घोडदळ हा त्याकाळातल्या लढाईचा आत्मा. मंगोलियन योद्धे घोडय़ावर मोठे होतात असं म्हटलं जायचं. तसाच बाजीराव घोडय़ावर मोठा झाला. तो त्याच्या काळातला सर्वोत्तम घोडेस्वार होता. त्याच्या शिपायांसोबत तो घोडय़ावर सर्वात पुढे असायचा. घोडय़ावरच पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खातखात दौड करीत फाके मारत बाजीराव सैनिकांसह प्रवास करी. त्यांच्यासोबतच राही.
खरं तर आजच्या तरुण पिढीला बाजीरावाच्या तोडीचं एखादं नेतृत्त्वं आज हवं आहे. मात्र बाजीरावच उपेक्षेच्या अंधारात आज हरवला आहे. उत्तर पेशवाईतल्या रंगढंगामुळे बाजीरावाबद्दल बहुजनांना ममत्व नाही. मांस भक्षण करणारा, मद्य प्राशन करणारा आणि मस्तानीसारख्या यवन स्त्रीवर प्रेम करून तिला शनिवारवाडय़ात आणणारा म्हणून उच्च जातीतील लोकांनी या वृत्तीनं शिपाई असलेल्या पेशव्याला उपेक्षित केलं. तसाही पुतळे बांधून वारसा जपला जातोच असं नाही. जातीच्या नाही तर प्रांताच्या संकुचित कुंपणात इतिहासातले सुपरहीरो अडकवले जातात. पण रावेरखेडीस चिरविश्रांती घेणारा राऊ या सगळ्या पलिकडचा होता. तो रणबाँकुरा होता, मुत्सद्दी होता, तडफदार होता, काळजानं हळवा होता. म्हणून पाबळला मस्तानीस कैदेस ठेवल्याच्या बातमीने तो धास्तावला होता.
बाजी रावेरखेडीस दहा दिवस मुक्कामास
होता. इतके दिवस रावबाजी एकाच ठिकाणी कधीच स्थिर नव्हता. इराणचा बादशहा नादिरशहास
धाक घालणारा राऊ घरच्या भेदामुळे खचला. त्यातच त्याला वैशाखातला ऊष्मा भोवला. आणि
त्याने नर्मदातीरावर वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी देह ठेवला. राऊ अधिक जगता तर आज
इतिहास वेगळा असता. पण या झाल्या जर तरच्या गोष्टी.
आजही बाजीरावाची समाधी मराठी मनांना आणि मनगटांना स्फूर्ती देते. मराठय़ांच्या इतिहासाच्या खुणा तशाही लोप पावत चालल्यात. त्यात आता बाजीरावाची समाधीही जलसमाधी घेते आहे. ज्या छत्रसालाने शिवाजी महाराजांच्या वचनाचा हवाला देत ‘जो गति ग्राह गजेंद्र की, सो गति भई है आज, बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज’ अशी हाक दिली होती आणि बाजीने त्या बुंदेलाची लाज राखली होती.
आज माळव्यातल्या आपल्या बाजीचीच लाज राखण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ज्यानं कधी पराभव पाहिला नाही, ज्यानं आपल्या मनगटानं दिल्ली काबीज केली आणि इराणपर्यंतच्या पातशाह्या हलवल्या त्या जगातल्या एकमेव अजेय, अपराजित योद्धय़ाची समाधी बुडिताखाली जातेय आणि आपण सारे या इतिहासाचा आणि परंपरेचा वारसा सांगणारे इथे मनगटं चावत बसलोय. नाही चिरा, नाही पणती या अवस्थेत आणखी एक पराक्रमाचा वारसा अंधाराचा आसरा घेईल, आणि प्राणांची बाजी लावणाऱ्या एका कणखर देशाचं इमान मातीमोल ठरेल.