आपल्याकडील संत साहित्याचा किंवा अगदी पाश्चात्य विचारवंतांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेचा धांडोळा घेतला असता सर्वांनी आवर्जून सांगीतलेली एक कॉमन गोष्ट नजरेत भरते ती म्हणजे - "तुम्हाला आनंदी व्हायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही प्रथम स्वतःला ओळखायला हवं!"

आपण स्वतःला ओळखायचं म्हणजे आपण स्वतःचा शोध घ्यायचा. आपण असं स्वतःला ओळखल्यानं नेमकं काय होईल? याचा विचार केला असता असं लक्षात येतं की, मी कोण आहे? हे मला माहित असायलाच हवं. मी एकाच वेळी अनेक भूमिकेत जगत असतो. मी एखादी गोष्ट करताना, एखादा निर्णय घेताना, एखादी कृती करताना माझी त्यावेळची भूमिका मला ठाऊक असली पाहिजे. म्हणजे त्या भूमिकेला साजेसा, योग्य असा निर्णय मला घेता येईल किंवा योग्य अशी कृती मला करता येईल.

मला नेमकं काय हवं आहे? माझी इच्छा, आकांक्षा, अपेक्षा नेमकी काय आहे? याचाही नेमका शोध आपण घेतला पाहिजे. म्हणजे आपणास जे हवं आहे, त्यावरच आपल्याला आपलं लक्ष केंद्रीत करता येईल. अनावश्यक गोष्टींवर लक्ष दिल्यामूळे वाया जाणारी आपली उर्जा आपणास वाचविता येईल. असं केल्यानं आपणास नकोशा, नकारात्मक गोष्टींपासून दूर राहाणं शक्य होईल आणि आपलं सगळं लक्ष सकारात्मक दृष्टीनं आपल्या ध्येयावर केंद्रीत करता येईल.
पण हे सगळं करायचं कसं? स्वतःला नेमकं कसं ओळखायचं? हा खरा प्रश्न आहे. समुपदेशनासाठी आलेल्या प्रवीणनंही आपल्या समुपदेशकांना नेमका हाच प्रश्न विचारला होता. प्रवीणला समजेल असं काही सांगण्याची आवश्यकता होती.

प्रवीणच्या पाठीवरुन हलकेच हात फिरवित समुपदेशकांनी प्रवीणशी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले -" प्रवीण, स्वतःला ओळखणं ही एक प्रक्रिया आहे. एकेक गोष्ट क्रमाक्रमानं करीत ही प्रक्रिया पूर्ण करुन आपण स्वतःची ओळख करुन घेवू शकतो. तुला ही प्रक्रिया नीटपणे समजून घेता यावी यासाठी मी आज तूला सगळं सविस्तरपणे सांगतो. नीट लक्षपूर्वक ऐक, समजून घे. तूला एखादी शंका असेल तर निःसंकोचपणे मला विचार."
प्रवीण आता लक्षपूर्वक ऐकू लागला होता. समुपदेशकांनी प्रवीणला स्वतःला ओळखण्याच्या प्रक्रियेतील जे टप्पे समजावून सांगीतले, त्यांचे स्वरूप साधारणपणे असे होते -
१) आपल्या चांगल्या सवयी शोधणं
२) आपल्या वाईट सवयी शोधणं
३) आपल्यातील लहान-मोठे गुण शोधणं
४) आपल्यातील लहान-मोठे दोष शोधणं
५) आपली बलस्थानं शोधणं
६) आपल्यातील उणीवा किंवा कमतरता शोधणं
७) आपल्या आवडी-निवडी शोधणं
८) आपल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, ध्येय शोधणं
९) आपली वृत्ती, प्रवृत्ती आणि दृष्टीकोन समजून घेणं
१०) आपली श्रद्धास्थानं समजून घेणं
११) आपले आदर्श समजून घेणं

"वरील मुद्यांमधून मिळालेल्या स्वतःबद्दलच्या माहीती वरुन आपणास आपली ओळख चांगल्या पद्धतीने करुन घेता येते." समुपदेशक प्रवीणशी बोलत होते.

प्रवीणच्या चेहऱ्यावर त्याला काहीच कळले नाही, असे भाव स्पष्टपणे दिसत होते. समुपदेशकांच्या चाणाक्ष नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. प्रवीणला काहीच समजले नाही हे आपल्या लक्षात आले आहे ही गोष्ट प्रवीणच्या अजिबात लक्षात येवू नये याची संपूर्ण काळजी घेत समुपदेशकांनी प्रवीणच्या हातात एक कागद आणि पेन दिला.
"हातात आलेल्या या कागद -पेनाचं मी काय करु?" असा प्रश्न प्रवीणच्या मनात उभा राहीला. तेवढ्यात समुपदेशक म्हणाले-
"प्रवीण बेटा, तूझ्या चांगल्या सवयींची यादी करुन या कागदावर लिही."
पुढच्या काही मिनिटात प्रवीणने ही यादी लिहून समुपदेशकांच्या हातात सोपवली. त्यांनी या यादीवरुन नजर फिरवली. प्रवीणने आपल्या चार चांगल्या व चार वाईट सवयी यादीमध्ये लिहील्या होत्या. समुपदेशक मनातल्या मनात खूष झाले होते. त्यांचं काम झालं होतं!
तरीही त्यांनी प्रवीणला थोडंसं रागावल्या स्वरात विचारलं - "तूला जेवढं सांगीतलंय तेवढंच न करता ही वाईट सवयींची यादी करण्याचा आगावूपणा तू का केलास?"
प्रवीणला आपण कोणताच आगावूपणा केलेला नाही याचा विश्वास वाटत होता. तो म्हणाला- "सर, मला वाटतंय की, मी माझ्या चांगल्या गोष्टींसोबत वाईट गोष्टीही समजून घेतल्या पाहिजेत. तरच मला माझी खरी व संपूर्ण ओळख होईल."
पुढच्याच क्षणी समुपदेशक म्हणाले- "शाबाश! प्रवीण, आज तू मला अगदीच खूष करुन टाकलंस!"
दोघेही खळखळून हसले. प्रवीणला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं!

चर्चेचा शेवट करताना सुपदेशक म्हणाले-" हे बघ प्रवीण, मी कोण आहे? माझं ध्येय काय आहे? त्यासाठी मला कोणत्या मार्गानं जावं लागेल? माझा हा मार्ग नेमका कसा आहे? या मार्गावरून जाताना मला कुणाची मदत घेता येईल का? माझ्या मार्गातले अडथळे कोणते आहेत? या अडथळ्यांचं मला काय करता येईल? याचा आपण सतत शोध घेत राहीलं पाहिजे. त्यामुळं आपल्याला प्रत्येक वेळी आपली नव्याने ओळख होते.

© श्री अनिल उदावंत
( साहित्यिक )
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel