(ही कथा काल्पनिक आहे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा) 

कमल व सुहास या दोघी सख्ख्या बहिणी होत्या.कमल मोठी व सुहास लहान दोघींमध्ये केवळ सहा तासांचे अंतर होते.दोघी बरोबरच वाढल्या, शाळेत गेल्या, कॉलेजमध्ये गेल्या आणि नोकरीलाही लागल्या. दोघी जरी बरोबरीच्या असल्या तरी सुद्धा सुहास कमलाला ताई म्हणून हाक मारीत असे .लहानपणीतरी ताई हा सुहासचा आदर्श होता. ताई कशी बोलते, ती कशी हसते, ती कशी पोशाख करते ,ती कशी चालते ,इकडे सुहासचे नेहमी लक्ष असे.सुहास नेहमी ताईची कॉपी करण्याचा प्रयत्न करीत असे .दोघी दिसायलाही सारख्या होत्या .मुले जुळी असली म्हणजे ती एकसारखी एक दिसतातच असे नाही.केव्हा केव्हा त्यांच्यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर असू शकते.  दोघी लहान असताना आई हौशीने त्यांना एकसारखा पोशाख शिवत किंवा विकत घेत असे.त्यामुळे वर्गात बाईंचा कमल व सुहास यांच्यामध्ये गोंधळ उडत असे.नाही म्हणायला त्यांच्यामध्ये थोडासा फरक होता .कमल गोरी होती तर सुहास किंचित कमी गोरी होती .दोघींची वाढ जरी सारखीच होत असली तरी सुहास किंचित उंच होती.नेहमी पाहणाऱ्यालासुद्धा हा फरक लक्षात येत असेच असे नाही .काही जणांच्या तो लक्षात येई तर काही जणांच्या तो लक्षात येत नसे. तसा दोघींच्या आवाजातही किंचित फरक होता .सुहासचा आवाज किंचित जाड होता .लक्ष देऊन ऐकले तरच हा फरक लक्षात येत असे .चटकन पाहतांना कमल कोण व सुहास कोण ते लक्षात येत नसे.पाठी मागून पाहताना दोघींमधील फरक मुळीच लक्षात येत नसे.

दोघी मोठ्या होत गेल्या तेव्हा त्यांना आपली वैयक्तिक ओळख  (इंडिव्हिजुअल आयडेंटिटी) स्वतंत्र असावी असे वाटू लागले .त्यांच्या केसांचे वळण पोषाख यांमध्ये फरक दिसू लागला .दोघी जरी साडी नेसत किंवा ड्रेस घालीत असल्या तरी  कमलला साडी जास्त आवडत असे.तर सुहासला ड्रेस जास्त पसंत असे.सुहास कधी कधी जीनस् व टीशर्ट घाली .तिला तो शोभूनही दिसत असे. टेनिस कोर्टवर जाताना पांढरी हापपँट व टीशर्ट सुहास सहज घालीत असे.एकूण सुहास थोडी मॉडर्न होती .तर कमल थोडी काकूबाई होती .

ताईला जी गोष्ट आवडे तीच गोष्ट आपल्याला आवडते असे सुहासला लहानपणी नेहमी वाटत असे .ती स्वतःच्या आवडी निवडीचा स्वतंत्रपणे विचार करू शकत नव्हती .थोडक्यात तिची कॉपी करण्याचा सुहास प्रयत्न करीत असे.दोघी जशा मोठ्या होत गेल्या तशा त्यांच्या आवडी निवडी बदलत गेल्या.त्यांना स्वतःचे म्हणून वेगळे व्यक्तिमत्त्व लाभले .दोघींना लहानपणी नेहमी त्यांचे आई वडील चिडवत असत .दोघीना एक सारखा एक नवरा कुठून आणायचा ?त्यावर  फार लहान असताना सुहास म्हणे आम्ही एकाशीच लग्न करू.थोडे मोठे झाल्यावर तिच्या लक्षात येऊ लागले की आपल्याला एकाशीच लग्न करता येणार नाही.हा सारखेपणाचा हव्यास हळूहळू  कमी होत गेला . आपण लहानपणी मूर्खासारखे वागत होतो हे तिच्या लक्षात आले .मोठ्या झाल्यावर दोघीही स्वतःची निराळी ओळख ठेवण्यासाठी वेगवेगळा पोषाख करीत असत .

तरीही दोघींना एखादे दिवशी लोकांची गंमत करण्याची लहर येई.दोघी एकसारखा एक पोषाख करीत आणि नंतर लोकांची उडणारी गंमत पाहून मनातल्या मनात हसत असत.कमलची अावड जरी साडी किंवा ड्रेस असला तरी ती कधी कधी जिनस् व टी शर्टही घालीत असे. 

दोघींनी कॉलेजमध्ये कोर्सही वेगवेगळे घेतले .कमल आर्किटेक्ट झाली तर सुहास मेडिकलला जाऊन डेंटिस्ट झाली .कमल एका आर्किटेक्ट फर्ममध्ये नोकरीला लागली.तर सुहासने डेंटल कॉलेजमध्ये नोकरी स्वीकारली .त्याचबरोबर तिने दवाखानाही सुरू केला होता .मी स्वतंत्र डेंटिस्टचा व्यवसाय करीन,दवाखाना सुरू करीन अशा अटीवरच तिने कॉलेजात नोकरी स्वीकारली होती .

जरी दोघींनी स्वतःचे वेगळेपण ठेवण्याचा राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरी अंतर्यामी कुठेतरी दोघी एकसारख्या एक होत्या .त्यांची आवड निवड बऱ्याच वेळा एकाच प्रकारची असे. ही गोष्ट त्यांच्या आई वडिलांच्या व त्याप्रमाणे त्यांना स्वतःलाही लक्षात आली होती .त्या दोघींचे एकमेकांवर विलक्षण प्रेम होते .वेळ पडली असती तर एकजण दुसरीसाठी कितीही त्याग करायला तयार झाली असती .असे त्यांना निदान अंतर्यामी वाटत असे.

एके दिवशी सुहास कॉलेजमध्ये गेली तेंव्हा कॉमनरूममध्ये  एक अनोळखी तरुण व्याख्याता दिसला. सर्वांशी  अत्यंत दिलखुलासपणे व मोकळेपणाने तो गप्पा मारीत होता.ही नवीन नेमणूक असावी असा तिने कयास केला .आणि तो बरोबर होता .कॉमनरूममध्ये नवीन व्याख्याते सुरुवातीला जरा बिचकतात तसा नवखेपणा याच्यामध्ये कुठे आढळत नव्हता. कुणीही नवीन स्टाफ मेंबर आल्याबरोबर तो स्वतःची ओळख करून देत होता .त्याचबरोबर तो दुसऱ्याचे नावही विचारीत होता.त्याची किंवा तिची  ओळख करून घेत होता .आणि लगेच त्याला किंवा तिला आपल्या गप्पांमध्ये सामील करून घेत होता .एकूण गडी मोठा दिलखुलास व बोलघेवडा होता.या दिलीपने हां हां म्हणता  सर्वांना आपलेसे करून घेतले.

नवीन लेक्चरर वर्गात जाताना थोडे घाबरतात थोडे बिचकतात .याचे तसे काही नव्हते .त्याचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा होता .तो आत्मनिर्भर होता .भाषेवर, विषयावर, त्याची उत्तम पकड होतीच परंतु वर्ग नियंत्रित करण्यामध्येही त्याचा हातखंडा होता.थोड्याच दिवसांत तो विद्यार्थ्याच्या गळ्यातील ताईत बनला .विद्यार्थी व विद्यार्थिनी त्याच्या आगेमागे सर सर म्हणून नेहमी असत.स्नेहसंमेलनामध्ये त्याने अत्यंत मोकळेपणाने आत्मीयतेने भाग घेतला.स्नेहसंमेलनामध्ये त्याची विद्यार्थी प्रियता शिखरावर पोचली. अत्यंत विद्यार्थीप्रिय असूनही त्याने कधीही एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त जवळ कुणालाही येऊ दिले नाही .धिस फार अॅण्ड नो फर्दर,  इतकेच आणि याच्या पुढे नाही, ही त्याची हातोटी वाखाणण्यासारखी होती.सर्व प्राध्यापकाना त्याच्या या गुणांचे कौतुक वाटत असे. विद्यार्थ्यांमध्ये एकाच वेळी त्याच्याबद्दल प्रेम कौतुक व आदर ही होती.विद्यार्थी व प्राध्यापक या दोहोंचाही तो हिरो होता .

सुहासला हा एक विशेष नमुना वाटत होता .ती त्याला दुरून न्यहाळीत असे. दोघांमध्ये संभाषण नेहमीच होत असे .  किंवा एखाद्या विषयावरून वादही होत असे .वाद झाला तरी तो फार ताणायचा नाही हे त्याला माहीत होते .वादाचे रूपांतर संवादात करण्यात तो कुशल होता .दाट काळेभोर केस, उंच कपाळ, पाणीदार काळेभोर डोळे, किंचित बसके नाक,थोडे पुढे आलेले दात,किंचित जाड ओठ, गहू वर्ण, बेताची उंची,असे त्याचे थोडक्यात वर्णन करता आले असते .पाहिल्याबरोबर छाप पडावी असे त्याचे व्यक्तिमत्त्व नव्हते.काही लोक प्रथमदर्शनी आवडत नाही परंतु नंतर मात्र आवडू लागतात त्यातीलच हा एक होता .तो बोलायला लागला की मग मात्र त्याची छाप पडत असे .त्याचा चेहरा फार बोलका व हलता  होता .तो बोलायला लागला की तो बोलतच राहावा असे वाटत असे.बऱ्याच वेळा तो डोळ्यांनी बोलत असे.

सुरुवातीला सुहासचे त्याच्याकडे विशेष लक्ष गेले नाही.बऱ्याच वेळा आपल्याच तंद्रीत राहण्याचा सुहासचा स्वभाव होता.काही वेळा ती एककल्ली व लहरी (मूडी) म्हणून समजली जात असे.

एके दिवशी ती लेक्चर देऊन वर्गातून कॉमनरूममध्ये येत होती.कॉरिडॉरमध्ये विद्यार्थिनीच्या घोळक्यात दिलीप उभा होता.गोपीमध्ये कन्हैय्या जसा तसा हा, असा गमतीदार विचार तिच्या मनात आला .विद्यार्थिनी याच्या फारच पुढे पुढे करतात असाही एक विचार तिच्या मनात आला.कां कोण जाणे तिला त्या विद्यार्थिनींचा थोडा राग आला.त्यांची थोडी असूयाही वाटली. या सटव्या फारच पुढे पुढे करतात.हा कशाला त्यांच्यात एवढा मिसळतो.तिला दिलीपचाही थोडा राग आला.एकाच वेळी तिला विद्यार्थिनींबद्दलची असूया व दिलीपचा राग अश्या  दोन्ही  भावना निर्माण झाल्या .

आणि ती एकदम चमकलीच.आपल्याला वाटते तसे आपण अलिप्त नाही . कुठेतरी अंतर्यामी आपल्याला त्याच्याबद्दल आकर्षण वाटत आहे याची जाणीव तिला झाली.आपण प्रेमात तर नाही ना असा एक विचार अकस्मात तिच्या मनात आला .ती विचार करू लागली तसे  आपण प्रेमात पडलो असे तिच्या लक्षात आले.गेले सहा महिने आपण जरी त्याच्याकडे अलिप्तपणे पाहत असलो ,त्याच्याकडे आपले विशेष लक्ष नाही असे दाखवीत असलो , किंवा आपल्याला तसेच आतून वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे नाही हे तिला आतून जाणवले .त्याचे दिसणे,त्याचे बोलणे, त्याचे वागणे ,त्याचे चालणे, उठणे बसणे,त्याची बुद्धिमत्ता या सर्वांचीच आपल्यावर छाप पडत होती, पडलेली आहे,हे तिच्या लक्षात आले.  

आपण नकळत त्याच्यावर प्रेम करू लागलो आहोत हे तिच्या लक्षात आले .गेले सहा महिने आपण हळूहळू त्याच्याकडे खेचले जात आहोत आणि ते आपल्या लक्षात कसे आले नाही याचे तिचे तिलाच आश्चर्य वाटू लागले.

आपण प्रेमात पडलो आहोत असा साक्षात्कार तिला झाला .  

(क्रमशः)  

२१/१०/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel