२१५१

देवासी तो पुरी एक भाव । नेणें वैभव दासाचें ॥१॥

जया चित्तीं जी वासना । तैशीं कामना पुरवणें ॥२॥

नाहीं पडत गोंवोंगुती । आपणचि हातीं करितुसे ॥३॥

एका जनार्दनीं अंकित राहे । तिष्ठत द्वारीं त्याच्या ॥४॥

२१५२

अंगावरी आलिया घाव । अवघा देव निवारी ॥१॥

काया वाचा शरण आतां । नुपेक्षी अनाथा विठ्ठल ॥२॥

मुख्य आधीं पाहिजे भाव । तेणें देव कव घाली ॥३॥

एका जनार्दनीं भावापाठीं । धावें उठाउठी देव मागें ॥४॥

२१५३

महालाभ हाचि आहे । जो या गाये विठ्ठलासी ॥१॥

प्रेमभरीत सदा कंठ । अंगीं बळकट भावना ॥२॥

हेंचि वैराग्याचें सार । वायां कासया वेरझार ॥३॥

एका जनार्दनीं भाव । अवघा पाठीं पोटीं देव ॥४॥

२१५४

समसाम्य सर्वाभुतीं । ज्यासी घडे भगवद्भक्ति ॥१॥

जालिया सदगुरुकृपा । सर्व मार्ग होय सोपा ॥२॥

हृ़दयीं ठसतांचि भावो । प्रगटे देवाधिदेवो ॥३॥

भक्तां भावार्थें विकला । एका जनार्दनीं देखिला ॥४॥

२१५५

झालिया गुरुकृपा सुगम । सर्वत्र ठावें परब्रह्मा ॥१॥

तेथें नाहीं जन्ममरण । भवबंधन असेना ॥२॥

ऐसा धरितां विश्वास । काय उणें मग तयास ॥३॥

एका जनार्दनीं भाव । स्वयें आपणचि होय देव ॥४॥

२१५६

सकळ साधनांचें सार । जनार्दन इतका उच्चार ॥१॥

येणें घडे सर्व कर्म । नको भेदाभेद वर्म ॥२॥

सांडा द्वैताचा भाव । तेणें सर्व दिसें वाव ॥३॥

एका जनार्दनीं भाव । भाव तेथें वसें देव ॥४॥

२१५७

आरशाअंगींक लागतां मळ । मुख न दिसेचि निर्मळ ॥१॥

मळ तो झाडुनि पाहतां । सुख दिसें निर्मळता ॥२॥

पाहतां शुद्धभाव रीतीं । परमार्थ हाचि चित्तीं ॥३॥

एका जनार्दनीं हा विचार । आरशासारिखा प्रकार ॥४॥

२१५८

शुद्धभाव चित्तीं । तरी कांहीं न लगे युक्ति ॥१॥

नलगे आणिक विचार । शुद्ध भाव हाचि सार ॥२॥

भावाविण वांझे । साधनें तीं अवघीं ओझें ॥३॥

एका जनार्दनीं भाव । पाववी अक्षय तो ठाव ॥४॥

२१५९

अभाग्य न भजती भगवंतीं । त्यांसी पृथ्वीं असे जडत्व देती ।

जळें दिधली त्या अधोगती तेजें दिधली त्या संतापवृत्ति ॥१॥

ऐसा कैसोनि भेटे भगवंतु । नरदेहीं मुकले निजस्वार्थु ।

जन्ममरणाचें भोगिती आवर्तु । त्यासी विन्मुख होय हृदयास्थु ॥२॥

वायुनें दिधलें त्या चंचळत्व । नभें दिधलें त्या भावशुन्यत्व ।

महतत्व हरिलें निजसत्व । मायें दिधलें त्या ममत्व ॥३॥

सभाग्य भावें भजती भगवंती । त्यासी पृथ्वी देतसे निज शांती ।

जळें दिधलीं मधुर रसवृत्ती । तेजें दिधली निजतेज प्रभादीप्ती ॥४॥

ऐशा सहजें प्रसन्न होय देवो । जेणें भूतांचा पालटे देहभावो ।

निजीं निजाचा वाढे निर्वाहो । जनीं विजनीं अखंड ब्रह्माभावो ॥५॥

वायु उपरमें दे निश्चळत्व । नभें दिधलें त्या अलिप्तत्व ।

महत्तत्वें दिधलें शोधित सत्व । मायें दिधलें सद्विद्या परमतत्वा ॥६॥

एकाजनार्दनीं निज भक्ति । तैं अलभ्य लाभु होय प्राप्ती ।

भुतें महाभुतें प्रसन्न होतीं । तेणें न भंगें ब्रह्मास्थिति ॥७॥

२१६०

भाव लागला भगवंतीं । हरिरुप पवित्र जगतीं । पाहता कर्माकर्म गति । ब्रह्मास्थिति अखंड ॥१॥

भक्ति म्हणे सोहंशक्ति । सांडिं भवभय आसक्ती । पाहतां निजभाव विरक्ति । सर्वाभूतीं भगवंत ॥२॥

करितां कर्मांचे देहाचरण । कर्म सबाह्म चैतन्य । देहविदेह अवसान । गमनागमन खुंटलें ॥३॥

एकाजनार्दनीं एकपण । अनन्यभावें पैं शरण । जन्ममरणा आलें मरण । ब्रह्मा परिपुर्ण पूर्णत्वे ॥४॥

२१६१

जो जो धरसील भाव । तें तें देईल देव । ये अर्थी संदेह । मानूं नको ॥१॥

भावें भक्ति फळे । भावें देह मिळे । निजभावें सोहळे । स्वानंदाचे ॥२॥

एका जनार्दनीं । भावाच्या आवडी । मनोरथ कोडी । पुरवी तेथें ॥३॥

२१६२

भावेंविण देव नयेचि पै हातां । वाउगें फीरतां रानोरान ॥१॥

मुख्य तें स्वरुप पाहिजे तो भाव । तेणें आकळे देह निःसंदेह ॥२॥

संतसमागम नाम तें पावन । वाचे नारायण हाचि भाव ॥३॥

एका जनार्दनीं सोपा मंत्र राम । गातां जोडे धाम वैकुंठींचें ॥४॥

२१६३

अवघे अवघे ते देव । अवघे अवघे एक भाव ॥१॥

अवघे अवघे प्रेमळ । अवघे अवघे निर्मळ ॥२॥

अवघे अवघे भावाचे । अवघे अवघे प्रेमाचे ॥३॥

अवघा एका अवघा एका । अवघा अवघा जनार्दन एका ॥४॥

२१६४

देवासी तों पुरे । एक तुळशीपान बरें ॥१॥

नाहीं आणिक आवडी । भावासाठीं घाली उडी ॥२॥

कण्या भाजी पान फळे खाय । न पाहे यातिकुळ स्वयें ॥३॥

प्रीतीनें दहींभात । उच्छिष्ट गोवळ्यांचें खात ॥४॥

भक्तिसुखें भुलला हरि । एकाजनार्दनीं निर्धारीं ॥५॥

२१६५

भावें करा रे भजन । भावेंक करा नामस्मरण ॥१॥

भावें जावें पंढरीसी । भावें नाहावें भीमरथीसी ॥२॥

भावें करा प्रदक्षिणा । भावें करा जागरणा ॥३॥

भावें व्रत एकादशी । एका शरण जनार्दनासी ॥४॥

२१६६

आम्हांसी विश्वासी पुरे एक भाव । या विठ्ठलावांचोनि देव न मानो कोण्हा ॥१॥

विश्रांतीचें घर संताचें माहेर । करिती निर्धार वेदशास्त्रें ॥२॥

जनार्दनाचा एका प्रेमें तो आठवी । विठ्ठल साठवी हृदयामाजीं ॥३॥

२१६७

पाउला पाउली चिंतावी माउली । विठाई साउली आदि अंती ॥१॥

नोहे परता भाव नोहे परता भाव । आतुडेचि देव हाति मग ॥२॥

बैसलासे दृढ हृदयमंदिरी । सब्राह्माभ्यंतरीं कोंडोनियां ॥३॥

एकाजनार्दनीं जडला विठ्ठल । नोहें तो निर्बळ आतां कधीं ॥४॥

२१६८

बहु मतें बहु मतांतरें । आम्हा निर्धारें नावडती ॥१॥

अविनाश आहे सुख पंढरीसी । यालागीं तयासी न विसंबो ॥२॥

विठ्ठल देवो जेथे उभे । पुढें शोभे पुंडलीक ॥३॥

एकाजनार्दनीं भ्रमर । कमळ परिकर विठोबा ॥४॥

२१६९

देव प्रसन्न जाला माग म्हणे वहिला । भक्त घरोघरीं विचार पुसों गेला ॥१॥

भाव कीं भ्रांति आळस की भक्ती । विचारुनी व्यक्ति ठायीं ठेवा ॥२॥

अरे हें गुह्मा गोप्य कुडे करुं नये उघडे । तरी द्वारोद्वार पुसुं जाय वेडे ॥३॥

विलंब करितां पहा हो उदास जाला देवो । निवालिया खंती न घाली म्हणे घावो ॥४॥

शिकविलें नायकती वरिलें तें करिती । आपुलेनि कर्में आपण गुंतताती ॥५॥

एकाजनार्दनीं शीतळ भाव । आळसाचें देव दुर्‍हाविला ॥६॥

२१७०

सर्वाठायीं ज्याची सत्ता । तो भक्ताधीन तत्त्वता ॥१॥

ज्याची आज्ञा प्रमाण । बारा अंगुळें विचरे प्राण ॥२॥

आज्ञा ज्याची धडफुडी । पर्वत बैसका न सोडी ॥३॥

ज्याचें आज्ञेविण । पवनु न चाले एक क्षण ॥४॥

जो सर्वांसी आधार । एका जनार्दनीं विश्वभंर ॥५॥

२१७१

भक्त देवातें भजती । देव भक्ती धरी प्रीती ॥१॥

ऐसा एकमेंकांचा ठावो । भक्ताअंगीं देव पहा हो ॥२॥

अलंकार एक सुवर्ण । तैसें नाहीं दुजेपण ॥३॥

एका आर्धी एक पाठीं । एका जनार्दनीं राहाटी ॥४॥

२१७२

एक एकाच्या भावा । गुंतुनीं ठेलेंक अनुभवा ॥१॥

प्रेम न समाये गगनीं । धन्य धन्य चक्रपाणी ॥२॥

उद्धरी पतिता । मोक्ष देतो सायुज्यता ॥३॥

एका शरण जानार्दनीं । उदार हा जगदानी ॥४॥

२१७३

आधी देव पाठीं भक्त । ऐसें मागें आले चालते ॥१॥

हेंहि बोलणेंचि वाव । भक्ता आधीं कैचा देव ॥२॥

भक्त शिरोमणी भावाचा । देव लंपट जाला साचा ॥३॥

भक्तासाठीं अवतार । ऐसा आहे निर्धार ॥४॥

वडील भक्त धाकुला देव । एकाजनार्दनीं नाहीं संदेह ॥५॥

२१७४

सप्रेम करितां भजन । नोहे भावाचें बंधन ॥१॥

भक्तांचे आधीन देवो । नाहीं नाहीं हो संदेहो ॥२॥

भक्तीची एवढी गोडी । वैकुंठाहुनी घाली उडी ॥३॥

भक्तामाजीं देव असे । देवा अंगीं भक्त दिसे ॥४॥

ऐशी परस्परें मिळणी । शरण एका जनार्दनीं ॥५॥

२१७५

देव भक्त दोन्हीं समचि सारखें । पाहातां पारिखें न दिसे दुजें ॥१॥

भक्ताचें अंगें देव असें । देवाचे हृदयीं भक्त वसें ॥२॥

ऐसीं परस्परें मिळणी । शरण एका जनार्दनीं ॥३॥

२१७६

भक्तांवांचुनी देवा । कैचें रुप कैंचें नांवा ॥१॥

भक्तिं धरूनी आवडी । देवा लाविलीसे गोडी ॥२॥

भक्तांवाचुनीं पुसें कोण । देवा नाहीं महिमान ॥३॥

भक्ति करूनि निर्धार । देवा धरविला अवतार ॥४॥

उभयंता नोहे तुटी । एका जनार्दनीं मिठी ॥५॥

२१७७

देव म्हणे भक्तांसी आवडी । मी जाहलों तुमचा गडी ॥१॥

सांगाल तें करीन काम । मजवर ठेवा तुमचें प्रेम ॥२॥

भाव भुज द्यावा । आणिक मज नाहीं हेवा ॥३॥

आवडीनें देव बोले । भक्तांमाजीं स्वयें खेळे ॥४॥

खेळतां गोपाळीं । एका जनार्दनीं गोकुळीं ॥५॥

२१७८

माझा भक्त मज अंतरीं । मी सदा बाहेरी तिष्ठतसें ॥१॥

ऐशी परस्परें खूण । जाणती तें ब्रह्माज्ञान ॥२॥

माझी सायुज्यता मुक्ति । घेउनी बळें मीच होती ॥३॥

सायुज्यापरीस भक्ती गोड । एका जनार्दनीं धरिती चाड ॥४॥

२१७९

बहु बोलाचें नाहीं कारण । मी देह भक्ति आत्मा जाण ॥१॥

माझा देह शरीर जाण । भक्त आंत पंचप्राण ॥२॥

नांदे सहज भक्त आंत । मी देह भक्त देहातील ॥३॥

एका जनार्दनीं भक्त । देवपणा मी भक्तांकित ॥४॥

२१८०

नामरुप मज आणिलें जिहीं । त्यांचिया उपकार नोहें उतराई ॥१॥

भक्तांचे उपकार कशानें फेडीं । यालागीं त्याचें उच्छिष्ट काढी ॥२॥

भक्ताचेनी पालटे येतो गर्भवास । उपकार उतराई नोहे कैसा ॥३॥

एका जनार्दनीं उतराई नोहे । यालागीं भक्तांसी न विसंबें जीवें ॥४॥

२१८१

मज भक्त आवडता फार । ऐसा माझा निर्धार ॥१॥

भक्तांअंगीं मीच वसें । माझा भक्त मजमाजीं असे ॥२॥

मज आणलें नामरुपा । भक्त सखा माझा तो ॥३॥

एकाजनार्दनीं निर्गुण । भक्तें सगुण मज केलें ॥४॥

२१८२

तुमचे अप्रमाण होतां बोल । मग फोल जीवित्व माझें ॥१॥

कासया वागवुं सुदर्शन । नाहीं कारण गदेचें ॥२॥

तुमचा बोल व्हावा निका । हेंचि देखा मज प्रिय ॥३॥

मज यावें उणेपण । तुमचें थोरपण प्रकाशुं द्या ॥४॥

एका जनार्दनीं देव । स्वयमेव बोलती ॥५॥

२१८३

माझा ब्रीदावळी । कदाकाळीं न संडी मी ॥१॥

तुम्हां पडतां अंतर । मज वाटे हुरहुर ॥२॥

तुमची न होते भेटी । मज दुःख पोटीं अनिवार ॥३॥

अंकिता अंकिलोंक तुमचा । एका जनार्दनीं सत्य साचा ॥४॥

२१८४

तुम्हासांठी उणेपण । स्वयें मजलागुन येऊं द्या ॥१॥

प्रतिज्ञा तुमची न्यावी सिद्धि । मधीं उपाधी येऊ नेदी ॥२॥

घेउनी हातीं सुदर्शन । आलें विघ्न निवारी ॥३॥

दारवंटा राखीन तुमचा । एका जनार्दनीं साचा ब्रीद माझें ॥४॥

२१८५

देव गुज सांगे भक्तां । अंकित अंकिता तुमचा मी ॥१॥

तुम्हालागीं अवतार । धरणें साचार मजलागीं ॥२॥

तुम्हां न यावें उणेपण । माझें थोरपण कोण वानी ॥३॥

म्हणोनि गळां घालीं मिठी । एका जनार्दनीं पडली गांठी ॥४॥

२१८६

भावें करितां माझी भक्ति । मी आतुडें भक्ताहातीं ॥१॥

माझें भक्तीपरतें । साधन नाहीं वों निरुतें ॥२॥

माझें भक्तीचें महिमान । भक्त जाणती सज्ञान ॥३॥

एका जनार्दनीं भाव । स्वयें बोलतसे देव ॥४॥

२१८७

जो जो कोणी भजनीं बैसे । तेथे मी दिसे तैसाची ॥१॥

उपासनेचा निर्वाहो । सर्वाभूति देवाधिदेवो ॥२॥

हो कां माझी प्रतिमा मूर्ति । अंतर्ज्योति मी वसें ॥३॥

तेथें करितां भावें भक्ति । एका जनार्दनीं मुक्ति तयासी ॥४॥

२१८८

जे भजती मज जैसे वासना । मीही तया तैसा असे ॥१॥

जयां जैशी पैं वासना । मीहि तैसा होय जाणा ॥२॥

हो का माझी प्रतिमा मूर्ति । आदरें करितां माझी भक्ति ॥३॥

मी जनीं असोनीं निराळा । एकाजनार्दनीं अवलीला ॥४॥

२१८९

मज जे अनुसरले काय वाचा मनें । त्याचें चालवणें सर्व मज ॥१॥

ऋणवई त्यांचा आनंद जन्माचा । जे गाती वाचा कीर्ति माझी ॥२॥

तयांचियां द्वारीं लक्षीसहित । उभा मी तिष्ठत याचकपणें ॥३॥

सर्व जडभारी जाणे योगक्षेम । एकाजनार्दनीं नेम जाणा माझा ॥४॥

२१९०

मजसि जेणें विकिलें शरीर । जाणें मी निर्धारें अंकित त्याचा ॥१॥

त्याचें सर्व काम करीन मी अंगें । पडों नेदीं व्यंगें सहासा कोठें ॥२॥

एका जनार्दनीं त्याचा मी अंकित । राहे पैं तिष्ठत त्याचे द्वारीं ॥३॥

२१९१

सर्व कर्म मदर्पण । करितां मन शुद्ध होय ॥१॥

न्य़ुन तें चढतें जाण । करी संपुर्ण मी एक ॥२॥

माझ्या ठायीं ठेवुनी मन । करी कीर्तन आवडी ॥३॥

मन ठेवुनी माझ्या ठायीं । वसो कोठें भलते ठायीं ॥४॥

एकाजनार्दनीं मन । करा मजचि अर्पण ॥५॥

२१९२

साक्षात्कार होतां । साच बद्धता नुरे तत्त्वतां ॥१॥

माझा होतां अनुभव । कल्पनेसी नुरे ठाव ॥२॥

माझें देखतां चरण । संसारचि नुरे जाण ॥३॥

माझी भक्ति करितां । दोष नुरेचि सर्वथा ॥४॥

सर्वांठायीं मी वसे । एकाजनार्दनीं भेद नासे ॥५॥

२१९३

भाविकांच्या उदकासाठीं । रमा नावडे गोमटी ॥१॥

भाविकांचें उदक घेतां । मज समाधान चित्ता ॥२॥

भाविकांचें उदकापुढें । मज वैकुंठही नावडे ॥३॥

ऐशी भाविकांची गोडी । एकाजनार्दनीं घाली उडी ॥४॥

२१९४

स्वर्ग नरक इहलोक । यांची प्रीति सांडोनि देख ॥१॥

भावें करितां माझी भक्ति । भाविक आपें आप उद्धरती ॥२॥

गव्हांची राशी जोडिल्या हातीं । सकळ पक्कान्न त्याची होतीं ॥३॥

द्रव्य जाहलें आपुलें हातीं । सकल पदार्थ घरां येती ॥४॥

एका जनार्दनीं बोध । सहज घडी एकविध ॥५॥

२१९५

माझा शरणागत न दिसे केविलवाणा । ही तो लाज जाणा माझी मज ॥१॥

एकविध भावें आलिया शरण । कर्म धर्म जाण पूर्ण त्याचें ॥२॥

समर्थाचे मुला काय खावयाची चिंता । तैसें मी त्या तत्त्वतां न विसंबें ॥३॥

एका जनार्दनीं हा माझा नेम । आणीक नाहीं वर्म भावेंविण ॥४॥

२१९६

माझा भक्त मज भीतरीं । मी स्वयें असे तया माझारीं ॥१॥

बहु बोलाचें नाहीं कारण । मी देह तो आत्मा जाण ॥२॥

माझिया भक्तिसी जे लागले । ते तीच होउनी ठेले ॥३॥

एकाजनार्दनीं अभेद । तया हृदयीं मी गोविंद ॥४॥

२१९७

पुजी माझिया भक्तांतें । तेणें संतोष होत मातें ॥१॥

भक्त माझा मी भक्तांचा । ऐसी परंपरा साचा ॥२॥

देवभक्तपण । वेगळीक नाहीं जाण ॥३॥

भक्त जेवितांची धालो । एका जनार्दनीं लाधलो. ॥४॥

२१९८

वमिल्या मिष्टान्ना । परतोई श्रद्धा न धरी रसना ॥१॥

ऐसे आठवितां माझे गुण । मिथ्या ठायीं नसें ज्ञान ॥२॥

जेथें कर्माचे परिपाठीं । हें तों पुन्हा नये गोष्टी ॥३॥

येव्हढें कथेचें महिमान । एका जनार्दनीं शरण ॥४॥

२१९९

भावें करितां माझी भक्ति । विषयवासना जळोनि जाती ॥१॥

चालतां माझे भक्तिपंथीं । सकळ साधनें जळोनि जातीं ॥२॥

माझिया निजभक्ता । न बाधेचि संसारव्यथा ॥३॥

प्रल्हादा गांजिता जगजेठी । मी प्रगटलों कोरडे काष्टीं ॥४॥

द्रौपदीं गांजिती तात्काळीं । कौरवांची तोंडे केली काळीं ॥५॥

गोकुळीं गांजितीं सुरपती । गोवर्धन धरिला हातीं ॥६॥

अर्जुन प्रतिज्ञेचे वेळीं । म्यां लपविला हेळीं ॥७॥

अंबऋषीचे गर्भवास । म्या सोशिलें सावकाश ॥८॥

भक्तचरणींची माती । एका जनार्दनीं वंदिती ॥९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel