२५७४

येऊनि नरदेहीं वायां जाय । नेणें संतसंग कांहीं उपाय ॥१॥

कली वाढलासे अधम । ब्रह्माण सांडिती आपुलें कर्म ॥२॥

शुद्ध याति असोनि चित्त । सदा नीचाश्रय करीत ॥३॥

देवपूजा नेणें कर्म । न घडे स्नानसंध्या धर्म ॥४॥

ऐसा कलीचा महिमा । कोणी न करी कर्माकर्म ॥५॥

एका जनार्दन शरण । घडो संतसेवा जाण ॥६॥

२५७५

मंत्रतंत्राची कथा कोण । गाइत्री मंत्र विकिती ब्राह्मण ॥१॥

ऐसा कलीमाजीं अधर्म । करिताती नानाकर्में ॥२॥

वेदशास्त्रीं नाहीं चाड । वायां करिती बडबड ॥३॥

एका जनार्दनीं धर्म । अवघा कलीमाजीं अधर्म ॥४॥

२५७६

कलीमाजीं नोहे अनुष्ठान । कालीमाजीं नोहे हवन । कालीमाजीं नोहे पठण । नोहे साधन मंत्राचें ॥१॥

नोहे योगयागाविधी । नसती अंगीं ते उपाधी । वाढतसे भेदबुद्धी । नोहे सिद्धि कोणती ॥२॥

न चले कर्माचें आचरण । विधिनिषेधांचे महिमान । लोपली तीर्थे जाण । देवप्रतिमा पाषाण ॥३॥

न ठाके कोणाचा कोठें भाव । अवघा लटिका वेवसाव । एका जनार्दनीं भेव । जेथें तेथें वसतसे ॥४॥

२५७७

कोणासी न कळे अवघे जहाले मूढ । म्हणती हें गुढ वायां शास्त्र ॥१॥

आपुलाला धर्म नाचरती जनीं । अपीक धरणी पीक न होय ॥२॥

अनावृष्टी मेग न पडे निर्धार । ऐसा अनाचार कलीमाजीं ॥३॥

एका जनार्दनीं नीचाचा स्वभाव । न कळे तया भाव कोण कैसा ॥४॥

२५७८

पंडित शास्त्री होती नीच याती । त्यांचे ऐकताती नीति ते धर्म ॥१॥

स्वमुखें ब्राह्मण न करती अध्ययन । होती भ्रष्ट जाण मद्यपी ते ॥२॥

नीचाचें सेवक करती घरोघरीं । श्वानाचिये परी पोट भरती ॥३॥

एका जनार्दनीं आपुलीं स्वधर्म । सांडुनियां वर्म होती मुढ ॥४॥

२५७९

या पोटाकारणें न करावें तें करिती । वेद ते विकिती थोर याती ॥१॥

नीचासी शब्दज्ञान सांगती ब्राह्मण । ऐकती ब्रह्माज्ञान त्यांचें मुखें ॥२॥

श्रेष्ठवर्ण होउनी नीचकर्म करिती । कांहीं न तें भीती पुण्यपापा ॥३॥

एका जनार्दनीं सांडोनि आचार । करिती पामर नानामतें ॥४॥

२५८०

कलियुगामाजीं थोर जाले पाषांड । पोटासाठीं संत जाले उदंड ॥१॥

नाहीं विश्वास संतदया मानसीं । बोलती वायांविण सौरस अवघा उपहासी ॥२॥

वेद पठण शास्त्रें संभाषे पुराणमत । अवघें बोधोनि ठेविती बोलती वाचाळ मत्त ॥३॥

देव भजन संतपुजन तीर्थ महिमान न कळे मुढ । ऐसें कलियुगीं जाले जाणत जाणत दगडा ॥४॥

एका जनार्दनीं काया वाचा राम जपा । सोपें हें साधन तेणें नोहे पुण्यपापा ॥५॥

२५८१

अल्प ते आयुष्य धन कलीं । मर्यादा हे केली संतजनीं ॥१॥

जनमय प्राण न घडें साधन । नोहे तीर्थाटन व्रत तप ॥२॥

असत्याचें गृह भरलें भांडार । अवघा अनाचार शुद्धबुद्ध ॥३॥

एका जनार्दनीं म्हणोनि । येते कींव । बुडताती सर्व महाडोहीं ॥४॥

२५८२

कोण मानील हा नामाचा विश्वास । कोण होईल उदास सर्वभावें ॥१॥

कलियुगामाजीं अभाविक जन । करती उच्छेदन भक्तिपंथा ॥२॥

नानापरीचीं मतें नसती दाविती । नानामंत्र जपती अविधीनें ॥३॥

एका जनार्दनीं पातकाची राशी । नाम अहर्निशीं न जपती ॥४॥

२५८३

वंदुं अभाविक जन । ऐकावेंक साधन पावन । कलियुगीं अज्ञान । अभाविक पैं होती ॥१॥

न कळे श्रुती वेदशास्त्र । पुराण न कळे पवित्र । ज्ञान ध्यान गायत्री मंत्र । जप तप राहिलें ॥२॥

यज्ञ यागादिक दान । कोणां न कळें महिमान । अवघे जाहले अज्ञान । न कळे कांहीं ॥३॥

लोपले मंत्र औषध । गाईस न निघे दुग्ध । पतिव्रता ज्या शुद्ध । व्यभिचार करिती ॥४॥

ऐसियानें करावें काय । तिहीं ध्यावें विठ्ठल पाय । एका जनार्दनीं ध्याय । विठ्ठल नाम आवडी ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to श्रीसंतएकनाथ गाथा - भाग तिसरा