भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो , म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्मे घडवीत असतो . त्याच्या प्ररणेनेच सर्व घडते आहे , अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली , म्हणजे भगवंतावर प्रेम जडते . जे जे काही करायचे ते भगवंताकरिता करावे ; म्हणजे पापपुण्याची बाधा आपल्याला होणार नाही . एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले . घरात तर त्यांना जेवू घालायला काही नव्हते , आणि अतिथीला भगवत्स्वरुप पाहावे असे शास्त्र आहे , तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली . चोरी करणे हे वाईट असले , तरी ती भगवंताकरिता केल्यामुळे तिचे पाप त्याला नाही लागले . निदान , कर्म झाल्यावर तरी भगवंताचे स्मरण करुन ते त्याला अर्पण करावे , म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल .

आपण भगवंताचे आहोत , जगाचे नाही , असा एकदा दृढ निश्चय करावा . आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा . तथापि हे साधणे कठीण आहे . त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे , जे काही घडते आहे ते भगवत्प्रेरणेने , त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडते आहे , अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी . आणि हेही साधत नसेल , तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे . या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते . सध्या आपले उलट चालले आहे ; आपण देहाने पूजा करतो , यात्राबित्रा करतो , पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो . सासरी असलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरिता कष्ट करते ; नवर्‍याचे कदाचित ती फारसे करीतही नसेल , पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते . तसे , प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे , पण मनात मात्र ‘ मी रामाचा आहे ’ ही अखंड आठवण ठेवावी . आपले स्टेशन ठरुन आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील ; उभे राहावे लागेल , निरनिराळ्या तर्‍हेचे लोक भेटतील . पण स्टेशनावर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये मागचे सगळे आपण विसरुन जातो . तसे भगवंताचे ध्येय निश्चित ठरुन आपण अनुसंधानात राहिल्यानंतर प्रपंचातल्या अडचणींना अगदी तात्पुरते महत्त्व येते . ध्येय मात्र आधी निश्चित करावे . भगवन्नाम हे भगवत्कृपेसाठी घ्यावे , कामनापूर्तीसाठी नसावे ; नामच ध्येय गाठून देईल . भगवंताप्रमाणे आपणदेखील , प्रपंचात असून बाहेर राहावे ; आपल्या देहाकडे साक्षित्वाने पाहायला शिकावे . पण ते साधत नसेल , तर व्यापात राहून अनुसंधानात असावे . वाचलेले विसरेल , पाहिलेले विसरेल , कृती केलेली विसरेल , पण अंतःकरणात घट्ट धरलेले भगवंताचे अनुसंधान कधी विसरायचे नाही .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel