सुभान रावांना सैन्यामधून निवृत्त होऊन पन्नास पंचावन्न वर्षे झाली होती.आज त्यांचे वय ऐशी वर्षे होते.सैन्यातून निवृत्त झाल्यावर पहिली पाच दहा वर्षे त्यांना सैन्यातील स्वप्ने पडत असत .आपण पंचवीस  किलोमीटरचा मार्च करीत आहोत .जंगलात अन्न पाण्याविना  एकेक दोन दोन दिवस राहावे लागत आहे .आपण खडकावरून उडय़ा मारीत आहोत .जंगलातून सरपटत सरपटत हळूहळू शत्रूच्या दिशेने पुढे सरकत आहोत.खंदकात बसून शत्रूवर मारा करीत आहोत .बर्फ पडत आहे बॉम्बचा वर्षाव होत आहे उखळी तोफांचा आवाज येत आहे .स्वप्ने पडली कि ते बऱ्याच वेळा दचकून उठत .तर काही वेळा स्वप्नात शत्रूवर आक्रमण करीत असत व विजयी होत असत .ते पॅराट्रुपर्स असल्यामुळे विमानातून आपण उड्या मारीत आहोत अशीही स्वप्ने त्यांना पडत असत.त्यावेळी ते कितीही संकटात असले तरी कधीही घाबरून स्वप्नातून जागे होत नसत.शत्रूने पकडले अंगावर गोळ्या बसून अंगाची चाळण झाली तरी सुद्धा ते कधी घामाघूम होत नसत .जशी वर्षे लोटली तशी स्वप्ने पडण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले .शेवटी तर त्यांना सैन्यातील स्वप्न पडण्याचे कायमचे बंद झाले .

गेल्या चाळीस वर्षात त्यांना कधीही सैन्याबद्दलचे स्वप्न पडले नव्हते.वय वाढले तशी ताकद कमी होत गेली.कंबरेत किंचित बाक आला. संधिवाताचे दुखणे जडले.हातात काठी आली.केव्हा केव्हा वॉकर घेऊन चालावे लागे.हौशीने त्यांनी बंदूक घेतली होती . निवृत्त सैनिक म्हणून त्याना ती कमी किमतीत मिळाली होती .त्या बंदुकीने त्यांनी अनेक शिकारी केल्या होत्या .शेताला होणारा रानडुकरांचा उपद्रव  तर कमी केलाच .पण एकदा तर जनावरे मारणाऱ्या ढाण्या वाघाची शिकार केली होती .त्या काळी वाघांच्या शिकारीवर बंदी नव्हती.त्यांनी  वाघाचे कातडे कमावून ते हॉलमध्ये अंथरले होते .तर मुंडके पेंढा भरून खुंटीवर टागले होते .त्यांना युद्धांमध्ये मिळालेली पदके ही काचेच्या शोकेसमध्ये नेहमी पॉलिश करून  ठेवलेली असत .शेतीचे येणारे उत्पन्न व  मिळणारे पेन्शन यांमध्ये त्यांचे व्यवस्थित भागत असे .त्यांना मूलबाळ नव्हते .आपल्यामागे सारजाबाईंचे कसे होईल याची चिंता त्यांना वाटत असे .

असे सर्व काही ठाकठीक असताना त्यांना पुन्हा सैन्यातील स्वप्ने पडू लागली .अगदी रोज नाही तरी दोन चार दिवसाआड निदान आठवड्यातून एकदा तरी स्वप्न पडले नाही अशी रात्र जात नसे .

हल्ली स्वप्ने पडली की त्यांना भीती वाटत असे .स्वप्नातून ते घाबरेघुबरे होऊन उठत .केव्हा केव्हा त्यांना दरदरून घाम फुटे.सारजाबाईंना त्यांची काळजी वाटू लागली .त्यांना घेऊन ते डॉक्टरकडे गेले .

डॉक्टरनी अपचनामुळे स्वप्ने पडत असतात असे सांगितले .रात्री तुम्ही सहाच्या आत सूर्यास्त व्हायच्या अगोदर जेवत जा.  व नंतर जमेल तेवढे चाला म्हणजे गाढ झोप लागेल व स्वप्ने  पडणार नाहीत ,असा उपाय सांगितला.आठ पंधरा दिवस चांगले गेले जवळजवळ महिना झाला आणि नंतर पुन्हा स्वप्नमालिका सुरू झाली . 

आता डॉक्टरनी त्यांची तपासणी केल्यावर त्यांना थोडा हार्ट प्रॉब्लेम आहे असे सांगितले. छातीवर हाताची घडी ठेवून झोपू नका छातीवर उशी ठेवू नका इत्यादी सल्ले दिले .पुन्हा काही दिवस चांगले गेले आणि स्वप्ने पडू लागली .स्वप्ने कुठची तरी न पडता ती सैन्यातीलच असत .

आता डॉक्टरने तपासणी करून त्यांना  मानसरोगतज्ञाकडे जाण्याचा सल्ला  दिला.त्याने तुम्ही सैन्यात जरी कितीही शौर्य गाजविले असले कितीही पदके तुम्हाला मिळाली असली तरी कुठे तरी तुम्हाला मृत्यूची भीती वाटत असल्यामुळे खोलवर ही भीती रुजून बसलेली आहे आणि त्यामुळे स्वप्ने पडतात असे सांगितले .काही औषधे काही इतर ट्रिटमेंट वगैरे दिली .दोन तीन महिने चांगले गेले .आता स्वप्न मालिकेतून आपली सुटका झाली असे त्यांना वाटू लागले .आणि पुन्हा तीच स्वप्ने पडू लागली .

ते पुन्हा आपल्या पहिल्या फॅमिली डॉक्टरकडे आले .त्यांनी त्यांना आता झोपेच्या गोळ्या दिल्या .या गोळ्यांमुळे तुम्हाला शांत झोप लागेल स्वप्ने पडणार नाहीत .अजिबात घाबरू नका.असे आश्वासन दिले .पुन्हा काही महिने चांगले गेले .आणि पुन्हा स्वप्न मालिका सुरू झाली .आता सुभानराव व सारजाबाई यानी डॉक्टरकडे जाण्याचे बंद केले होते.

एका रात्री त्यांना पुढील प्रमाणे स्वप्न पडले .ते सैन्यात होते . सार्जंटकडून त्यांना बोलावणे आले .ते कसेबसे हळूहळू चालत सार्जंटच्या  पुढ्यात जाऊन उभे राहिले .त्यांना कडक सलामही ठोकता येईना .थरथरत्या हातांनी त्यांनी सॅल्यूट केला .सार्जंटने त्यांना ताठ उभे राहण्यास सांगितले .ते म्हणाले मला आता संधिवात आहे मी एक्याऐशी वर्षांचा म्हातारा आहे .मी ताठ कसा काय उभा राहणार ?तुम्ही मला सैन्यात कशाला परत बोलाविले आहे .सार्जंट म्हणाला ते काही चालणार नाही .युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व निवृत्त सैनिकांना बोलाविले आहे . तुम्हाला परेड करावीच लागेल. तुम्हाला सैन्याची सर्व शिस्त पाळावीच लागेल .तुम्ही नाही म्हणू शकत नाही.जर तुम्ही आज्ञापालन केले नाही तर तुमचे कोर्ट मार्शल करण्यात येईल. सुभानराव थरथर कापू लागले. त्यांना धड उत्तर देता येईना.त्यांची जीभ जड पडली.शब्द लुबडा येऊ लागला.झोपेत ते जोरजोरात ओरडू लागले .सारजाबाई जाग्या झाल्या.त्यांना सुभानराव झोपेत घाबरले आहेत हे लक्षात आले त्यांनी त्यांना हलवून जागे केले .सुभानराव जागे झाले ते घामाने निथळत होते .त्या रात्री त्यांना पुन्हा झोप लागली नाही .

दुसऱ्या रात्री त्यांना झोपण्याची भीती वाटू लागली .झोपेची गोळी त्यांनी घेतली. नंतर केव्हातरी झोप लागली..ते बराकीमध्ये झोपले होते .पहाटे साडेचार वाजता बिगुल वाजू लागला .त्यांना तयार होऊन ग्राऊंडवर साडेपाच वाजता येण्याचे फर्मान होते.बराकीत ते कॉटच्या वरच्या  मजल्यावर झोपले होते .तिथून तो छोटासा जिना उतरून त्यांना खाली येता येईना. ग्राऊंडवर वेळेवर हजर राहण्यासाठी ते खटपट करून खाली उतरू लागले.त्यामध्ये ते जिन्यावरून खाली पडले व त्यांना जाग आली. कॉटवरून ते खाली कोसळले होते. सुदैवाने मोडतोड न होता मुका मार लागण्यावर निभावले .सारजाबाईंच्या मदतीने व कॉटला धरून ते कसेबसे कॉटवर बसले .

तिसऱ्या रात्री त्यांना आपण एकदम ग्राउंडवर आहोत असे स्वप्न पडले.त्यांना मार्च करण्यास सांगण्यात आले होते .त्यांना बंदूक नीट धरता येत नव्हती .बंदूक डोक्यावर धरून त्यांना ग्राउंडला तीन चकरा मारण्याची शिक्षा देण्यात आली .त्यांचे हात वर सरळ होईनात बंदूक वर घेता येईना त्यांना दरदरून घाम फुटला .आणि ते जागे झाले .

त्यांना शांत झोप लागावी म्हणून सारजाबाईंनी नवरत्न तेल त्यांच्या डोक्यावर भरपूर जिरविले.त्या रात्री त्यांना गाढ झोप लागली . स्वप्न मुळीच पडले नाही .एक दोन महिने चांगले गेले .डोक्यावर नवरत्न तेल चोळणे हा एक नवा उद्योग सारजाबाईंना झाला .

आणि पुन्हा एक रात्री सुभानरावाना स्वप्न पडले .स्वप्नात त्यांना जंगलातून खडतर परिस्थितीतून जोरात शत्रूवर आक्रमण करायचे होते .आज जंगलात सुभानराव त्यांच्या काठीसह आले होते . स्वप्नात असूनही त्यांना आपण आपल्या काठीसह इथे कसे आलो याचे आश्चर्य वाटत होते .वॉकर आणला असता तर जास्त बरे झाले असते असेही त्यांना वाटत होते .जंगलातील चढउतार अडथळे काटेकुटे यातून त्यांना पुढे जाता येईना .त्यांच्याबरोबरचे सैनिक पुढे निघून गेले .मला घेऊन जा. मला घेऊन जा असा ते आक्रोश करीत होते.परंतु कुणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही .घनघोर अंधार .काळी रात्र . जंगलातील पशुपक्ष्यांचे विचित्र आवाज .आपल्या अंगावर चारी बाजूंनी वाघ धावत येत आहेत असे त्यांना वाटले. आणि ते  घाबरून ओरडत उठले .सारजाबाई दचकून जाग्या झाल्या .शेजारी सुभानराव झोपेतच ओरडत होते .ते घाबरून स्वप्नात जागे झाले होते .सारजाबाईंनी त्यांना हलवून हलवून जागे केले .ते जागे झाले तो त्यांना आपण सुरक्षित कॉटवर झोपलेले आहोत असे आढळून आले .त्यांना हसावे की रडावे ते कळेना .ही सैन्यातील स्वप्न मालिका थांबविण्यासाठी काय करावे ते त्यांना उमगेना .

तो आठवडा चांगला गेला .आपली भयाण स्वप्नातून सुटका झाली असे त्यांना वाटू लागले.ते जरा समाधानाचा सुस्कारा सोडतात न सोडतात तो त्यांना पुन्हा स्वप्न पडले.या वेळी ते खंदकात होते .शत्रूकडून अविरत गोळ्यांचा मारा केला जात होता .ते मधूनच डोके वर करून शत्रूचा वेध घेत होते . अॅटोमॅटिक रायफलमधून गोळ्यांच्या अनेक फैरी झाडत होते.गोळ्या झाडण्यासाठी उठत असताना त्यांच्या कंबरेत एकदम उसण भरली .त्यांना अजिबात हालचाल करता येईना .अकस्मात त्यांच्या आसपासचे त्यांच्या बटालियनमधील सैनिक गायब झाले.शत्रू सैनिक फैरी झाडत धावत खंदकाच्या दिशेने येत होते . ते पकडले जाणार एवढ्यात जागे झाले .घामाने गादी ओली झाली होती .त्यांचे संपूर्ण शरीर घामाने निथळत होते. ते जागे झाले म्हणून वाचले .नाही तर सैनिकांच्या गोळ्यांनी एक ते मेले असते किंवा शत्रू सैनिकांनी त्यांना कैद केले असते .त्यांनी योग्य वेळी जागे झाल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला .

काही आठवडय़ांनी त्यांना पुन्हा एक स्वप्न पडले .यावेळी त्यांना पॅराशूटमधून शत्रू सैनिकांच्या मागे जंगलात उतरायचे होते .रात्रीच्या गडद अंधारामध्ये विमानातून शत्रू सैन्याच्या पाठिमागच्या बाजूला गेले.एकामागून एक सैनिक विमानातून उड्या मारीत होते . त्यांनीही त्यांच्या वॉकर सकट पॅराशूट पाठीवर असताना उडी मारली .दुर्दैवाने त्यांची पॅराशूट उघडली नाही. दगडासारखे ते आकाशातून जमिनीवर येऊ लागले .आणि त्यांना जाग आली .जर वेळेवर जाग आली नसती तर ते जमिनीवर आपटून छिन्नविछिन्न  झाले असते. थोडक्यात बचावले.

त्यांच्याबरोबर सैन्यातून निवृत्त झालेले अनेक सैनिक त्यांच्या माहितीचे होते .त्यातील काही सैनिक तर गावातीलच होते .त्यांचे गाव सैन्यात भरती होण्यासाठी सुप्रसिद्ध  होते .त्यांनी त्यांच्या मित्राना त्यांना अशी काही स्वप्ने पडतात का म्हणून विचारले .त्यावर त्यांनी हसून मुळीच नाही म्हणून सांगितले . त्यांना त्यांच्या मित्रांनी तुम्ही हवापालट करा म्हणजे स्वप्ने पडण्याचे थांबेल म्हणून सांगितले .महाबळेश्वरला त्यांचा एक मित्र राहात होता .तो त्यांना त्यांच्याकडे अनेक दिवस बोलावीत होता .त्यांनी त्याच्याकडे काही दिवस राहण्यासाठी जाण्याचे ठरविले .महाबळेश्वरला थंड हवेच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना मुळीच स्वप्न पडले नाही .परंतु महाबळेश्वरला किती दिवस राहणार ?त्यांच्या मित्राने त्यांना तू इथे खोली घेऊन राहा म्हणून सांगितले .परंतु सुभानरावांची शेती होती मोठे घर होते ते सोडून महाबळेश्वरला कसे राहणार ?त्यावर त्यांच्या मित्राने सल्ला दिला की तू एसी बसवून घे.तुला उष्ण हवेमुळे स्वप्ने पडतात .थंड हवेत डोके थंड राहील स्वप्ने पडणार नाहीत .सुभानरावानी लगेच एसी बसवून घेतला.नंतर ते पुन्हा आपल्या घरी राहण्यासाठी आले .आता त्या भयानक स्वप्नांपासून आपली सुटका झाली आहे त्यांना वाटत होते.

एसी बसविल्यापासून एक वर्ष चांगले गेले.पाऊस थंडी काहीही असो ते नेहमी एसी लावत असत .त्यांच्या बायकोला एसी सहन होत नसे.ती बिचारी रग पांघरून  झोपत असे.तिला शेवटी सर्दी होऊ लागली .काही केल्या सर्दी हटेना.शेवटी डॉक्टरनी एसी तरी बंद करा किंवा वेगळ्या खोलीत झोपत जा असा सल्ला दिला .सारजाबाई मुलखाच्या हट्टी त्यांना आपल्या पतीला सोडून कुठेही राहायचे नव्हते.तसाच त्रास सोसत त्या एसीमध्ये सुभानरावांबरोबर  झोपत असत  .

अशीच दोन वर्षे गेली आणि सुभानरावाना पुन्हा मिलिटरीतील स्वप्न पडले .यावेळी वॉकर घेऊन ते फ्रंटवर होते .रायफल उचलत नसताना सुद्धा ते ती कशीबशी उचलून फायरिंग करीत होते.एवढ्यात शत्रूचा मोठा जमाव त्यांच्या अंगावर धावून आला .त्यांच्या अंगावर गोळ्यांची बरसात झाली .क्षणात त्यांचा देह छिन्नविच्छिन्न झाला .आणि त्यांनी मान टाकली .

सकाळी सारजाबाई उठल्यावर त्यांना आपल्या नवऱ्याला गाढ झोप लागलेली पाहून आनंद झाला.आठ वाजले तरी सुभानराव उठेनात.जवळ जाऊन पाहतात तो त्यांचे शरीर बर्फासारखे गार पडले होते .

१६/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to गूढकथा भाग २


गूढकथा भाग ४
कौटुंबिक प्रेमकथा भाग २
वस्ती
रहस्यकथा (युवराज कथा) भाग ३
रहस्यकथा (युवराज कथा) भाग २
भूतकथा भाग ३
भूतकथा भाग ४
प्रेमकथा भाग ४
रहस्यकथा भाग ३
प्रेमकथा भाग ३
गूढकथा भाग ३