त्याचे डोळे नुकतेच उघडले होते. त्या फुलपाखराला अगदी आताच नवीन नवीन पंख आले होते. आणि डोळे उघडताच त्याने त्याचे पंख रंगहीन आणि कुरूप असल्याचे पाहिले. त्याच्या पंखांवर काळपट सोडून आजीबात इतर कोणता रंग नव्हता आणि ते पाहून ते अस्वस्थ झाले. त्याने उडण्याची आशाच सोडून दिली. असही उडून ते काय करणार होते. त्याचं मन खूपच उदास झालं होतं. आयुष्यात रंगच नसेल तर कोणाच्या मनाला औदासिन्य येणार नाही.

इतर सर्व रंगीबेरंगी फुलपाखरे पाहून त्याला खूप वाईट वाटले. दु:खी मनाने ते एका पानावर बसून विचार करत बसले,  त्याचे पंखही इतर फुलपाखराप्रमाणे रंगीबेरंगी असते तर तेही मोकळ्या आकाशात उडून त्याचे रंगीबेरंगी पंख फडफडवून लाजत मुरडत फिरले असते. ते त्याच्या विचारांच्या रंगीबेरंगी दुनियेत कुठेतरी हरवून गेले होते.

इतक्यात एक जाडा भरडा भ्रमर तिकडे उडत उडत आला आणि त्याला त्रास देऊ लागला. त्याला उडण्याचा आग्रह करु लागला. मग ते फुलपाखरू रागावले त्याने त्याच्याशी चक्क भांडण सुरु केले. ते त्याचे पंख रंगहीन आणि काळे आहेत विसरून गेले होते आणि उलट त्याने भुंग्याला काळ्या, कुरूप, विद्रूप पंखाच्या म्हणून हिणवले. पण मग त्याला त्याची चूक कळली आणि मग ते काही न बोलता शांत झाले. आता त्याला खूप अपराधी वाटत होते.

फुलपाखरू गप्प आणि उदास आहे हे पाहून भुंग्याने त्याच्या मनातील भाव ओळखले आणि तो म्हणाला, “होय आहे मी विद्रूप आणि काळा. पण मी उडतो. फुलांचा सुंगध घेतो, मध पितो. मी माझे आयुष्य मजेत जगतो....तुझ्यासारखा एकलकोंडा दु:खी चेहरा करून बसून राहत नाही. नुसतं बसून राहणं आपल्या आयुष्याचं ध्येय असत तर देवाने आपल्याला हे दोन पंख दिलेच नसते. ”

भुंग्याचे हे शब्द ऐकून फुलपाखराच्या मनात एक आगळीच चेतना स्फुरली, त्याने त्याचे पंख पसरले आणि आभाळाकडे झेप घेतली. ते उडत उडत पुढे पुढे गेले. उंच उंच गेले. त्याने निळे आकाश पहिले, रंगीबेरंगी फुले पाहिली, सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहिले, हिरवीगार आणि पिवळी शेतं पहिली. मग उडत असताना एका तलावाजवळ आले त्यात त्याने आपले प्रतीबिंब पहिले. तेव्हा त्याला दिसले कि सूर्याची किरणे त्याच्या पंखांवर पडली होती आणि काळ्या पंखांवर गडद निळे ठिपके होते. आपल्याही पंखांमध्ये रंग आहेत हे पाहताच ते प्रचंड खुश झाले. उडत उडत ते सुंदर फुलातील मकरंद वेचू लागले.

आपले जीवन देखील आपल्याला हीच शिकवण देते. दु:ख असो व सुख असो जीवन आनंदात जगा. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद फुलातील मकरंदाप्रमाणे वेचायला शिका. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल आयुष्य आपल्याला अनेक नवनवीन संधी देत असते. नैराश्य हे अंताचे प्रतिक आहे तर उत्साह हे नव्या सुरवातीचे! भविष्यात कधीही जेव्हा तुमच्या आयुष्यात नैराश्य येईल तेव्हा वेड्या फुलपाखराची आणि भुंग्याची आठवण काढा. त्यांची हि गोष्ट तुम्हाला जीवन जगण्याची कला शिकवेल. उत्साही, आनंदी आणि सकारात्मक राहण्यासाठी तुम्ही काय करता ते आम्हाला कमेंट करून सांगा.    

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel