हेत हें लक्ष्यांत ठेविलें पाहिजे.

हे पांच स्कंध वासनायुक्त असले म्हणजे त्यांना उपादानस्कंध असें म्हणतात. यांच्या योगें पुनर्जन्म होतो. या जन्मी कुशलाकुशल कर्म केलें म्हणजे त्याच्या जोरावर दुस-या जन्मीं या पांच उपादानस्कंधांचा प्रादुर्भाव होतो. जेव्हां वासनेचा समूळ उच्छेद होतो, तेव्हां या स्कंधांनां उपादानस्कंध न म्हणतां नुसते स्कंध म्हणतात. कारण त्यांच्या योगें पुनर्जन्म होण्याचा संभव नसतो. अर्हत्पद प्राप्त झाल्यावर वासनेचा समूळ उच्छेद होतो. अर्हत्पदाप्रत पावलेल्या व्यक्तींचे पंचस्कंध त्यांच्या मरणापर्यंत राहतात. अकुशल संस्कार मात्र अर्हत्पद मिळाल्याबरोबर सर्वथैव नष्ट होतात. मरणसमयीं अर्हतांच्या पंचस्कंधांचा निर्वाणांत लय होतो. अर्थात त्यांजपासून नूतन पंचस्कंध उदय पावत नाहींत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel