दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक भावा-बहिणींना या निमित्ताने प्रत्यक्ष भेटता, बोलता आले. एकमेकांना डोळे भरून पाहता आले. काल एका मित्राशी फोनवर बोलता बोलता रक्षाबंधनाचा विषय निघाला. स्वाभाविक सहजतेने मी त्याला विचारले- "कसं झालं यंदाचं रक्षाबंधन? प्रत्यक्ष भेटून की पोस्टाने?" माझ्या या प्रश्नाने जणू त्याची दुखरी नसच पकडली होती. त्याचा स्वर ओला झाला होता. गदगदलेल्या स्वरात मित्र म्हणाला- " अनिल, मला दोन बहिणी आहेत; पण माझ्या बहिणी रक्षाबंधन साजरं करीत नाहीत. त्या मला राखी बांधत नाहीत किंवा माझ्यासाठी त्या पोस्टानेही राखी पाठवत नाहीत."

मी पुढे त्याला "का बरं?" असं विचारल्यावर त्यानं मला जे सांगीतलं ते खरंच धक्कादायक होतं. तो म्हणाला- "भावाने बहिणीचं रक्षण करावं यासाठी बहिण भावाला राखी बांधते असं राखीचा इतिहास सांगतो. मी लहान होतो तोपर्यंत माझ्या बहिणी मला राख्या बांधत होत्या. काळाबरोबर आम्ही सारेच मोठे झालो. बहिणींची लग्नं झाली. माझं शिक्षण सुरु होतं. लग्नानंतर काही वर्ष मी त्यांच्याकडे जाऊन राख्या बांधून घेत असे. पुढे माझं शिक्षण संपलं, मी नोकरीनिमित्त बाहेर पडलो. तेव्हाही दोघी बहिणी मला पोस्टानं राख्या पाठवायच्या. मीही त्यांच्या राखीची वाट बघायचो."

मित्र पुढं बोलतच होता- " हळूहळू बहिणी त्यांच्या संसारात रमल्या. त्यांचा संसार फुलला. त्यांना मुलं बाळं झाली. त्यांची आर्थिक स्थितीही भक्कम झाली. तोपर्यंत माझंही लग्न झालं होतं. माझा संसार नुकताच सुरू झाला होता. मी माझ्या प्रपंचाची जुळणी करु लागलो होतो. माझ्या आर्थिक प्रगतीचा वेग बहिणींपेक्षा थोडा कमीच होता. हे अंतर हळूहळू वाढत गेलं आणि मला बहिणींकडून राखी येणं कधी बंद झालं ते कळलंच नाही! सुरुवातीला मला खंत वाटायची पण आता मला त्याची सवय झाली आहे. माझ्या पत्नीनं मला दरवर्षी न चुकता राखी बांधली आणि माझा आत्मसन्मान टिकवून ठेवला. नाही म्हणायला माझ्या कामातल्या सहकारी महिलांनी देखील मला राखी बांधली. त्यामुळे बहिणींच्या राखीची उणीव मला कधी भासलीच नाही."

आपल्यापैकी एखाद्याचा अनुभव माझ्या या मित्रासारखाच असुही शकेल. काही बाबतीत अधिक- उणे असणे हे मानवी नात्याचे विशेष वैशिष्ठ्य आहे. या प्रत्येक अधिक- उणेला सांभाळून घेत नाती जपावी लागतात. प्रत्येक माणसाला मन आणि मेंदू मिळालेला असतो. त्यानुसार प्रत्येकाला बुद्धी आणि भावना असतात. आपल्या बुद्धिनुसार प्रत्येकजण आपल्या भावनांना कुरवाळीत असतो. असं करताना मानवी मनं दुःखावली जाणं स्वाभाविक असतं. ही दुःखावलेली मनं पुन्हा प्रफुल्लित व्हावीत, नाती अधिक दृढ व्हावीत यासाठी मानवानेच अधुनमधुन विविध सण- उत्सव साजरे करण्याचा सांस्कृतिक आदर्श घालून दिला आहे. प्रत्येक नात्याचा सन्मान होईल अशा रितीनेच या सण- उत्सवांची रचना करण्यात आली आहे. प्रत्येक सण- उत्सवाला सांस्कृतिक अर्थ देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पुराणकथांचे संदर्भ सण- उत्सवांशी जोडले आहेत. भावाबहिणीच्या नात्याची वीण घट्ट रहावी यासाठी भाऊबीज आणि रक्षाबंधन हे दोन प्रमुख सण आहेत. बहिणीने भावाच्या हातात रेशमी धागा बांधला म्हणून भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी असं सांगून या सणाने भावाबहिणीतील नाते अधिक दृढ करण्याचा सुसंस्कृत प्रयत्न केला आहे.

अलिकडच्या काळात सण- उत्सवांचे महत्त्व कमी झाले आहे. कारण माणसांचा प्राधान्यक्रम बदलला आहे. नातं जपण्याचं कौतूक आता कुणालाच वाटेनासं झालं आहे.

अधिकाधिक पैसा कमावणं हीच प्रत्येकाची प्राधान्यता झाली आहे. त्यामुळे बहिणी राखी बांधायला उत्सुक असल्या तरी त्यांचे भाऊ मात्र राखी बांधुन घ्यायला तितकेसे उत्सुक नसतात. अशीही काही उदाहरणं आपल्याआजूबाजूला पहायला मिळतात. मानवी नात्यांना प्राधान्य देणारी माणसं चटकन आपल्या भोवतालच्या संबंधातल्या माणसांतून आपला भाऊ किंवा बहिण निवडतात. नात्यांच्या प्रेमाचा अविष्कार अनुभवतात आणि आपल्या जीवनात आनंदाची पेरणी करतात. आपल्याला आपलं जीवन आनंदी करायचं असेल तर मानवी नात्यांमधलं प्रेम आणखी दृढ करता यायला हवं हेच शाश्वत सत्य आहे! रक्षाबंधनाचा सण ही त्यासाठीची मोठी पर्वणी आहे!

© अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक,
सावेडी, अहमदनगर संपर्क: ९७६६६६८२९५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel