आज सुधाकर नावाचा तिशीतला एक तरुण आपली एक समस्या घेऊन समुपदेशकांना भेटायला आला होता. आपल्या अवतीभवतीच्या वातावरणात त्याला जणू गुदमरायला झालं होतं. आपल्याला नीट श्वास तरी घेता येईल की नाही या भीतीनं त्याला घेरलं होतं. नेहमी मीच का?, दुःख, अपयश, अपमान, निराशा, माघार हे सारं माझ्याच वाट्याला का? या प्रश्नाने त्याच्या मनाला पुरतं कुरतडून टाकलं होत!

आधीच निश्चित केलेल्या वेळेनुसार समुपदेशकांशी    त्याची भेट झाली. या भेटीत समुपदेशकांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे सुधाकरने दिली, पण त्याची सारी उत्तरे अतिशय टोकदार होती. प्रत्येक उत्तराच्या टोकाशी "मीच का?" हा प्रश्न एखाद्या समितीच्या स्थायी अध्यक्षासारखा हमखास विराजमान झालेला होता. समुपदेशकांना सुधाकरची समस्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही; पण ते खूप विचारात पडले होते. निदान तसा त्यांचा एकूण आविर्भाव दिसत होता.

हे पाहून सुधाकरने विचारले, "तुमच्याकडे माझ्या प्रश्नांचं काही उत्तर आहे की नाही? की, इथंही माझ्या वाट्याला निराशाच येणार आहे?"
सुधाकरच्या या प्रश्नाने विचारांत हरवून गेलेले समुपदेशक भानावर आले आणि हलकेच हसत म्हणाले-
''परिस्थिती फार काही अवघड झालेली नाहीय. मात्र तुमची पचनक्षमता त्या गंगाधरसारखीच कमी झालीय. तुम्हाला तुमची पचनक्षमता सुधारावी लागेल!"
याचा अर्थ मघाशी आपलं बोलणं ऐकता ऐकता समुपदेशक गंगाधरचा विचार करीत होते हे सुधाकरच्या ध्यानात आलं. सुधाकर आता खूप चिडला होता. तो आपली चिडचीड कंट्रोल करु शकला नाही. चिडक्या सूरातच तो बोलू लागला-
"मला अपॉईंटमेंट देवून तुम्ही हा वेळ माझ्यासाठी दिला असताना, माझ्यासाठी वेळ द्यायचं सोडून तुम्ही हे गंगाधरचं काय झेंगट आणलंय मध्ये? कोण हा गंगाधर? त्याचा माझ्याशी काय संबंध आहे?"
सुधाकरने वैतागून समुपदेशकांना उद्देशून एका पाठोपाठ एक प्रश्नांच्या फैरी झाडल्या. कदाचित समुपदेशकांना सुधाकरकडून हेच अपेक्षित असावे. सुधाकरचे प्रश्न अगदी योग्य आहेत हे नमुद करीत समुपदेशक म्हणाले-
"का कुणास ठाऊक? पण आजकाल अनेक लोकांची पोटं सातत्यानं खराब होतात. काहीजणांना त्यांनी स्वतःच खाल्लेलं नीट पचत नाही, तर काहींना इतरांनी खाल्लेलं अजिबात पचत नाही! मला वाटतं त्यांची पचनक्षमता अगदीच बिघडून गेलीय. ती आधी सुधारायला हवी."

समुपदेशक हे काय बोलत आहेत? नेमकं काय सांगत आहेत? आणि ते गंगाधरचं प्रकरण काय आहे? यातलं काहीच समजत नसल्याने सुधाकर वैतागला होता. आपण योग्य माणसाकडे आलो आहोत की नाही?, योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण निवडलेला हा आपला रस्ता चुकला तर नाही ना? अशा विविध प्रश्नांनी सुधाकरच्या मनात काहूर उठले होते.
अशा वेळी नकळत सुधाकरच्या तोंडून शब्द आले-
"हे म्हणजे फार झालं! मला तर ही गोष्ट कधीच पचनी पडू शकत नाही!"

सुधाकरच्या या शब्दांनी समुपदेशकांना आपण योग्य ट्रॅकवर आहोत याची खात्री झाली. त्यामूळं ते अधिक खुश झाले होते. हलकीशी शीळ मारुन त्यांनी आपल्या या खुशीला वाट काढून दिली आणि सुधाकरला उद्देशून ते म्हणाले- "आजकालच्या समाजात वेगवेगळ्या प्रकारची माणसं आढळून येत असली तरी त्यांच्यात एक साम्य हमखास दिसतं. ते म्हणजे त्या सर्वांनाच अपचनाची समस्या आहे. त्या सर्वांची पचनक्षमता एक तर खूप कमी झाली आहे किंवा अगदीच नष्ट झाली आहे."

सुधाकरला आपलं बोलणं समजतंय की नाही याचा अधुनमधुन अंदाज घेत समुपदेशक पुढं बोलत राहिले. ते म्हणाले- "सुधाकर, तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून मी तुम्हाला अशा माणसांची काही वैशिष्ठयं सांगतो. आणि हो, सुधाकर, हेही लक्षात ठेवा की, याच माणसांमध्ये तुमचा आणि मी मघाशी ज्याचं नाव घेतलं होतं त्या गंगाधरचाही समावेश होतो."

समुपदेशकांनी सुधाकरशी बराच वेळ संवाद साधला. त्यांच्या बोलण्यातून त्यांनी खालीलप्रमाणे काही सर्वसाधारण मुद्दे परंतु अतिशय ठळकपणे मांडले होते -

१) अलिकडच्या काळात लोकांची सहनशक्ती अत्यंत कमी झाली आहे. त्यांना कोणतीच गोष्ट सहन होत नाही. ते एका जागी थोडा वेळही स्थिर राहू शकत नाहीत. कोणत्याही, अगदी कोणत्याही एका गोष्टीत त्यांचं मन पुरेसं रमत नाही. हे असं घडतं, कारण त्यांचं मन चंचल, अस्थिर किंबहुना सैरभैर झालेलं असतं.

२) एका बाजूला सहनशक्ती कमी होत असताना त्यांच्यातील वहनशक्ती मात्र झपाट्यानं वाढली आहे आणि ती आणखी वाढतच आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंगाचा जराही सारासार विचार न करता अतिशय उथळपणे प्रतिक्रिया दिली जाते. अशी प्रतिक्रिया देताना त्यांचा "Who cares?" किंवा "Who bothers?" म्हणजे "मला काय त्याचे?" असा आत्मकेंद्री व स्वार्थपरायण दृष्टीकोन दिसून येतो.

३) लोकांना दुःख, अपयश, अपमान, नकार या सारख्या गोष्टी मूळीच सहन होत नाहीत. अशावेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सामोरे कसे जायचे? हा प्रश्न त्यांच्यासाठी एक यक्षप्रश्न ठरतो. या यक्षप्रश्नाची सोडवणूक कशी करायची हे त्यांना उमजत नाही. ते गांगारुन जातात, भांबावून जातात. अशा भांबावलेल्या अवस्थेत ते योग्य निर्णय घेवू शकत नाहीत. मग चूकीचे निर्णय घेतले जातात. चूकीच्या निर्णयाचे नको-नकोसे परिणामही त्यांना भोगावे लागतात. हे परिणाम टाळण्याच्या मोहाला बळी पडून काहीजण आधीची एक चूक लपविण्यासाठी आणखी काही नव्या चूका करुन ठेवतात आणि एका दुष्टचक्रात अडकून पडल्यावर ''हे सगळं माझ्याच वाट्याला का?" किंवा "दरवेळी मीच का?" असा टाहो फोडीत बसतात.

प्राप्त परिस्थितीचा आनंदानं स्वीकार केला तर वाट्याला आलेलं कोणतंही दुःख, अपयश, अपमान, किंवा नकार हा भयंकर किंवा भयप्रद वाटत नाही. एकदा भीती नष्ट झाली की आपण शांतपणे परिस्थितीचा गुंता सोडवण्याचे मार्ग शोधू शकतो. 'शोधलं की सापडतंच!' या उक्तीनुसार आपणास मार्गही सापडत जातात. हा परिस्थितीचा गुंता अलगद सुटत जातो. आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपण स्वतःच प्रयत्न केले आणि त्यांना यश आले तर त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. हा अवर्णनीय आनंद तुम्ही नक्कीच मिळवू शकता!

४) जसं काही लोकांना दुःख, अपयश, अपमान, नकार या सारख्या गोष्टी मूळीच सहन होत नाहीत तसं काही लोक असेही आहेत की ज्यांना सुख टोचतं, आनंद झेपत नाही, यश पचवता येत नाही. डोक्यात हवा गेल्यासारखा यांचा वारु बेलगाम उधळतो. त्यांच्याकडे कोणतीच मान- मर्यादा शिल्लक राहात नाही. हे लोक इतरांचा वारंवार पाणउतारा करतात. हटकूनच त्यांच्या भावना दुःखावतात. त्यामूळे लोक त्यांच्यापासून दुरावतात आणि एकटेपण खायला उठतं. असे लोक त्यांना मिळालेल्या मानसन्मान किंवा प्रतिष्ठेबद्दलही साशंक असतात. आपल्या मनातली ही शंका त्यांना हा मानसन्मान किंवा प्रतिष्ठा अंगी लागू देत नाही. साहजिकच त्यांना मिळालेलं सुख, आनंद, यश मानसन्मान, प्रतिष्ठा हे सारं त्यांच्यासाठी निरुपयोगी किंबहुना त्रासदायक ठरतं!

५) इतर कुणाचं चांगलं झालेलं हल्ली अनेकांच्या पचनी पडत नाही! 'मला मिळणार नसेल तर कुणालाच मिळता कामा नये.' असा दुष्ट विचार करणाऱ्या लोकांना इतरांचं सुख, आनंद, यश, मानसन्मान, प्रतिष्ठा, किर्ती यातलं काहीच सहन होत नाही, पचत नाही.

थोडक्यात काय तर अनेक लोकांना स्वतःला मिळालेलं, स्वतःच्या वाट्याला आलेलं यश, अपयश, सुख, दुःख, आनंद, प्रेमातला स्वीकार, नकार, मान, अपमान यातलं काहीच पचत नाही. ते पचविता येत नाही. दुसऱ्यांना मिळालेला आनंद, सुख, यश, मानसन्मान अशा गोष्टीही लोकांना पचत नाहीत, पचविता येत नाहीत; म्हणजेच या लोकांची पचनक्षमता खराब झालेली असते. त्यांची ही पचनक्षमता सुधारणे अतिशय आवश्यक आहे!

इतकं सविस्तर बोलून झाल्यावर समुपदेशकांनी सुधाकरला विचारले -" हं सुधाकर, आता बोला.. तुमची समस्या नेमकी काय आहे?"
सुधाकरनं समुपदेशकांचं बोलणं तल्लीन होऊन ऐकलं होतं. त्याचे डोळे पाण्यानं डबडबले होते. त्याला त्याची समस्या नेमकेपणानं कळली होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या " दरवेळी मीच का?" या अतिशय टोकदार प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं होतं!

समुपदेशकांच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं?
सुधाकर स्वतःशी विचार करु लागला- "मी उगाचच छोट्या छोट्या गोष्टींची भीती का बाळगतोय? समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी 'दरवेळी मीच का?' असं विचारुन मी परिस्थितीपासून पळ का काढतोय? मी प्राप्त परिस्थितीच्या रणांगणात धैर्यानं लढायचं सोडून असं कुढत बसलो तर कसं चालेल? ते काही नाही. आता भ्यायचं नाही. समस्येला पाहून पळायचं नाही. कोणत्याही प्रश्नाला टाळायचं नाही आणि कवटाळायचं तर मुळीच नाही. आता कुढायचं नाही, आता लढायचं! कोणत्याही प्रश्नाच्या आधी त्याच्या उत्तराचा जन्म झालेलाच असतो फक्त त्याचा शोध आपल्याला आपल्या प्रयत्नांनी घ्यायचा असतो. तो शोध मी घेणारच!"

आपण आजवर चुकीच्या पध्दतीने विचार करुन, चूकीचं वागून आपल्याच आयुष्याला बदनाम केलं. आपल्या सुखाची आणि आणि आनंदाची माती केली आहे हे लक्षात आल्यानं सुधाकर लज्जीत झाला होता!

तुमचीही पचनक्षमता अशीच कमी झालीय का? किंवा तुमची पचनक्षमता बिघडलीय का?
जर तुम्हालाही असं वाटत असेल तर सुधाकरसारखा विचार एकदा तुम्हीही करुन पहायला हवा.

© श्री अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel