गेले अनेक महिने आपण सगळे लॉक डाऊनमध्ये आहोत की लॉकअप मध्ये हेच कळत नाही. जाम बोअर व्हायला झालंय. भाजी आणण्याच्या निमित्तानं थोडंस बाहेर पडावं म्हटलं तर- "मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका हो" असा बायकोचा आग्रह ! अगदी केंद्र आणि राज्य सरकारपेक्षाही अधिक दमदार असाच तिचा आग्रह होता. मग काय, मास्क लावूनच घराबाहेर पडलो. मास्कची सवय नसल्याने मला अवघडल्यासारखं होत होतं, कोरोनाच्या इवल्याशा विषाणूची मनात खूप मोठी भीती मात्र साठली होती. त्या भीतीनंच खरंतर अधिक गुदमरायला होत होतं.

मी भाजी आणायला निघालो असलो तरी मी घराच्या बाहेर पडल्यावर माझे पाय भाजीबाजाराकडे वळेनातच. शेवटी मी भाजी आणायला न जाता समोरच्याच मंदिराच्या प्रांगणात जाऊन उभा राहीलो. मंदीरही लॉक डाऊन होते. मी डोळे मिटून तसाच उभा राहीलो. मिटल्या डोळयांनी बंद देवळातील परमेश्वरांचं दर्शन घेतलं. "कोरोनाच्या या महामारीतून जगाची लवकर सुटका कर बाबा" असं काहीसं मी पुटपटलो आणि काय आश्चर्य! जणु चमत्कारच झाला !

परमेश्वर माझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय असंच वाटलं मला. मी डोळे उघडून खात्री करायचा प्रयत्न करीत मंदीराच्या गाभाऱ्याकडं नीट पाहिलं तर तिथल्या परमेश्वराच्याही तोंडाला मास्क लावलेला होता. आमच्यातलं अंतरही भरपूर होतं; मात्र बंद असलेलं ते दार जाळीचं होतं त्यामूळे मला परमेश्वर स्पष्ट दिसत होता. मी म्हटलं - " देवा, आपण एकमेकांपासून पुरेसं दूर उभे आहोत. चांगलं सोशल डिस्टन्स राखलंय आपण. तुम्ही काय बोलताय ते कळत नाहीय. तोंडावरचा मास्क बाजूला करुन काय ते स्पष्ट बोला, म्हणजे मला नीट कळेल तरी."

माझं म्हणणं परमेश्वराला पटलं असावं. त्यानं पुढच्याच क्षणी आपल्या तोंडावरचा मास्क बाजूला केला. आणि तो पुन्हा एकदा बोलू लागला- "अरे मनुष्यप्राण्या, सृष्टीच्या निर्मितीपासुन मी हे सतत सांगत आलो आहे की, माझ्या इच्छेशिवाय या ब्रम्हांडात काहीच घडत नाही. मीच सर्वशक्तिमान आहे आणि माझा वावर सर्वत्र आहे. तू मला जिथे शोधशील, तिथे तुला मी नक्कीच दिसून येईल. पण तू स्वतःला कायम खूप शहाणा समजत राहीला आणि तूझी ती शहाणीव तशीच पुढे नेत राहीलास."  

परमेश्वराचा मनुष्य प्राण्यावरच्या नाराजीचा हा सूर ऐकून मी परमेश्वराला म्हणालो - " देवा, मी तर एक सामान्य, पामर माणूस आहे. मला समजेल असं काहीतरी बोला."

हलकंसं स्मित करीत परमेश्वर म्हणाला - "चल, सोड ते सगळं. आपण या विषयावर नंतर कधीतरी बोलू. सध्या तुझाही मूड काही ठीक दिसत नाही. काय झालंय तूला? तू इतका अस्वस्थ का आहेस?"

माझी परमेश्वर इतकी आपुलकीनं चौकशी करतोय हा अनुभव माझ्यासाठी अगदीचनवीन होता. आपलं मत मांडण्यासाठी हीच योग्य वेळ आणि संधी आहे हे लक्षात घेवून मी म्हटलं - " काय देवा, हा कोरोना कधी संपणार? हे तोडावरचं मास्क कधी हटणार? आणखी किती दिवस हे लॉक डाऊन? आमच्या रोजगाराचं, आमच्या खाण्या-पिण्याचं काय होणार? हे सारं तूझ्याच इच्छेने चाललंय का?"

आता परमेश्वरानं मला खुणेनंच थोडं जवळ यायला सांगितलं. मी बंद दरवाजाच्या जवळ जाऊन उभा राहीलो. परमेश्वर म्हणाला - अरे दीडशहाण्या ! हे कोरोनाच संकट माझ्या नाही, तूझ्याच इच्छेनं आलंय. माणसानं नेहमी मास्क वापरायला हवं असं सांगण्याचा प्रयत्न मी कितीतरी वेळा केला. कधी संताच्या तर कधी विचारवंताच्या मुखातून तुम्हाला मास्क वापरण्याविषयी मी खूपदा सांगीतलं. पण तुम्ही ऐकाल तर ना !"

माझ्या तोंडावरचा मास्क दाखवित मी म्हटलं - "देवा, हाच का तुम्ही म्हणताय तो मास्क?" ताबडतोब मला थांबवत परमेश्वर पुढं म्हणाला - " मी ज्या मास्क बद्दल बोलतोय, ते हे तुझ्या तोंडाला लावलेलं कापडाचं मास्क नव्हे ! मी वेगळ्याच मास्क बद्दल बोलतोय !"

आता मात्र माझं डोकं गरगरायला लागलं होतं. मी म्हटलं - " अरे देवा, या कापडाच्याच मास्कने आमचा जीव गुदमरायला झालाय, आणि तू आणखी कोणत्या मास्कबाबत बोलतोयस? "

'नको देवराया अंत आता पाहू' अशी माझी आर्जवी अवस्था झाली होती. माझी ही अवस्था पाहिल्यावर परमेश्वराचं दयाळू मन माझ्यासाठी द्रवलं. तो गाभाऱ्यातून उठून थेट जाळीच्या दरवाजाच्या बाहेर येवून माझ्या पुढ्यात उभा राहिला. मी साष्टांग नमस्कार करीत देवाला म्हटलं - "आता कृपा करा माझ्यावर. " देवानं माझ्या डोक्यावर हात ठेवला. स्मित करुन तो म्हणाला - "तथास्तू !"

पुढच्या काही क्षणात शक्तीपात व्हावा तसं काहीतरी झालं. आणि मला मास्कचा देवानं सांगितलेला अर्थ नीट समजला.

देवाची भेट झाली. दर्शन झाले. मला त्यांचा आशीर्वाद मिळाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शक्तीपात व्हावा तसं काहीसं झालं. या हृदयीचे त्या हृदयी झाले आणि देवाला अभिप्रेत असलेला आणि जो प्रत्येक माणसानं नेहमीच वापरला पाहिजे अशी देवाची तीव्र इच्छा आहे, तो 'मास्क' नेमका कोणता? याचं मला ज्ञान झालं. "हे मी सांगीतलेलं मास्क माणसानं नेहमी वापरलं तर हे कापडी मास्क पुन्हा पुन्हा वापरण्याची नामुष्की कदाचित उद्भवणार नाही" असं देवानं अखेरचं वाक्य उच्चारलं आणि तो माझा निरोप घेऊन पुन्हा गाभाऱ्यात निघून गेला.

वास्तविक देवानं आधी सांगीतल्याप्रमाणं या मास्कबाबत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने संतांनी पुष्कळदा सांगीतलं आहे. वेगवेगळया विचारवंतांनीसुद्धा आपल्या विचारवाणीतून या मास्कची गरज व महत्त्व याबाबत बरंच काही सांगीतलं आहे. कदाचित आपल्यापैकी अनेकांनी या मास्कबद्दल ऐकलेलं असेलही. काही भाग्यवंतांनी तर ते चांगलं समजुनही घेतलं असेल. देवाच्या मुखातून मास्क समजून घेताना मला भारावल्यासारखं होत होतं.

जे जे आपणाशी ठावे I
ते ते सकळांशी सांगावे ॥
शहाणे करुनि सोडावे I
सकळ जन ॥

या उक्तीप्रमाणे आज मी मला देवानं सांगीतलेलं हे 'मास्क' सर्वांना माझ्या आकलनाप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.

परमेश्वराचं सांगणं असं होतं की, "प्रत्येक मनुष्यानं त्याला मिळालेल्या विचार करण्याच्या शक्तीचा योग्य उपयोग करावा, स्वतःच्या गरजा, इच्छा, आवड -निवड, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, वृत्ती, प्रवृत्ती आणि स्वभावाला अनुसरुन स्वतःसाठी एक स्वतंत्र मास्क तयार करावं; आणि हे मास्क त्यानं सातत्यानं वापरायला हवं."

"कुणीही दुसऱ्याचं मास्क वापरता कामा नये. दुसऱ्याचं मास्क कितीही चांगलं, आकर्षक, आखीव आणि रेखीव असलं तरी ते आपल्या उपयोगाचं नसतं. प्रत्येकाला स्वतःच मास्क स्वतःच तयार करता येतं आणि आलंच पाहिजे." असं देव आग्रहानं सांगत होता.

देव म्हणाला - "हे मास्क चांगल्या रितीनं तयार करता यावं यासाठी तुला त्याची रचना क्रमाक्रमाने समजून घ्यावी लागेल. 'मास्क' मधील पहिला महत्वाचा घटक आहे Motivation म्हणजे प्रेरणा !  प्रत्येक मनुष्याला चांगली, योग्य व पुरेशी प्रेरणा मिळणे आवश्यक असते. ती तशी मिळावी म्हणूनच मी मनुष्याला वेगवेगळ्या इच्छा, गरजा, आवडी-निवडी दिल्या आहेत. त्यामधूनच त्याला प्रेरणा मिळत असते. स्वतःची प्रेरणा स्वतःला नीट ओळखता यावी. 'हीच ती आपली प्रेरणा' असं ठामपणे ओळखता यायला हवं. त्यासाठी आपलं मन प्रसन्न असावं लागतं. 'प्रसन्न मन' ही आपली अत्यंत महत्त्वाची निकड आहे. " असं देवानं मला निक्षून सांगीतलं. देवानं "मन करा रे प्रसन्न I सर्व सिद्धीचे कारण ॥" असं म्हणत संतवाणीचा दाखलाही दिला.

"तुम्ही माणसं, तुमच्या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी काहीच करत नाहीत. मग तुम्हाला प्रेरणा मिळणार कशी? भूतकाळाच्या बऱ्या- वाईट आठवणी आणि भविष्याच्या काळजीनं वर्तमानात जगण्याचा, त्यातून आनंद मिळवण्याचा तुमचा मार्ग धूसर होतो. तुमच्यासमोर काळोखी दाटते अन् तुम्ही निराश होता. या नैराश्याच्या गर्तेत तुम्ही अडकून राहाता आणि मग तुमच्या आजूबाजूला निसर्गात आणि समाजात  घडणाऱ्या अनेक उत्साहवर्धक, प्रेरणादायी गोष्टी तुमच्या निराश नजरेला दिसतच नाहीत. तुमचं प्रेरणास्थान किंवा तुमच्या प्रेरणेचं उगमस्थान असलेल्या तुमच्या इच्छा, आकांक्षा, गरजा, आवडी-निवडी याबाबत तुमच्या मनात एक विचित्र उदासीनता निर्माण होते आणि तुमचा प्रेरणास्रोत आटून गेल्याचा अनुभव तुम्हाला येतो. इथेच अपयशाचं पहिलं पाऊल तुमच्या आयुष्यात पडतं." देव सांगत होता.

देवानं पुढं असंही सांगीतलं- "हे अपयशाचं पाऊल तुमच्या आयुष्यात पडू द्यायचं नसेल तर तुम्हाला तुमचा प्रेरणेचा स्रोत शोधावा लागेल. या स्रोतामधून तुम्हाला योग्य ती प्रेरणा मिळवावीच लागेल. एकदा प्रेरणा मिळाली म्हणजे झालं असंही नसतं. हा प्रेरणास्रोत निरंतर असावा लागतो. मिळालेली प्रेरणा कायम जीवंत ठेवावी लागते. अनेकदा तुम्ही तुमच्या काही गरजा, इच्छा, आवडी-निवडी भागवून निश्चिंत होऊन जगू लागता. तुम्ही असे निश्चिंत झाल्याबरोबर तुमच्या प्रेरणा संपुष्टात येतात. तुम्हाला एक प्रकारची पठारावस्था येते. तुमच्या रोजच्या जगण्यात एक विचित्र असा सैलपणा येतो. हा सैलपणाच तुमच्या वाढ आणि विकासाला मारक ठरतो. तुमच्या जगण्याला असा सैलपणा येवू नये म्हणून तुम्ही तुमच्या प्रेरणेचा परिघ प्रयत्नपूर्वक मोठा करायला हवा."

देव पुढे बोलतच होता- "सभोवतालची परिस्थिती आणि आपल्या वैयक्तीक, कौटूंबिक आणि सामाजिक गरजा, इच्छा, आवड-निवड यातूनच प्रेरणा मिळते आणि तिचा परिघ मोठा करण्यासाठीही याच गोष्टींचा उपयोग करता येतो."

मास्कचा पहिला घटक 'प्रेरणा'. या प्रेरणेबद्दल पुष्कळ निरुपण केल्यावर देवानं मास्कचा पुढचा घटक समजून सांगायला सुरुवात केली. देव म्हणाला, "हे बघ बाळा, 'दृष्टीकोन' हा मास्कचा दुसरा आणि अतिशय महत्वाचा घटक आहे. तुम्ही लोक त्याला इंग्रजीत Attitude असं म्हणता." मी देवाला मध्येच थांबवत म्हणालो, "बरं झालं, तुम्ही हा दृष्टीकोनाचा विषय काढलात. त्याबद्दल मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. मी आता विचारु का?"  देवानं क्षणात होकार दिला. आणि मग मी एका दमात दोन प्रश्न देवाला विचारले. ते प्रश्न साधारणतः पुढीलप्रमाणे होते.

१) "देवा, मानवी जीवनात दृष्टीकोन खूप महत्वाची भूमिका बजावतो असं मी आजवर खूपदा ऐकलं आणि वाचलं आहे. पण मग हा खूप महत्वाचा असणारा दृष्टीकोन आम्हाला कोणीच शिकवित नाही. असं का?"

२) आणि "जर हा दृष्टीकोन मानवी जीवनात इतकाच महत्वाचा आहे तर तुम्ही तो प्रत्येकाला In built आणि by default पद्धतीने का नाही दिलात?"

माझ्या या प्रश्नांवर देवानं हलकंसं स्मित केलं आणि तो बोलू लागला- "बेटा, तुम्हा मानवांना जी विचार करण्याची शक्ती दिली आहे; ती कशासाठी दिलीय याचा कधी तर्कशुद्ध विचार केलाय का? ज्यांनी असा विचार केलाय, त्यांना तूझ्यासारखे खुळचट प्रश्न पडत नाहीत !"

मला देव काय म्हणतोय हे समजलंच नाही. माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. माझ्या चेहऱ्यावरचं हे प्रश्नचिन्ह बहुधा देवानं हेरलं असावं. देवानं मला समजावायला सुरुवात केली. देव म्हणाला - "हे बघ बाळा, प्रत्येक माणसाला विचार करण्याची शक्ती मिळाली आहे. बरोबर ना?"

मी "हो" म्हटलं.

देव पुढं सांगू लागला- "माणसाला मिळालेल्या या शक्तीचा त्यानं कसा वापर करायचा याचं पूर्ण स्वातंत्र्य त्याला दिलंय. हे चुकलंय का आमचं?"

मी "नाही. अजिबात नाही." असं ठामपणे म्हणालो.

देवानं मला आपल्याजवळ ओढून घेतलं, माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि तो म्हणाला- "जो माणूस जसा विचार करतो तसा त्याचा दृष्टीकोन बनतो. तो शिकवावा लागत नाही. तुमच्या विचारांमधूनच तुमचा दृष्टीकोन जन्म घेत असतो. याचाच अर्थ तू मघाशी म्हणालास तसा तो तुमच्यात In built आणि by default असाच आहे.

माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देवानं फारच सोप्या रीतीनं दिली होती. माझा चेहरा थोडासा खुलला होता. एवढ्यात देव म्हणाला- "हा दृष्टीकोन दोन प्रकारचा असतो. पहिल्या प्रकारच्या दृष्टीकोनाला 'सकारात्मक दृष्टिकोन' (Positive Attitude) आणि दुसऱ्या प्रकारच्या दृष्टीकोनाला 'नकारात्मक दृष्टिकोन' (Negative Attitude) असं म्हणतात. माणुस सकारात्मक विचार करतो तेव्हा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक प्रकारचा असतो; मात्र नकारात्मक विचार करणाऱ्या माणसाचा दृष्टीकोन नकारात्मक प्रकारचा असतो.''

इथे मी देवाला एक शंका विचारली. मी म्हटलं- "देवा, माणसानं नेहमी सकारात्मक राहावं, सकारात्मक विचार करावा, सकारात्मक दृष्टीकोन अंगी बाळगावा असं सर्वच संत, महात्मे आणि विचारवंतांनीही सांगीतलं आहे. पण 'सकारात्मक' म्हणजे नेमकं कसं? मला, माझ्यासारख्या सामान्य माणसाला सहज कळेल असं काही सांगाल तर बरं होईल." त्यावर देवानं छान उत्तर दिलं.

'सकारात्मक' म्हणजेे नेमकं कसं? हा प्रश्न मी देवाला विचारला होता. सामान्य माणसाला 'सकारात्मक' शब्दाचा नेमका अर्थ कळला तर त्याला आपले विचार, वर्तन, वाणी आणि दृष्टीकोन सकारात्मक कसा ठेवायचा हे समजायला मदत होईल असा माझा साधा आणि शुद्ध हेतू हा प्रश्न विचारण्याामागे होता. सर्वज्ञ परमेश्वराला हे अचूक कळले असावे. त्यानं मला सकारात्मकतेचा अर्थ सांगायला सुरुवात केली. देेव म्हणाला- " बाळा, 'सकारात्मक' असणे म्हणजे 'स्वतःसाठी अनुकूल' असणे होय. माणसाचे विचार, त्याचं वागणं, बोलणं, त्याची प्रत्येक कृती ही त्याच्या स्वतःसाठी अनुकूल असायला हवी."

मी देवाला मध्येच थांबवून विचारलं, '' देवा हेे कसं काय शक्य आहे? प्रत्येेक माणसानं स्वतःला अनुकूल विचार केला, कृती केली तर मग इतरांंचं काय होईल?" माझा प्रश्न ऐकून देव गालातल्या गालात हसला आणि म्हणाला- अरे वा ! तू तर खूपच हुषार आहेस ! तू अगदी अचूक प्रश्न विचारला आहेस !" देव माझ्या प्रश्नाचं उत्त्तर म्हणून पुढं बोलतच राहीला. तो म्हणाला- "इतरांच्या हिताला कोणतीही बाधा न आणता स्वतःसाठी अनुकूल विचार करणं, तशी कृती  करणं, तसं वागणं आणि बोलणं हीच खरी सकारात्मकता आहे. माणसं कधी कधी स्वतःचं हित पाहताना इतरांच्या हिताचा विचार करीत नाहीत. त्याला 'अविचार किंवा 'कुविचार' असं म्हणतात."

देव आणखी बोलतच होता - " काही वेळा माणसं सकारात्मकतेच्या नावाखाली फक्त अनुकूल तेवढाच विचार करतात. प्रत्येक गोष्टीचा विचार करताना त्या गोष्टीचा चोहोबाजूंनी विचार करायला हवा. अनुकूल बाजूसोबतच प्रतिकूूल बाजूही लक्षात घ्यायला हवी." मी मध्येच म्हटलं, ''देवा, असा प्रतिकूल बाजूचा विचार करणारी काही माणसं आहेत; मात्र अशा माणसांना 'नकारात्मक' समजलं जातं. त्याचंं काय करायचं?" देवानं आपली मान हलवित म्हटलं, असं करण्याचा मूर्खपणा काही माणसं काही वेळा करतात. परंतु हे योग्य नाही. याचा अर्थ इतकाच की अशा लोकांना सकारात्मकतेचा खरा अर्थ समजलेला नसतो."

देव अगदी न थांबता पुढं बोलत होता-
"वास्तविक माणसाच्या मनसागरात कल्पनेच्या लक्षावधी लाटा अव्याहतपणे येत-जात असतात. किनाऱ्यावर विरुन जाणाऱ्या या लक्षावधी लाटांमधली एखाद्याच कल्पनेची लाट अशी असते की, जी पुन्हा पुन्हा तडफेने येवून किनाऱ्यावर आदळून आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावते. हीच कल्पनेची लाट माणसाच्या मनात स्थिर होते. अशा स्थिर झालेल्या कल्पनेला 'विचार' असं म्हणतात. हा तुमच्या मनातील विचार इतरांच्या हिताला बाधा न आणता तुमच्या हितासाठी अनुकूल असायला हवा. म्हणजे याच विचाराला धरुन तुमचे आचरण अर्थात वागणंं -बोलणं आणि कृती होईल. थोडक्यात तुमच्या विचारांपासून सुरु झालेल्या सकारात्मकतेमूळे तुमचा दृष्टीकोन सकारात्मक होईल आणि परिणामी तुमची कृतीही सकारात्मक अशीच होईल." माझ्या मनातला दृष्टीकोनाबाबतचा गुंता एव्हाना सुटला होता. तुमच्याही मनातला गुंता सुटतोय ना? सुटायलाच हवा !

सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे नेमकं काय यावर सविस्तर निरुपण केल्यावर देवानं मास्कचा पुढचा घटक मला समजून सांगायला सुरुवात केली. देव सांगू लागला- "मास्कचा पुढचा महत्वाचा घटक आहे skill अर्थात 'कौशल्य'. माणसाला जशी विचार करण्याची  शक्ती जन्मजात मिळालेली आहे, तसं कौशल्याच्या बाबतीत मात्र मूळीच नाही. कुणाही माणसाला कोणतंही कौशल्य जन्मजात अवगत नसतं. माणूस जन्मल्यानंतर आपल्या शरिराचा तोल धरणे, बसणे, उभे राहणे, रांगणे, पळणे, खाणे, पिणे, बोलणे अशा अनेक गोष्टी करण्यासाठी लागणारी विविध कौशल्ये माणसाला नियमित सरावाने आणि प्रयत्नपूर्वक मिळवावी लागतात. यातील कोणतेही कौशल्य कुणालाही विनासायास प्राप्त होत नाही."

देवाचं हे बोलणं सुरु असताना मला हसू आवरत नव्हतं. मी हसतोय हे पाहून देवानं मला माझ्या हसण्याचं कारण विचारलं. माझं हसू आवरतं घेऊन मी म्हटलं, "देवा, तुम्ही आता कौशल्याबद्दल जे सांगत होता ते ऐकत्यावर कुणालाही हसूच येईल. मी हसलो म्हणून काय झालं?''

"म्हणजे? तूला नेमकं काय म्हणायचंय?" देवानं विचारलं.

"अरे देवा ! " मी म्हणालो, "अहो देवा, माणूस जन्माला आल्यानंतर आपल्या शरिराचा तोल धरणे, बसणे, उभे राहणे, रांगणे, पळणे, खाणे, पिणे, बोलणे अशा अनेक गोष्टी कमी अधिक वेळेत, कमी अधिक चपळाईने सर्वजण करीत असतात. त्यात कसलं आलंय कौशल्य? असं वाटलं मला, म्हणून मी हसत होतो. मी हसलो, म्हणजे माझं काहीं चुकलं का?''  आता हसण्याची पाळी देवाची होती. देव हसत होता.

हसता हसता त्यानं पुढं बोलायला सुरुवात केली. देव म्हणाला- "अरे बाळा, सगळेजण या क्रिया करायला शिकतात म्हणजे सर्वांना कौशल्य प्राप्त झालं; असं थोडच आहे? प्रत्येक क्रिया करताना त्यात सफाईदारपणा असायला हवा. तुमची क्रिया आकर्षक, इतरांचे लक्ष वेधून घेणारी, सौंदर्याचा लीलया प्रत्यय देणारी आणि तुमचं वेगळेपण जपणारी अशी असली पाहिजे. तरच त्याला कौशल्य म्हणता येईल."

"म्हणजे कसं देवा?''  मी मध्येच म्हटलं- "एखादं उदाहरण द्याल तर बरं होईल देवा."

मग देवानं काही उदाहरणं दिली.

त्यानं मला विचारलं- "तूला क्रिकेट खेळता येतं? "

मी म्हटलं- "हो."

त्यानं पुढं विचारलं- "तू बॅटींग करतोस की बॉलिंग?"

उत्तरादाखल मी म्हणालो- "बॅटींग करतो मी." त्याचा मला पुढचा प्रश्न होता- "तू क्रिकेट खेळताना चौकार मारतोस का?"

मी म्हटलं- "कधी कधी मारतो की..''

"आता पुढचा प्रश्न" असं म्हणत देवानं मला पुढचा प्रश्न विचारला- "आता मला सांग, तू मारलेला चौकार आणि सचिन तेंडूलकरनं मारलेला चौकार यातला कोणता चौकार तूला अधिक भावतो?"

मी पटकन् उत्तरलो- ''अर्थातच कुणालाही सचिनचाच चौकार भावेल. तसाच तो मलाही भावेल."

देव म्हणाला-"त्याचं काय कारण?"

मी म्हटलं, " देवा, त्याचं कारण सोपं आहे. अहो, मी मारलेला चौकार हा लागोभागो टोला असतो. मला ठरवून चौकार मारता येत नाही. पण सचिनचं तसं नाही. तो एखाद्या बॉलवर ठरवून चौकार मारु शकतो. त्याच्या पीचवर क्रिजमध्ये बॅट हातात धरुन उभं राहण्यात आणि त्याच्या फटका मारण्यात एक सौंदर्य, एक नजाकत असते. त्याचा चौकारही त्याला चारच धावा देतो पण त्याचा चौकार प्रेक्षकांना रिझवतो. ते सचिनच्या खेळण्यातलं कसब आहे."

देव म्हणाला, "अगदी बरोबर बोललास तू ! "

तो पुढं म्हणाला की, "तू खेळण्यातलं 'कसब' हा शब्द वापरलास ना, त्यालाच 'कौशल्य' असं म्हणतात."

देव पुढं म्हणाला- "म्हणजे बघ, चित्रपट अभिनेता नाना पाटेकर, महानायक अमिताभ बच्चन, गानसम्राज्ञी लता मंगेशक, धावपटू हुसेन बोल्ट, कुस्तीपटू गीता फोगट, चित्रकार राजा रविवर्मा अशी अनेक उदाहरणं आहेत, जी आपल्याला हेच सांगतात की, तुम्ही कोणतेही काम करताना त्यात सफाईदारपणा असायला हवा. तुमचं काम आकर्षक, इतरांचे लक्ष वेधून घेणारं, सौंदर्याचा लीलया प्रत्यय देणारं आणि तुमचं वेगळेपण जपणारं असेच असलं पाहिजे. तरच त्याला 'कौशल्य' म्हणता येईल."

देवाचं बोलणं सुरुच होतं - "माणूस आपल्या आयुष्यात वेगवेगळी कामे, कृती, क्रिया करीत असतो. हे करताना त्यांनं त्याच्यातलं आपलं कौशल्य बघायला हवं. त्यानं ठरवलं तर प्रयत्नपूर्वक सारी कौशल्ये त्याला मिळवता येतील. आणि बाळा एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेव की राम नेहमी कौशल्याच्याच पोटी जन्माला येतो. तुमच्यामधील 'राम' तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कौशल्य मिळवायलाच हवं."

मी देवाचं बोलणं मध्येच थांबवित प्रश्न विचारला- " देवा, मला सांगा माणसानं नेमकी किती आणि कोणती कौशल्ये मिळविली पाहिजेत? "

माझा भाबडा प्रश्न ऐकून देवानं हलकंसं स्मित केलं आणि म्हणाला- "बेटा, तसं सांगता येणं खूप कठीण आहे. कारण कौशल्ये अनेक आहेत. प्रत्येक माणसाला सर्वच कौशल्ये मिळवता येणंही कठीण आहे. विशेष म्हणजे कौशल्य हे कौशल्य असतं. त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असं काही नसतं. मी तूला एवढंच सांगेन की, प्रत्येक माणसानं त्याच्या आनंदी जगण्यासाठी लागणारी  आवश्यक ती सारी कौशल्ये प्राणपणाने मिळविली पाहिजेत, ती विकसित केली पाहिजेत आणि जपलीही पाहिजेत."

प्रत्येक माणसाला त्याचं जगणं आनंदानं जगायचं आहे. तूला असं आनंदानं जगायचं असेल तर तूला आवश्यक ती कौशल्ये प्राप्त करावीच लागतील असं सांगीतल्यानंतर देव म्हणाला- "आता मास्कचा आणखी एक महत्वाचा घटक मी तुला सांगणार आहे. नीट लक्ष देवून ऐक."

मी हुंकार भरताच देव पुढं निरुपण करु लागला. तो म्हणाला- "मास्कचा हा महत्वाचा घटक आहे 'Knowledge, म्हणजे 'ज्ञान' !"

मी बाळबोधपणे विचारले- "देवा, 'ज्ञान' म्हणजे काय हो?"

देवाचा चेहरा तेजाने चमकू लागला होता. आता मला देवाच्या मागे-पुढे, दाहीदिशेला तेजाचे वलय दिसू लागले होते. माझ्या बाळबोध प्रश्नाची देवानं गांभिर्यानं दखल घेतली आहे, असं त्यांच्या एकूण देहबोलीवरून माझ्या ध्यानात आलं. देव म्हणाले, "बेटा, 'ज्ञान' म्हणजे माणसाला मिळालेली माहिती, शिक्षण, प्रशिक्षण आणि मिळालेले लहान मोठे चांगले- वाईट अनुभव या साऱ्यातून आपल्याला एखादा विषय, वस्तू, व्यक्ती, विचार, घटना प्रसंग किंवा परिस्थिती याबाबत झालेले आकलन किंवा आलेली समज होय. या आकलनाच्या किंवा समजाच्या आधारे माणसाला योग्य व अचूक निर्णय घेता येतो. आवश्यकता असल्यास योग्य तो प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देता येते. मनातील इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, वृत्ती, प्रवृत्ती, आवड-निवड, विचार, मतं, कल्पना, भावना या साऱ्या गोष्टींचं प्रभावी व नेटकं व्यवस्थापन करता येतं. आपल्या वर्तनात आवश्यक ती सुधारणा करता येते. आपले वागणे, चालणे, बोलणे या सर्वांवर योग्य पद्धतीचे नियंत्रण ठेवता येते. म्हणूनच 'ज्ञान ही एक शक्ती आहे' किंवा 'Knowledge is power.' असं म्हटलं जातं. तुमच्या लहान-मोठ्या, सोप्या-जटील, व्यक्तिगत किंवा सार्वजनिक अशा सर्व प्रकारच्या समस्या ज्ञानामूळेच सोडविता येतात. जगणं आनंदी होतं. तुमच्याकडे पुरेसं आणि योग्य ज्ञान असेल तर तुम्हाला स्वतःबरोबर इतरांच्या जीवनातही आनंद पेरता येतो."

देववाणीचा हा धबधबा अथकपणे बरसत होता. 'ज्ञान' शब्दाचा खरा अर्थ मला आता चांगलाच कळू लागला होता

ज्ञानाच्या अनुषंगाने माझ्या मनात असलेला प्रश्न आता देवाला विचारुन घ्यावा असा नुसता विचार माझ्या मनात आला; पुढच्याच क्षणी देवानं म्हटलं- "बाळा ज्याचं त्याचं ज्ञान ज्यानं त्यानं मिळवावं आणि आपलं आयुष्य आनंदी करावं. असं तूला सध्या जे वाटतंय, ते गैर आहे.

तूला जेवढं जास्त ज्ञान मिळवता येईल तेवढं तू मिळवायचं हे खरंच; पण तू मिळवलेलं ज्ञान तू तूझ्यापुरतंच वापरलंस, इतरांना ते दिलं नाहीस, तुझ्या ज्ञानाचा वापर इतरांसाठी केला नाहीस तर त्या ज्ञानाची किंमत घटते. कधी कधी असं ज्ञान मातीमोल ठरु शकतं. म्हणूनच

जे जे आपणाशी ठावे I ते ते सकळांशी सांगावे॥ शहाणे करुन सोडावे I सकळ जन॥
असं समर्थांनी लिहून ठेवलं आहे."

देवाच्या या बोलण्यातून माझ्या मनातल्या ज्ञानाच्या वापराविषयीच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असलं तरी आता माझ्या मनात काही नवेच प्रश्न उभा राहीले होते. मी न घाबरता ते प्रश्न एकापाठोपाठ एक करुन देवाला विचारले. मी विचारलेले प्रश्न असे होते -  

१) युवराज सिद्धार्थने तपश्चर्या केली. त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. किंवा प्राचीन काळी ऋषीमुनी देखील जप-तप करुन ज्ञान मिळवायचे असं पुराणकथांमधून सांगितलं जातं. आणि सध्याच्या काळात आम्ही सारेच ज्ञान मिळवायला शाळा कॉलेजात जातो. या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे?

२) ज्ञान मिळवण्याचा नेमका मार्ग कोणता?

३) 'खरे ज्ञान ' असा एक शब्द संत मंडळींच्या अभंगवाणीतून ऐकायला मिळतो. त्याचा काय अर्थ होतो? 'खरे ज्ञान' आणि 'खोटे ज्ञान' असं काही असतं का?

माझे प्रश्न ऐकल्यावर देवानं छान हसून बोलायला सुरुवात केली. देव म्हणाला- अरे बाळा, ज्ञान मिळवायला तुम्ही जे कोणते प्रयत्न करु शकता ते सर्व प्रयत्न तुम्ही करायलाच हवेत. तुमचं शाळा- कॉलेजात जाणं, युवराज सिद्धार्थाचं राजमहालाचा त्याग करुन तपश्चर्या करणं, किंवा प्राचीन काळातल्या ऋषीमुनींनी जप-तप करणं हे सारेच ज्ञान मिळवण्याचे मार्ग आहेत. ज्ञान मिळवण्यासाठी शाळा कॉलेजातच जायला हवंच असं काही नाही. एकलव्यानं कोणत्याही शाळेत, गुरुकुलात न जाता धनुर्विद्येचं परिपूर्ण ज्ञान मिळवलं होतं. ही कथा तुम्हाला ठाऊक असेलच."

मी म्हटलं- "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही शाळेबाहेर बसूनच ज्ञान मिळवलं आहे."

"अगदी बरोबर" देव म्हणाला.

देवानं पुढं म्हटलं- ''शाळा कॉलेजातून मिळणाऱ्या ज्ञानामध्ये माहितीचा साठा भरपूर असला तरी मिळालेल्या या भरमसाठ माहितीचं नेमकं काय करायचं? हे अनेकांना ठरवता येत नाही. त्यासाठी अनुभवाची गरज असते. हा अनुभव चार भिंतींबाहेरच्या शाळेतूनच मिळवावा लागतो. तशी संधी स्वतः शोधावी लागते, प्रत्येकाने स्वतःसाठी अशी संधी प्रयत्नपूर्वक मिळवायला हवी."

"आता ज्ञान कसं मिळवायचं? या विषयी थोडं समजून घेवू" असं म्हणत देवानं बोलायला सुरुवात केली. देव म्हणाला- "माणसाला ज्ञान मिळवता यावं, ज्ञान ग्रहण करता यावं यासाठी जीभ, नाक, कान, डोळे आणि त्वचा ही

पाच ज्ञानेंद्रियं त्याला मिळालेली आहेत. यातल्या प्रत्येक इंद्रियाचा पर्याप्त उपयोग करून माणसानं ज्ञानार्जन करायला हवं. त्यासाठी तुमचं शरीर आणि मन निरोगी असायला हवं. या पाचही ज्ञानेंद्रियांचा पुरेपुर उपयोग करून केलेल्या अभ्यासातून माणसाला ज्ञान मिळतं. वाचन, लेखन, मनन, चिंतन, प्रयोग, निरीक्षण व परिक्षण किंवा मूल्यमापन या सप्तपदीच्या मार्गाने अभ्यास करून ज्ञान मिळवता येते."

"आता तूझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर नीट ऐक" असं म्हणत देव पुढं बोलू लागला. तो म्हणाला- "या जगात कोणतंही ज्ञान खोटं असू शकत नाही. तुम्हाला मिळालेली माहिती कदाचित खोटी असेल, चुकीची असेल, तर त्यामूळे तुमचं आकलन चुकेल पण म्हणून त्याला खोटं म्हणता येणार नाही. ज्ञान हे नेहमी खरं असतं, ते कधीच खोटं असू शकत नाही ! ज्ञान म्हणजे सत्य ! केवळ जसे आहे तसे ! ज्ञान म्हणजे प्रकाश ! ज्ञान म्हणजे अंधाराचा, अज्ञानाचा नाश ! जसं एखाद्या अंधाराच्या ठिकाणी आपण दिवा लावल्यावर प्रकाशाच्या आगमनानं तेथील अंधार तात्काळ नाहीसा होतो, तसं अज्ञानी माणसाला ज्ञान प्राप्त झालं, सत्य समजलं की त्याच्या ठायी असलेल्या अज्ञानाचा विनाविलंब नाश होतो."

मी हे सगळं तल्लीन होऊन ऐकत होतो. अचानक देवानं माझ्या डोक्यावर हात ठेवला. मला माझ्या अंगात अचानक वीज चमकून गेल्यासारखं वाटलं. हे अचानक असं काय झालं? हे नं कळल्यानं मी थोडा घाबरलो होतो. तेवढ्यात देव म्हणाला- "घाबरु नकोस, मी सदैव तुझ्यासोबतच आहे. तूला आता मी एक जबाबदारी देणार आहे. ती तू प्राणपणानं पूर्ण करायची आहेस. या कामात हयगय करायची नाहीस."

मी म्हटलं, "देवा, म्हणजे मी नेमकं काय करायचंय? मला तुम्ही दिलेली जबाबदारी पेलता येईल का?"

देवानं हलकंसं स्मित करुन म्हटलं, "या कामासाठी मी तुझी निवड केली आहे. माझी निवड चुकायची नाही !"

"आता शेवटचं ऐक'' असं म्हणत देव बोलू लागला- "आता तोंडाला हे कापडी मास्क लावून कुठं बाहेर जाऊ नकोस. थेट तुझ्या घरी जा. एवढा वेळ भाजी आणायला गेलेला माणूस अजुन घरी आला नाही म्हणून घरी तूझी वाट पाहात असतील. आता तू कुठेही थांबू नकोस. थेट घरी जा. तुझ्या हातात भाजी नसली तरी तूला कोणीही भाजीबद्दल काहीही विचारणार नाही. उद्यापासून तुला माझ्याकडून मिळालेलं हे सारं ज्ञान तूझ्याभोवतीच्या गरिब, गरजू, होतकरु समाजघटकांना देण्यासाठी एक ज्ञानयज्ञ सुरु कर. तूला मिळालेलं हे सारं ज्ञान तू त्या यज्ञामधून दान कर. त्यानं तूला कृतार्थता येईल. तूझं जीवन सार्थ होईल. सर्वांना ज्ञान मिळेल. सर्वजण प्रेरणा, दृष्टीकोन, कौशल्य आणि ज्ञान यांचा समावेश असलेला मास्क नेहमीसाठी लावायला शिकतील. सर्वांचं शारिरीक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य चांगलं राहील. सर्वांना आपलं जीवन यशस्वी, आनंदी, निरोगी आणि सुरक्षितपणे जगता येईल."

देवानं मला विचारलं, " करशील ना हा ज्ञानयज्ञ?"

मी "हो " म्हणत देवाला साष्टांग नमस्कार केला. मला गहिवरुन आलं होतं. माझ्या दोन्ही डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या.

देवानं पुन्हा मला जवळ ओढलं आणि आशीर्वाद देत म्हणाला- "हे बघ बाळा, हे फार जबाबदारीचं काम आहे; पण तू घाबरु नकोस. तू हे काम करण्यात यशस्वी होशील ! "

"आणि हो, एवढं लक्षात ठेव..

M = Motivation ( प्रेरणा )
A = Attitude ( दृष्टीकोन )
S = skill  ( कौशल्य )
K = Knowledge ( ज्ञान )

हे मी सांगीतलेलं 'मास्क' प्रत्येक माणसानं नेहमी वापरलं तर हे कापडी मास्क पुन्हा पुन्हा वापरण्याची नामुष्की कदाचित उद्भवणार नाही!"

देवानं हे अखेरचं वाक्य उच्चारलं आणि तो माझा निरोप घेऊन पुन्हा गाभाऱ्यात निघून गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel