( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)  

कृष्णाच्या,व्यवस्थापकाच्या व स्वागतिकेच्या,मुलाखतीतून पुढील गोष्ट स्पष्ट झाली.

दोघांच्याही परस्परांशी  असलेल्या वर्तनावरून त्या दोघांतील संबंध विशेष प्रेमाचे नव्हते.

*संबंध सामान्य होते.ती हनीमूनला निश्चितच आलेली नव्हती.मधुचंद्रासाठी आलेली जोडपी जशी एकमेकात हरवलेली असतात.एकमेकांजवळ गुलुगुलू बोलत असतात.तसे हे जोडपे अजिबात नव्हते.

इन्स्पेक्टर श्रीकांतनी प्रथम रोहिणीने पोलिसांसाठी लिहिलेला लखोटा उघडून वाचावा असे ठरविले आणि  तो लखोटा उघडला.

रोहिणीने पाेलिसांना पुढीलप्रमाणे पत्र लिहिले होते.

पाेलिस इन्स्पेक्टर यांस. 

मी खाली सही करणार रोहिणी सारंगधर ,सूर्यास्त  कड्यावरून किंवा आणखी एखाद्या कड्यावरून उडी मारून बहुधा जीव देणार आहे.बहुधा असे म्हणते कारण  माझा विचार कदाचित बदलू शकतो.मी कड्यावरून उडी टाकून जीव दिल्यास त्यासाठी माझे पती मनस्वी सारंगधर यांना जबाबदार धरू नये.प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या ते जबाबदार नाहीत.त्यांनी मला ढकलले नाही.तसे ते करू शकणार नाहीत.पोलीस कदाचित त्यांच्यावर संशय घेतील म्हणून मुद्दाम लिहित आहे. 

माझा व मनस्वी यांचा प्रेमविवाह झाला आहे. आमच्यामधील मतभेदांची नंतर जाणीव होऊ लागली.दोन व्यक्तींमध्ये मतभेद जरूर असतात.आणि असणारच.म्हणून त्यांच्यामधील प्रेम कमी होते असे नाही.माझे मनस्वीवर व मनस्वीचे माझ्यावर अजूनही प्रेम आहे.

मला घटस्फोट मान्य नाही.प्रेम मतभेदांवर विजय मिळवील असे माझे मत आहे.तर आमच्यातील मतभेदांवर व त्यामुळे सतत होणाऱ्या भांडणावर  मनस्वीला घटस्फोट हाच एक उपाय दिसत आहे. 

आम्ही इथे या मतभेदांवर चर्चा करण्यासाठीच आलो आहोत.घटस्फोटाबद्दल मतभेद अजूनही कायम आहे.घटस्फोट हाच अंतिम उपाय आहे या मतापासून मनस्वी न ढळल्यास,मी माझ्या जीवनाचा शेवट करणार आहे.म्हणून हा पत्रप्रपंच  

रोहिणी सारंगधर  

अशी शेवटी तिने सही केली होती.  

इन्स्पेक्टर श्रीकांतना एका पोलिसाचा फोन आला होता.कड्यावरून पडून एक बाई मृत्यू पावली. तिचा देह दरीमध्ये आहे.ट्रेकर्सच्यामार्फत आम्ही तो वर काढत आहोत.अशा स्वरुपाचा तो फोन होता.ती बाई रोहिणीच असावी असा अंदाज इन्स्पेक्टर श्रीकांतनी केला.

मनस्वी व रोहिणी यांच्यातील मतभेद कायम राहिल्यामुळे शेवटी रोहिणीने तिच्या जीवनाचा अंत केला असला पाहिजे असे अनुमान निघत होते.

आता इन्स्पेक्टर   श्रीकांतनी रोहिणीने मनस्वीला लिहिलेले पत्र वाचण्यासाठी घेतले. 

प्रिय मनू

तुला पहिल्यांदा पहिल्यापासूनच मी तुझ्यावर प्रेम करू लागले.त्यावेळी तुझी व माझी ओळख नव्हती.ओळख फार उशिरा झाली.तू व मी दोघेही एकच ऑफिसमधे काम करीत होतो.आपले विभाग भिन्न होते.तू अकाऊंट्स सेक्शनला होतास आणि मी जनरल अॅडमिनिस्ट्रेशन विभागात होते.आपले विभाग निरनिराळ्या मजल्यावर होते.कधी कॅन्टीनमध्ये,कधी लिफ्टमध्ये, कधी ट्रेनमध्ये, मी तुला पाहत असे.

माझी मैत्रीण तुझी मैत्रीण होती.त्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला आपण प्रथम एकत्र आलो होतो.तिथे आपली प्रत्यक्ष ओळख झाली.तूही माझ्या प्रेमात पडलास.सर्वांच्या म्हणजेच दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने आपण विवाहबंधनात अडकलो.

सुरुवातीचे कांही महिने केव्हां निघून गेले कळलेच नाही.नंतर परस्परातील भिन्नता लक्षात येऊ लागली.निराळेपणा स्वभाव,सवयी,आवडीनिवडी यामध्ये होता.आपण दोघांनीही परस्परांशी जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न केला.परंतु दुर्दैवाने भांडणे होतच राहिली.मतभेद होतच राहिले.शेवटी त्या मतभेदानी विराट स्वरूप प्राप्त केले.विभक्त झाल्याशिवाय दुसरा कांहीही पर्याय नाही अशा निर्णयावर तू आलास.मी मात्र तुझ्यावर पहिल्यासारखीच जीव ओतून प्रेम करीत राहिले.तुझ्याशी जुळवून घेण्याचा,माझ्या स्वभावाला मुरड घालण्याचा,मी प्रयत्न केला.

आपण हनीमूनला येथेच आलो होतो.तिथे पुन्हा एकदा यावे म्हणजे पूर्व स्मृती जागृत होतील.पूर्वीचा उत्साह व आनंद आपल्यात संचारेल अशी आशा होती.परंतु ती आशा फोल ठरली.येथे घेऊन आज तीन दिवस झाले.शेवटी तू विभक्त होण्याच्या  निर्णयावर ठाम राहिलास.

आज आपण बाहेर जाऊ त्या वेळी मी पुन्हा एकदा तुझे मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहे.मला अजूनही तुझ्यासोबत राहायचे आहे.तुझ्यावर अजूनही मी तितक्याच उत्कटतेने प्रेम करते.तूही माझ्यावर तसाच प्रेम करतोस असे मला वाटते.असे असूनही आपल्यात वादविवाद कां होतात ते कळत नाही.

प्रेम आपल्याला तारून नेईल अशा आशेत मी आहे.तू आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास मला जगण्यात कांही अर्थ वाटत नाही.मी कड्यावरून उडी टाकून माझी जीवनयात्रा संपवणार आहे.तू कुठेही पोलिसांच्या चौकशीत सापडू नयेस म्हणून,आत्महत्येला मला कुणीही प्रवृत्त केले नाही,हा सर्वस्वी माझा निर्णय होता,अशा प्रकारचे पत्र मी हॉटेल व्यवस्थापकाजवळ दिले आहे.योग्यवेळी तो ते पोलिसांना देईल.मी तुला सुखी करू शकले नाही याबद्दल मलाअत्यंत विषाद वाटतो. तुला भविष्यकाळासाठी मनापासून शुभेच्छा. 

अजूनही सर्वस्वी तुझीच

रोहिणी 

पत्र वाचून इन्स्पेक्टर श्रीकांतचे मन विषादाने भरून गेले.असे व्हायला नको होते असा एकच विचार श्रीकांतच्या मनात होता.

श्रीकांतने दोन्ही पत्रे समोर घेऊन पाहिली.व्यवस्थापकाजवळ पोलिसांसाठी दिलेले व दुसरे हॉटेलमधील खोलीत मनस्वीसाठी  टीपॉयवर ठेवलेले.वरवर तरी हस्ताक्षर एकच वाटत होते.तरीही  हस्ताक्षर तज्ज्ञांकडून खात्री करून घेतली पाहिजे असे त्यांचे पोलिसी मन त्यांना सांगत होते.

थोड्या वेळाने त्यांनी मनस्वीने लिहिलेले पत्र वाचण्यास सुरुवात केली.

पत्राला मायना नव्हता. पत्र एकदम सुरू केले होते.

माझ्या डोळ्यांदेखत रोहिणीने कठडय़ावरून उडी टाकली.कुणी तोल जाऊन पडून नये.घसरून किंवा धक्काबुक्की झाल्यामुळे पडू नये.यासाठी कठडा बांधला होता.त्या कठडय़ावर बसून आम्ही बोलत होतो.रोहिणी माझे मन वळवीत होती.आमच्या सुरूवातीच्या प्रेमाचे दिवस स्मरत होती.त्यावेळचा उत्साह, प्रेमाची तीव्रता,ती आठवीत होती.

तिने मला विचारले,

*तुझे माझ्यावर अजूनही खरेच प्रेम आहे ना?*

एक क्षणही विचार न करता मी उत्तरलो,

*अर्थातच तेवढेच उत्कट प्रेम आहे.*

त्यावर तिने विचारले,

*मग प्रेम विजयी कां होत नाही?*

मी तिला म्हटले,

*आपल्या दोघांत प्रेम असले तरी विचारात एवढा फरक आहे की आपण एकत्र जीवन जगू शकत नाही.* 

तिने मला निर्वाणीचे विचारले,

*तुझा घटस्फोटाचा निर्णय वज्रलेप आहे ना?*

मी *होय* म्हणताच क्षणाचाही विचार न करता, वेळ न दवडता, ती कठड्यावर पटकन चढली आणि क्षणार्धात तिने दरीत उडी मारली.

त्यावेळी तिथे कुणीही नव्हते.नाही तर कदाचित मला भरपूर मार पडला असता.निदान पोलीस बोलवून लगेच चौकशी सुरू झाली असती.

ती असे कांही अकस्मात करील असा संशयही मला आला नव्हता.माझे तिच्यावर मनापासून प्रेम होते व अजूनही आहे.तरीही आमचे कां पटत नव्हते ते कळत नाही.ती म्हणत होती त्याप्रमाणे प्रेमाने विसंवादावर विजय मिळवायला हवा होता.परंतु मी तिला निग्रहपूर्वक विभक्त होणेंच इष्ट असे म्हटले.आणि पुढील सर्व घटना घडली.

मी हॉटेलवर खिन्न  उदास मनाने परत आलो.हॉटेल मॅनेजरने मला बाईसाहेब दिसत नाहीत असे म्हटले.त्यावर मी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे असे सांगून वेळ मारून नेली.

मी आता संपूर्णपणे पश्चात्तापदग्ध आहे.रात्री मी जेवलोही नाही.फक्त मिल्क चॉकलेट मागविले.झोपेच्या गोळ्यांची बाटली हॉटेलला लागूनच असलेल्या मेडिकल स्टोअरमधून विकत आणली.मेडिकल स्टोअरमधील विक्रेता,प्रिस्क्रिप्शनशिवाय बाटली  देत नव्हता.इथे शेजारी हॉटेलमध्ये उतरलो आहे असे सांगितल्यावर त्याने ती मला दिली.त्यातील वीस टॅब्लेटसची मी पूड केली.ती मिल्क चॉकलेटच्या ग्लासामध्ये टाकली.चमच्याने अधूनमधून ती ढवळीत आहे.अधूनमधून एक एक घोट घेतही आहे.मला हळूहळू गुंगी येत चालली आहे.पत्र संपले की मी ग्लासमधील सर्व मिल्क चॉकलेट पिणार आहे.

मला रोहिणी बरोबरचे पहिल्या पासूनचे सर्व दिवस आठवत आहेत.तिच्यावरील प्रेमात  मी आकंठ बुडालो होतो आणि अजूनही बुडालेला आहे.तिच्या अंतिम प्रश्नावर मी *होय मला विभक्त व्हायचे आहे* असे कसे म्हणालो तेच कळत नाही.

तिच्यानंतर मलाही आता जगावेसे वाटत नाही.हे पत्र कोणालाही उद्देशून असे लिहिलेले नाही.

सर्व प्रेमिकांना मी असा इशारा देतो की,संसारात भांडणे होतात.भांड्या शेजारी भांडे आले की आवाज होतो.अहंकार किती जपायचा याला मर्यादा आहेत.दुसऱ्याच्या सुखासाठी स्वत:ला अर्पण करण्यात फार आनंद आहे.कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.प्रेमाचा विजय होवो.अशी प्रभू चरणी प्रार्थना करून मी हे पत्र संपवतो. 

इन्स्पेक्टर श्रीकांतनी ग्लासकडे पाहिले.ग्लास संपूर्ण रिकामा होता.तळाला किंचित पांढरा चॉकलेटी साखा बसलेला होता.  

पत्रांखाली सही नव्हती.पत्र मनस्वीनेच लिहिले आहे ना याची खात्री करून घ्यायला पाहिजे असा विचार इन्स्पेक्टर श्रीकांतच्या मनात आला.

त्याना आपल्या पोलिसी संशयी  स्वभावाचे हसू येत होते.

पोलिसांनी सर्व गोष्टींची खात्री करून घेतली.दु:खी अंत:करणाने केस बंद केली.

*वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल, यांनी मोठ्या प्रमाणात कांही दिवस या सर्व घटनेला प्रसिद्धी दिली.*

*डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, समाजसुधारक, राजकारणी, समाजशास्त्रज्ञ इत्यादिकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. 

*थोडय़ाच दिवसांत  दुसरे विषय सर्वांना मिळाले.*

*काळाचा ओघ सुरूच राहिला.*

*दोन जीव बहुधा  अहंकारापायी हकनाक मृत्यू पावले.*

(समाप्त)

२८/१०/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel