सच्चक हा तरूण निर्गंथ दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. तो वादविवादात अतिशय पारंगत बनला होता, त्याला विविध प्रकारच्या विद्या येत होत्या. त्याला ४ मोठ्या बहिणी होत्या त्या सुद्धा त्यांच्या पालकांनी शिकविलेल्या एक हजार विद्यांमध्ये पारंगत बनल्या होत्या. परंतु महास्थाविर सारीपुत्र यांच्यासोबत वादविवादात झालेल्या पराभवामुळे त्यांनी भिक्खुणी संघात प्रवेश केला. आणि खुप कमी वेळात अरहंतपद प्राप्त करुन घेतले. सच्चक हा त्यांच्या भावंडांपैकी सर्वात हुशार होता. त्याने आपल्या पालकांकडुन हजार प्रकारच्या विद्याच नव्हे तर अनेक प्रकारच्या विद्या त्याला येत होत्या. तो आपल्या हुशारीने आंधळा बनला होता. तो लिच्छवीच्या राजकन्येचा शिक्षक म्हणुन वैशालीला रहायचा....
तो स्वतःबद्दल जाहीरपणे सांगायचा कि, मी वादविवादात माझ्यापेक्षा पारंगत या जगात दुसरा कोणी सापडायचा नाही. तो स्वतःला अतिशय विद्वान आणि पवित्र समजायचा. वैशाली शहरात तो जाऊन अशा प्रकारच्या बढाया मारताना तो नागरिकांना म्हणायचा
मी अशा एकाही पंथाच्या नायकाला बघु शकत नाही कि जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मग तो कोणत्या संघाचा नायक असो, कोणता तपस्वी असो, एवढेच नव्हे तर स्वतः सम्यक संबुद्ध सुद्धा असो,, माझ्यासमोर कोणाचे काहीच चालत नाही..
एके दिवशी शहरातुन भटकत असताना त्याने स्थाविर अश्वजीत यांना बघितले. ते भिक्षाटन करत होते. तेव्हा सच्चक अश्वजीत यांना भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाबद्दल विचारले आणि भगवान बुद्धांसोबत वादविवाद करुन त्या वादविवादात त्यांना हरविण्याची इच्छा प्रगट केली.
भगवान बुद्धांच्या अनित्यवाद, अनात्मवाद, दुःख, इत्यादी शिकवणींच्या बद्दल ऐकल्यावर त्याचा असा समज झाला कि,, भगवान बुद्धांसोबत वादविवाद करण्याची हिच योग्य वेळ आहे. त्यानंतर त्याने लिच्छवींच्या सभेमध्ये बुद्धांसोबत वादविवाद करण्याचे जाहीर केले यासाठी लिच्छवींच्या राजकन्येला आपला वादविवादात असलेला दबदबा आपली विद्वानता बघण्यासाठी आमंत्रीत केले.
त्यावेळी भगवान बुद्ध महावन नावाच्या जंगलात असताना सच्चक आपल्या पाचशे अनुयायी व लिच्छवींसह भगवान बुद्धांकडे गेला. भगवान बुद्धांना भेटल्यानंतर काहीशी विचारपुस केली. आणि विशिष्ट विषयावर प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. भगवान बुद्धांनी संमती दिल्यानंतर, त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याला जाणुन घ्यायचे होते कि भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना काय शिकवले. (जेव्हा त्याने स्थाविर अश्वजीत यांच्याकडुन याबाबत माहीती करुन घेतली होती. परंतु त्याला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची लोकांसमोर पुष्टी करायची होती.)
सच्चक म्हणाला,, सम्यक संबुद्धांनी आपल्या शिष्यांना काय शिकवले..?
त्यावर भगवान बुद्ध म्हणतात,, सर्व संस्कार अनित्य आहेत, सर्व वेदना अनित्य आहेत, रुप अनित्य आहेत, संज्ञा अनित्य आहेत, विज्ञान अनित्य आहेत.... हे सच्चका सर्व रुप अनात्म आहेत, वेदना अनात्म आहेत, विज्ञान अनात्म आहेत. संज्ञा अनात्म आहेत, संस्कार अनात्म आहेत., सर्व धर्म अनात्म आहेत.
यावर सच्चकाने प्रतिकार करताना म्हटले कि, ज्याप्रमाणे बी किंवा प्राणी पृथ्वीचा आधार घेवुन वृद्धी प्राप्त करुन घेतात.
ज्याप्रमाणे बळ लागणारी कामे पृथ्वीचा आश्रय घेवुन संपन्न केली जातात. त्याचप्रमाणे पुरुष सुद्धा रुप, वेदना, संज्ञा संस्कार आणि विज्ञान यांचा आश्रय घेऊन पुण्याचे सृजन करुन घेतात. सच्चक पुढे म्हणाला, माझ्या विचारांमध्ये रुप, वेदना, संस्कार, विज्ञान आणि माझा आत्मा आहे.
तेव्हा भगवंत सच्चकाला म्हणाले कि, राजा अजातशत्रु, राजा प्रसेनजीत अथवा अन्य कोणताही राजा आपल्या राज्यातील नागरीकास जिवे मारु शकतो.? जाळु शकतो.? देशाच्या बाहेर हाकलुन लावु शकतो काय.? सच्चक म्हणाला, होय हे संभव आहे. तेव्हा भगवंतांनी त्याला विचारले कि रुप माझा आत्मा आहे, तर हा रुप तुझ्या अधिपत्याखाली आहे काय.? माझा रुप असा असेल, माझा रुप तसा असेल.. हे आपल्या अधिकारात आहे काय.?
यावर पहिल्यांदा सच्चकाने मौन पाळले, दुसऱ्यांदा विचारल्यावरही सच्चक मौन होता. तिसऱ्यांदा विचारल्यावर सच्चक म्हणाला,, नाही भगवान... आपले म्हणने सत्य आहे..
यानंतर त्यान विचारलेल्या अन्य प्रश्नांना भगवंतांनी दिलेल्या उत्तरांचा तो स्वीकार करत गेला.
वादविवादात आपणच महाज्ञानी, सर्वश्रेष्ठ आहोत, हा त्याचा आंधळेपणा आता त्याला दिसु लागला होता.
• वेदना, विज्ञान, संस्कार, संज्ञा हे आपल्या शक्यते पलीकडे आहे.
• रुप अनित्य आहे.
• जो अनित्य आहे, तो दुःख आहे.
• अनित्य, दुःख, परिवर्तनशील आहे, त्याच्याबद्दल विचार करणे योग्य नाही.
• जी स्थीती रुपाची आहे, तिच स्थीती वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान या सर्वांची सुद्धा आहे.
त्यानंतर सच्चक म्हणाला, आपले श्रावक काशाप्रकारे संशयविरहीत, आत्मविश्वासी आणि आत्मनिर्भर होऊन आपल्या शासनात विहार करतात..?
भगवान म्हणाले., माझे श्रावक भुत, भविष्य आणि वर्तमानात शरीराच्या आत किंवा बाहेर, दुर किंवा बाहेर जे काही रुप, वेदना, संज्ञा, संस्कार किंवा विज्ञान आहेत, त्यांना हे माझे नाही, हे मी आहे, नाही हा माझा आत्मा आहे, हे सर्व प्रज्ञेने पाहतात.
यानंतर सच्चक म्हणाला,, भिक्षु कशाप्रकारे, सम्यक ज्ञानाची प्राप्ती करुन अरहंतत्व प्राप्त करुन घेतो..? भगवान बुद्धांनी या प्रश्नाचे उत्तर पहिल्याप्रमाणेच दिले, सम्यक संबुद्धाने प्रभावीत होवुन त्याने भगवान बुद्धांना भिक्षुसंघासहीत जेवणाला आमंत्रीत केले...
सच्चं विहाय मति सच्चक वादकेतुं, वादाभिरोपितमनं अतिअंधभूतं । पञ्ञा पदीपजलितो जितवा मुनिंदो, तं तेजसा भवतु ते जयमंगलाननि
ज्या मुनींद्राने, सत्य सोडलेल्या व असत्यवादाला पोषक, अभिमानी, वादविवाद परायण व अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकास प्रज्ञाप्रदीपाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.