२६१५

वेदविधि कांही न कळे पाठका । गुणदोष देखा मलीन सदा ॥१॥

दशग्रंथीं ज्ञान होतांचि जाण । निंदितो देखोन भलत्यासी ॥२॥

सर्व ब्रह्मरुप ऐसें बोले वेद । तेथें वादावाद उरला नाहीं ॥३॥

ओऽहं सोऽहं कोऽहं नाहीं ठाव । उगेचि गौरव मिरवी ज्ञान ॥४॥

एका जनार्दनीं ब्रह्माज्ञानासाठीं । हिंडताती कोटी जन्म घेत ॥५॥

२६१६

वेद बोलिला जो जो गुण । तो तो नव्हेची पठण ॥१॥

वेदें सांगितलें न करी । ब्रह्माद्वेषीं दुराचारी ॥२॥

न करा सुरापान । कन्या-गो-विक्रय जाण ॥३॥

ऐसे वेदाची मर्यादा । न कळेचि मतिमंदा ॥४॥

निजमुखें स्वयें बोले वेदु । न करावा परापवादु ॥५॥

एका जनार्दनीं शरण । वेदाचें नोहे आचरण ॥६॥

२६१७

करुनी वेदशास्त्र पठण । निर्धारितां निज ज्ञान ॥१॥

करुनी वेदशास्त्र श्रवण । होय शिश्वोदरपरायण ॥२॥

महा मोहो गिळिला ज्ञाना । शरण एका जनार्दना ॥३॥

२६१८

वेदशास्त्र वक्ता अति निःसीम पाही । सिद्धान्त बोलतां उरीं ठेवी कांहीं ।

लयलक्ष ध्यान मुद्रा दावी आपुलें ठायीं । वेडे वेडे चार करितां मोक्ष न ये हातां ॥१॥

तो खूण वेगळी विरळा जाणें एक । जाणीव ग्रासोनी त्यासी बाणे देख ॥ध्रु०॥

अष्टांग योग जाणे मंत्र तंत्र कळा । प्रबोध भक्तीनें वश्य सिद्धि सकळा ।

वर्म चुकला भाग्यहीन अंधळा । मी कोण हेंचि नेणें कळ त्या विकळा ॥२॥

सिद्धान्त एक निका सावध ऐका । सुखासी मेळवितें वर्म नातुडे फुका ।

भाव धरुनी संतापायीं नाम वोळखा । तैंचे एका जनार्दनीं भेटी देखा ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel