आठशे वर्षापूर्वी चीनमध्ये हंग चौ, ही सूना साम्राज्याची राजधानी होती. राजधानीचेच शहर होते. अर्थातच पूर्ण वैभवाने भरलेले. त्या वैभवांत भिकाऱ्यांचे वैभव ही ओतप्रोत होते. त्यांत त्यांचा एक राजा हि होता. तो बाकी सर्व भिकाऱ्यांकडून त्यांच्या प्राप्तीतील एक निश्चित वाटा घेत असे व त्याच्यावर सावकारीचा धंदा पण करीत असे. अशा तऱ्हेने त्याला पैसे मिळविण्याचे एक उत्तम साधन मिळत असे.

भिकाऱ्यांचा राजा घरांत जरी राजासारखाच राहात असे तरी दारा बाहेर त्याला कोणी विचारीत नसे. हंग चौ नगरांत त्या वेळी 'चिन लाओतो' नांवाचा भिकारी त्यांचा राजा होता.सात पिढ्यांपासून हे राज्यपद त्यांच्याकडे चालत आले होते. त्यामुळे त्याच्याजवळ अलोट संपत्ति सांठली होती.

गांवांत त्याच्या मालकीची किती तरी घरें होती. बरीचशी धान्याची कोठारें होती. तिजोऱ्या पैशांनी भरलेल्या होत्या. घरांत नोकर चाकर होते. गांवांतील गर्भश्रीमंतांत तो एक होता. एवढे सर्व होते तरी गांवांत त्याला मान नव्हता. तो मिळावा म्हणून त्याने आपलें हें पिढिजात चालून आलेले पद सोडून दिले. त्या ठिकाणी त्याने आपल्याच एका नातेवाईकाची नेमणूक केली. तरी सुद्धा सर्व त्याला भिकाऱ्यांचा राजा म्हणूनच म्हणत असत.

त्याला एक मुलगी होती. तिला जन्म देऊन त्याची बायको मरण पावली. नंतर त्याने पुन्हां लग्न केले नाही. आपल्या मुलीचेच संगोपन करण्यांत त्याने मन रमविलें.

तिला त्याने उत्तम शिक्षण दिले. तऱ्हेतऱ्हेची कलाकुसरीची कामें शिकविली. लिहावयास वाचावयास शिकविलें. एवढेच नव्हे तर तिला उच्च शिक्षण देऊन सुविद्य केले. ती मुलगी हि सुशील व गुणवति होती. सुंदर होती. खरोखर थोरामोठ्याच्या घरांत शोभण्यासारखी होती. तिचे नाव होतें यूनू, चिन लाओतोच्या मनांतून आपल्या मुलीला मोठ्याच्या घरांत द्यावी असें होतें. परंतु भिकाऱ्याच्या राजाची मुलगी म्हणून तिच्याशी लग्न करण्यास कोणी तयार होईना. यूनू अठरा वर्षांची झाली तरी तिचे लग्न कोठेच जमले नाही. त्याच गांवांत मोची नांवाचा एक मुलगा होता. तो फार सुंदर होता. त्याला आईवडील कोणी नव्हते.

तो फार गरीब होता. परंतु हुशार होता. तशा गरीबीत सुद्धा त्याने काही तरी सरकारी परीक्षा दिल्या होत्या. त्याचे वय वीस वर्षांचे होते तरी पण त्या गरीबीमुळे त्याचे अद्यापि लग्न झाले नव्हते. चिनने त्या मुलाची चौकशी केली. चांगला होतकरू होता तो म्हणून त्याला घर जांवई करून घेतले चिननें. मोची पण अगदी गरीब निराधार होता. म्हणून लग्नास तयार झाला. सुंदर, संपन्न व सुविद्य पत्नी मिळाल्यामुळे मोची फार खूष झाला. त्याच्या मित्रांनीसुद्धा त्याचे त्या बद्दल अभिनंदन केले.

त्याने लग्नानिमित्त आपल्या सर्व मित्रांना बोलावून सासऱ्याकडेच मेजवानी दिली. त्या जेवणावळीची बातमी चिनचा नातलग भिकान्यांचा राजा याला समजली. तो रागारागाने आपल्याबरोबर पन्नास साठ भिका-यांची टोळी घेऊन चिनच्या घरी आला,

“तोच कोण मोठा. आम्ही काय त्याच्या पेक्षा कमी आहोत काय?" असें म्हणत तो चिनच्या घरांत शिरूं लागला.

भिकाऱ्यांना येतांना पाहून मोची व त्याचे मन पानावरून उठून निघून गेले. चिनला फार वाईट वाटले. त्याने भिकाऱ्याना सांगितले, हे जेवण जावयाने त्याच्या मित्र मंडळींना दिले आहे. माझ्याकडील जेवण मी तुम्हांला देणार आहे. आलेल्या भिकाऱ्यांना थोडी थोडी दक्षिणा देऊन शांत करून त्याने त्यांना परतविलें. त्या दिवशी मोची आपल्या एका मित्राकडे राहिला. दुसरे दिवशी तो घरी गेला. त्याला पाहून चिनला लाजल्यासारखे झाले, यूनूला अपमान झाल्याचे भासले. परंतु मोची कोणालाच काही म्हणाला नाही.

तेव्हां पासून मोचीने आणखी खूप शिकावे म्हणून यूनू त्याला पुस्तके आणून देऊ लागली. पंडितांना घरी बोलावून मोचीला शिकवण्याची व्यवस्था करून दिली. मोची देखील संधीचा योग्य फायदा घेत होता. त्याने भराभर एकेक वरच्या परीक्षा दिल्या. मोठा विद्वान पंडित झाला आणि अखेरीस इन्लिन परिषदेचा सभासद झाला. तो रोज दरबारी पोषाक करून दरबारांत जाऊ लागला. तरी पण रस्त्यांत जातांना टवाळ पोरें त्याला पाहून ओरडत,

“भिकारी राजाचा जावई...! झाला आहे, मोठा अधिकारी....!" मोची सर्व परीने सुखी होता.

तरी हा गांवच्या पोरांचा आक्षेप त्याला दुःख देई. त्याचे मन कच खाऊ लागले. त्यामुळे वरवर तो चिनबद्दल आदर दाखवी. तरी मनांतून त्याचा जळफळाट होत असे. त्याच्या मुलीशी आपण कशाला केले म्हणून पश्चात्ताप वाटत असे. त्याला वाटे की जर आपण एखाद्या हुद्यावर पोहोचणार आहोत हे अगोदर समजलें असतें. युनू एकदा बाहेर गेली असताना पाण्यांत पडली.

सर्वांना वस्तुस्थिति कळून चुकली, पण कोणी काही बोलले नाही. युनू पाण्यात पडली खरी पण ती काही मेली नाही. तिच्या पायाला कशाचा तरी आधार मिळाला. त्याच्या सहायाने ती किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली. तेथे बसून ती आपल्या परिस्थितीवर विचार करू लागली. आपल्याला मारून टाकून आपला पति दुसरें लग्न करणार आहे. या विचाराने तिला फार दुःख झाले. पण ती बिचारी काय करणार? मोची निघून गेल्यावर त्याच वाटेने आणखी एक बोट आली. तिनें हि त्याच ठिकाणी नांगर टाकला. त्या बोटींत वाहतुक खात्याचा एक अधिकारी होता. त्याचे नांव चिंग हो असे होते. सर्व निजानीज होण्यापूर्वी त्याने व त्याच्या बायकोनें सर्वकडे हिंडून जहाजाची तपासणी केली. नंतर एकदा आपल्या खोलीतील खिडकीतून डोकावून पाहिले तर त्यांना किनाऱ्यावर कोणी रडत असल्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी नावाड्यांना सांगून युनूला बोटीवर बोलावून घेतले.

तिला चांगले कपडे देऊन माहिती विचारली. ती ऐकून ते म्हणाले

"तू घाबरूं नकोस. आम्ही तुझी सर्व व्यवस्था करतो. तूं आम्हाला मुलीप्रमाणेच आहेस.”

त्यांनी बोटीवरील सर्वांना बजावून सांगितले की ही वार्ता कोणास हि कळता कामा नये. काही दिवसांनी चिंग हो पोहोचला. तेथे त्याला सर्वात मोठा अधिकारी म्हणून पाठविले होते. मोची त्याच्या हाताखाली एक अधिकारी होता. अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी सर्व नोकर गेले. त्यांत मोची हि होता. त्याला पाहतांच चिंग हो मनांत म्हणाला,

"हा मनुष्य सुशिक्षित आणि चांगला दिसतो आहे. तरी सुद्धा त्याने हे असें नीच काम कां केलें?"

काही दिवसांनी चिंग होने सांगितले की माझी एक वीस वर्षांची मुलगी आहे. तिच्या योग्य वर कोणी दिसला तर सुचवा. मी त्याला घरजावई करून घेणार आहे. तेथे सर्वांना माहीत होते की मोची दुसरे लग्न करण्यास तयार आहे. म्हणून सर्वांनी त्याचे नाव सुचविलें. चिंग होला तो पसंत पडला व त्याच्या विषयीं पूर्णपणे तपास करण्यास सांगितले. आपले भाग्य इतके अनुकूल झाल्याचे पाहून त्याला फार आनंद झाला. तो लग्न करण्यास तयार झाला. चिंग होनें त्याला बोलावून प्रत्यक्ष विचारलें.

चिंग हो म्हणाला, "आम्ही फार लाड केल्यामुळे मुलगी थोडी बिघडली आहे. ती कोणाचेच ऐकत नाही. तूं तिच्या मर्जीप्रमाणे तिच्या आर्जेत वागण्यास तयार असशील तर ठीक, नाहीतर ह्या भानगडीत न पडलेलें बरें.”

मोची कबूल झाला. इकडे युनूला जेव्हां समजले की तिचा पुनर्विवाह लावणार आहेत, तेव्हा तिने त्या गोष्टीला नकार दिला.

युनू म्हणाली, “मला दूर करण्यासाठीच त्यांनी एवढे कारस्थान केले, माझ्याबरोबर राहण्यांत त्यांना अपमान वाटला. पण त्यांना सोडून मी दुसरे लग्न करणार नाही."

चिंग होने जेव्हा तिच्या होण्याऱ्या पतीची माहिती सांगितली तेव्हा आपल्याच नवऱ्याशी चिंग हो आपलें लग्न लावणार म्हणून ती तयार झाली. दोघांचे लग्न झाले. नवरा नवरीला एका खोलीत नेण्यात आले. मोचीने युनूच्या खोलीत प्रवेश करतांच चारी बाजूंनी आठ दहा दासी आल्या व त्यांनी मोचीला दांडक्यांनी मारण्यास सुरवात केली.

तो ओरडला, "धांवा..! धांवा..!! वाचवा...!!!"

"मारूं नका त्यांना. इकडेच घेऊन या." युनू म्हणाली.

मोची तिच्याजवळ गेला व म्हणाला, "मी काय गुन्हा केला आहे. म्हणून मला ही शिक्षा दिली?”

युनू कांहीं हि बोलली नाही. तिने फक्त आपला बुरखा बाजूस केला.

“भूsssत भूऽऽऽत..!!" तो ओरडला.

तेथे असलेले नोकर चाकर सर्व हसू लागले. गडबड ऐकून श्री व सौ. चिंग हो तेथें आली. त्यांनी मोचीला समजावून सांगितले. मोचीने युनूची माफी मागितली. तेव्हां पासून ती दोघे सुखाने राहूं लागली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel