गाव तसा लहान होता .जेमतेम दोन ते तीन हजार लोकसंख्या होती .गावाजवळून कोस्टल हायवे गेला होता .हायवे असल्यामुळे रहदारी बऱ्यापैकी असे .हल्ली गावाबाहेर एक घटना सुरू झाली होती .कधी मोटारीला हात दाखवून मोटार थांबविली जाई.कधी रस्त्यात अडथळा निर्माण करून मोटार थांबवली जाई.कधी एखाद्या अपघाताचा भास निर्माण केला जाई त्यामुळे मदतीसाठी मोटार थांबे.त्यानंतर ती लुटण्यात येत असे .जवळच्या पोलिस ठाण्यावर अशा तक्रारी मधून मधून  येऊ लागल्या होत्या.लुटण्याचे एक विशिष्ट तंत्र साधारणपणे वापरले जाई .   

अपघात होऊन एखादी व्यक्ती निपचित पडली आहे असा देखावा निर्माण केला जाई. अपघात दिसला की एखादी मोटार थांबे.अपघातातील मनुष्य वेडा वाकडा रस्त्यावर पडलेला असे.त्याला पाहण्यासाठी व मदत करण्यासाठी जो कुणी येई तो जर एकटा असला तर त्याच्यावर हल्ला केला जाई.सोने नाणे पैसे काढून घेतले जात .लहानसा फटका मारून त्याला बेशुद्ध केले जाई.हल्लेखोर पसार होत असे .काही जण तक्रार न  करता तसेच निघून जात. तर काही जण पोलीस ठाण्यावर जाऊन तक्रार करीत असत .  

लहानश्या गावांमध्ये पोलिसाना गस्त घालणे शक्य नसे .अशा तक्रारी वारंवार येऊ लागल्यावर मोठ्या शहरातील पोलिस स्टेशनकडे तक्रार नोंदविण्यात आली .आणि चौकशीसाठी इन्स्पेक्टर श्यामराव यांची नेमणूक करण्यात आली . शामराव पोलीस वेषात न येता एक साधे प्रवासी म्हणून गावात मोटारीने आले. गावात उतरण्यासाठी कुठे सोय आहे का अशी चौकशी करता त्यांना एक जागा सुचविण्यात आली .तो एक मोठा प्रशस्त चौसोपी वाडा होता .वाडा दुमजली होता .वाडा चांगलाच जुना होता .त्यातील अर्ध्या भागात मालक राहत असत .तर उरलेल्या भागाचे रूपांतर हॉटेलमध्ये केलेले होते .हाही बदल अलीकडेच गेल्या एक दोन वर्षात केलेला होता .गाव समुद्रकिनारी असल्यामुळे आणि हल्ली लहान खेडेगावात आउटिंगसाठी जाण्याची जास्त फॅशन आवड निर्माण झाल्यामुळे बऱ्यापैकी टुरिस्ट हॉटेलमध्ये येत असत .

श्यामरावांनीही त्या हॉटेलमध्ये येऊन आपली पथारी पसरली .हॉटेलचे मालक रघू शेठ साधारण पंचेचाळीस वयाचे होते.त्यांचे बंधू दामू शेठ हे विशेष दिसत नसत .शेतीवाडीची कामे ते पाहत असत .त्यांच्या कलमांच्या दोन बागाही होत्या .त्याची देखभाल दामू शेठ करीत .तर हॉटेलचा व्यवसाय रघू शेठ पाहत असत .दोन्ही भावांमध्ये चांगला एकोपा होता . श्यामरावांनी गावात सहज फेरफटका मारता मारता  चौकशी केली .त्यात त्यांना असे आढळून आले की सुमारे पांच सहा वर्षांपूर्वी रघू व दामू यांचे वडील वारले .तेव्हा वाडा मोडकळीस आलेला व ज्याची रया गेली आहे असा होता .जुने मालक नानासाहेब यांचा मृत्यू झाल्यानंतर एकाएकी  रघू व दामू यांच्या हातात पैसा खेळू लागला. त्यानी वाड्याची चांगल्यापैकी डागडुजीही केली .एका भागाचे रूपांतर हॉटेलमध्ये केले.त्याच प्रमाणे ओसाड डोंगरावर कलमांच्या बागाही लावल्या.एकाएकी एवढा पैसा दोघांजवळ कुठून आला असावा याची चर्चा गावात होताना आढळून आली.

त्यांच्या दारात मोटार आली .दोघांकडेही टीव्ही आला .दोघे भाऊ गुण्या गोविंदाने जरी नांदत असले तरी ते एकत्र राहात नव्हते.त्यांना छुपा खजिना सापडला असावा किंवा लॉटरी लागली असावी किंवा त्यांना धनलक्ष्मी प्रसन्न झाली असावी असा प्रकारच्या चर्चा गावात होत असलेल्या श्यामरावांना आढळून आल्या .गेल्या सहा महिन्यात हे वाटमारीचे प्रकार अस्तित्वात आले होते .श्यामराव मधील पोलिस सतर्क होता .वाटमारी व या कुटुंबाची संपन्नता यांच्यामध्ये काही संबंध तर नाही ना असा संशय त्याना वाटू लागला .

परंतु तसा संबंध दिसेना.नानासाहेबांना जाऊन पाच सहा वर्षे झाली होती. वाड्याचे पुनरुज्जीवन व पुनर्रचना यालाही दोन तीन वर्षे झाली होती .बागेतील कलमेही दोन तीन वर्षांची झाली होती.या सर्वासाठी काही लाख रुपये खर्च झाले होते .वाटमारीच्या घटना गेल्या सहा महिन्यातील होत्या .तेव्हा वाटमारी व या कुटुंबाची संपन्नता यांचा संबंध लावणे शक्य नव्हते.योग्यही नव्हते . 

ज्या ज्या लोकांना लुटले गेले होते त्यांनी लुटणाऱ्यांना पाहिले नव्हते .अंधारात कुणीतरी पाठीमागून येऊन मानेवर हलकासा फटका मारीत असे .बेशुद्ध झाल्यावर पैसाआडका सोने नाणे घेऊन बेशुद्ध इसमाला मोटारीत ठेवले जाई .व लुटारू पसार होत असत .त्यामुळे लुटलेल्या लोकांना प्रत्यक्ष रघू व दामू याना  दाखवून काही साध्य होण्यासारखे नव्हते .वाटमारी आणि रघू व दामू यांची संपन्नता यांमध्ये कुठे संबंध तर नाही ना असा संशय रामरावांच्या पोलिसी डोक्यात वळवळत होता परंतु त्याला काही आधार दिसेना.

जो वाडा जुना पडका होता .ज्यातील कुटुंबे कशीबशी जगत होती . त्यांच्या दारात मोटारी याव्यात .घरात टीव्ही यावेत .दोन डोंगर खरेदी करून त्यावर कलमांच्या बागा लावण्यात याव्यात .संपन्नते बरोबर येणाऱ्या इतर गोष्टीही घरात याव्यात. याचा नानासाहेबांच्या मृत्यूशी काहीतरी संबंध असलाच पाहिजे असे सर्वांनाच वाटत होते .वाटमारी गेले सहा महिने सुरू होती .नानासाहेबांना जाऊन पाच सहा वर्षे झाली होती .संपन्नतेचे रहस्य वाटमारीत नव्हते हे उघड उघड दिसत होते .

परंतु नानासाहेबांच्या मृत्यूशी संपन्नता निश्चित जुळलेली होती .झाले होते ते असे .नानासाहेबांचे वय झाले होते .त्यांची पंचाऐशी उलटून गेली होती .काहीतरी आजार होऊन ते अंथरुणावर शेवटच्या घटका मोजीत होते .त्यांच्या जवळ त्यांचे दोन मुलगे व तीन मुली बसल्या होत्या. नानासाहेबांना काहीतरी मुलांना सांगायचे होते.परंतु त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता .ते बोलण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत होते .त्यानी एकदा पा पा असे म्हटले .त्यांना बहुदा पाणी हवे असावे असे वाटून एका मुलाने पाणी चमच्यातून त्यांना पाजण्याचा प्रयत्न केला.त्यावर त्यांनी हाताने चमचा बाजूला ढकलला व पुन्हा पा पा असे करू लागले.त्यावेळी त्यांची नजर व हात नक्की काय दाखवत होते ते कळत नव्हते .नंतर केव्हा तरी ते जी जी असे म्हणत आहेत असे वाटले.त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या और्ध्वदेहिकानंतर मुलांच्या मनात तोच विषय घोळत होता .नानांना आपल्याला काहीतरी सांगायचे होते .परंतु ते काय सांगत होते यावर एकमत होत नव्हते.शेवटी ते काहीतरी बडबड करीत असावेत असा निष्कर्ष काढण्यात आला .तिन्ही मुली आपापल्या घरी निघून गेल्या .रघू व दामू यांच्या डोक्यातून मात्र तो विषय जाईना.शेवटी एक दिवस रघुला डोक्यात एकदम एक कल्पना आली .जी म्हणजे जिना तर नसेल ना ?जिन्याबद्दल नानासाहेबांना काय सांगायचे असावे?जिन्याखाली काही पुरले तर नसावे ?की जिना चढून वर गेल्यावर तिथे कुठे तरी काही तरी आहे ?कि जिन्यातच काही तरी आहे .तेवढ्यात त्यांना पा हा शब्द आठवला .पा म्हणजे पायरी.पाणी नव्हे . जिन्याच्या पायरी मध्ये काहीतरी असावे असे त्यांना वाटू लागले .वाडा दुमजली होता .वाडा चौसोपी होता .प्रत्येक बाजूकडून वर जाण्यासाठी जिना होता .असे  वाड्याला एकूण सोळा जिने होते .प्रत्येक जिन्याला सोळा पायऱ्या होत्या .म्हणजे एकूण दोनशे छप्पन पायऱ्या होत्या.यातील कुठच्या पायरी मध्ये किंवा किती पायऱ्यांमध्ये काय आहे कि नाही असा सर्वच  गोंधळ होता .

रघू व दामू यांची डोके तल्लख होती.त्यांनी जिन्यांची पाहणी सुरू केली .सोळा जिन्यांपैकी चार जिने खालून फळ्या मारून बंद करण्यात आले होते.काही असले तर ते या जिन्यामध्ये असणार असे त्यानी पक्के ठरविले. ही सर्व पाहणी त्यांना कुणालाही संशय येऊ न देता गुपचूपपणे करायची होती . या चार जिन्यापैकी एका जिन्याला खिळे न मारता स्क्रू लावण्यात आले आहेत असे त्यांना आढळून आले.रात्रीच्या वेळी त्यांनी ते स्क्रू  काढण्याचा प्रयत्न केला.एक दिवस त्यांना त्यात यश मिळाले .एका पायरी मध्ये एक डबा लपविलेला त्यांना आढळून आला .त्या डब्यांमध्ये त्यांना शिवकालीन एक एक तोळ्याचे शंभर नंबरी शंभर होन आढळून आले.बघता बघता दोघेही तीस पस्तीस लाखांचे धनी झाले .

दोघेही हुषार असल्यामुळे आलेली संपत्ती हवी तशी न उडविता त्यानी त्याचा विनियोग उत्पादक कार्यांमध्ये व्यवस्थितपणे केला .अर्ध्या वाड्याचे हॉटेलमध्ये रूपांतर ,उजाड डोंगरांवर कलमांची लागवड ,असलेल्या कलमांची डागडुजी करून दरवर्षी उत्पन्न येईल अशी व्यवस्था करणे ,असलेल्या जमिनीमध्ये योग्य पिके काढणे, अशाप्रकारे संपत्तीचा योग्य वापर करून त्यांनी आपल्या संपन्नतेत आणखी भर घातली .

रघू शेठ जवळ गप्पा मारता मारता यातील काही धागे श्यामरावांना मिळाले .सुताने स्वर्गाला जाण्याची त्यांची सवय असल्यामुळे त्यांनी पूर्ण इमारत तयार केली .या सर्वात बेकायदेशीर असे शामरावाना काहीच आढळले नाही.त्यामुळे ज्या मूळ कारणासाठी शामराव या गावात आले होते ते रहस्य अजून रहस्यच होते.

या होन असलेल्या डब्याच्या शेजारी एक लहानशी पेटी होती .त्यात एक लांबलचक पितळेची किल्ली होती .ही गोष्ट फक्त रघू व दामू यांनाच माहिती होती .

(क्रमशः) 

प्रभाकर  पटवर्धन   

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel