मधू व मधुकर ही एक कबुतराची जोडी होती .ती एकमेकावर प्रेम करीत असणार हे आपण ओळखले असणारच.ती दोघे बाल मित्र मैत्रिण होती?  शाळेत ती एका वर्गात होती ?ती दोघे एका शाळेत होती?एका कॉलेजात होती ?एका चाळीत होती ?एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहत होती ?एका ऑफिसमध्ये काम करीत होती ?एका ट्रेनने प्रवास करीत होती ? एका खेड्यात एका शहरात एका उपनगरात राहत होती ?ती दोघे एका जातीची होती ?त्यांची जात वेगवेगळी होती ?त्यांचा धर्म एक होता की निराळा होता ?त्यांच्या वयात फार अंतर होते ?मधू मोठी व मधुकर लहान असे काही होते ?त्यांची मातृभाषा भिन्न होती ?एका कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या निरनिराळ्या ऑफिसमध्ये ती काम करीत होती ?दोघे परस्परांना अनुरूप होती का नव्हती?उजळ कोण होते ?सावळे कोण होते? गोरे कोण होते?आकर्षक कोण होते? नाकीडोळी नीट कोण होते ?कमी शिकलेले कोण होते ?जास्त शिकलेले कोण होते ?दोघेही सुशिक्षित होती की दोघेही अशिक्षित होती? 

असे किंवा या स्वरूपाचे अनेक प्रश्न तुमच्या मनात कदाचित उभे राहिले असतील .परंतु आपल्याला या गोष्टीशी काय करायचे आहे .प्रेम,~धर्म जात वय भाषा सौंदर्य काहीही पाहत नाही .प्रेम केव्हा बसते, कुणावर बसते?  का बसते? या सगळ्याचा काही फॉर्म्युला नाही. हेहि आपल्याला माहीत आहेच.प्रेम बसले की बसले तिथे काही इलाज उपाय नाही .हेही आपल्याला माहीत आहे .प्रेम हा असा दुर्धर रोग आहे की तो कुणीही बरा करू शकत नाही .हेही आपल्याला माहीत आहेच .सहसा तरुण युवक व युवती प्रेमात पडतात हेही आपल्याला माहीत आहेच.परंतु प्रेमाला वयाचे महत्त्व नसते हेही आपण ऐकले असेलच ?वय काय बघता? मन तरुण आहे की नाही ते पाहा? असेही काहीजण म्हणतात .

तर आपल्याला वरील गोष्टींशी काहीही कर्तव्य नाही हे आपण ओळखले असेलच .तर मधु व मधुकर ही कबुतराची जोडी होती आणि त्यांचे सारखे गुटर्गू  चाललेले असे.त्यांची भेटण्याची ठिकाणे विविध होती.

कधी या बागेमध्ये त्या कोपऱ्यात तर कधी त्या बागेमध्ये या कोपर्‍यांत.

कधी त्या थिएटरमध्ये  इकडची कडेची सीट तर कधी  या थिएटरमध्ये तिकडची कडेची सीट .

कधी जवळच्या रेस्टॉरंटमध्ये कधी दूरच्या रेस्टॉरंटमध्ये .

कधी हॉटेलात बाहेर उघड्यावर चारचौघांमध्ये ,तर कधी फॅमिली रूममध्ये फक्त तो व ती ,मधु व मधुकर .

कधी कॉलेजच्या रेस्टॉरंटमध्ये, कधी कॉलेजच्या हिरवळीवर,कधी कॉलेजच्या क्लासरुममध्ये एका कोपऱ्यात, एका बाकावर .

ती दोघे नेहमी भेटण्याची ठिकाणे बदलत असत .कुणी बघितले तर? ती घाबरत होती असे नव्हे परंतु उगीचच इतक्यात  घरच्यांना माहित होऊ नये असे त्यांना वाटत असे .रेस्टॉरंट्स बागा थिएटर्स  निवडताना शक्यतो दूरची निवडत असत.आपल्याला शक्यतो ओळखीचे कुणी भेटू नये असा हेतू त्यामागे असे.कुणी भेटल्यास आपल्या घरी कळू नये त्याचप्रमाणे आपला एकांत भंग होऊ नये यासाठी अशी काळजी घेतली जाई.

शहरातील सर्व बागा सर्व रेस्टॉरंट्स सर्व थिएटर्स मध्ये अनेकदा जाऊनही झाले .पुन्हा पुन्हा तिथे जाण्या ऐवजी आणखी कुठेतरी जाऊन भेटावे असे दोघांनाही वाटू लागले.

प्रत्येकाला आयुष्यात मागे वळून पाहताना आपण हे केले आपण ते केले असे वाटले तर एक मानसिक समाधान मिळते .परंतु हे करायचे राहून गेले ते करायचे राहून गेले असे झाले तर निष्कारण एक हुरहूर मनांमध्ये राहून जाते .आयुष्य कोणासाठी थांबत नाही .वर्तमानाचा आस्वाद घेण्याऐवजी भूतकाळात किंवा भविष्यकाळात रमणारेच फार .

शाळेच्या,कॉलेजच्या, ऑफिसच्या,पिकनिकला ती अनेकदा बरोबर गेली होती . चार मुले , चार शिक्षक, चार सहकारी  बरोबर आहेत म्हणजे घरच्यांना काही मुलीची काळजी नसे. मैत्रिणी बरोबर आहेत असे म्हटले म्हणजे तर दुधात साखरच .पिकनिकला अनेकदा जाऊन त्यांनी सर्वांसमक्ष किंवा सर्वांना चुकवून धमाल केली होती .

धमाल करण्याचेच  त्यांचे दिवस होते.धमाल करण्याचेच त्यांचे वय होते. ना कसली जबाबदारी.ना कसले ओझे.ना कसले ताण तणाव.स्वच्छंदपणे विहरण्याचे त्यांचे दिवस होते.मधू व मधुकर या दोघांना आपण जरी जमिनीवर चालत असलो तरी आकाशातून उडत  आहोत आणि जमिनीवरील सर्व माणसे क्षुद्र प्राणी आहेत.बिचारे संसाराच्या कर्दमात रुतलेले असे वाटत असे .

ते वयच तसे असते .तो काळच तसा असतो. आपण युद्धिष्ठिराप्रमाणे जमिनीवरून  चार अंगुळे अधांतरी चालत आहोत असा भास होत असतो .दिवसा व रात्री स्वप्ने पाहण्याचे दिवसा डोळे उघडे ठेवून स्वप्ने पाहण्याचे दिवस . भावविश्वामध्ये मनोरंजनामध्ये गुंगून जाण्याचे दिवस .स्वप्नांना काल्पनिक  मनोरंजनाला मर्यादा नसते .

मधुकरला काहीतरी थ्रीलिंग करावे असे वाटत होते .तुमच्या मनात काही भलते सलते आले असले तरी मधुकरच्या मनात तसे काही भलते सलते नव्हते.त्याची एक साधी इच्छा होती .

गर्दीपासून गजबजाटापासून मित्र मैत्रिणीपासून, नातेवाईकांपासून 'ओळखीच्या लोकांपासून ,अनोळखी लोकांपासून,दूर दूर कुठे तरी फक्त फक्त दोघांनीच जावे .त्याला पाऊस व समुद्र खूप आवडत असे .पावसाच्या सुरुवातीला समुद्राचे रूप रौद्र होते .समुद्र लाल होतो.समुद्राकडे बघितले तरी भीती वाटते. उंच उंच लाटा येत असतात .त्या स्वतःशीच पिळल्यासारख्या पिळवटल्यासारख्या फिरत असतात .त्याच वेळी पावसाच्या सुरुवातीला काळ्या काळ्या ढगानी आकाशात गर्दी केलेली असते.जवळ किंवा दूर आकाशात लख्खकन वीज चमकते डोळे दिपतात आणि ती विजेची लकेर  समुद्रात ओढली जाते.त्या पाठोपाठ कमी जास्त वेळाने आकाशात ढगांचा प्रचंड गडगडाट कान बहिरे करून टाकतो. एकाच वेळेला भीती वाटते आणि आपण संमोहितही होतो.त्याचा पुन्हा पुन्हा अनुभव घ्यावा आणि घेऊ नये  असे एकाच वेळी वाटत असते. त्यात जोरात पाऊस पडत असला तर आणखी मजा येते .पावसाच्या धारा अंगावर घेण्यात,त्या धारांखाली चिंब  भिजण्यात, अंगावर येणाऱ्या गार वाऱ्याने शहारण्यात,हिरवळीने व्यापलेल्या डोंगरावर फिरण्यात ,डोंगरापलीकडील खडक व त्यावर आपटणाऱ्या लाटा पहाण्यात, लाटांची खडकावर आपटल्यामुळे उडणारी उंच उंच कारंजी बघण्यात खूप मजा येते .

हे सर्व मधुकरला आवडत होते .ते मधूनेही बघावे आणि त्याचा आनंद व मजा घ्यावा असे त्याला वाटत होते.केव्हा तरी गप्पा मारताना बोलताना त्याने या रौद्र दृश्याचा उल्लेख केला होता . तसे दृश्य मधूने पाहिले नव्हते .पाहण्याची इच्छा  प्रगट केली होती.

पाऊस जवळ आला होता.आकाशात काळे ढग गर्दी करू लागले होते .काळ्या ढगांची फौजच्या फौज समुद्राच्या क्षितीज रेषेवरून झपाट्याने वरवर येत होती.ढग पाऊस पडल्याशिवाय डोक्यावरून पलीकडे निघून जात होते .पावसाला केव्हाही सुरुवात होईल असे वाटत होते . मधुकरला मधूची तीव्रतम आठवण येत होती .तिच्याबरोबर हातात हात घालून समुद्र किनाऱ्यावर फिरावे, डोंगरावर फिरावे,हा सर्व निसर्ग उत्सव, वर्षा उत्सव, डोळेभरून तिच्यासोबत पाहावा असे त्याला तीव्रतेने वाटत होते .ओलेत्या मधूचे शिरशिरी आलेले अंग आपल्या बाहूत घेऊन ती शिरशिरी घालवावी असे त्याला उत्कटतेने वाटत होते .त्याचप्रमाणे डोंगराच्या पायथ्याला  टपरीमधील चहाविक्रेत्याकडे त्याच्या बाकावर बसून गरमगरम चहा घोट घोट घ्यावा . आपल्या कपातील चहाचा घोट हळूच तिला पाजावा.तिने तिच्या कपातील चहाचा घोट आपल्याला पाजावा. टपरीवाला तळीत असलेल्या गरम गरम भज्यांचा सुवास छाती भरून  घ्यावा.भज्यांची प्लेट मागवून त्यातील भजी एकमेकांनी एकमेकांना भरवावी. शक्यतो आपण दोघेच असावे .शेजारी बसणाऱ्या आजीकडून भुट्टा घ्यावा.आलटून पालटून दोघांनी त्या मक्याच्या कणसाचा आस्वाद घ्यावा . पुन्हा चहा घ्यावा .पुन्हा भुट्टा घ्यावा. इतर कुणी नसेल तर उत्तमच असलेच तर ते अनोळखी असावेत.अश्या मनोरंजनात दिवास्वप्नात मधुकर हरवलेला होता.   

मधुकर दिवा स्वप्नातून जागा झाला . यावेळी मधू आपल्याजवळ पाहिजे असे त्याला उत्कटतेने वाटत होते.त्याने मधूला फोन केला .रिंग वाजली मधूने फोन उचलला ."पावसाला सुरुवात होत आहे. मी तुझ्याजवळ अनेकदा समुद्रावर पाहिलेले दृश्य वर्णन केले आहे.समुद्रावर फिरण्याची हीच वेळ आहे .तू डोंगराजवळ ये .मी तुझी वाट पाहात आहे ."एवढे बोलून त्याने फोन ठेवला . 

शहराला दोन समुद्र होते .एक काळा समुद्र ज्यावरील वाळू काळी होती .तो शहराच्या जवळ होता .दुसऱा पांढरा समुद्र या समुद्रावरील वाळू पांढरी होती.हा दूर होता .दोन्ही समुद्रांना दोन वेगवेगळे डोंगर होते.काळ्या समुद्रावर बऱ्यापैकी गर्दी असे .पांढरा समुद्र दूर असल्यामुळे सहसा तिकडे कुणी जात नसे .भेळ पकोडे चहा इत्यादी गाड्या काळ्या समुद्रावर असत.तिथे त्यांचा धंदा बऱ्यापैकी चालत असे . पांढऱ्या समुद्रावर तुरळक लोक येत .इथे चहाची एकच टपरी होती .हंगामात मक्याची कणसे भाजून विकणारी आजीही तिथे बसत असे.

संध्याकाळचे पाच वाजले होते .आकाशात ढगांनी दाटी केल्यामुळे आताच रात्र  झाल्यासारखे वाटत होते .मधु सायकलवरून येईल की स्कूटरवरून येईल त्याचा तो अंदाज बांधत होता. तो पांढऱ्या समुद्रावरच होता .दूरवर दिसणाऱ्या रस्त्यावर त्याची नजर होती.इतक्यात तिची सायकल किंवा स्कूटर दिसणे अपेक्षित होते .आपण कुठचा समुद्र ते तिला सांगितले नाही याची त्याला अकस्मात आठवण झाली.फोन करून तिला पांढरा समुद्र असे सांगण्यासाठी त्याने प्रयत्न केला .रिंग वाजत होती परंतु ती फोन उचलत नव्हती .बहुदा ती स्कूटरवर असावी त्यामुळे तिला रिंग एेकू येत नव्हती .ती काळ्या समुद्रावर तर जाणार नाही ना अशी शंका त्याला निर्माण झाली .त्याने पांढरा समुद्र तिथला डोंगर त्यावरून दिसणारे समुद्राचे रौद्र स्वरूप असे वर्णन तिला अनेकदा ऐकविले होते .घाई गर्दीत ती काळ्या समुद्रावर तर जाणार नाहीना अशी आशंका होतीच.त्याने पुन्हा एकदा प्रयत्न केला .रिंग वाजत होती. ती फोन उचलत नव्हती.ती अजूनही येत नव्हती .मुळात ती स्वतःहून येईल का ?कि ती येण्याला घाबरेल? ती घरच्यांना काय सांगेल ?अशा संध्याकाळी पावसात तिला बाहेर जायला परवानगी मिळेल का ? ती काळ्या समुद्रावर तर जाणार नाही ना ?अनेक शंका अनेक कुशंका !!

*एवढ्यात त्याला दूरवरून ती येताना दिसली .त्याच्या आवडीचा गुलाबी ड्रेस तिने घातला होता. क्षणाक्षणाला ती जवळ येत होती .आणि त्याच वेळेला पाऊस पडण्याला सुरुवात झाली .*

२२/४/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel