२२६५

द्वारकेमाजीं श्रीकृष्ण । एकदा करी देवार्चन । उद्धवें कर जोडोन । केला प्रश्न श्रीकृष्णा ॥१॥

सर्व देवाचा तुं देव । ईश्वर न कळे तुझी माव । शिवणे सर्व ऋषी गणगंधर्व । परी तुं नाकळा सर्वथा ॥२॥

तुम्हीं बैसोनि एकांतीं । काय करितां श्रीपती । हें होतें पुसणें माझे चित्तीं बहु दिवस श्रीहरीं ॥३॥

एकोनी उद्धवाची मात । तया बोले जगन्नाथ । एका जनार्दनीं विनवीत । सावधान परियेसा ॥४॥

२२६६

ऐके उद्धवा प्रेमळा । सांगतों जीवाचा जिव्हाळा । तुं भक्तराज निर्मळा । सुचित्तें ऐके ॥१॥

मी बैसोनी आसनीं । पुजा करितों निशिदिनीं । तें पूय मुर्ति तुजलागुनी । नाहीं ठाउको उद्भवा ॥२॥

जयाचोनि मातें थोरपण । वैकुंठादि हें भुषण । तयाचे पूजेचें महिमान । एक शिव जाणे ॥३॥

येरा न कळेचि कांहीं । वाउगे पडती प्रवाहीं । उद्धवा तुं पुसिलें पाही । म्हणोनि तुज सांगतों ॥४॥

माझे जें अराध्य दैवत । तें कोण म्हणसी सत्य । भक्त माझे जीवेचे हेत । जाणती ते ॥५॥

तयांविण मज आवड । नाहीं कोणता पोवाड । माझा भक्त मज वरपड । काया वाचा मनेंसी ॥६॥

माझें विश्रांतीचें स्थान । माझे भक्त सुखनिधान । काया वाचा मन । मी विकिलो तयांसी ॥७॥

ते हे भक्त परियेसीं । उद्धवा सांगें हृषीकेशी । एका जनार्दनीं सर्वासी । तेंचि वदतसे ॥८॥

२२६७

ऐकोनी कृष्णाचें बोलणे । उद्धव संतोषला तेणें । म्हणें कृपा करुनी मज दाखवणें । भक्तांचे मंदिर ॥१॥

मग धरुनी उद्धवाच्या हात । स्वयें दावी श्रीकृष्णानाथ । आणिकांसी नोहे तें प्राप्त । हरिभक्ताविण ॥२॥

देवें देवघर उघडिलें । सन्मुख उद्धवा बैसविलें । देव सांगतसे वहिलें । तया उद्धवाप्रति ॥३॥

एका जनार्दनीं प्रेम । भक्तांचें ऐकतां नाम । प्राणी होती निष्काम । अहर्निशीं जपतां ॥४॥

२२६८

मुख्य आदिनाथ प्रणवाचें निज । पार्वतीतें बीज उपदेशिलें ॥१॥

सनकसनदंन अत्रि कपिलमुनी । नारदादि शिरोमणी भक्तराज ॥२॥

व्यास आणि वसिष्ठ वाल्मिकादिक । ध्रुव प्रल्हाद देख शिरोमणी ॥३॥

एका जनार्दनीं भक्तांचें महिमान । स्वयें नारायण वाढवीत ॥४॥

२२६९

उद्धव अक्रूर गोपाळ सवंगडे । हनुमंतादिक बागडे भक्त देखा ॥१॥

गुहक बिभीषण नळनीळ देखा । ऐशी भक्तामालिका शोभतसे ॥२॥

एका जनार्दनीं घेतां त्याचें नाम । सर्व हरती कामक्रोधादिक ॥३॥

२२७०

गोपाळ गौळणी शोभती त्या मुर्ती । तें सुख परिक्षिती संतजन ॥१॥

ऐसें अपरंपार भक्त ते असती । स्वयेंचि श्रीपती दावितसे ॥२॥

एका जनार्दनीं भक्ताचा तो मेळ । दावीत सकळ वैभव हरिभक्तां ॥३॥

२२७१

पुढें कालीमाजीं होणार जे भक्त । ते मूर्तिमंत उद्धव पाहे ॥१॥

पाहतां पाहतां समाधि उन्मनीं । गेलासे बुडोनि सुखमाजीं ॥२॥

एका जनार्दनीं नाठवेचि कांहीं । देहीच्या विदेही होउनी ठेलों ॥३॥

२२७२

द्वारकेहुनी धांवणें । केलें पुंडलिकाकारणें ॥१॥

ऐसा कृपाळू उदार । उभा विटेश्यामसुंदर ॥२॥

न बोले म्हणोनि पाहे पुढें । चित्त ठेविलें तिकडे ॥३॥

एका म्हणे जनार्दनीं । धन्य पुंडलिक मुनी ॥४॥

२२७३

नाना अवतार घेशी भक्तासाठीं । कृपाळु जगजेठी म्हनोनियां ॥१॥

मत्स्य कूर्मरुप धरुनियां देवा । साधिलें केशवा भक्तकाज ॥२॥

एका जनार्दनीं भक्ताचा कैवारी । गाती वेद चारी तुम्हांलागीं ॥३॥

२२७४

उतरावया धरा भार । घेतिला अवतार इहीं जगें ॥१॥

ते हें बळिये रामकृष्ण । केलेंक कंदन दैत्यासी ॥२॥

केला जो जो कीर्तिघोष । उच्चारितां निर्दोष होती प्राणी ॥३॥

एका जनार्दनीं कृपाळु । भक्त स्नेहाळू समर्थ ते ॥४॥

२२७५

उतरावया धरा भार । धरीं अवतार कृपाळूं ॥१॥

पाळीतसे भक्तलळा । नोहे वेगळा वेगळीक ॥२॥

जया आवडे जें कांही । देतां न म्हणे थोडें कांहीं ॥३॥

पुरवी इच्छा जैसी आहे । मच्छ कच्छ तयासाठीं होय ॥४॥

ऐसा कृपेचा कोंवळा । एका जनार्दनीं पाहुं डोळा ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel