प्रचिती बस थांब्यावर उभी होती. तिला कॉलेजला जायला उशीर होत होता .ती वाकून वाकून बस येत आहे का ते पाहात होती .स्कूटर घेण्यासाठी कित्येक दिवस ती बाबांच्या मागे लागली होती.बाबांची ती एकुलती एक लाडकी मुलगी  होती.हल्ली वाहने वाढल्यामुळे,  लोक बेदरकार चालवीत असल्यामुळे,रस्ते पुर्वीचेच लहान असल्यामुळे , अपघाताचे प्रमाण वाढले होते .त्यामुळे बाबा स्कूटर घेण्यासाठी टाळाटाळ करीत होते .तिचा नोकरी करत असलेला  थोरला भाऊ बाबांना नेहमी गंमतीने म्हणत असे .अशी तिला जपून जपून देव्हाऱ्यात किती दिवस ठेवणार आहात .आज ना उद्या तिला स्कूटर घेऊन द्यावी लागेलच .बाबांनाही विश्वासचे बोलणे पटत असे .परंतु वळत नसे.पुढच्या वर्षी स्कूटर घेऊ असे म्हणत म्हणत तीन वर्षे गेली होती.बारावी सायन्स होऊन ती आता मेडिकलच्या पहिल्या वर्षाला होती .यावर्षी नक्की स्कूटर घेणार म्हणून बाबांनी सांगितले होते .बाबांवरील प्रेमापोटी  तीहि स्कूटर घेण्याचा विशेष जोर करीत नसे.तिला बस नेहमी लगेच मिळत असे .कॉलेजचा स्टॉप शेवटचाच असल्यामुळे ती आरामात पोचत असे .येतानाही ती तशीच आरामात येई .एरवी ती मैत्रिणींबरोबर स्कूटरवरून जात असे .स्कूटर नाही याची विशेष अडचण भासत नसे .

अजूनही बस येत नव्हती .एवढ्यात बस आली नाही तर तिचे पहिले लेक्चर चुकणार होते . एवढ्यात एक तरुण मुलगा थांब्यावर आला व त्याने तिला विचारले बस गेली का ?तिने अजून नाही म्हणून सांगितले .गावाबाहेर नवीन मेडिकल कॉलेज सुरू झाले होते त्या बाजूला ही बस जात असे .त्या बाजूला हळूहळू वस्तीही वाढत होती .बंगले टॉवर्स व्यापारी संकुल अश्या मिश्र बिल्डींग्ज उभ्या राहात होत्या.हा तरुण तिथे कुठेतरी बहुधा काम करीत असावा .तिने अजून नाही एवढ्यात येईल मीही वाट बघत आहे असे पुन्हा एकदा सांगितले .एवढ्यात बस आली दोघेही बसमध्ये चढले त्यांना शेजारी शेजारी सीट्स मिळाल्या .त्या तरुणाने एक्स्प्रेस टॉवर म्हणून कंडक्टरला तिकीट मागितले .हा टॉवर नवीनच झाला होता.जवळपासच्या लोकांसाठी  ती मोठी खूण होती.हा तिथेच कुठेतरी नोकरी करीत असावा असा तर्क तिने बांधला .तिचा पास होता तो तिने कंडक्टरला दाखविला .

त्या दिवशी त्यांचे काहीही बोलणे झाले नाही.रोज त्याच वेळी तो थांब्यावर येत असे व दोघेही एकत्र जात असत .हळूहळू दोघेही भेटल्यावर ओळखीचे स्मित करीत असत.अजूनही एकमेकांना ती काय करतात ते माहीत नव्हते .त्यांना  परस्परांची नावेही माहीत नव्हती .कधी त्यांचा प्रवास शेजारी शेजारी बसून, तर कधी वेगळ्या ठिकाणी बसून, तर कधी उभे राहून होत असे.एके दिवशी राजने त्या तरुणाचे नाव राज होते तिला तिचे नाव विचारले.त्याने आपण इतके दिवस प्रवास करीत आहोत परंतु आपले नावही माहीत नाही .माझे नाव राज आपले नाव काय ?म्हणून विचारले.प्रचितीने तिचे नाव सांगितले .एकमेकांनी आपले फोन नंबर परस्परांना दिले .रोज एकत्र जात असल्यामुळे त्यांच्यामध्ये संवाद होऊ लागला .आता मधून मधून फोनवरही संवाद होऊ लागला .राज नवीनच सीए झाला होता.एक्स्प्रेस टॉवरमधील एका सीए फर्ममध्ये तो काम करीत होता .प्रचितीनेही ती मेडिकलच्या पहिल्या वर्षाला आहे म्हणून सांगितले. प्रचितीने स्कूटर घेण्याचा आग्रह केव्हां सोडून दिला ते तिचे तिलाही कळले नाही .केव्हातरी तिच्या दादाने तिला तुला स्कूटर पाहिजे होती ना म्हणून विचारले .त्यावर तिने स्मित करून काहीच उत्तर दिले नाही.बाबांनी केव्हा तरी विचारता तिने केवढी रहदारी वाढली आहे, केवढे ड्रायव्हिंगचे टेन्शन,त्यापेक्षा बसच बरी असे सांगितले .बाबांना व दादाला थोडे नवल वाटले परंतु त्यांनी तो विषय पुढे फार ताणला नाही.ती दोघांचीही लाडकी होती .गर्दीतून तिने स्कूटर चालविणे दोघांनाही फारसे पसंत नव्हते.त्यामुळे दोघांनीही नंतर तो विषय काढला नाही .

एक दिवस ती तिची आई बाबा दादा अशी मॉलमध्ये काही खरेदीसाठी गेली होती.त्यावेळी एक नवी ब्रॅंड ह्युंडाई मॉलसमोर पार्किंगमध्ये येऊन उभी राहिली .त्यातून राज उतरला.त्याचे त्या चौघांकडे लक्ष नव्हते.याच्याजवळ मोटार असूनही हा बसने का येतो याचे प्रचितीला नवल वाटले .कदाचित त्याने मोटार नवीनच घेतली असावी असा अंदाज तिने केला.उद्यापासून तो बसला येणार नाही याचे तिला थोडे वाईट वाटले .आता बाबांना सांगून स्कूटर घ्यायचीच असे तिने ठरविले .दुसऱ्या दिवशी ती थांब्यावर येते तो तिथे राज उभा असलेला तिला आढळून आला.ती मनातल्या मनात सुखावली.मोटार असूनही तो आपल्यासाठी बसने येत असावा असे तिच्या लक्षात आले. त्याच्याजवळ मोटार आहे हे आपल्याला माहित आहे हे तिने त्याला जाणवू दिले नाही .एक दिवस तो मोटार घेऊन येईल आणि आपल्याला कॉलेजपर्यंत सोडील अशी एक वेडी आशा तिच्या मनात खोलवर कुठेतरी होती .परंतु त्याने तसे कधीच केले नाही .

एक दिवस त्याला यायला उशीर झाला .आलेली बस सोडून द्यावी की काय असा ती विचार करीत होती .तिने रांगेमध्ये मागे उभे असलेल्यांना पुढे जाऊ दिले.एवढ्यात तो समोरच्या फुटपाथवरून येताना दिसला .बस पाहून धावत धावत तो रस्ता क्रॉस करीत होता.एवढ्यात एका भरधाव येणाऱ्या कारने त्याला निसटता धक्का दिला .रस्त्याच्या कडेला तो भेलकांडत आला व खाली पडला.तिने येणाऱ्या एका रिक्षाला थांबविले त्याला आधार देऊन रिक्षात बसविले .रिक्षा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलकडे घेण्यास सांगितले .न विसरता तिने त्याची बॅगही घेतली .त्याला एक फ्रॅक्चर काही जखमा झाल्या होत्या .सुदैवाने तो बालंबाल बचावला होता .त्याला सात आठ दिवस हॉस्पिटलमध्ये राहणे भाग होते.तो या शहरात एकटाच होता .तिने फोन करून त्याच्या आई वडिलांना बोलवून घेतले .रोज ती त्याला घरून नाष्टा जेवण नेत असे.तो रोज बसमधून आपल्याबरोबर येत असे हे तिने घरी सांगितले नाही. फक्त त्या दिवसाची हकीगत सांगितली .त्याला इथे घरी कुणीही नसल्यामुळे आपण त्याची काळजी घेत आहोत असे सांगितले .त्यावर तिच्या आईने मिस्किलपणे आम्ही कुठे तुला एवढी काळजी का घेत आहेस असे विचारले आहे? असे म्हटले .रस्ता धावत निष्काळजीपणे ओलांडला याबद्दल तिने त्याची चांगलीच हजेरी घेतली.काही भलते सलते झाले असते म्हणजे?तिला आपली एवढी काळजी वाटते हे ऐकून त्याला आनंद झाला .एवढी दाट आई वडिलांशिवाय आणखी कुणाकडून त्याला पडली नव्हती.कुणीतरी आपल्याला प्रेमाने रागावत आहे हे पाहून तो मनोमन सुखावला. 

हॉस्पिटलमध्ये नाते सांगताना तिने मित्र म्हणून सांगितले.तिचे आई वडिलही त्याला एकदा भेटून आले .त्याचे आई वडील आल्यावर तिची जबाबदारी संपली.तरीही कॉलेजमध्ये गेल्यावर ती त्याच्याकडे एक चक्कर टाकत असे .तो बरा होईपर्यंत त्याची सर्व जवाबदारी तिच्यावरच होती याप्रमाणे ती वागत असे.त्याच्या आई वडिलांनाही तिचे कौतुक वाटले .त्यांनी मनोमन तिला सून म्हणून  केव्हाच पसंत करून टाकले.फक्त राज हा विषय केंव्हा काढतो याची ते वाट बघत होते. तो बरा झाला. घरी आला. त्याचे आई वडील एकदा येऊन त्यांच्या घरी त्या सर्वांचे आभार मानून गेले .त्यांनी तिच्या आई बाबा दादा याना त्यांच्या घरी बोलाविले.तेही राजच्या फ्लॅटवर जाऊन त्याच्या आई वडिलांना भेटून आले. मनोमन सगळ्यांना सर्व काही लक्षात आले होते .त्या दोघांनी त्यांच्या आई वडिलांजवळ उच्चार करावा असे प्रत्येक घरच्या वडील मंडळींना वाटत होते.एवढ्यात काय धांदल आहे तिचे अजून शिक्षण पूर्ण व्हायचे आहे असाही विचार होता.

सर्व फ्रंटस् वर शांतता होती. 

तो पूर्ण बरा झाल्यावर पुन्हा बसमध्ये एक्स्प्रेस टॉवरला जाण्यासाठी चढला.तिने त्याला जरा दरडावून तुझ्याजवळ मोटार असताना तू बसने का येतो असे विचारले.त्यावर तो तुझ्यासाठी असे म्हणेल असे तिला वाटले होते.परंतु हसत हसत त्याने पेट्रोल वाचविण्यासाठी म्हणून सांगितले .तिला त्याचा जरा रागच आला.त्याने आपल्याला प्रपोज केल्याशिवाय आपण काहीही हालचाल करायची नाही असे तिने मनोमन ठरविले .

त्यांचा सहप्रवास असाच काही महिने चालू राहिला .प्रवासात त्यांच्या गप्पा होत असत .गप्पांचे विषय निरनिराळे असत.कुणीच काही मुद्याचे बोलेना .दोन्ही घरच्या मंडळींना सर्वकाही माहित असूनही ते काही हालचाल करीत नव्हते. अजूनही दोघेही मॉल बाग सिनेमागृह नाटकगृह इत्यादी कुठल्याही ठिकाणी  गेले नव्हते.फक्त बस सहप्रवास चालला होता .अशी दोन वर्षे गेली .परस्परांच्या मनात नक्की काय आहे ते एकमेकांना कळेना .तो किंवा ती कुणी आगाऊ आहेत केवळ खेळ म्हणून याकडे पाहात आहेत असेही कुणाला वाटत नव्हते.

शेवटी प्रचितीने एक युक्ती केली.तो दुसऱ्या दिवशी जेव्हा भेटला तेव्हा तिने तिच्या घरात तिच्या लग्नाविषयी बोलणी चालू आहेत. मुलगा डॉक्टर आहे. लग्नानंतर शिक्षण चालू ठेवायला सर्वांची संमती आहे .अशी एक पुडी सोडून दिली .नंतर गंभीर चेहरा करून विचारले, की तिने काय करावे ?शिक्षण पुरे झाल्याशिवाय लग्न करू नकोस असे त्याने अधिकारवाणीने सांगितले .अर्धवट शिक्षण असताना लग्न केल्यास पुढे शिक्षण चालू ठेवण्याची कितीही इच्छा असली तरी अनेक कारणांनी शिक्षण अर्धवट सोडलेली कितीतरी उदाहरणे मला माहित आहेत असे सांगितले.तो अधिकारवाणीने बोलत होता परंतु प्रपोज मात्र करीत नव्हता. त्याच्या मनात काय चालले आहे ते काही कळत नव्हते. 

अजून दोन वर्षे आहेत .नंतर ती एमबीबीएस होईल .पुढे तिला पोस्टग्रॅज्युएट करायचे आहे.आजकाल स्पेशलायझेशन असल्याशिवाय विशेष मान नाही. उपयोग नाही.तोही थांबायला तयार आहे .तीही थांबायला तयार आहे .प्रेमाचा उच्चार अजून कुणीही केलेला नाही .

*जे जे बोलायचे जे जे सांगायचे ते ते त्या त्या वेळीच बोललेले सांगितलेले चांगलेअसते,असे आपल्याला वाटत नाही का ?*

*पाहू या काय होते ते की काळाच्या ओघात दोघांच्या वाटा निरनिराळ्या होतात.*

२६/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel