मारातिरेक-मभियुज्झित-सब्बरंत्ती, घोरम्पनाल वक मक्ख मथद्ध यक्ख । खान्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि
ज्या मुनींद्राने, माराशिवाय समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठुर ह्रदयाच्या आलवक नावाच्या यक्षाला क्षांती आणि संयमाच्या बळाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.
एकदा भगवान बुद्ध आळवी मध्ये आरामांत थांबले होते. तेव्हा आलवक नावाचा निष्ठुर यक्ष त्यांच्या जवळ येऊन म्हणाला,
इथुन चालता हो,,
त्यावर तथागत उत्तरले, मित्रा, मी इथुन जाणार नाही, तुला जे करायचे आहे ते कर.
मी तुला प्रश्न विचारतो, जर तु त्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकला नाहीस तर तुझे पाय पकडुन गंगेच्या पलीकडे फेकीन.
भगवान म्हणाले, माझ्या मित्रा सर्व देवांगणांत, मारांमध्ये, ब्रह्मांमध्ये नाही श्रमण आणि ब्राह्मणांमध्ये असा कोणी जो माझ्या मनापर्यंत पोहोचु शकेल. आणि माझे पाय धरुन मला गंगेच्या पलीकडे फेकु शकेल. पण जाऊदे,, तुला जे काही विचारायचे आहे ते विचार.
आलवक म्हणाला,
•मनुष्याचे श्रेष्ठ धन कोणते?
•कोणते सत्कृत्य त्याच्यासाठी सुखकारक आहे?
•कोणत्या प्रकारच्या आचरणाने त्याचे जीवन श्रेष्ठ होते?
भगवान म्हणाले -
•श्रद्धा हे मनुष्याचे श्रेष्ठ धन होय.
•सद्धम्माचे संपादन केल्यास जीवन सुखकारक होते. सत्य हा सर्वोच्च उद्धारक आहे.
•सन्मार्गाने प्रज्ञापुर्वक वागणाऱ्यांचे जीवन श्रेष्ठ आहे.
आलवक म्हणाला,
• मनुष्य पुरातुन बाहेर कसा निघतो?
• तो अर्णव (समुद्र) कसा पार करतो?
•मनुष्य दुःखाच्या पार कसा जातो?
तो परिशुद्ध कसा होतो.?
भगवान म्हणाले,
• मनुष्य श्रद्धेने पुरातुन पोहुन बाहेर येतो.
• सावधानपणाने अर्णव तरतो.
• उत्साहाने दुःखाच्या पार जातो.
• प्रज्ञेने परिशुद्ध होतो.
आलवक म्हणाला,
• मनुष्य कशाने प्रज्ञा मिळवतो?
• धन कसे मिळवतो?
• किर्ती कशी प्राप्त करतो?
• मित्र कसे मिळवितो?
• कोणता मनुष्य परलोकात गेल्यावर शोक करत नाही?
भगवान म्हणाले,
•अरहंताच्या निर्वाणप्राप्तीच्या धम्मावर श्रद्धा ठेवुन श्रद्धावान व प्रज्ञावंत मनुष्य शुश्रुषेने प्रज्ञा मिळवितो.
• योग्य मेहनत करणारा, धुरा वाहणारा, सत्याने किर्ती प्राप्त करणारा, दानाने मित्र जोडतो.
• ज्या गृहस्थाकडे सत्य, संयम, अहिंसा व दमन हे गुण आहेत. तो परलोकात गेल्यावर शोक करत नाही. हवे असल्यास निरनिराळ्या श्रमण ब्राह्मणांकडे जाऊन विचार श्रेष्ठ, दम, त्याग आणि क्षांति यांच्यापेक्षा श्रेष्ठ या लोकात काय आहे?
यावर आलवक नामक यक्ष म्हणाला, मी निरनिराळ्या श्रमण आणि ब्राह्मणांना कशाला विचारु? जेव्हा तथागतांनी येथेच मला सत्याचे दर्शन घडवुन दिले. मला माझ्या जीवनाचा लाभ समजला आहे.
खरोखरच माझ्या लाभासाठी तथागत आळवीला रहावयास आले, त्यामुळे कोणाला दान दिले असता ते लाभदायक होते हे मला समजले. मी सम्यक संबुद्धाला आणि त्याच्या धम्माच्या सुधर्मतेला नमस्कार करीत गावो गावी आणि शहरो शहरी फिरत राहीन.
धन्य धन्य गौतमा,, आजपासुन मी तुला शरण जातो.
असे म्हणत आलवक भगवान बुद्धांना शरण गेला तेथेच त्याची उपसंपदा झाली.
मारातिरेक-मभियुज्झित-सब्बरंत्ती, घोरम्पनालवक मक्ख मथद्ध यक्ख । खान्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो,
तं तेजसा भवतु ते जयमंगलानि
ज्या मुनींद्राने, माराशिवाय समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठुर ह्रदयाच्या आलवक नावाच्या यक्षाला क्षांती आणि संयमाच्या बळाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या तेजाने तुमचे कल्याण होवो.