(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

।। अश्वत्थामा बलीर्व्यासो हनुमांश्च बिभिषण: ।।

।। कृप: परशुरामश्च सप्तैते चिरंजीवन: ।।

हनुमान हा सात चिरंजीवांपैकी एक आहे हे सर्वांनाच माहीत आहे.वरील चिरंजीवींपैकी  प्रत्येकाला कोणत्या देवाने चिरंजीव असण्याचा वर दिला ते मला माहीत नाही.हनुमानाला श्रीरामचंद्रांनी  निजधामाला जाताना दिलेला वर मात्र माहीत आहे. जोपर्यंत रामकथा  या भूतलावर सांगितली जात आहे तोपर्यंत ती ऐकण्यासाठी किंवा रामकथेचे  गुणगान करण्यासाठी तुझ्या इच्छेप्रमाणे, तू या भूतलावर वास करशील अशा स्वरूपाचा तो वर होता .

हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे  मला झालेले हनुमंताचे साक्षात दर्शन होय.हनुमंत रामायण काळापासून मधूनमधून कुणाकुणाला दर्शन  देतात, असे मी ऐकले होते .भीमाचे गर्वहरण करण्यासाठी हनुमंताने वृद्ध कपीचे रूप घेऊन त्याचे गर्वहरण कसे केले ते सर्वांनाच माहीत आहे .

हनुमंत एक  राजयोगी आहेत . हनुमंतांना आकाश गमन सिद्धी  प्राप्त झाली होती.ज्या वेळी लक्ष्मण शक्ती लागून मूर्छित झाला,त्यावेळीं सकाळपर्यंत  संजीवनी औषधी हिमालयातून आणणे आवश्यक होते.जर ती औषधी सूर्योदयापर्यंत मिळाली नसती तर लक्ष्मणाचे प्राण धोक्यात आले असते .आकाश मार्गे गमन करून हनुमंताने ती औषधी असलेला द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला हे सर्वश्रुतच आहे . पंचमहाभूतांचे शरीर व त्यास आश्रय देणारे आकाश यांचे ठायी संयम केला असता आकाशगमन सिद्धी प्राप्त होते.असे पतंजलीनी योगशास्त्रात म्हटले आहे . 

श्रीरामाने "हनुमानसहस्त्रनामस्तोत्र " रचिले अशी अाख्यायिका आहे .त्या स्तोत्रात हनुमंताचे एक नाव उर्ध्वग: असे आहे .त्याचा अर्थ आकाशमार्गाने गमन करणारा असा आहे.

त्याच स्तोत्रात पुढे हनुमंताची नावे सांगताना  केवळ 'योगिवत' असे म्हणून श्रीराम थांबलेले नाहीत तर त्याला पुढे  'योगकर्ता ' आणि ' योगयोनि: ' असेही म्हटले आहे. याचा अर्थ, तो केवळ योग जाणणारा नव्हता तर  'योगकर्ता ' म्हणजे योग निर्माण करणारा व ' योगयोनि: ' म्हणजे योगाच्या उत्पत्तीचे कारणही होता.

काही ठिकाणी हनुमंत  हा भगवान शंकराचाच अवतार समजला जातो . भगवान महादेव तर सर्वश्रेष्ठ योगी , आदियोगी , योग निर्माते . नाथपंथीयांचे  शंकर हे आद्य गुरू होत.  मारुती हादेखील एक महानयोगी होता व त्याला पतंजलींनी वर्णन केलेल्या सर्व शक्ती प्राप्त झाल्या होत्या असे म्हणता येईल .

चिरंजीव होशील हा वर आहे की शाप आहे यावर मतभेद होण्याचा संभव आहे .दीर्घायुषी हो येथपर्यंत  फारतर ठीक आहे.जर आयुष्य आरोग्य संपन्न नसेल तर त्या दीर्घ आयुष्याचा काय उपयोग ? दीर्घ आयुरारोग्य लाभो हे जरा बरे वाटते .

इथे मला एका बादशहाची गोष्ट आठवते. एका फकिराने त्याला सांगितले की तुझ्या देखत तुझे सर्व नातेवाईक मृत्यू पावतील.हे ऐकून बादशहा फार चिडला आणि त्याने फकिराला ताबडतोप सुळी देण्याचा हुकूम सोडला .

गोष्ट  बिरबलाची आहे हे आपण ओळखले असेलच .बिरबल फकिराला म्हणाला "मी काल तुम्हाला भविष्य सांगताना जरा चुकलो होतो"असे बादशहाला सांग. तू उद्या बादशहाला पुढील प्रमाणे भविष्य सांग. "तू तुझ्या नातेवाईकांपेक्षा जास्त जगशील"त्यावर बादशहा खूष झाला  आणि त्याने फकिरालाला भरपूर मोहरा देऊन सोडून दिले .

तात्पर्य  सांगायला पाहिजे असे मला वाटत नाही. सर्व जग  बदलत असताना आपण मात्र वृद्ध होऊन आणि वृद्धपणी अपरिहार्यपणे येणार्‍या व्याधी व दौर्बल्यासहित  रहाणे हे फारसे उत्साहवर्धक  असेल असे वाटत नाही.  जरी क्षणभर चिरंजीव व्यक्ती सुदृढ आहेत असे गृहीत धरले तरीही बदलत्या जगात बरोबरचे सर्व निजधामाला गेलेले पाहात जगणे आनंददायी असेल असे वाटत नाही. 

असो. तर मी हनुमंताशी माझी भेट झाली ती कथा सांगत होतो .

मी असे वाचले होते की जिथे जिथे रामकथा चालते,राम गुणगान होत असते ,त्या त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या रूपात साक्षात हनुमंत हजर असतात .आपल्याला फक्त ते कोणत्या रूपात आहेत ते ओळखता आले पाहिजे . 

कधी खार,चिमणी, अशा एखाद्या पक्षाच्या रूपात :कधी गाय,श्वान, अशा एखाद्या प्राण्याच्या रूपात;कधी एखादा लहान मुलगा, तरुण मुलगा ,वृद्ध मनुष्य ,अशा रूपात रामकथा एेकण्यासाठी हनुमंत हजर असतात .

लोक घरातच राहावेत व त्यांची करमणूक व्हावी, म्हणून दूरदर्शनने, कोरोना महामारी जोरात असताना ,अत्यंत सुप्रसिद्ध अशी रामानंद सागर यांची रामायण मालिका दाखविली होती .त्यात हनुमंताला पाहून मला त्यांचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे अशी उत्कट इच्छा निर्माण झाली .

ही इच्छा होण्याचे कारण मणजे मी एक हनुमंत भक्त आहे .दर शनिवारी मी नेमाने मारुतीच्या मंदिरात जातो .सकाळी दर्शन व संध्याकाळी आरतीसाठी हजेरी शक्यतो न चुकविता  मी लावीत असतो. माझा दर शनिवारी उपास असतो.प्रवास ,सेमिनार, कॉन्फरन्स, आजारपण,विवाह समारंभ, इ .कोणतेही कार्यक्रम असले तरीही मी माझा उपवास सोडत नाही.त्या बाबतीत मी फार कठोर, दृढनिश्चयी व सनातनी विचारांचा आहे. 

माझा विवाह शनिवारी झाला .गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे त्या दिवशी उत्कृष्ट मुहूर्त होता. सासुरवाडीच्या लोकांची सोय, कार्यालय उपलब्ध होणे,अशा सर्व गोष्टी त्या दिवशी जुळून आल्या होत्या .मी माझ्या सासऱ्यांना सांगितले की माझा कडक उपास असतो  मी दुपारी फक्त उपवासाचे पदार्थ घेईन.त्या दिवशी माझ्यासाठी खास उपवासाचे पदार्थ केलेले होते .दुपारी सर्वांनाच थोडाबहुत उपवास घडला .

अनेकदा शनिवारी मुहूर्त असतात .मला विवाह समारंभ किंवा इतर समारंभाना जावे लागते .मला सांगायला आनंद वाटतो की लोक आठवण ठेवून माझ्यासाठी खास उपवासाचे पदार्थ करतात .

मधून मधून मला हनुमंतांनी प्रत्यक्ष दर्शन द्यावे अशी तीव्र इच्छा निर्माण होत असे .या रामायण मालिकेच्या निमित्ताने ती इच्छा  पुन्हा जागी झाली. तीव्र झाली. हनुमंताच्या भेटीसाठी मी व्याकूळ झालो .

हनुमंतांच्या दर्शनासाठी मी एक योजना आखली .

आमच्या गावात रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो.पेशवेकालीन राम मंदिर आहे.काही चौरस किलोमीटर त्याचा परिसर आहे.शहरात गेलेली स्थानिक मंडळी शक्यतो या उत्सवाला आवर्जून येत असतात.

नऊ दिवस मोठी यात्रा भरते .उत्सव पाहण्यासाठी, रथयात्रा पहाण्यासाठी दूरदूरहून लोक येतात. 

गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत रोज भजन, पूजन, कीर्तन,प्रवचन, व्याख्यान,रामलीला व इतर करमणुकीचे कार्यक्रम चालतात.कीर्तनामध्ये रामकथा नऊ दिवस चालते .या कीर्तनाच्या कार्यक्रमात हनुमंत हजेरी लावत असतील अशी मी एक कल्पना केली . हनुमंत आपली रूपे बदलू शकतात.मनुष्य किंवा पशुपक्षी कोणतेही रूप ते घेऊ शकतात.मनुष्यामध्येही लहान मुलगा, तरुण, वृद्ध, कोणते रूप घेवून ते हजेरी लावतात. मला त्याना बरोब्बर ओळखायचे होते. त्यांना ओळखून काढण्याचे व त्यांना घट्ट मिठी मारून दर्शन देण्याची विनंती करण्याचे मी ठरविले .

रामनवमीच्या उत्सवात प्रत्यक्ष चालू असलेल्या अनेक कार्यक्रमांपैकी, विशेषत: भजन कीर्तन प्रवचन या कार्यक्रमांमध्ये मी हजेरी लावीत होतो.कोणती व्यक्ती रोज नियमाने या कार्यक्रमाला हजर रहाते  ते मला शोधून काढायचे होते.अनेक माणसे रोज या कार्यक्रमाला सातत्याने येत असतात .या येणाऱ्या माणसात हनुमंत कोण ते मला शोधून काढायचे होते .

मी प्रभू रामचंद्रांचे  मन:पूर्वक  स्मरण केले .मी तुमचाही भक्त आहे. हनुमंताचाही भक्त आहे.मला हनुमंत ओळखण्याचे सामर्थ्य द्या अशी मी त्याना विनंती   केली.

प्रभू रामचंद्रांनी माझी विनंती मान्य केली असे पुढील घटनेवरून लक्षात आले .भजनाच्या वेळी एक म्हातारेबुवा अत्यंत तल्लीन होउन भजनात  दंग होतात असे मला आढळून आले.मी त्यांच्याकडे निरखून पहात होतो. वृद्ध असले तरी त्यांचे शरीर कमावलेले वाटत होते.तीन चार दिवसांत ते हनुमंतच आहेत याची मला खात्री पटली.ते कुठे जातात ते पाहण्यासाठी मी त्यांचा पाठलाग करू लागलो.मंदिर परिसराबाहेर पडण्याअगोदर ते गुप्त होतात असे माझ्या लक्षात आले.आमच्या गावात राम मंदिराचा परिसर फार विस्तृत आहे.राममंदिरा बाहेर पडून रस्त्याला लागण्यापूर्वी जवळजवळ अर्धा किलोमीटर चालावे लागते. या रस्त्यावर म्हातारेबुवा अकस्मात गुप्त होत असत.रामनवमीला आता थोडेच दिवस राहिले होते . रामनवमी पूर्वीच नाहीतर या वर्षी हनुमंत दर्शन नाही .हे मला जाणवत होते .मंदिराबाहेर पडल्यावर आसपास बघून ते झपझप चालत असत .आणि अकस्मात गुप्त होत असत .

एके दिवशी मी ते ज्या झाडाखाली गुप्त होत असत तिथे लपून राहिलो.ते झपझप  चालत येत असताना अकस्मात त्यांच्या पुढ्यात येऊन त्यांच्या पायाना घट्ट  मिठी मारली .

मी त्यांना म्हटले, मी तुम्हाला ओळखले आहे .तुम्ही मला मूळ स्वरूपात दर्शन दिल्याशिवाय मी तुमच्या पायाची मिठी सोडणार नाही.त्यांनी मी मारलेली मिठी सोडवण्याचा प्रयत्न केला .त्यांच्या मनात असते तर त्यांनी मिठी केव्हाच सोडविली असती.परंतु ते तसे करू शकत नव्हते .भक्ताची तीव्र इच्छा भगवंत डावलू शकत नाहीत.

मी त्यांचा भक्त आहे .मी त्यांचा उपासक आहे. हे त्यांना अर्थातच ज्ञात होते.माझी इच्छा, माझी युक्ती, माझा प्रयत्न,त्यांना कदाचित अगोदरच कळलेला असणार .त्यांनी मला आपल्या हातावर घेतले आणि ते एका निर्मनुष्य जागी आले.

तिथे ते त्यांच्या मूळ रूपात आले . त्यांची उंची दहा बारा फूट तरी नक्की असावी .शरीरयष्टी अत्यंत बळकट होती .डोक्यावर सोनेरी मुकुट होता .चेहऱ्यामागे दिव्य प्रभा होती. नेत्र व चेहरा अत्यंत तेजस्वी होता.त्यांच्यापुढे मी एवढासा लहानखुरा दिसत होतो . त्यांच्याकडे पाहण्यासाठी मला वर मान करावी लागत होती .

त्यांच्या दर्शनाने मन तृप्त झाले .हनुमंतानी प्रसन्न होऊन तुला काय पाहिजे म्हणून विचारले. मी त्याना तुम्ही रामायण काळात वेळोवेळी जे जे कांही केले ते ते सर्व  प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे असे सांगितले .

ते म्हणाले मी तुला सर्व काही दाखवू शकणार नाही .त्याची गरजही नाही .ज्याला तीव्र इच्छा असेल त्याला मनाने सर्व घटना डोळ्यासमोर सहज दिसू शकतात. मी पुन्हा त्यांच्या पायाला घट्ट मिठी मारली.भक्ताची मिठी वज्रमिठी असते. भगवंत ती सोडवू शकत नाहीत.मला रामायणाचा काही भाग प्रत्यक्ष बघायचा आहे ही इच्छा पुन्हा प्रगट केली .

ठीक आहे. एक कुठचा तरी प्रसंग सांग. मी तो तुला दाखवितो असे ते म्हणाले .

*मी त्यांना लक्ष्मण मूर्छित होऊन पडतो आणि तुम्ही द्रोणागिरी पर्वत घेऊन येता तो प्रसंग दाखवण्याची,अनुभवण्याची  विनंती केली.*

*हनुमंत म्हणाले ठीक आहे परंतु त्यावेळी मी द्रोणागिरी पर्वत उचलून आणत असल्यामुळे विराट रूप धारण केले होते .ते रूप इतके प्रचंड होते की ते तू पाहू शकणार नाहीस.तू मूर्छित पडशील.*

* मी मूर्छित पडणार नाही.मी तुमचा भक्त आहे .*

*तुमच्या कृपाप्रसादाने, तुमच्या आशीर्वादाने, मी ते सर्व सहन करू शकेन. असे मी त्यांना म्हणालो. *

(क्रमशः)

३/५/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel